आसंजके : दोन अथवा अधिक, सारख्या किंवा भिन्न प्रकारच्या वस्तूंना चिकटून सांधणाऱ्या द्रव्याला आसंजक असे म्हणतात. संस्कृतातील आसंजनम् म्हणजे चिकटणे या शब्दावरून ही संज्ञा बनली आहे. डिंक, सरस, सिमेंट ही अशा पदार्थांची व्यवहारातील काही ठळक उदाहरणे होत.

बहुसंख्य आसंजके नेहमीच्या तापमानास वापरली जातात. काहींचे कार्य घडून येण्यास मात्र तापमानात वाढ करावी लागते तथापि ती मर्यादित असते. म्हणून झाळकाम (धातूचे दोन तुकडे त्यांच्या जोडाच्या भागात पितळ, जस्त इ. धातू वितळवून जोडण्याची प्रक्रिया), वितळजोडकाम (वेल्डिंग) . उच्च तापमान वापरून केल्या जाणाऱ्या क्रियांत, जोड घडविण्याकरिता जे धातू किंवा मिश्रधातू वापरतात त्यांचा अंतर्भाव आसंजकांत सामान्यतः करीत नाहीत.

डिंक व सरस ही आसंजके प्राचीन कालापासून वापरण्यात आहेत. त्यानंतर रबर व नायट्रोसेल्युलोज यांची आसंजके प्रचारात आली. अलीकडील काळात सिद्ध झालेले सेल्युलोजाचे कित्येक अनुजात (साध्या रासायनिक विक्रियांनी तयार होणारी संयुगे) आणि संश्लेषित (कृत्रिम) रेझिने यांच्या उपयोगाने, पूर्वी शक्य नव्हते असे अनेक पदार्थ सांधता येतात. यामुळे आसंजकांच्या उपयोगाचे क्षेत्र बरेच विस्तृत झाले आहे आणि ते यापेक्षाही विस्तार पावेल अशी चिन्हे दिसत आहेत.

यांत्रिक जोड व आसंजन : खिळे, स्क्रू, बोल्ट, रिव्हेट इत्यादींचा उपयोग करून यांत्रिक तऱ्हेने जोड घडवून आणण्यापेक्षा आसंजकाने वस्तू सांधणे अनेक दृष्टीने हितावह ठरते. किंबहुना या यांत्रिक क्रिया जेथे वापरता येत नाहीत अशाही कित्येक ठिकाणी आसंजकेच उपयोगी पडतात. उदा., कागदाची अथवा कापडाची लेबले वस्तूंना लावणे, धातूंच्या पातळ पत्र्यांचा किंवा काचेचा इतर पदार्थांशी जोड करणे, जमिनीवर फरशा बसविणे, लहानलहान तुकड्यांच्या रूपांत असणारे पदार्थ एकत्र सांधणे या कामांकरिता आसंजकेच उपयोगी पडतात.

आसंजकाने वस्तू सांधल्यास तिचा पृष्ठभाग नितळ राहतो आणि जोडलेल्या वस्तूच्या आकारात बदल होणार नाही व जोड चटकन नजरेस येणार नाही, अशी योजना करता येते. आसंजकाने बनलेल्या बंधावर पडणारा ताण किंवा दाब सर्व पृष्ठभागावर सारखा विभागून पडतो. यांत्रिक जोडात तो काही विशिष्ट भागावरच केंद्रित होतो व त्यामुळे जोड निकामी होण्याची शक्यता जास्त असते. भिन्न धातू आसंजकाने जोडल्यास त्यांच्या पृष्ठभागांचा एकमेकांशी प्रत्यक्ष संपर्क होत नाही व त्यामुळे असा जोड गंजत नाही. आसंजकाचा जोड हवा, धुरळा, आर्द्रता, द्रव पदार्थ इत्यादींचा शिरकाव होणार नाही असा बनतो व त्यामुळे त्यांपासून होणारे अनिष्ट परिणामही टळतात. आसंजक वापरल्याने वजनात फारशी वाढ होत नाही, ही गोष्ट विमानांच्या बांधणीत वापरावयाच्या वस्तूंच्या दृष्टीने महत्त्वाची आहे. आसंजक वापरल्याने खर्चातही बचत होते. तथापि आसंजकांच्या उपयोगास काही मर्यादाही आहेत.

आसंजकाने जोड घडविण्यापूर्वी जोडावयाचे पृष्ठभाग घासणे किंवा इतर क्रियांनी संस्कारित करणे आवश्यक असते.त्याचप्रमाणे बंध घडून यावा म्हणून जोडावयाच्या वस्तूला विशिष्ट काल दाब आणि काही ठिकाणी उष्णता द्यावी लागते. त्यामुळे आसंजकाचा बंध त्वरित होत नाही, त्यास कालावधी लागाते. आसंजकाचा उपयोग करताना दाब, उष्णता इ. उत्पन्न करण्याकरिता यांत्रिक साधने लागतात. आसंजकांचे जोड सामान्यतः उच्च तापमानास टिकत नाहीत. परंतु दिवसेंदिवस या क्षेत्रात जे अन्वेषण (संशोधन) होत आहे त्यावरून असे म्हणावयास हरकत नाही की, भविष्यकालात जोडण्याच्या यांत्रिक क्रियांऐवजी आसंजकांचा अनेक ठिकाणी उपयोग होऊ लागेल.

वर्गीकरण :आ संजकांचे अनेक प्रकार आहेत. काही आसंजके नैसर्गिक पदार्थ किंवा त्यांचे अनुजात असून काही संश्लेषणाने बनविलेले असतात. त्यांचे वर्गीकरण पुढीलप्रमाणे करता येते :

(अ) नैसर्गिक पदार्थ : (१) वनस्पतींचे डिंक, धान्याच्या पिठापासून बनविलेल्या खळी व डेक्स्ट्रिने (स्टार्चपासून तयार केलेले डिंक(२) प्राण्यांची हाडे, कातडी, रक्त व माशांचे कल्ले यांपासून बनविलेले सरसांचे प्रकार, दुधापासून मिळणारे केसीन, सोयाबिनाचे पीठ इ. प्रथिनयुक्त आसंजके. (३) नैसर्गिक रबर, लाख, अस्फाल्ट इत्यादींपासून तयार होणारी आसंजके. (४) सोडियम सिलिकेट, मॅग्नेशियम ऑक्सिक्लोराइड इत्यादींपासून मिळणारी आसंजके.

(आ) संश्लेषित पदार्थ : (१) सेल्युलोजाची एस्टरे व ईथरे, अल्किल व ॲक्रिलिक एस्टरे, पॉलिअमाइडे, पॉलिस्टायरीन, कृत्रिम रबरे, पॉलिव्हिनिल अल्कोहॉल व त्याचे अनुजात इ. ऊष्मामृदू (उष्णतेने मऊ होणारी) रेझिने. (२)यूरिया, मेलामाइन, फिनॉल, रिसॉरसिनॉल, फ्यूरान, एपॉक्सी व अतृप्त पॉलिएस्टरे इत्यादींपासून बनणारी ऊष्मादृढ (उष्णतेने घट्ट होणारी) रेझिने.

आसंजके ज्या पदार्थांना सांधण्याकरिता वापरतात त्यावरून कागदआसंजके, लाकूड-आसंजके, धातू-आसंजके, प्लॅस्टिकआसंजके अशी वर्गवारी किंवा औद्योगिक आसंजके आणि घरगुती आसंजके अथवा ज्या तऱ्हेचा जोड अपेक्षित आहे, त्यावरून संरचना आसंजके, धारक आसंजके व पूरण आसंजके अशी वर्गवारीही करण्याचा प्रघात आहे.

आसंजके पाण्यात किंवा कार्बनी विद्रावकांत (विरघळविणाऱ्या पदार्थांत) विरघळतात किंवा निलंबित (लोंबकळल्यासारखी) होऊन पायसरूप [ एकमेकांत न मिसळणाऱ्या दोन द्रवांचे मिश्रण,→ पायस ] बनतात. काही आसंजके तापविल्याने वितळतात व द्रवरूपात वापरता येतात तर काही आसंजके घनरूपात वापरतात.

आसंजन-क्रिया : आसंजकाच्या रेणूंना सांधावयाच्या पृष्ठभागावरील रेणूंबद्दल आकर्षण असते, यालाच आसंजन म्हणतात. आसंजकाच्या स्वतःच्या रेणूंमध्ये परस्परात जे आकर्षण असते त्याला समासंजन म्हणतात. आसंजन समाधानकारक घडण्यासाठी ही दोन्ही आकर्षणे पुरेशी बलवान असणे आवश्यक असते.

आसंजकांचे विद्राव वाळले म्हणजे पृष्ठभाग टणक बनतो. जी आसंजके घनरूपात वापरली जातात, त्यांना उष्णता दिल्याने त्यांचा टणक पापुद्रा बनतो. जोडावयाच्या पृष्ठभागांच्या आत शिरलेले किंवा पृष्ठावर पसरलेले आसंजक दोन्ही पृष्ठभागांत अडकले जाते व त्यामुळे बंध निर्माण होतो. काही आसंजकांत जे विक्रियाशील गट असतात त्यांची सांधावयाच्या वस्तूतील द्रव्याशी रासायनिक विक्रिया होते व बंध निर्माण होतो. तथापि बहुसंख्य आसंजनक्रिया यांत्रिक असतात.

आसंजकांनी निर्माण होणारे बंध दोन प्रकारचे असतात. (१) ज्यांमध्ये सांधलेली वस्तू वापरताना बंधावर ताण किंवा दाब पडतो असे म्हणजे संरचना बंध. उदा., प्लायवुड, विमानातील यंत्रांचे भाग इ. (२) ज्यांमध्ये असा ताण किंवा दाब जवळजवळ नसतो किंवा अल्प असतो असे बंध.उदा., बाटलीला चिकटविलेले लेबल, फरशांच्या दरजा भरण्याकरिता वापरलेला सिमेंटाचा बंध. यांना धारक बंध म्हणतात. भोके, भेगा इ. बुजविण्याकरिता वापरलेली लुकणे इत्यादींमध्येही बंधावरील ताण अत्यल्प असतो. या बंधाला पूरण बंध असे म्हणतात.

सांधावयाच्या पृष्ठभागांचे स्वरूप आणि बंधाचा प्रकार या दोहोंचा विचार करून आसंजकाची निवड करावी लागते. प्रत्यक्ष वापरण्याकरिता तयार मिळणारी बाजारातील आसंजके अनेक पदार्थांची मिश्रणे असतात. वितळवून वापरावयाची पूड, कांड्या किंवा ठोकळे, विद्राव्य पूड, विद्राव, पायसे, दुसऱ्या पदार्थावर आधारलेले किंवा स्वतंत्र पापुद्रे अशा नानाविध रूपांत अशी मिश्रणे विकली जातात. या मिश्रणांमध्ये वरील वर्गीकरणात दाखविलेल्या वर्गांतील एक अथवा अधिक पदार्थ मुख्य घटक म्हणून असून वापरण्याच्या दृष्टीने आवश्यक ते गुणधर्म यावे म्हणून त्यांत अनेक आनुषंगिक द्रव्ये मिसळलेली असतात. मुख्य घटक विद्रुत (विरघळावा) किंवा निलंबित व्हावा म्हणून योग्य ते विद्रावक वापरावे लागतात. कारण त्यामुळे द्रवरूप मिश्रण पृष्ठभागावर सुलभतेने पसरता येते व आसंजकाचे वितरण सर्वत्र सारखे आणि जरूरीप्रमाणे नियंत्रित करता येते. कागद व लाकूड यांकरिता वापरावयाच्या आसंजकांत पाणी हा विद्रावक असतो, परंतु संश्लेषित रेझिनांकरिता कार्बनी विद्रावक वापरतात. काही बाष्पनशील कार्बनी विद्रावक संश्लेषित रेझिनांसाठी विरलकारक द्रव्ये म्हणूनही वापरतात. त्यांच्यामुळे मिश्रण पुरेसे विरल बनते व फवाऱ्याच्या योगाने वापरता येते.

याशिवाय पृष्ठभागात आसंजकाचे शोषण बेताबाताने व्हावे म्हणून पूरक द्रव्ये, वितरण प्रमाण कमी व्हावे म्हणून विस्तारक द्रव्ये आणि साठवणीच्या काळात किंवा आसंजन-क्रिया होताना जंतूंच्या क्रियेने आसंजकाचे विघटन होऊ नये म्हणून काही द्रव्ये संरक्षण म्हणून वापरावी लागतात. जेथे आसंजन-क्रिया रासायनिक असते तेथे ती त्वरेने घडावी याकरिता उत्प्रेरक (स्वतः विक्रियेत भाग न घेता ती जलद होण्यासाठी वापरलेला पदार्थ) म्हणूनही काही द्रव्यांचा अंतर्भाव मिश्रणात केलेला असतो.


पूर्वसंस्कार : आसंजकाचा उपयोग करण्यापूर्वी सांधावयाचे पृष्ठभाग घासून काढल्याने बंध दृढ होण्यास फार मदत होते. लाकूड आणि धातू यांच्या पृष्ठांना या संस्काराची विशेष आवश्यकता असते. ज्या लाकडामध्ये तेल किंवा रेझिने यांचे प्रमाण उच्च असते त्याचे पृष्ठभाग एखादा विद्रावक किंवा क्षार (अल्कली) यांचा संस्कार करून व त्यांच्यातील तेल किंवा रेझिने काढून टाकून आसंजनास योग्य असे बनवावे लागतात.

द्रवरूप आसंजके ब्रशाने, रुळांच्या योगाने किंवा फवाऱ्याने उडवून जोडावयाच्या पृष्ठभागांना लाविली जातात, वितळवून वापरावयाची आसंजके रुळाच्या किंवा पट्टीच्या साहाय्याने पृष्ठभागास लावतात किंवा कोरड्या आसंजकाचा बनविलेला पातळ पापुद्रा पृष्ठभागावर ठेवून वापरतात.

जोडावयाचे पृष्ठभाग त्यानंतर एकत्र आणले जातात. ज्या आसंजकांचा बंध रासायनिक विक्रियेने बनतो. (उदा., ऊष्मादृढ रेझिने) तेथे आसंजक लेपनानंतर लगेच पृष्ठभाग एकमेकांशी संलग्न करतात. पंरतु ऊष्मामृदू रेझिने किंवा रबर विद्राव असलेली आसंजके त्यांतील विद्रावक नियंत्रित प्रमाणात उडून जावे म्हणून काही काळ तसेच ठेऊन मग संलग्न केले जातात.

या क्रियेनंतर संलग्न पृष्ठभागांना कित्येक आसंजकांच्या बाबतीत दाब द्यावा लागतो. दाबामुळे पृष्ठे एकमेकांशी सर्वत्र सारखी चिकटून बसतात, आसंजक पृष्ठभागावर सर्वत्र पसरतो आणि आसंजक मिश्रणात अडकून राहिलेले हवेचे बुडबुडे निघून जाण्यास मदत होते. दाब किती द्यावयाचा आणि किती काळ ठेवावयाचा हे आसंजकाच्या गुणधर्मांवर अवलंबून असते. जेथे रासायनिक विक्रियेने बंध निर्माण होतो तेथे दाबाबरोबर उष्णताही देणे आवश्यक असते. वितळलेल्या स्थितीत वापरलेल्या ऊष्मामृदू आसंजकांना पृष्ठे दाबात असतानाच थंड करणे हितावह असते.

दाब देणे यथावकाश बंद केल्यावर बंध सुदृढ व्हावा म्हणून काही ठिकाणी सांधलेली वस्तू इष्ट काल तशीच राहू देतात. काही आसंजकांच्या बाबतीत नुकत्याच सांधलेल्या वस्तू एकमेकींना खेटून राहतील अशी त्यांची रास रचतात. त्यायोगाने बंधाला दिलेली उष्णता काही काळ टिकून राहते आणि वस्तूच्या दाटीमुळे जो दाब पडतो त्यामुळे बंध सुदृढ होतो.

चाचणी : आसंजकांच्या परीक्षणात गुणवत्ता आणि स्थायित्त्व यांची चाचणी घेतली जाते. गुणवत्ता परीक्षणामध्ये बंधाचे ताणबल (ताण सहन करण्याची क्षमता) आणि कर्तनबल (कापून तुकडा पडण्यास विरोध करण्याची क्षमता) निश्चित करतात. ताणबल मोजण्याकरिता आसंजकाने झालेल्या बंधाच्या पातळीच्या लंब दिशेने प्रेरणा लावून बंध तुटल्यास एका चौ.सेंमी.स किती किग्रॅ.ची प्रेरणा लावावी लागते ते ठरवितात. यावरून बंधाची दृढता कळते. कर्तनबल ठरविण्यासाठी बंधाच्या पातळीला समांतर दिशेने दर चौ.सेंमी.स किती किग्रॅ.ची प्रेरणा लावली असता पृष्ठभाग एकमेकांवर सरकतील हे मोजतात. पाण्यामध्ये किंवा इष्ट द्रवात बंध बुडविला असता वरील गुणांच्या मूल्यावर काय परिणाम होतो, हेही ठरविण्याचा प्रघात आहे.

सांधलेली वस्तू काही काळ वापरल्यावर त्याच्या बंधाची व त्याकरिता वापरलेल्या आसंजकाची स्थिती काय होते हे अजमावून बंधाच्या स्थैर्याची कल्पना करता येते. वस्तू उच्च अथवा नीच तापमानात आणि ऑक्सिजनाच्या किंवा बंधावर परिणाम करतील अशा रासायनिक द्रव्यांच्या सान्निध्यात दीर्घ काळ ठेवून नंतर बंधाची आणि आसंजकाची तपासणी केली तर बंध त्या त्या परिस्थितीत कितपत टिकेल याची कल्पना येऊ शकते. जेव्हा सांधलेली वस्तू एखाद्या यंत्राचा हालचाल होणारा भाग म्हणून वापरावयाची असते तेव्हा बंधावर कंपनांचा आणि घर्षणाचा काय परिणाम होतो याची चाचणी घ्यावी लागते. त्याकरिता बंधाची प्राथमिक स्थिती आणि नियंत्रित काल कंपन व घर्षण होऊ दिल्यानंतरची त्याची स्थिती, यांची तपासणी केली जाते.

भारतीय उत्पादन : भारताच्या औद्योगिक विकासाबरोबर आसंजकांची मागणीही वाढत आहे. बाभळीचा, गवारीचा व ट्रॅगकांथ डिंक, डेक्स्ट्रिने, विविध प्रकारचे सरस, फिनॉलफॉर्माल्डिहाइड, पॉलिव्हिनिल ॲसिटेट, कार्‌‌बॉक्सी मिथिल सेल्युलोज इत्यादींचे उत्पादन करणारे अनेक कारखाने भारतात आहेत व ते देशाची गरज भागवितात. परंतु काही उच्च दर्जाची, एपॉक्सी व थायोईथर यांवर आधारलेली आसंजके मात्र काही प्रमाणावर आयात करावी लागतात.

काही आसंजके व त्यांचे उपयोग : आसंजक म्हणून बाभळीचा डिंक आणि ट्रॅगकांथ डिंक हे पूर्वीपासून वापरले जात आहेत. हे पाण्यात विद्राव्य असून त्यांचा चिकट व घट्ट विद्राव बनतो. बाभळीच्या डिंकात त्याच्या वजनाच्या दुप्पट किंवा तिप्पट पाणी घालून केलेला विद्राव सामान्य आसंजनास उपयोगी पडतो. हा विद्राव वाळला म्हणजे त्याचा जो पातळसा थर बनतो तो ठिसूळ होऊ नये म्हणून विद्रावात सु. १० टक्के ग्लिसरीन मिसळतात. असा विद्राव जवळजवळ वर्णहीन असून तो सहज पसरतो व लवकर वाळतो.

कणीक, तांदळाचे व टॅपिओकाचे पीठ इ. स्टार्चयुक्त पदार्थ पाण्यात मिसळून तापविले म्हणजे खळी मिळतात. खळ तयार करताना त्यात इष्ट प्रमाणात क्षार मिसळला तर जेलीसारखी व जास्त चिकटपणा असलेली खळ बनते. कॅल्शियम, मॅग्नेशियम किंवा झिंक क्लोराइड यांचाही उपयोग चिकट व घट्ट खळी बनविण्यासाठी करतात.

स्टार्च भाजल्याने किंवा त्यावर अम्‍लांची किंवा डायास्टेज या एंझाइमाची (शरीरातील रासायनिक विक्रिया घडवून आणण्यास मदत करणाऱ्या प्रथिनयुक्त पदार्थाची) विक्रिया केल्याने डेक्स्ट्रिने मिळतातती पाण्यात विरघळतात व त्यांचे विद्राव आसंजक म्हणून वापरले जातात. वरील आसंजकांचा, विशेषत: डेक्स्ट्रिनाचा, उपयोग पोस्टाची तिकिटे, पाकिटे, माल भरण्याकरिता वापरावयाच्या पिशव्या, पुठ्ठ्याची लहानमोठी  खोकी, वेष्टनासाठी वापरला जाणारा पन्हळी कागद किंवा पुठ्ठा यांच्या निर्मितीत होतो. या आसंजकांचे बंध जलाभेद्य (पाणी आत न शिरणारे) नसतात व त्यामुळे यांच्या उपयोगास मर्यादा पडते.

जनावरांची कातडी, हाडे, शिंगे, खूर, रक्त, माशांचे कल्ले इत्यादींचे निष्कर्षण केल्यावर सरसाचे विविध प्रकार मिळतात. त्यांचा उपयोग लाकूड, कागद, कातडी इ. पदार्थ सांधण्यासाठी मुख्यत: केला जातो. लाकडाचे सालपे चिकटवून प्लायवुड बनविण्याच्या धंद्यात त्यांचा उपयोग होतो कारण त्यांचे बंध बळकट असतात. पण ते फारसे जलाभेद्य नसतात, त्यामुळे पाण्याचा प्रत्यक्ष संबंध येणार नाही अशा ठिकाणीच म्हणजे घराच्या आतील भागाचे दरवाजे, पार्टिशन इत्यादींकरिता असे प्लायवुड उपयोगी पडते.

मलई काढून घेतलेल्या दुधावर एखाद्या अम्‍लाची विक्रिया केल्याने केसीन अवक्षेपित होते व अम्‍लाऐवजी रेनेट या एंझाइमाची विक्रिया केल्यास रेनेटकेसीन मिळते. केसिनात सोडियम हायड्रॉक्साइड व कॅल्शियम हायड्रॉक्साइड हे क्षार मिसळले म्हणजे एक जलाभेद्य आसंजक बनते. त्याचा उपयोग करून जलाभेद्य प्लायवुड बनविता येते. हे पाण्याचा प्रत्यक्ष संबंध येईल अशा ठिकाणीही वापरता येते.

सोयाबिनातील प्रथिनापासून बनणारे आसंजक हे ज्यांच्यात १५% इतके पाणी आहे, असे लाकडी सालपेही सांधून प्लायवुड बनविण्यासाठी उपयोगी पडते. इतर आसंजकांनी ५% पेक्षा जास्त पाणी असलेले लाकडी सालपे सांधले जात नाहीत.


लाख एका प्रकारच्या कीटकापासून मिळते. तापविल्याने ती वितळते. सामान्य वापरातील लाख व जलीय विच्छेदन केलेली (पाण्याच्या साहाय्याने घटक सुटे केलेली) लाख यांमध्ये अभ्रक, काजळी इत्यादींची भर घालून केलेले मिश्रण गरम करून फवाऱ्याने उडवून वापरता येते. मिथिलेटेड स्पिरिटात लाख विरघळवून केलेला विद्राव, त्यात आनुषंगिक द्रव्ये मिसळून आसंजक म्हणून वापरता येतो. जलीय विच्छेदित लाखेपासून आसजंक खळ करता येते. लाखेच्या आसंजकाने केलेले जोड टिकाऊ व बळकट असतात. खनिज तेलांचा त्यांच्यावर परिणाम होत नाही. परंतु ते ठिसूळ असतात आणि जलाभेद्य नसतात. यामुळे लाखेच्या आसंजकांचा उपयोग मर्यादित होतो. दुसऱ्या महायुद्धकाळी या आसंजकांचा उपयोग ताग, कागद इ. पदार्थ सांधण्याकरिता करण्यात आला. वितळलेल्या लाखेत एखाद्या अपघर्षकाची (खरवडून व घासून पृष्ठ गुळगुळीत करणाऱ्या पदार्थाची) पूड मिसळून साच्यांच्या उपयोगाने धार लावण्याची चाके करता येतात. त्याचप्रमाणे काच, अभ्रक व धातू यांचे पृष्ठभाग एकत्र चिकटविण्यासाठी लाख उपयोगी पडते.

 

रबरी आसंजकांचे अनेक प्रकार आहेत. त्यात नैसर्गिक रबर, पुन:प्रापित रबर किंवा कृत्रिम रबरे आणि त्यांचे अनुजात यांचा उपयोग केलेला असतो. व्हल्कनाईज (गंधक वा त्याच्या संयुगांची क्रिया) करावी लागणारी व न करावी लागणारी अशा दोन्ही तऱ्हेची रबरी आसंजके उपलब्ध असून ती विद्रावाच्या किंवा पायसाच्या रूपात वापरता येतात. अनेक तऱ्हेची पृष्ठे सांधण्यास ती उपयोगी पडतात. उदा., धातूंना कापड, फेल्ट किंवा रबर चिकटविणे. ती वापरण्यास सामान्यतः यंत्रसामग्री लागत नाही. या आसंजकांचे बंध नम्य (लवचिक) असतात, त्यामुळे दाब किंवा ताण पडला तरी ते सहजासहजी भंग पावत नाहीत. निओप्रिन, ब्युटाडाइन-स्टायरीन या कृत्रिम रबरांची आसंजके बळकट बंध बनवितात. फिनॉलिक रेझिनांशी रबर आसंजके मिश्र करता येतात. अशा मिश्रणाने फिनॉलिक रेझिनांची बळकटी आणि रबर आसंजकांची नम्यता आसंजकाच्या बंधास प्राप्त होते.

अस्फाल्ट वितळलेल्या स्थितीत किंवा पायसाच्या रूपात तंतुमय पदार्थांच्या आसंजनाकरिता वापरतात. हे स्वस्त असून याचे बंध जलाभेद्य असतात. सोडियम सिलिकेटाचा उपयोग पन्हळी कागद व पुठ्ठे बनविण्याकरिता करतात. याचे बंध जलरोधी असून त्यांवर बुरशी चढत नाही. चिनी मातीच्या वस्तूंकरिता आसंजक म्हणून मॅग्नेशियम ऑक्सिक्लोराइडाची लुकणे उपयोगी पडतात.

ऊष्मामृदू रेझिने : सेल्युलोज नायट्रेट इतर रेझिनांशी मिश्र करून घरगुती आसंजके बनवितात. ती अनेक प्रकारचे पृष्ठभाग सांधण्यास उपयोगी पडतात. सेल्युलोज ॲसिटेट व सेल्युलोज ॲसिटेट ब्युटिरेट हे अनुजात वापरल्याने जलाभेद्य आणि टिकाऊ बंध बनतात. मिथिल सेल्युलोज, सोडियम कार्‌‌बॉक्सी मिथिल सेल्युलोज व हायड्रॉक्सी एथिल सेल्युलोज हे अनुजात जलविद्राव्य किंवा जलनिलंबनक्षम (पाण्यात लोंबकळत ठेवता येण्यासारखे) असून नैसर्गिक डिंकाऐवजी वापरता येतात. मिथिल मेथाक्रिलेटाचा कार्बनी विद्रावकातील विद्राव प्लॅस्टिकाकरिता आसंजक म्हणून उपयोगी पडतो. पॉलिव्हिनिल आसंजकांचा उपयोग अनेक ठिकाणी होतो.

सच्छिद्र किंवा छिद्ररहित पृष्ठांच्या आसंजनास ती उपयोगी पडतात. पॉलिव्हिनिल ॲसिटेट हे काच, धातू आणि सेलोफेन चिकटविण्याकरिता उपयोगी पडते. पॉलिव्हिनिल ब्युटिराल यांचा उपयोग मुख्यत: मोटारगाडीकरिता वापरण्यात येणाऱ्या सुरक्षित काचेच्या उत्पादनात होतो. पॉलिव्हिनिल अल्कोहॉलाची आसंजके कागद, कापड व कातडी सांधण्याकरिता फार उपयोगी पडतात.

ऊष्मादृढ रेझिने : ह्या आसंजकांचे बंध बळकट, जलरोधी आणि उष्णतारोधी असून त्यांवर बुरशी येत नाही.

फिनॉल फॉर्माल्डिहाइड या आसंजकाचा उपयोग मुख्यत: लाकडाच्या सालप्यापासून जलरोधी प्लायवुड बनविण्यासाठी होतो. असे प्लायवुड घराच्या बाह्यभागाकरिताही वापरता येते. हे इतर आसंजकांबरोबर मिसळता येते. ‘रेडक्स’ हा पॉलिव्हिनिल फॉर्मालफिनॉलिक आसंजक विमानाच्या बांधणीत फार उपयुक्त ठरला आहे. या आसंजकांचे दृढीकरण करण्यास उष्णता द्यावी लागते. यूरिया फॉर्माल्डिहाइड रेझिनाचा रंग बराच फिक्का असतो व ती स्वस्त पडतात. यांचा आर्द्रता, उष्णता आणि रसायने यांना रोध करण्याचा गुण फिनॉल फॉर्माल्डिहाइड रेझिनांपेक्षा कमी आहे. मेलॅमीन फॉर्माल्डिहाइड रेझिने यूरिया रेझिनांपेक्षा जास्त जलरोधी आहेत.

स्टायरीन किंवा डायॲलिल थॅलेट ह्यांचे बहुवारिकीकरण (एकापेक्षा जास्त रेणू एकत्र येऊन मोठा रेणू बनण्याची क्रिया) करता येईल असे विद्राव आसंजके म्हणून वापरले जातात. यांचे बंध जलरोधी व विद्रावकरोधी असून काचेच्या तंतूंपासून तक्ते बनविण्याकरिता त्यांचा उपयोग मुख्यत: होतो.

एपॉक्सी रेझिने दृढ होताना आकुंचन पावत नाहीत व त्यांपासून बाष्पनशील द्रव्येही निर्माण होत नाहीत. काच, चिनी माती, संगमरवर व हलक्या धातू या आसंजकाने चांगल्या प्रकारे सांधता येतात.

सिलिकोन आसंजके धातू, चिनी माती, प्लॅस्टिके व सिलिकोन रबरे यांना सांधण्याकरिता उपयोगी पडतात. यांचे बंध–५०० सेइतक्या कमी तापमानासही ठिसूळ होत नाहीत आणि सु. २५० से. तापमानास टिकू शकतात.

 पहा : डिंक रेझिने सरस स्टार्च.

 

संदर्भ : 1. Clarke F. Rutzler J. E. Savage, R. L. Adhesion and Adhesives, Fundamentals and  Practice, London, 1954.

            2. Delmonte, J. The Technology of Adhesives, New York 1947.

 

पाठक, त्र्यं.