पुस्तक-बांधणी: कागद, चर्मपत्रे, ताडपत्रे, भूर्जपत्रे इत्यादींवर लिहिलेली वा कोरी सुटी पाने एकत्रित करून आवेष्टनात गुंफलेल्या जुडग्यास ‘पुस्तक’ वा ‘कोडेक्स’ (codex)असे म्हणतात. सुटी पाने गुंफून पुस्तक तयार करण्याच्या प्रक्रियेस ‘पुस्तक-बांधणी’ असे म्हणतात. प्रस्तुत नोंदीत ‘पुस्तक-बांधणी’ याऐवजी नुसता ‘बांधणी’ असाच शब्द वापरला आहे कारण बांधणीच्या सर्व क्रिया वापरूनच नियतकालिके, परीक्षेच्या उत्तरपत्रिका, जमाखर्चाच्या वह्या, दिनदर्शिका रोजनिशी, फाइल, संग्रहिका (ल्बम) इ. तयार करण्यात येतात पण रूढार्थाने त्यांना पुस्तके म्हणत नाहीत. हस्तलिखित वा मुद्रित वस्तू वाचण्याच्या व हाताळण्याच्या सोयीसाठी, त्यांच्या संरक्षणासाठी व टिकवण्यासाठी आणि आटोपशीर जागेत ठेवण्यासाठी बांधणी करण्यात येते. ग्रंथनिर्मितीतील ही अखेरची प्रक्रिया होय. बांधणीकला अस्तित्वात येण्याआधी कागदाच्या अथवा पपायरसाच्या[पपायरस नावाच्या वनस्पतीपासून तयार करण्यात येणाऱ्यालेखन साधनाच्या ® पपायरस] गुंडाळ्या करण्यात येत असत. पूर्वी पुस्तकांसाठी लाकडी फळ्या वापरीत असत व लॅटिन भाषेतील coudex या ‘झाडाचा बुंधा’ या अर्थाच्या शब्दावरून codex हा शब्द प्रचारात आला.

इतिहास: कोडेक्सचा उपयोग सामान्यतः ख्रिस्ती धार्मिक पुस्तकांसाठी केला जात असे. इ.स. पहिल्या शतकाच्या अखेरीचे कोडेक्स प्रकारातील रूढ वाङ्‌मय उपलब्ध आहे. हा प्रकार लोकवाङ्‌मयासाठी इ.स. चौथ्या शतकात वापरण्यात येऊ लागला.

अगदी सुरुवातीला केलेली पुस्तकांची बांधणी कलाकुसरयुक्त होती. अशा बांधणीची पुस्तके चर्चमधील वेदीवर ठेवण्यात येत असत. अशा पुस्तकांपैकी सध्या उपलब्ध असलेल्या पुस्तकांच्या आवेष्टनावर (कव्हरवर) रत्ने, सोने, हस्तिदंत वा भरतकाम अशा साधनांनी जडविलेली व कलाकुसर केलेली आढळून येते. ईजिप्तमधील स्थानिक ख्रिस्ती लोकांच्या कॉप्टिक चर्चमध्ये असलेली पुस्तकेही सुशोभित कातडी वापरून केलेल्या बांधणीची होती. ही पद्धत प्रथमच तेथे वापरण्यात आली. यांपैकी सध्या उपलब्ध असलेल्या आणि आठव्या व नवव्या शतकांतील लाल वा करड्या रंगाच्या शेळीच्या कातड्याचा उपयोग करून केलेल्या पुस्तकांच्या बांधणीचे निरीक्षण केल्यास बांधणीचे तंत्र व पुस्तकावरील सजावट यांत अनेक शतकांपासून भर पडत गेलेली आढळून येते. यावरून बांधणीचे काम अनेक शतकांपूर्वीपासून करण्यात येत होते हेही सिद्ध होते. या काळानंतरच्या यूरोपीय बांधणीशी तुलना करता ही बांधणी फार उच्च दर्जाची असून ती विशिष्ट तंत्र व हत्यारे वापरून तज्ञ कारागिरांकडूनच करण्यात येत असे.

अगदी सुरुवातीच्या इस्लामी बांधणीवर ईजिप्तमधील बांधणी तंत्राचा प्रभाव होता. ही पुस्तके आडवी होती. त्यांच्या आवेष्टनावरील सजावट सामान्य असून त्यासाठी सोन्याच्या पानांचा वापर केलेला नव्हता. अकराव्या शतकात मध्यभागी सुशोभित अंडाकार व चार कोपऱ्यांत त्रिकोणाकृती असलेल्या इस्लामी सजावटीचा वापर प्रथम ईजिप्तमध्ये करण्यात आला. सु. दोनशे वर्षांनंतर मोरोक्कोमध्ये उत्कृष्ट बांधणी होऊ लागली. या पद्धतीने केलेली पुस्तके उभी होती. त्यांच्या आवेष्टनांवर गरम केलेल्या हत्यारांच्या साहाय्याने सोनेरी रंग वा सोन्याची पाने बसवीत असत. चौदाव्या-पंधराव्या शतकात या पद्धतीने कुराणाची बांधणी करण्यात येत असे. पंधराव्या शतकात पर्शियामध्ये (इराणमध्ये) उत्कृष्ट बांधणी होऊ लागली. भौमितिक आकृत्यांऐवजी पानाफुलांची नक्षी याच सुमारास वापरात आली. तसेच काही चित्रे ठशांच्या साहाय्याने आवेष्टनावर उमटविण्याची पद्धत वापरात आली, तर आवेष्टनाच्या आतील भागात विविध रंग आणि तारकाम यांचा उपयोग करण्यात येऊ लागला. अशा प्रकारची बांधणी तुर्कस्तानात करीत असत.

इ.स. १५२५–५० या काळात प्रथमच पर्शियात लॅकरचा उपयोग बांधणीसाठी करण्यात आला. लॅकरच्या साहाय्याने विशिष्ट पुठ्ठ्यांवर वा कातड्यावर नक्षीकाम करीत असत. ही पद्धत पर्शिया व भारत या देशांत लोकप्रिय होती. अद्यापिही पूर्वेकडील देशांत तिचा वापर करण्यात येतो. सोळाव्या शतकानंतर मध्यपूर्वेत बांधणीत म्हणावी तशी सुधारणा झाली नाही.

सातव्या शतकाच्या अखेरीचे स्टोनीहर्स्ट गॉस्पेल हे सेंट कथबर्ट थडग्यात सापडलेले पुस्तक म्हणजे यूरोपीय पद्धतीचे उपलब्ध असलेले पहिले व सुशोभित कातडी बांधणीचे पुस्तक होय. हे पुस्तक म्हणजे कॉप्टिक व इस्लामी बांधणीचे तंत्र वापरून केलेले पुस्तक होय. दहाव्या शतकात उत्तर आफ्रिका-आशियामधील बांधणीपेक्षा वेगळ्या प्रकारच्या बांधणीची पद्धत यूरोपात सुरू झाली. या पद्धतीत बांधणीच्या शिवणी पुठ्ठ्यात ओवलेल्या दोऱ्यांवर करीत असत व त्यावरील नक्षीकाम वेगळ्या स्वरूपाचे असून त्यासाठी पुठ्ठा भिजवून त्यावर गरम हत्यारांनी ते करीत, यालाच ‘ब्लाइंड टूल पद्धत’ असे म्हणतात. जर्मनी व फ्रान्समधील धार्मिक मठांत कॅरोलिंजिअन व ऑटोनिअन पद्धतीच्या बांधणीचा वापर सर्वांत अगोदर करण्यात आला असावा. त्यांची हत्यारे गोलाकार असून ती नाण्याच्या नक्षीकामासारखी होती. चौदाव्या शतकाअखेर ही पद्धत जवळजवळ नामशेष झाली होती. तथापि फ्रान्समध्ये ती काही प्रमाणात वापरात होती. तसेच मुद्रणाचा शोध लागल्यावर या पद्धतीचा वापर सर्व देशांत झाला. याच सुमारास बांधणीतील श्रम कमी करणाऱ्यादोन साधनांचा वापर करण्यात येऊ लागला. पहिले म्हणजे नक्षीकामाची वा कोरीव कामाची पट्टी तयार करणारा रूळ व दुसरे म्हणजे आवेष्टनावर साध्या दाबयंत्राच्या साहाय्याने संपूर्ण नक्षीकाम उमटविणारा ठसा किंवा फलक. पैकी पहिल्याचा वापर प्रथम जर्मनीत करण्यात आला व दुसरे तेराव्या शतकापासून नेदर्लंड्समध्ये वापरात होते. जर्मन भाषा बोलणाऱ्याराष्ट्रांत ‘कट-लेदर’ तंत्राचा वापर बांधणीत करत असत. या तंत्रात चाकूऐवजी अणकुचीदार तीक्ष्ण अशा स्टायलस नावाच्या साधनाच्या साहाय्याने कातड्यावर मुक्तहस्त नक्षीकामाची सजावट करण्यात येत असे. गॉथिक पद्धतीच्या बांधणीचा वापर सोळाव्या शतकाअखेर जर्मनी व पूर्व यूरोपात करीत होते. १४५९ च्या सुमारास उत्तर इटलीत (कदाचित व्हेनिस येथे) सोनेरी बांधणी सुरू झाली. या बांधणीवर विशेषतः आवेष्टनावरील सजावट, हत्यारे, कामातील नाजूकपणा यांवर लेव्हँटमधील (भूमध्य व इजीअन समुद्रांच्या पूर्व किनाऱ्यावरील प्रदेशामधील) बांधणीची छाप पडलेली होती. दक्षिण इटलीत या बांधणीचा प्रसार स्पेनद्वारा मूर लोकांनी केला व तेथून ती पंधराव्या शतकाअखेर हंगेरीत गेली. या कलेत सोळाव्या शतकाअखेर फ्रान्स अग्रेसर होता. अठराव्या शतकाअखेर फ्रान्समधील बांधणी श्रेष्ठ मानली जात होती. याउलट इंग्लिश बांधणीचा दर्जा खालावलेला होता. एकोणिसाव्या शतकात आवेष्टनावर विविध रंगांचा वापर करण्याकडे कल झाला. नक्षीकामात विशेष प्रगती झाली नाही पण त्यात अचूकता मात्र आली. पॅरीसमध्ये विसाव्या शतकात बांधणीच्या तंत्रात बरीच सुधारणा झाली.

 


मध्ययुगीन काळात पुस्तकाच्या पाठीव्यतिरिक्त पुस्तकातील पानांनी बनणाऱ्याइतर कडांना काही वेळा रंग देण्याची पद्धत होती. सोनेरी बांधणीत कडा सोनेरी रंगातच रंगवीत असत. १६५० नंतर इंग्लंडमध्ये कडांवर नक्षीकाम करीत असत. अशी नक्षी पुस्तक बंद असताना दिसे. एकोणिसाव्या शतकाअखेरपर्यंत नक्षीकामाची पद्धत वापरात होती मात्र कडा रंगविण्याची पद्धत अद्यापही काही प्रमाणात प्रचारात आहे.

 बांधणीसाठी विविध यंत्रांचा उपयोग करण्यात येतो. ही यंत्रे वेळोवेळी शोधली गेली. बांधणीतील काही क्रियांसाठी स्वयंचलित यंत्रांचा वापर १९५० पासून करण्यात येऊ लागला. १९६० च्या सुमारास पुस्तकाच्या पाठीला गोलाई आणणारी यंत्रे प्रचारात आली. त्यानंतर बहुतेक सर्व क्रिया स्वयंचलित यंत्रांच्या सहाय्याने करण्यात येऊ लागल्या.

 भारतीय इतिहास: पुरातन व ऐतिहासिक काळांतील भारतीय ग्रंथ सुट्या कागदांवर लिहून ते एकावर एक अनुक्रमाने ठेवीत असत पण ते बांधण्याची कल्पना रूढ नव्हती. काही ग्रंथ मात्र दोरीत ओवलेले आढळतात. ताडपत्रांवर मजकूर लिहून ती पाने अनुक्रमाने एका दोरीत ओवत आणि ही दोरी ओवण्यासाठी ताडपत्रीवर माया सोडत असत.

 भारतात बांधणीची विशेष प्रगती झाली नाही याचे कारण असे की, वाचण्यापेक्षा श्रवणावर व पाठांतरावर जास्त भर दिला गेला. व्यासपीठावर पुराणिकाने बसून पुस्तकाचे एकेक पान हातात घेऊन ते वाचावयाचे व इतरांनी श्रवण करायचे अशी सर्वसाधारण प्रथा होती. संपूर्ण पोथी हातात उचलून घेणे शक्य नसे म्हणून पोथ्यांमध्ये सुटी पानेच असत आणि ती क्रमाने एकत्र ठेवून वरखाली लाकडी फळीने बांधून ठेवीत.

 महानुभाव पंथीय पोथ्या मात्र एका बाजूस आरपार भोके पाडून शिवलेल्या आढळतात. पोथ्यांच्या दोन्ही बाजूंना आधाराकरिता जाड पुठ्ठा असून त्यावर रेशमी कापडाचे वेष्टन चढवून त्या बांधीत असत.

 सातव्या शतकात कुराण व हर्ष राजाचे ग्रंथ चांगल्या तऱ्हेच्या व उत्तम कलाकुसरीच्या बांधणीचे नमुने होते. नवव्या शतकात रजपूत राजांकडे चित्रांचा संग्रह जतन करून ठेवण्यासाठी बांधणी करीत असत. यासाठी नक्षीकाम केलेली लाकडी वा पत्र्याची वेष्टने वापरीत. दहाव्या शतकातील बांधणीचा नमुना बडोदा संग्रहालयात आहे.बऱ्याच संग्रहालयांत दुर्मिळ पुस्तके आहेत आणि त्यांपेकी कित्येकांवर सोनेरी काम केलेले आढळते.

 इंग्रजांचा अंमल सुरू झाल्यावर व भारतात मुद्रणकलेचा प्रसार झाल्यावर इंग्रजी पद्धतीच्या बांधणीचा भारतात प्रसार झाला.

 साहित्य: विशिष्ट प्रकारचे कागद, पुठ्ठे, कापड, कातडे, रेक्झीन, दोरा, तार, खळ, सरस इ. साहित्य बांधणीसाठी वापरतात. आवेष्टनासाठी जाड कागद, पुठ्ठे, रेक्झीन, कातडे, कापड इत्यादींचा वापर करतात, तर आवेष्टनावरील आच्छादनासाठी जाड कागद, पारदर्शक प्लॅस्टिक इत्यादींचा वापर करतात. ‘आसपास’ साठी (आवेष्टनाला लागून असलेल्या आतील पृष्ठांसाठी) जाड, पांढरा अथवा रंगीत नक्षीचा कागद वापरतात. काही वेळा अशा कागदावर बोधचिन्हे वा पुस्तकाशी संबंधित अशी रेखाचित्रे असतात. तसेच काही पुस्तकांवर, पुनर्बांधणीच्या पुस्तकांवर तसेच जमाखर्चांच्या वह्या, नोंद पुस्तके इत्यादींच्या आवेष्टनांवर चिकटविण्यासाठी गुळगुळीत (मार्बल) कागद वापरतात. आवेष्टनाच्या पुठ्ठ्यावर लावण्यासाठी कापड, रेक्झीन वा कातडे वापरतात. शिलाईसाठी दोरा, सुतळी, तार, पट्टी इ. वापरतात.

 घड्या घालण्यासाठी वापरण्यात येणारी पट्टी, दाबयंत्र, विविध करवती, विविध आकाराच्या सुया, सुऱ्याव कात्र्या, गोलाई आणणारे हातोडे, सरसपात्र, ब्रश, शेगडा, कापणी यंत्र, शिवणकामाची चौकट, छिद्रण यंत्र, पिना मारणारी यंत्रे, घड्या घालणारी यंत्रे इ. साधनांचा व यंत्रांचा वापर बांधणीत करण्यात येतो. चिकटविण्यासाठी खळ, डिंक, सरस, पॉलिव्हिनिल सिटेटासारखे आसंजक [→आसंजक] इत्यादींचा उपयोग करतात. यांत्रिक बांधणीत सर्व क्रिया यंत्राने करण्यात येत असल्याने त्या त्या क्रिया करणारी यंत्रे वापरली जातात. यांत्रिक कागदी बांधणीत (पेपर बॅकमध्ये) मुद्रणापासून ते पुस्तक पूर्णपणे तयार होईपर्यंतच्या सर्व क्रिया यंत्रावरच केल्या जातात. स्वयंचलित यंत्रांच्या साहाय्याने जाड पुठ्ठ्याच्या बांधणीतील क्रिया केल्या जातात.


 बांधणीचे प्रकार: पुस्तक-बांधणी तीन प्रकारांनी केली जाते: (१) हातबांधणी, (२) यांत्रिक बांधणी व (३) कागदी बांधणी. यांपैकी शेवटचे दोन प्रकार जास्त प्रमाणात वापरले जातात. तथापि कमी प्रतीच्या पुस्तकांची बांधणी, दुर्मिळ पुस्तकांची बांधणी, कलात्मक बांधणी वा पुनर्बांधणी यंत्राच्या साहाय्याने करणे आर्थिक दृष्ट्या तसेच दुर्मिळतेमुळे परवडत नसल्याने त्यांसाठी हातबांधणीचा वापर करण्यात येतो.

आ.१. पुस्तक-बांधणीत वापरल्या जाणाऱ्या संज्ञा दाखविणारी आकृती : (१) संच, (२) ‘आसपास’चे कागद, (३) गोलाई, (४) शिलाईच्या वेळी वापरण्यात येणारी फीत, (५) पुस्तकाची कड, (६) सरस लावलेली पाठ, (७) शिलाईसाठी केलेली खाच, (८) आसपास चिकटविण्याची जागा, (९) मजबुतीसाठी लावलेले कापड, (१०) कापडावर लावलेली उघडती पट्टी, (११) पाठीचे टोक (टेल बँड), (१२) आवेष्टन, (१३) आच्छादन.

हातबांधणी: दोन्ही बाजूंना छापलेल्या संचाच्या (फॉर्मच्या) अगदी सुरुवातीला येणाऱ्यापानाच्या खालच्या डाव्या कोपऱ्यात अंक पुस्तकाच्या नावाच्या संक्षेपासह टाकलेला असतो, यालाच संचनिर्देशांक (सिग्नेचर्स) असे म्हणतात. अशा संचावर ८,१६,३२ वा अधिक पाने पाठोपाठ छापलेली असतात. संचातील पाने क्रमवार येतील अशा तऱ्हेने संचाची घडी घालतात. घडी घातल्यावर संचनिर्देशांक वरती येतो. पाठोपाठ आठ पानांसाठी दोन घड्या, सोळा पानांसाठी तीन घड्या, बत्तीस पानांसाठी चार घड्या इ. घड्या घालतात. घड्या घालताना छापलेला मजकूर समोरासमोर येतो की नाही हे पाहणे अत्यावश्यक असते. नेहमी उजवीकडून डावीकडे कागद नेऊन व लांबीच्या बाजूस घड्या घालतात. हाताने घड्या घातल्यावर त्या दाबण्यासाठी गुळगुळीत पट्टीचा उपयोग करतात. भरपूर कागदांच्या घड्या घालावयाच्या असतील, तर यंत्रांचा वापर करतात. अशा यंत्रावर एका संचाच्या तीन घड्या याप्रमाणे ताशी २,०००–३,००० संचांच्या घड्या घातल्या जातात. अशा तऱ्हेने एका संचाचा एक गठ्ठा याप्रमाणे संचांचे गठ्ठे तयार करून ते क्रमवार लावतात. तसेच सुरुवातीची पाने, संच व शेवटची पाने तसेच संचांत योग्य जागी चित्रे या क्रमाने गठ्ठे लावतात. यामुळे प्रत्येक गठ्ठ्यातील एक संच क्रमवार घेऊन पुस्तकाचा गठ्ठा तयार करणे सोपे जाते, यालाच ‘जुपणी’ असे म्हणतात. दुहेरी वा तिहेरी पावती पुस्तके तयार करण्यासाठी मधे कोरी पाने घालून केलेल्या जुपणीस एकाआड एक (इंटरलिव्हिंग) जुपणी असे म्हणतात. संचाला घडी घातल्यावर शेवटच्या घडीवर म्हणजे संचाच्या पहिल्या व सोळाव्या पानांच्यामध्ये डॅश (–) सारखी एखादी खूण करतात. या खुणेला ‘कोलेटिंग मार्क’ असे म्हणतात. जुपणीत सर्व संच क्रमावार आलेत की नाही हे या खुणेच्या उतरत्या क्रमावरून ठरविता येते. एखादा संच  राहिला असल्यास वा दुहेरी झाल्यास खुणेचा उतरता क्रम बदलतो. जुपणी झाल्यावर गठ्ठा दाबयंत्राने दाबतात.  दाबयंत्रातून काढल्यावर पुस्तक शेगड्यात घालतात. शेगड्यात घालताना पुस्तकाच्या दोन्ही बाजूंस पुठ्ठे घालतात आणि पुस्तक शेगड्याच्यावर सु. १.२५ सेंमी. इतके ठेवतात. या वेळी पुस्तक सारखे लागले की नाही हे पाहतात. सारखे नसल्यास थापटणीने ठोकून सारखे करतात व मग स्क्रू घट्ट करतात. नंतर करवतीने खुणा करतात. शिलाईचा दोरा ओवण्याच्या खाचा करवत हलक्या हाताने वरवर फिरवून करतात व सुतळीकरिता करावयाच्या खाचा खोलवर करतात. नंतर शेगड्यातून पुस्तक काढतात. पुस्तकावर करण्यात आलेल्या या खाचांमधील अंतराएवढेच अंतर शिलाई-चौकटीवरील सुतळ्यांमध्ये ठेवतात. या सुतळ्या संचांच्या खाचांत बसवून त्यावर शिलाई करतात. या शिलाईला लवचिक शिलाई वा संच शिलाई वा विभाग शिलाई असे म्हणतात. संचाच्या खोल खाचा सुतळीच्या बाजूला येतील अशा प्रकारे संच ठेवतात. सुई उजव्या हाताकडील शेवटच्या गाठीच्या खाचेतून (भोकातून) आत घालून, डावा हात संचाच्या पोटात घालून सुई बाहेर काढतात. सुई बाहेर काढताना सुतळीच्या अलीकडून घेतात व सुतळीच्या बाहेरून पण त्याच भोकातून आत घेतात. अशा प्रकारे सर्व भोकांतून व सुतळ्यांवरून सुई घेऊन डाव्या बाजूकडील गाठीच्या भोकातून बाहेर काढतात. यानंतर दुसरा संच त्यावर ठेवून डाव्या गाठीच्या भोकातून आत घालून व वरीलप्रमाणे सर्व शिलाईची क्रिया करून उजव्या गाठीच्या भोकातून बाहेर काढतात. या ठिकाणी दोऱ्याचे शेवटचे टोक आणि दुसऱ्यासंचातून बाहेर आलेला दोरा यांची गाठ मारतात. अशा प्रकारे सर्व संच शिवतात. या प्रकारची शिलाई मजबुतीच्या दृष्टीने चांगली असते. सर्व संच शिवल्यावर सुतळी काही अंतर सोडून वरून आणि खालून कापतात व तिची टोके सपाट करतात. एकाच वेळी एकापेक्षा जास्त संचांची शिलाई पुढीलप्रमाणे करतात. पहिल्या दोन संचांची शिलाई वर वर्णन केल्याप्रमाणे करतात. यापुढील शिलाईत मात्र फरक असतो. तिसरा संच घेऊन त्याच्या उजव्या गाठीच्या भोकातून दोरा आत घेऊन सुतळीच्या अलीकडून बाहेर घेतात. त्यावर चौथा संच ठेवून सुतळीच्या बाहेरून त्या संचाच्या भोकातून दोरा आत खोचतात व त्याच संचाच्या भोकातून दुसऱ्यासुतळीच्या अलीकडून बाहेर काढून तिसऱ्यासंचाच्या भोकातून सुतळीच्या पलीकडून आत खोचतात आणि तिसऱ्यासंचाच्या गाठीच्या भोकातून बाहेर घेऊन ताणून घेऊन गाठ देतात. या पद्धतीने एकापेक्षा अधिक संच एकाच वेळी दोन वा अनेक सुतळ्यांवर शिवले जातात. सामान्यतः या प्रकारात गाठीपासून मध्यावरचा टाका वर चढत जातो व तेथून उतरत येऊन गाठीच्या भोकातून सुई घेऊन मग गाठ देतात. या प्रकारात शिलाई लवकर होते, दोरा कमी लागतो पण मजबुतीच्या दृष्टीने शिलाई चांगली होत नाही.

  


काही वेळा लवचिक शिलाईसाठी फक्त गाठीच्या जागी करवत मारतात व इतर ठिकाणी पेन्सिलीने रेघा मारतात. या रेघांवरच सुतळी धरून वरच्याप्रमाणे शिलाई करतात. यामुळे सुतळी पुस्तकाच्या पाठीवरच राहते. सुतळीच्या आजुबाजूची जागा भर घालून पाठ एकसारखी करतात व आच्छादनालाच पुस्तकाची पाठ चिकटवितात. भर घालून पाठ एकसारशी न केल्यास पाठीवरची सुतळी उंचावल्यासारखी दिसते व पुस्तक हाताळणीत खराब होते.

 सुतळीऐवजी फीत वापरल्यास शिलाईसाठीच्या करवती फितीच्या बाजूस मारतात. या खाचेच्या साहाय्याने शिलाई सुतळी वापरून करण्याच्या शिलाईसारखीच करतात पण यात गाठ फितीवर येते. या शिलाईत एका वेळी एकच संच शिवल्यास शिलाई मजबूत होते. दोन वा अधिक संच शिवल्यास ती मजबूत होत नाही. फितीवरची शिलाई यंत्रावरही करता येते. खातेवह्या, बँक लेजर्स इत्यादींसाठी फितीऐवजी चामड्याच्या पट्टीवर शिवतात. सर्वसाधारणतः फितीवरच्या शिलाईसारखीच ही शिलाई असते. यात शिलाईबरोबर मजबुतीलाही महत्त्व असते.

 स्टेपल यंत्राने ८० पाठपोट पानांपर्यंत पोटात वा वरून पिना मारतात. यासाठी हाताने वापरावयाची स्टेपल यंत्रे वापरतात. तसेच पायांनी चालविता येणारी स्टेपल यंत्रे उपलब्ध आहेत. अशा यंत्रावर सु. ६–२५ मिमी. जाडीच्या पुस्तकाला पिना मारता येतात. यापेक्षा जास्त जाडीच्या पुस्तकांसाठी मोठी व यांत्रिक शक्तीवर चालणारी यंत्रे वापरतात. पुस्तकाच्या जाडीनुसार २२, २४ वा २६ गेजची तार पिनांसाठी वापरतात.

आ.२. हातबांधणीतील शिलाईची क्रिया : (अ) शिलाई करण्यापूर्वी शेगड्यात पुस्तक ठेवून दोऱ्यांची शिलाई व सुतळीसाठी करवतीने खाचा करण्याची क्रिया (आ) शिलाई-चौकट : (१) सुतळी, (२) संच (इ) शिलाई-दाबयंत्रावरील शिलाई : (१) संच, (२) सुतळी, (३) शिवलेल्या दोऱ्याची स्थिती.

शिलाईची आणखी एक पद्धत म्हणजे शिवण यंत्रावरच पुस्तके शिवणे. विशेषतः लहान मुलांची पुस्तके या पद्धतीने आवेष्टनासहित शिवतात. अशी पुस्तके फार काळ टिकत नाहीत.

 सुतळीवर शिलाई केल्यावर दोन्ही बाजूंना थोडा भाग ठेवून सुतळी कापतात. सुतळीची ही टोके हातोडीने ठोकून सपाट करतात. यानंतर पुस्तक परत शेगड्यात घालून फळी ठेवून पाठ हातोडीने ठोकून शिलाईने आलेला फुगवटा दाबतात. नंतर पुस्तकास दोन्ही बाजूंनी (वरती व खालती) ‘आसपास’चा कागद लावतात. यानंतर पुस्तक उरलेल्या तीन बाजूंनी कापतात. नंतर पाठीला सरस लावतात, काही वेळा त्यावर अस्तर लावतात व वाळल्यावर परत शेगड्यात धरून विशिष्ट प्रकारच्या हातोडीने गोलाई आणतात. पाठीला लावावयाचे अस्तर लवचिक असणे जरूर असते. कारण पुस्तक उघडल्यावर ते अंतर्गोल होते. अस्तर लवचिक नसल्यास पुस्तक उघडण्यास वा मिटण्यास त्रास होतो. काही वेळा पाठीच्या उजव्या व डाव्या बाजूंवर रेशमी वा तत्सम कापड लावून ते पुस्तकाच्या शिलाईशी शिवतात. यानंतर दाबयंत्राने पाठीच्या दोन्ही (वरच्या व खालच्या) बाजूंस दाब देऊन कंगोरे आणतात. हे कंगोरे विशिष्ट हातोडीने योग्य आकार देऊनही आणतात. या कंगोऱ्यांमुळे आवेष्टनाचा पुठ्ठा सुलभ रीत्या उघडता व बंद करता येतो.

यानंतर कठीण पुठ्ठा आवेष्टनासाठी वापरतात. पुस्तकाच्या पाठीवरील सुतळ्यांची टोके ह्या पुठ्ठयांच्या भोकांतून ओवून वर घेतात व सुतळीची टोके चिकटवितात आणि भोके ठोकून सपाट करतात. फीत वापरली असेल, तर एक पातळ व एक जाड असे दोन पुठ्ठे आवरणासाठी वापरतात आणि या दोन पुठ्ठ्यांत फीत घालून दोन्ही पुठ्ठे एकमेकांना चिकटवितात. काही वेळा पाठीच्या उजव्या व डाव्या बाजूला तयार रेशमी गोठ लावून रेशमी दोऱ्याने पुस्तकाच्या पहिल्या शिवणीला धरून चिकटवितात वा शिवतात. तसेच या वेळी पुस्तकात खूण म्हणून ठेवण्यासाठी वापरण्यात येणारा रेशमी गोफ घालतात. यानंतर सर्व पाठ प्रथम कागदाने व क्वचित नंतर कापडाने झाकतात. कापड वा कागद याचा थोडा भाग पुठ्ठ्याला चिकटवितात व त्यावर छापील कागद चिकटवितात. हा कागद उरलेल्या तीन बाजूंनी आत दुमडतात आणि पुठ्ठ्याच्या आतल्या भागाला चिकटवितात व त्यावर ‘आसपास’चा कागद चिकटवितात आणि पुस्तक दाबयंत्राने दाबतात.

 यानंतर पाठीव्यतिरिक्त इतर तीन बाजू विविध प्रकारे (रंगात बुडवून, फवाऱ्याने रंग उडवून इ.) रंगवितात. तसेच डिक्शनरीसारख्या पुस्तकांना वा जमाखर्चाच्या वह्यांना मुख्य कडेवर अंगुष्ठ सूची (विभाग वा अक्षरानुक्रमे भाग दर्शविणाऱ्यानखाच्या आकाराच्या खाचांनी तयार केलेली सूची, थंब इंडेक्स) करण्यात येते.

काही वेळा संपूर्ण कागदी आवरणे आधीच तयार करतात व ती पुठ्ठ्याला चिकटवितात. सर्व पुस्तक तयार झाल्यावर त्यावर ⇨ ग्रंथवेष्टन (बुकजॅकेट) घालतात. ही ग्रंथवेष्टने पुठ्ठ्याच्या आतील बाजूला काही वेळा चिकटवितात, अन्यथा ती मोकळी असतात.

 पुठ्ठयावर कातडे वापरावयाचे असल्यास कातड्याच्या कडा आतील बाजूंनी तासून पातळ करतात. त्यामुळे पुठ्ठयाची जाडी वाढत नाही. तसेच पुस्तकाच्या बिजागरीसारख्या भागाजवळचेही कातडे तासतात त्यामुळे पुस्तक उघडण्यास त्रास होत नाही. मात्र जास्त तासल्यास कातडे लवकर खराब होते. कातडे खळीने पुठ्ठ्याला चिकटवितात व कडा दुमडतात. खळीतील पाण्यामुळे कातडे मऊ होते त्यामुळे ते घट्ट बसविणे व त्यावर शिक्के मारणे (ब्लाइंड टूलिंग) सोपे जाते आणि त्याला पाहिजे तसा आकार देता येतो. कातडे वाळल्यावर आत दुमडलेल्या कडा कापतात व मधली मोकळी जागा पातळ पुठ्ठ्यांनी भरतात व त्यावर ‘आसपास’ चा कागद चिकटवितात.

 पाठीवर योग्य तापमानाच्या गरम हत्यारांच्या साहाय्याने अक्षरे, पाठ साधारण ओलसर करुन कोरतात. प्रत्येक अक्षरासाठी वेगवेगळे हत्यार वापरतात. जर अक्षरे सोनेरी हवी असतील, तर कोरलेल्या अक्षरांवर प्रथम अंड्यातील पांढरा बलक लावतात व त्यावर सुवर्णपान ठेवून परत गरम हत्यार फिरवितात. आता सुवर्णपानाऐवजी त्याच्याशी सदृश्य असा सोनेरी कागद वापरतात. हत्याराच्या उष्णतेने बलक सोन्यासह चिकटतो व जादा झालेले सोने खरवडून काढतात, यालाच ‘गोल्ड टूलिंग लेटरिंग’ म्हणतात. बांधणीवर हत्यारांनी कोरीवकाम करावयाचे असल्यास प्रथम पातळ आणि चिवट कागदावर नक्षी काढतात. अंतिम संस्कार करावयाच्या हत्यारांनी कागदावरील नक्षी कातड्यावर उमटवितात. ही हत्यारे विविध आकारांची असून त्यांवरही कोरीवकाम केलेले असते. फिरत्या पितळी चाकाचा उपयोग लांब रेषा काढताना करतात. बोधचिन्हे, स्मृतिचिन्हे इ. मोठ्या आकृत्या ठशाच्या साहाय्याने उमटवितात. काही वेळा नक्षीकामासाठी रंगीत कातडे वापरले जाते व काही वेळा ठशांऐवजी हत्यारेच वापरली जातात. काही वेळा बांधणीत कोपऱ्यांसाठी वा कडांसाठी धातूचे कोपरे वा कडा वापरतात. आवेष्टनावर याच पद्धतीने नक्षी, बोधचिन्हे इ. उमटवितात.


बांधणीत नक्षीकामाला महत्त्व आहे व ती कला बऱ्याच कष्टाने साध्य होते. यासाठी योग्य सामग्री व पद्धती वापरावी लागते. चांगल्या प्रकारच्या हातबांधणीचे पुस्तक अनेक शतके टिकते.

 यांत्रिक बांधणी: पुस्तकांच्या वाढत्या मागणीमुळे आणि त्यांच्या महोत्पादनामुळे  बांधणीमध्ये शक्यतो हातांचा वापर कमी करता येईल याकडे लक्ष वेधले गेले. यातूनच बऱ्याच यंत्रांचा शोध लागला व त्यांचा वापर बांधणीत होऊ लागला आणि यांत्रिक बांधणीचा उदय झाला. अलीकडच्या काळात बांधणीकरिता स्वयंचलित यंत्रांचा वापर अधिकाधिक होऊ लागला आहे. यांत्रिक बांधणीचे प्रकार पुढीलप्रमाणे आहेत: (१) कठीण पुठ्ठ्याची बांधणी, (२) कागदी बांधणी, (३) स्प्रिंग, सळई इत्यादींच्या साहाय्याने केलेली बांधणी,यांत्रिक बांधणीतील बहुतेक क्रिया थोड्याफार फरकाने हातबांधणीसारख्याच आहेत.

कठीण पुठ्ठ्याची बांधणी: यालाच कठीण आवेष्टन बांधणी किंवा ‘केस (case)बांधणी’ म्हणतात. संच मोठ्या प्रमाणावर असतील, तर त्यांच्या घड्या घालण्यासाठी यंत्रे वापरतात. ६४ पानांचा संच असल्यास यंत्राने तासाला सु. २,०००–३,००० संचांच्या घड्या घातल्या जातात. काही मुद्रण यंत्रांबरोबरच घड्या घालण्याचे कार्य करणारे यंत्र जोडलेले असते, त्यामुळे एकाच वेळी छपाई व घड्या घालणे या क्रिया होतात. घड्या घातल्यावर एकेका संचाचे गठ्ठे करतात व संचाच्या आकाराच्या पुठ्ठ्यावर ठेवून वरती आणखी एक पुठ्ठा ठेवून दाबयंत्राने दाबून गठ्ठे बांधतात. यामुळे पानांमधील हवा निघून जाते. यानंतर प्रत्येक गठ्ठ्यातील एकेक संच घेऊन ते यंत्राच्या साहाय्याने अनुक्रमे लावले जाऊन पुस्तकाचा साचा तयार होतो. त्यानंतर मध्ये घालावयाची चित्रे, नकाशे इ. कागद मात्र योग्य जागी हातानेच घालावे लागतात. पुस्तकाच्या साच्याच्या आधी व शेवटी ‘आसपास’चे कागद स्वयंचलित यंत्राने लावले जातात. अशा यंत्राने सामान्यतः पाच हजारपर्यंत ‘आसपास’चे कागद लावले जातात. सर्व संच क्रमवार लावण्याचे काम यंत्राने केले जाते. अशा यंत्राने मिनिटाला १२० पुस्तकांचे संच एकत्रित केले जातात. जास्त हाताळल्या जाणाऱ्यापुस्तकांच्या पाठीला लिननचे कापड वा कागद लावून त्यांना जास्त टिकाऊपणा आणतात. त्यानंतर सर्व संच शिवले जातात. यासाठी काही वेळा त्यांना पिनाही मारल्या जातात. पुस्तके शिवणाऱ्यायंत्रात बऱ्याच सुधारणा होत जाऊन १९६० च्या सुमारास अर्धस्वयंचलित व पूर्ण स्वयंचलित शिवण यंत्रांचा शोध लागला. यानंतर पाठीला एक चिकटपट्टी यंत्रानेच लावली जाते. बाजूने शिवणाऱ्यायंत्राने पुस्तकाला प्रथम भोके पाडली जातात व त्यांतून दोरा ओवून पुस्तक शिवले जाते. संदर्भ ग्रंथ, विश्वकोष (एन्सायक्लोपीडिया) यांसारखी मोठ्या आकारमानाची पुस्तके बाजूंनी शिवली जात नाहीत.

 दोराविरहीत बांधणी १९५० नंतर प्रगत झाली. या पद्धतीत संचाच्या पाठीची बाजू कापतात व तीवर गरम वा थंड सरस लावून त्यावर लिननचे कापड लावतात. ही पद्धत कादंबऱ्याव सर्वसामान्य साधी पुस्तके यांच्यासाठी वापरतात. एकाच वेळी विविध प्रकारचे कागद वापरणाऱ्यापुस्तकांसाठी ही पद्धत सामान्यतः वापरली जात नाही.

 यानंतर पुस्तके एकाच जाडीची व्हावीत व पाठ मोठी दिसू नये म्हणून ती दाबतात. यासाठी विविध प्रकारांची दाबयंत्रे वापरली जातात. कागदाच्या प्रकारानुसार व पुस्तकाच्या स्वरूपानुसार विविध दाबयंत्रे वापरली जातात. कादंबरीसारख्या पुस्तकांसाठी ‘निपिंग’ यंत्रे तर बायबलसारख्या पुस्तकांसाठी ‘स्मॅशिंग’ पद्धतीची यंत्रे वापरतात. पुस्तकाच्या पाठीचा फुगवटा कमी करण्याच्या क्रियेला ‘निपिंग’ व पुस्तकातील हवा दाबाने बाहेर काढून टाकून ते सगळीकडून एकसारखे करण्याच्या क्रियेला ‘स्मॅशिंग’ म्हणतात.

आ. ३. यंत्राच्या साहाय्याने आवेष्टन तयार करण्याची पद्धत : (१) पुठ्ठा, (२) पाठीची पट्टी, (३) कागद, कापड, कातडे वा रेक्झीन, (४) बाजूचा कागद दुमडण्याची क्रिया, (५) पाठीला लंब असणाऱ्या कागदाच्या कडा दुमडण्याची क्रिया, (६) सपाट स्थितीतील तयार झालेले आवेष्टन, (७) मधल्या पट्टीवर पुस्तकाच्या जाडीनुसार घडी घातलेले अंतिम आवेष्टन.

यानंतर पाठीव्यतिरिक्त इतर तीन कडा यंत्राने कापतात. पूर्वी एका वेळी एकच कड एकाच करवतीने कापली जात असे. हल्ली एकाच वेळी तीन कडा कापणारी तीन करवतींची यंत्रे वापरली जातात. एकाच वेळी १०–१५ सेंमी. जाडीचे १५–२५ गठ्ठे प्रती मिनिटास यंत्रावर कापले जातात. गठ्ठे एका बाजूने यंत्रात जाऊन दुसऱ्याबाजूने ते कापून बाहेर पडावेत अशी सोय केलेली असते. यानंतर पुस्तकाच्या पाठीला यंत्राने सरस लावतात. काही यंत्रांत निपिंग व सरस लावणे ह्या क्रिया एकाच वेळी केल्या जातात. यानंतर काही वेळा कडांना यंत्राच्या साहाय्याने रंग देतात. यानंतरची क्रिया म्हणजे पाठीला गोलाई आणणे १९६० च्या सुमारास अशी गोलाई असणारी विविध यंत्रे वापरात आली. या यंत्रांमुळे पाठीला गोलाई येऊन पुस्तक सुलभपणे उघडता-मिटता येते. मिनिटाला सु. ४० पुस्तकांना यंत्राने गोलाई आणता येते. यानंतर शब्दकोशासारख्या पुस्तकांना यंत्राने अंगुष्ठसूची करतात. जाड पुठ्ठा आणि कागद, कापड वा कातडे यांच्यापासून योग्य आकाराचे आवेष्टन यंत्रानेच करतात. या यंत्रात एका बाजूने आवेष्टनासाठी लागणारे साहित्य घातले जाऊन दुसऱ्याबाजूने आवेष्टन तयार होऊन बाहेर पडते. ही क्रिया आ.३ मध्ये दाखविल्याप्रमाणे होते. तयार झालेल्या आवेष्टनावर सजावट व अक्षरे काढतात. काही वेळा पुठ्ठ्याला कागद चिकटविण्यासाठी कागदावर जरूर त्या सर्व गोष्टी छापून घेतात व मग असा छापलेला कागद पुठ्ठ्यावर चिकटवितात. अक्षरे व सजावट काढण्यासाठी शीत व

उष्ण पद्धतींचा वापर केला जातो. आवेष्टनासाठी लागणारे पुठ्ठे कापणारी यंत्रे अचूक शीघ्र गतीने फिरतात. कापड कापणारी यंत्रे वेगळी असतात. आवेष्टन तयार झाल्यावर त्यात पुस्तक घालण्यासाठी अर्ध वा पूर्ण स्वयंचलित यंत्राचा वापर करतात. दोन रुळांच्या साहाय्याने पुस्तकाच्या ‘आसपास’च्या कागदाला व पाठीला आसंजक वा सरस लावतात. आवेष्टन गरम रुळांच्या साहाय्याने तापवितात, त्यामुळे त्याला पुस्तकाचा योग्य तो आकार येतो. नंतर पुस्तकाचा आसंजक लावलेला भाग आवेष्टनाला यंत्रानेच चिकटवितात व चिमट्यात आवेष्टनासह पुस्तक पकडले जाऊन त्यावर यंत्राने दाब दिला जातो व ते गरम रुळातून पाठविल्यास पुस्तक तयार होऊन बाहेर पडते. विविध तापमानांना अशा पुस्तकांचा आकार बदलत नाही. अर्धस्वयंचलित यंत्राचा वापर केल्यास पाठीला सरस व पुठ्ठ्याला खळ लावतात व यातून ‘घट्ट पुठ्ठा बांधणी’ची पुस्तके तयार होतात.

 बांधणीत चुका आढळल्यास दुरुस्त करता येतात. मात्र त्यातील मजकुरातील चुका दुरुस्त करणे अवघड असते. सर्वांत शेवटी पुस्तकाच्या आवेष्टनावर प्लॅस्टिकचे वा कागदी वेष्टन यंत्रानेच घातले जाते.


इ.स. १९५० च्या सुमारास स्वयंचलनाचा उपयोग बांधणीत करण्यात येऊ लागला. वाहक पट्ट्याच्या उपयोगामुळे बांधणीतील विविध क्रियांची यंत्रे एकमेकांना जोडता येऊ लागली. १९६० च्या सुमारास पुस्तक-बांधणीच्या सर्व क्रिया स्वयंचलनाने करता येऊ लागल्या. त्यामुळे छपाईनंतर खंड न पडता स्वयंचलित यंत्रांच्या साहाय्याने पुस्तक बांधले जाऊ लागले.

 मऊ पुठ्ठ्याची बांधणी: यालाच ‘पेपरबॅक’ वा कागदी बांधणी असे म्हणतात. १९३५ नंतर या बांधणीचा वापर करण्यात येऊ लागला. दुसऱ्यामहायुद्धाच्या काळात पुस्तकांच्या निर्मितीचा खर्च भरमसाठ वाढला व सैनिकांना अल्प किंमतीत पुस्तके मिळावीत म्हणून कागदी बांधणीचा प्रसार मोठ्या प्रमाणावर झाला. या पद्धतीत छापलेले सर्व संच एकत्रित केल्यावर व त्यांच्या वर-खाली ‘आसपास’चे कागद घातल्यावर पुस्तकाच्या चारी कडा कापतात व पाठीला सरस लावून त्यावर आधी छापलेले जाड कागदाचे  वा पातळ पुठ्ठ्याचे आवरण घालतात आणि आवश्यकतेनुसार त्यावर वेष्टन घालतात. कागदी बांधणीसाठी यंत्राचा वापर केला जातो. अशा यंत्रात एका बाजूने छापलेले कागद आत जाऊन दुसऱ्याबाजूने मिनिटाला सु.२०० पर्यंत पुस्तके बांधून बाहेर पडतात. या पद्धतीतील सर्व क्रिया जवळजवळ जाड पुठ्ठ्याच्या बांधणीसारख्या असतात.

 स्प्रिंग, सळया, कड्या इत्यादींच्या साहाय्याने बांधणी: काही पुस्तके आवेष्टनात स्प्रिंग, कड्या, सळया, पट्ट्या इत्यादींच्या साहाय्याने बांधण्यात येतात. आवेष्टनाला स्प्रिंग, कड्या, इ. घट्ट धरून ठेवण्याची योजना केलेली असते. या योजनेमुळे क्रमशः प्रकाशित होणाऱ्यानियतकालिकांचे व तत्सम साहित्याचे पुस्तक तयार करणे सोईचे होते. सामान्यतः प्लॅस्टिकच्या स्प्रिंगा, तसेच लोखंडी, ल्युमिनियम वा प्लॅस्टिकच्या सळया, पट्ट्या, कड्या इ. वापरल्या जातात. छापलेल्या कागदाच्या पाठीकडील बाजूला आवश्यक ती व योग्य आकाराची भोके पाडतात व नंतर त्यातून पट्ट्या, सळया, स्प्रिंग इ. ओवून बांधणी करतात. काही वेळा आवेष्टनासह कागदांना भोके पाडली जाऊन स्प्रिंग इ. ओवून पुस्तके तयार करतात.

व्यापारी कामाची बांधणी: पुस्तकांशिवाय इतर काही बाबींसाठीही बांधणीचा उपयोग करण्यात येतो. यामध्ये रोजकीर्द, रोजमेळ इ. जमाखर्चाच्या वह्या, विविध प्रकारच्या वह्या, विविध प्रकारची पावती पुस्तके, चिकट पुस्तके, दैनंदिनी, दिनदर्शिका, विविध प्रकारच्या संग्रहिका इत्यादींचा समावेश होतो. पावती पुस्तके, दुहेरी वा तिहेरी पुस्तके, चिकट पुस्तके इत्यादींमध्ये योग्य ठिकाणी छिद्र पाडणे अत्यावश्यक असते. यासाठी एका ओळीत सुया असलेल्या छिद्रण यंत्राचा उपयोग करतात. अशा कागदांवर क्रमांकयंत्राने क्रमांक घालतात. दुहेरी, तिहेरी,  इ. पावती पुस्तकांवर दुहेरी वा तिहेरी स्वरूपानुसार क्रमांक घालतात व आवश्यकतेनुसार बाजूला वा वरती एक कागद सोडून बांधणीसाठी माया सोडून छिद्रे पाडतात आणि नंतर शिवून बांधणी करतात. अशा प्रकारच्या बांधणीला खालती जाड पुठ्ठा असून तो शिवणीतच घेतात वा त्याच्यासह पाठीला आसंजके लावून त्यावर व वरती सामान्यतः तपकिरी रंगाचा कागद (ब्राऊन पेपर) आवेष्टन म्हणून लावतात. रोजनिशी, जमाखर्चाच्या वह्या इ. हातबांधणीप्रमाणे शिवतात व पाने कमी असल्यास पिना मारतात. दिनदर्शिकेची पाने एकत्र करून ती एकमेकांना सरसाने चिकटवितात वा शिवतात. कधी कधी तिच्या वरच्या बाजूस कथिलाच्छादित पत्र्याची पट्टी मारतात. व्यापारी कामाच्या बांधणीत स्वच्छता, कौशल्य व नीटनेटकेपणा यांना महत्त्व आहे.

 पुनर्बांधणी : यालाच ‘ग्रंथालयीन बांधणी’ असेही म्हणतात. ग्रंथालयात येणारी पुस्तके व्यवस्थित हाताळली जात नाहीत म्हणून ही पुस्तके परत बांधून घ्यावी लागतात. सामान्यतः आवेष्टने निघतात वा पुस्तकांची शिलाई तुटते. अशी पुस्तके प्रथम काळजीपूर्वक सोडवून घेतात. पुस्तक सोडविताना पाने फाटणार नाहीत याची काळजी घ्यावी लागते. आवेष्टन पुस्तकापासून अलग केल्यावर पाठीवरून ओले फडके फिरवितात. त्यामुळे सरस ओला होतो, तो अलगद खरडता येतो व शिलाईचा दोरा सोडविता येतो. पाने सुटी केल्यावर त्यातील फाटलेल्या कागदांना पातळ पारदर्शक कागद खळीने लावतात. पुनर्बांधणीच्या पुस्तकांचे संच व्यवस्थित नसतात म्हणून त्यांना पूर्वीप्रमाणेच दोरा-शिलाई करता येत नाही. पुस्तके आधी कापून घेतात. मात्र कापताना मजकुरातील अक्षरे कापली जाणार नाहीत अशी खबरदारी घेतात. पाठीच्या बाजूस टोच्याने भोके पाडून त्यांतून दोरा ओवून पुस्तक शिवतात व जरूर त्या प्रकारची बांधणी करतात. 

 संदर्भ : 1. Darkey, L. Bookbinding:Then and Now, 1959.

           2. Lee, M. Bookmaking, New York, 1965.

           3. Vaughan. A. J. Modern Bookbinding, Guildford and London, 1960.

           ४. जोशी, य. गो. भावे, भा. वि. बांधणीकला, पुणे, १९७२.

           ५. लिमये, वि. ना. पुस्तक-बांधणी, मुंबई, १९७७.

गोखले, श्री. पु. मिठारी, भू.चिं.


संचाची (फॉर्मची) घडी घालण्याचे यंत्र संचांची जुपणी
पुस्तकाची हातशिलाई

पुस्तकाची यंत्रशिलाई

पुस्तकाच्या कडा तीन सुऱ्यांनी कापण्याचे यंत्र शिलाईच्या बाजूस गोलाई करणारे यंत्र
आवेष्टनाची तयारी आवेष्टन बसविण्याचे यंत्र
आसपास कागद लावण्याची क्रिया तयार पुस्तकावर दाब देणारे यंत्र