बोरिक अम्ल : एक जलविद्राव्य (पाण्यात विरघळणारा) व पांढरा स्फटिकीय पदार्थ. बोरॅसिक अम्ल, ऑर्थोबोरिक अम्ल या नावांनीही ते ओळखले जाते. रेणवीय सूत्र (रेणूतील अणूंचे प्रकार व त्यांची संख्या दर्शविणारे सूत्र) H3BO3. याच्या शोधाचे श्रेय डब्ल्यू. हॉमबर्ख यांना दिले जाते. १७०२ मध्ये त्यांनी ⇨टाकणखारावर (बोरॅक्सवर) सल्फ्यूरिक अम्लाची विक्रिया करून बोरिक अम्ल तयार केले व त्यास Sal Sedativum असे नाव दिले.

बोरिक अम्ल हे वनस्पतींत, प्राण्यांत तसेच खनिज रूपात सापडते. वनस्पती व प्राणी यांत ते लेशमात्र प्रमाणात आढळते. काही विशिष्ट खनिजांत ते जास्त प्रमाणात आढळते. बरीच वर्षे इटलीतील तस्कनी येथील ज्वालामुखी पाण्यातून (गरम पाण्याचे झरे, वाफेचे झोत व चिखलयुक्त खाजणे यांतून) प्रामुख्याने व्यापारी प्रमाणावर बोरिक अम्ल मिळवीत असत. तेथील पाण्यात ०.१% पेक्षाही बोरिक अम्लाचे प्रमाण कमी असले, तरी पाण्याचे बाष्पीभवन करून बोरिक अम्लाचे संहतीकरण करण्यास (विद्रावातील प्रमाण वाढविण्यास) तेथील नैसर्गिक उष्णता पुरेशी होती. नंतर त्याच्या वाढत्या मागणीमुळे टाकणखारावर सल्फ्यूरिक अम्लाची विक्रिया करून ते तयार करण्यात येऊ लागले.

व्यापारी दृष्ट्या बोरिक अम्ल टाकणखार व कोलेमनाइट (सजल कॅल्शियम बोरेट) यांपासून तयार करतात. (१) दाणेदार टाकणखार व टाकणखाराचा गरम संहत विद्राव आणि सल्फ्यूरिक वा हायड्रोक्लोरिक अम्ल मिसळून विक्रिया करतात. नंतर ते मिश्रण थंड करतात व तयार झालेले बोरिक अम्लाचे स्फटिक गाळून अलग करतात. पुनर्स्फटिकीभवनाने [⟶ स्फटिकीभवन] त्याचे शुद्धीकरण करतात. (२) कोलेमनाइट वापरल्यास त्याचे बारीक चूर्ण करून त्याच्या विद्रावात ९०० से.ला सल्फ्यूरिक अम्ल मिसळतात व मिश्रण जोरात ढवळतात. मिश्रणातील जादा अम्लाचे चुन्याने ⇨उदासिनीकरण करून ते काढून टाकतात. परमँगॅनेटाने लोहाचे ऑक्सिडीकरण [⟶ ऑक्सिडीभवन] करतात आणि सक्रियित (अधिक क्रियाशील केलेल्या) कार्बनाने मिश्रण रंगहीन करून गाळतात. गाळलेला विद्राव थंड करून त्यातून बोरिक अम्लाचे स्फटिक मिळवितात. दुसऱ्या एका पद्धतीत कोलेमनाइटाचे बारीक चूर्ण गरम पाण्यात मिसळून, त्यातून सल्फर डाय-ऑक्साइड वायू सोडल्यास बोरिक अम्ल तयार होते. विद्राव थंड केल्यावर बोरिक अम्लाचे स्फटिक तयार होतात.

बोरिक अम्लाचे ऑर्थोबोरिक अम्ल (H3BO3) व मेटाबोरिक अम्ल (HBO2) असे दोन प्रकार आहेत. पहिला प्रकार व्यापारी दृष्ट्या महत्त्वाचा आहे. ऑर्थोबोरिक अम्लाचे स्फटिक पांढरे, चकचकीत, पत्रित रचनेचे असून ते त्रिनताक्ष प्रकारचे असतात [⟶ स्फटिकविज्ञान]. ते स्पर्शाला मऊ व साबणासारखे बुळबुळीत लागते. बोरिक अम्ल पाण्यात विरघळते व जसजसे तापमान वाढवावे तसतशी त्याची विद्राव्यता वाढते. उदा., ०० से.ला २.६%, तर १०७० से.ला ३७% इतके ते पाण्यात विरघळते. ते अमोनियात अल्प प्रमाणात विरघळते, तसेच संहत सल्फ्यूरिक अम्लातही विरघळते. ते ग्लिसरॉल, मिथेनॉल इ. कार्बनी विद्रावकांत (विरघळविणाऱ्या द्रवांत) विरघळते. वितळबिंदू १७०.९० से. वि. गु. १.५१७२ हळूहळू तापविल्यास १००० से.ला त्यातील पाणी निघून जाऊन मेटाबोरिक अम्ल (HBO2) तयार होते व शेवटी बोरॉन ऑक्साइड (B2O3) तयार होते. वाफेत त्याचे संप्लवन (घन अवस्थेतून एकदम वायुस्थितीत रूपांतर होणे) होते. मध्यस्थ पॉलिबोरिक अम्ले निश्चितपणे ओळखता येत नाहीत पण त्यांची संयुगे ज्ञात आहेत तथापि बोरिक अम्लाची खरी संयुगे ज्ञात नाहीत. बोरिक अम्ल अत्यंत दुर्बल असल्याने त्यामुळे निळा लिटमस पूर्णपणे लाल होत नाही तसेच ⇨दर्शकाच्या साहाय्याने व प्रबल क्षारकाने (अम्लाशी विक्रिया झाल्यास लवण देणाऱ्या संयुगाने) ⇨अनुमापन करता येत नाही पण विद्रावात मॅनिटॉल, ग्लिसरॉल यांसारखी पॉलिहायड्रॉक्सी संयुगे मिसळल्यास फिनॉलप्थॅलीन दर्शक म्हणून वापरून अनुमापन करता येते.

कुर्कुमिनावर (हळदीतील पिवळ्या रंगद्रव्यावर) शुद्ध बोरिक अम्लाची विक्रिया केल्यास त्याला गडद लाल रंग येतो व त्यावरून बोरिक अम्ल ओळखता येते.

बियांमध्ये मूलतः अल्प बोरिक अम्ल बऱ्याचदा असते आणि ते अंकुरणासाठी पुरेसे असते. त्यानंतर मात्र बोरॉनाअभावी कोरडी कूज, खुरटी वाढ व वंध्यत्व यांसारखी रोगलक्षणे आढळतात. बोरिक अम्ल (वा टाकणखार) जमिनीतून अथवा खोडाद्वारे दिल्यास ही रोगलक्षणे नाहीशी होतात.

बोरिक अम्ल सौम्य पूतिरोधक (पू होण्यास विरोध करणारे) असल्याने त्याचा उपयोग जखमा व भाजणे यांवरील मलमांत, तसेच नेत्ररोगात डोळे धुण्याकरिता वापरण्यात येणाऱ्या विद्रावात करतात. काही सूक्ष्मजीवांची (विशेषतः कवकांची म्हणजे बुरशीसारख्या हरितद्रव्यरहित वनस्पतींची) वाढ या अम्लामुळे रोखली जाते पण इतर सूक्ष्मजीवांवर त्याचा परिणाम होत नाही आणि या कारणामुळे व त्याच्या विषारी परिणामांमुळे खाद्यपदार्थ व सौंदर्यप्रसाधने यांच्या परिरक्षणासाठी त्याचा उपयोग करण्यास सामान्यतः मनाई करण्यात वा परावृत्त करण्यात येत आहे. अनेक कार्बनी विक्रियांत उत्प्रेरक (विक्रियेत भाग न घेता विक्रियेची गती बदलणारा पदार्थ) घटक म्हणून त्याचा उपयोग करतात. बोरेटे व इतर बोरॉन संयुगांच्या निर्मितीत, मृत्तिका पात्रांना झिलई देणाऱ्या पदार्थात, उत्तम पॉलिश होणाऱ्या उच्च दर्जाच्या सिमेंटांमध्ये, स्टिअरीनयुक्त, मेणबत्त्यांतील वातींमध्ये ज्योत संरक्षक म्हणून, प्रकाशकीय बोरोसिलिकेट यांसारख्या खास प्रकारच्या काचांच्या निर्मितीत, वस्त्रधुलाईतील चकाकी आणणाऱ्या स्टार्चयुक्त पदार्थांत, कातडी कमविण्यासाठी त्यांवर पूर्वप्रक्रिया करण्याकरिता वापरण्यात येणाऱ्या संयुगांत, कृत्रिम रत्नांमध्ये, पोलादाच्या कठिनीकरणात वापरण्यात येणाऱ्या फेरोबोरॉनाच्या निर्मितीत, बोरॉन मिश्रधातूंच्या निर्मितीत, निकेलाच्या विद्युत्‍ विलेपनात, वितळजोडकामातील (वेल्डिंगमधील) अभिवाहात (सांधावयाच्या धातूच्या तुकड्यांना लावण्यात येणाऱ्या आणि भरण धातूंचा वितळबिंदू कमी व्हावा व ऑक्साइडे तयार होऊ नयेत यांकरिता वापरण्यात येणाऱ्या पदार्थात), तांब्याच्या झाळकामात, लोखंडावर एनॅमलाचा थर देण्याकरिता, तिजोऱ्यांना लावावयाच्या अग्निरोधक द्रव्यांत, रंगद्रव्यांत, एनॅमल रंगलेपांत, मऊ लाकडापासून नकली कठीण लाकूड तयार करण्याच्या प्रक्रियेत, कागदांना चकाकी आणणाऱ्या पदार्थात, औषधांत, सौंदर्यप्रसाधनांत, साबणांत, वस्त्रे अग्निरोधक बनविण्यासाठी व वस्त्रांवर रंग पक्का बसण्यासाठी, कॅरम फलक व नृत्यगृहातील लाकडी जमीन यांतील लाकडाचे घर्षणापासून तसेच सूक्ष्मजंतू व हवामान यांच्या परिणामांपासून रक्षण करण्यासाठी, लिंबू वर्गातील फळे (संत्रे, मोसंबे वगैरे) बुरशीविरहीत करण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या विद्रावात, धान्यांच्या परिरक्षणात इत्यादींसाठी बोरिक अम्लाचा उपयोग करण्यात येतो.

बागडे, शं. ना.