कवकनाशके : कवकांचा नाश करणाऱ्‍या किंवा त्यांच्या वाढीस प्रतिबंध करणाऱ्‍या रासायनिक पदार्थास कवकनाशक म्हणतात. काही वेळा कवकांचा नाश उष्णता, जंबूपार किरण (वर्णपटातील जांभळ्या रंगाच्या पलीकडील अदृश्य किरण) इ. भौतिक कारकांनीसुद्धा होत असला, तरी त्यांचा समावेश कवकनाशकांत करीत नाहीत. सर्वसामान्यत: कवकनाशके रासायनिक पदार्थ असतात. कवकांपासून मानव, जनावरे आणि पिके यांना होणाऱ्‍या रोगांवर तसेच लाकडी, कातडी इ. व्यापारी वस्तूंचे कवकांपासून होणारे नुकसान टाळण्यासाठी कवकनाशकांचा उपयोग करणे अत्यावश्यक ठरते.

कृषि-कवकनाशके : कवकांपासून होणाऱ्‍या रोगांमुळे अन्नधान्याचे फार मोठे नुकसान होते. रोगापासून पिकाचे संरक्षण करण्याच्या अनेक पद्धतींपैकी कवकनाशके वापरून पिकांचे संरक्षण करणे ही एक सर्वमान्य पद्धत आहे. हल्ली निरनिराळ्या कवकनाशकांचा उपयोग रोग नियंत्रणासाठी सर्रास केला जातो. ती वापरताना जरूर ती काळजी घेतली व तज्ञांच्या सूचनेनुसार त्यांचा वापर केला तर फायदाच होतो. पिकांच्या रोगावर कवकनाशके वापरण्यापूर्वी ती आर्थिक दृष्ट्या परवडतील किंवा नाही हे पाहणे जरूरीचे असते. द्राक्ष पिकासारख्या काही पिकांवर मात्र त्याचा वापर करणे अटळ ठरते. कवकनाशके साधारणतः पाण्यात मिसळणारी असल्याने निरनिराळ्या फवारणी यंत्रांनी पिकावर फवारली जात असली तरी त्यांचा उपयोग बीज संरक्षण, जमिनीचे निर्जंतुकीकरण इ. प्रकारांतसुद्धा होतो. विशिष्ट कवकनाशके विशिष्ट कवकापासून होणाऱ्‍या रोगावरच परिणामकारक ठरतात. उत्तम कवकनाशकामध्ये पुढील गुणधर्म असणे आवश्यक असते : (१) पिकावर अपायकारक परिणाम न होता रोगोत्पादक कवकाचा नाश करण्याचा गुणधर्म, (२) सहज उपलब्धता, (३) पिकावर त्याचा परिणाम दीर्घकाल टिकणे, (४) तयार करण्यास सोपे असणे, (५) आर्थिक दृष्ट्या परवडणारे तसेच किंमतीने अल्प असून मानव व प्राणी यांना अपायकारक नसणे.

वर्गीकरण : कवकनाशकांचे वर्गीकरण (१) त्यांच्या रासायनिक घटकानुसार, (२) त्यांच्या क्रियेनुसार व (३) त्यांच्या उपयोगावरून केले जाते.

(१) रासायनिक घटकानुसार : या वर्गीकरणानुसार कवकनाशकांचे पुढील प्रकार आढळतात : (अ) गंधकयुक्त कवकनाशके, (आ) ताम्रयुक्त कवकनाशके, (इ) पारायुक्त कवकनाशके, (ई) क्विनोनयुक्त कवकनाशके. तसेच त्यांचे कार्बनी (सेंद्रिय) व अकार्बनी असेही दोन भाग पडतात. अकार्बनी कवकनाशकांमध्ये बोर्डो मिश्रण, गंधक, ताम्रयुक्त इ. कवकनाशकांचा समावेश होतो. हल्ली अकार्बनी कवकनाशकांचा उपयोग कमी होत चालला असून त्यांची जागा कार्बनी कवकनाशके घेत आहेत. जुन्या कवकनाशकांतील उणीवा व दोष दूर होत असून नवीन नवीन कार्बनी कवकनाशके उपलब्ध होत आहेत. यांत लोह, जस्त व धातूंची डायथायोकार्बामेटे इत्यादींचा समावेश होतो. उदा., फेरबाम, झायरम.

(२) क्रियेनुसार : कवकनाशकांचे त्यांच्या क्रियेवरून (अ) संरक्षक, (आ) निर्मूलक व (इ) दैहिक (वनस्पतीत शोषली जाणारी) असे तीन प्रकार आढळतात. संरक्षक कवकनाशके ही पिकावर रोगोत्पादक कवकाचा प्रादुर्भाव होण्यापूर्वी वापरतात. उदा., झायनेब, गंधक इत्यादी. या कवकनाशकांचा उपयोग द्रावण किंवा भुकटीच्या रूपात केला जातो. त्यामुळे रोगोत्पादक कवकाचा प्रादुर्भाव पिकावर होत नाही.

निर्मूलक कवकनाशके रोगाचा प्रादुर्भाव झाला असताना वापरतात. ही कवकनाशके द्रावण किंवा भुकटीच्या रूपात पिकावर फवारतात. त्यांचा कवकजालाशी (कवकाच्या तंतूंशी) प्रत्यक्ष संबंधी येऊन कवक नाश पावते.

काही कवकनाशके वनस्पतीत शोषली जातात व त्यामुळे वनस्पतीत शिरकाव झालेल्या कवकाचा नाश होऊन रोगास आळा बसतो. अशा कवकनाशकांना दैहिक कवकनाशके म्हणतात. फारच थोडी दैहिक कवकनाशके उपलब्ध आहेत. पण हे क्षेत्र प्रगतीच्या मार्गावर आहे.

(३) उपयोगावरून : कवकनाशकांच्या उपयोगानुसार (अ) बीज संरक्षक, (आ) पाने व मोहर संरक्षक, (इ) फल संरक्षक, (ई) जमीन निर्जंतुकीकारक व (उ) वनस्पतींना झालेल्या इजा बऱ्‍या करण्यासाठी वापरण्यात येणारी कवकनाशके, असे वर्गीकरण केले जाते.

(अ) बीज संरक्षक : काही वेळा रोगोत्पादक कवक बियाणे, कंद वगैरेंच्या पृष्ठभागावर असते. अशा कवकांचा नाश करण्यासाठी बियाणे कवकनाशक भुकटीत अथवा द्रावणात बुडवून पेरतात. त्यामुळे पीक रोगमुक्त रहाते. उदा., पारायुक्त कवकनाशके, कॅप्टन, थायरम इत्यादी.

(आ) पाने व मोहर संरक्षक : पानावरील टिक्का व इतर रोग, मोहर करपणे यांवर काही कवकनाशके फवारतात. सामान्यतः ही कवकनाशके रोगाचा प्रादुर्भाव होण्यापूर्वी वापरतात त्यामुळे पालवीवर संरक्षक आवरण तयार होऊन कवकबीजे नाश पावतात. उदा., झायनेब, कॅप्टन इत्यादी.

(इ) फल संरक्षक : कवकामुळे फळात निर्माण होणारे दोष, डाग व कुजण्याची क्रिया नाहीशी करण्यासाठी कवकनाशके वापरतात. उदा., कॅप्टन, मॅनेब इत्यादी.

(ई) जमीन निर्जंतुकीकारक : जमिनीद्वारा प्रसार होणाऱ्‍या रोगांचे निर्मूलन करण्यासाठी वापरण्यात येणाऱ्‍या व पाण्यात मिसळणाऱ्‍या किंवा वायूत रूपांतर होणाऱ्‍या रसायनांचा यात समावेश होतो. उदा., वापम, कॅप्टन पेंटाक्लोरोनायट्रोबेंझीन (पीसीएनबी) इत्यादी. फार्माल्डिहाइड सदृश कवकनाशकांचा बियाण्यावर किंवा लहान रोपावर वाईट परिणाम होतो त्यामुळे अशी कवकनाशके वापरावयाची असल्यास पेरणीपूर्वी थोडे दिवस अगोदर वापरणे इष्ट असते.

(उ) वनस्पतींच्या इजांवरील कवकनाशके : वनस्पतींना झालेल्या इजा बऱ्‍या होण्यासाठी कवकनाशके वापरतात. त्यांत प्रामुख्याने बोर्डो पेस्ट या कवकनाशकाचा समावेश होतो.


गंधकयुक्त अकार्बनी कवकनाशके : गंधकाचा उपयोग कवकनाशक म्हणून फार पूर्वीपासून माहीत असला, तरी ते एकोणिसाव्या शतकामध्येच कवकनाशक म्हणून मान्यता पावले. १८२१ साली सप्ताळूवरील भुरी रोगासाठी रॉबर्ट्‌सन यांनी गंधकाचा उपयोग केला होता, पण ज्यावेळी ते द्राक्षाच्या भुरी रोगावर वापरले गेले त्याच वेळेपासून ते भुरी रोगावरील एक प्रभावी कवकनाशक म्हणून प्रसिद्धी पावले आणि आजही त्याचा उपयोग करण्यात येत आहे.

कवकनाशक म्हणून वापरल्या जाणाऱ्‍या नैसर्गिक गंधकाचे प्रामुख्याने गंधकाची बारीक भुकटी व पाण्यात मिसळणारे गंधक असे दोन प्रकार आहेत.

गंधकाच्या भुकटीमध्ये ती तयार करण्याच्या पद्धतीनुसार तीन प्रकार आढळतात. (१) दळलेले गंधक, (२) संप्लवित गंधक (घन गंधकाचे एकदम बाष्परूपात रूपांतर केलेले) व (३) दुग्ध गंधक. गंधकाच्या कणांचा आकार हा त्याची परिणामकारक उपयुक्तता दर्शवतो. गंधकाच्या बारीक भुकटीमध्ये लहान गुठळ्या बनण्याची शक्यता असते. याकरिता त्यामध्ये थोड्या फार प्रमाणात अक्रिय पदार्थांचा वापर केलेला असतो. सध्या प्रचलित असलेले ३०० मेश (कणाचे आकारमान दर्शविणारे एकक) गंधक कवकनाशक म्हणून प्रभावी असून आर्थिक दृष्ट्या अल्प खर्चाचे आहे. त्याचा उपयोग द्राक्षे, पानवेली, आंबा, गुलाब, वाटाणा यांच्यावरील भुरी रोगावर केला जातो. तसेच ते ज्वारीच्या काणी रोगावर व भुईमुगाच्या टिक्का रोगावरही वापरतात.

पाण्यात मिसळणारे गंधक फवारणे हे भुकटी वापरण्यापेक्षा जास्त हितकारक असते. कारण हे मिश्रण झाडाच्या सर्व भागांवर एकसारखे पसरले जाते. गंधकाचे सूक्ष्मकण पाण्यात नीट मिसळावे म्हणून त्याला ओले करणारे पदार्थ त्यामध्ये मिसळतात. बाजारात अशी पाण्यात मिसळणारी कवकनाशके उपलब्ध आहेत. उदा., थायोव्हिट, अल्ट्रासल्फर, कोसान इत्यादी.

समशीतोष्ण हवामानात गंधकाचे वनस्पतींवर वाईट परिणाम आढळत नाहीत. पण उष्ण हवेमध्ये पानावर डाग पडणे, पालवी करपणे यांसारखे परिणाम आढळतात. अंजीर, सफरचंद, काकडी वगैरे पिकांच्या पालवीवर किंवा फळावर असा परिणाम आढळतो. फुलोरा, मोहर व नाजुक फळे यांवर प्रमाणापेक्षा जास्त गंधक फवारू नये. अकार्बनी गंधकाचा उपयोग कमी प्रमाणात होत असून त्याची जागा नवीन कार्बनी कवकनाशके घेत आहेत.

द्राक्षावरील भुरी रोगाचे निवारण करण्यासाठी ग्रायसन यांनी चुना व गंधक यांच्या मिश्रणाचा १८५१ मध्ये प्रथम वापर केला. तेव्हा त्यास ‘यू ग्रायसन’ या नावाने संबोधले गेले. १९०५ साली पॅरट व त्यांच्या सहकाऱ्‍यांना सफरचंदावरील खपली रोगावर त्यांचा उपयोग होतो असे आढळले. या मिश्रणाचे वैशिष्ट्य म्हणजे ते काही अंशी कवकनाशकही आहे.

कळीचा चुना ४५० ग्रॅम, गंधक ९०० ग्रॅम व पाणी ५० लिटर या प्रमाणात घेऊन प्रथम चुना पाण्यात विरघळवून घेऊन तो तापत ठेवतात व त्यामध्ये पाण्यात मिसळलेले गंधकाचे द्रावण हळूहळू टाकतात. उकळताना थोड्या वेळात मिश्रणाला गडद चॉकलेटी रंग आला म्हणजे हे द्रावण तयार झाले असे समजतात. हे द्रावण तीव्र असल्यामुळे पिकावर फवारण्यापूर्वी याच्या १ भागामध्ये ९० पट पाणी घालून सौम्य करतात.

या मिश्रणाचा उपयोग सफारचंदावरील खपली रोग, द्राक्षे आणि गुलाबावरील भुरी रोग, मिरची व बटाटा यांवरील तांबेरा रोग यांच्यावर तसेच फळावरील लाल कोळी (माइट) किडीवर करतात.

चुना व गंधक द्रावणाचा काही वेळा वाईट परिणाम दिसतो. हिरव्या पानांवर ते फवारले असता त्यांची प्रकाशसंश्लेषण क्रिया (प्रकाशाच्या ऊर्जेने व हरितद्रव्याच्या साहाय्याने कार्बर डाय-ऑक्साइड व पाणी यांच्यापासून कार्बोहायड्रेटे तयार करण्याची क्रिया) मंदावते. गंधक व डीडीटी (१:१) भुकटी यांचा आंब्याच्या भुरी रोगावर व तुडतुड्याच्या बंदोबस्तासाठी वापर करतात. याकरिता ३०० मेश गंधक भुकटी व ५% डीडीटी वापरतात.

ताम्रयुक्त कवकनाशके : १८०७ साली प्रीव्होस्ट या शास्त्रज्ञांनी तृणधान्याच्या काजळीस [→ काणी रोग] कारणीभूत असलेल्या कवकास मोरचुदाची विक्रिया अपायकारक असल्याचे प्रत्ययास आणून दिल्यानंतर ताम्रयुक्त कवकनाशकाचे महत्त्व वाढत गेले. काणी रोगाविरुद्ध मोरचुदाचा १९२६ पर्यत उपयोग करण्यात आला, पण गंधक हे स्वस्त व परिणामकारक बीज संरक्षक उपयोगात येऊ लागल्यापासून मोरचुदाची विक्रिया बियाण्यावर करत नाहीत. मोरचुदाचा उपयोग प्रयोगासाठी वापरण्यात येणाऱ्‍या मातीच्या कुंड्या निर्जंतुक करण्याकडे केला जातो. ताम्रयुक्त कवकनाशकांपैकी महत्त्वाची कवकनाशके पुढीलप्रमाणे आहेत.

(१) बोर्डो मिश्रण : पीक संरक्षणात वापरात असणाऱ्‍या अनेक कवकनाशकांत बोर्डो मिश्रणाचे स्थान अग्रगण्य आहे. फ्रान्समधील बोर्डो या शहरापासून या मिश्रणाचा प्रसार झाला म्हणून त्याला बोर्डो मिश्रण असे म्हणतात. रस्त्याच्या कडेला असलेल्या द्राक्षवेलीवरील द्राक्षे वाटसरूंनी चोरून नेऊ नयेत म्हणून मोरचूद व चुना यांचे मिश्रण वापरत असत. हे मिश्रण विषारी आहे असे समजून कोणीही त्या द्राक्षांना हात लावीत नसत. फ्रान्समध्ये १८७८ च्या सुमारास मोठ्या प्रमाणावर केवडा रोग उद्‍भवला होता त्यावेळी वरील मिश्रण फवारलेल्या बागांतील द्राक्षवेलींची पाने रोगमुक्त राहिल्याचे मीयार्दे यांना आढळले. मोरचूद व चुना या मिश्रणामुळे रोगाला आळा बसला असावा असा त्यांनी निष्कर्ष काढला. त्यानंतर बोर्डो मिश्रणाचा कवकनाशक म्हणून मोठ्या प्रमाणावर प्रसार झाला. बोर्डो मिश्रण तयार करण्यासाठी मोरचूद, कळीचा चुना व पाणी यांची आवश्यकता असते. पिकाच्या अवस्थेनुसार सर्वसाधारणपणे २.३ : २.३ : २२५ हे मिश्रण वापरले जाते. पण लहान व नाजूक रोपांवर सौम्य मिश्रण वापरतात.

बोर्डो मिश्रण तयार करण्यासाठी मोरचूद ठराविक प्रमाणात वजन करून घेऊन पाण्यात विरघळवितात. हे द्रावण धातूच्या भांड्यात न करता यासाठी लाकडी टीप किंवा मातीची भांडी वापरतात. दुसऱ्‍या लाकडी टिपात ठराविक प्रमाणात चुनकळी घेऊन पाण्यात त्याचे द्रावण तयार करतात. त्यानंतर मोरचुदाचे द्रावण चुन्याच्या द्रावणात ओतून मिश्रण ढवळून एकजीव करतात किंवा मोरचुदाचे द्रावण व चुन्याचे द्रावण एकाच वेळी तिसरऱ्‍या लाकडी टिपामध्ये ओतून हे मिश्रण तयार करतात. मिश्रण तयार झाल्यावर शक्यतो त्याच दिवशी वापरावे. तसेच वापरण्यापूर्वी ते रासायनिक दृष्ट्या उदासीन आहे याची खात्री करावी.

बोर्डो मिश्रण हे अल्प किंमतीमध्ये तयार होणारे, वापरण्यास बिनधोक व बऱ्‍याच रोगांवर उपयुक्त आहे. सुपारीवरील गळ, रोपांचे मृत्यू, बटाट्यावरील करपा, द्राक्षावरील तंतुभुरी, लिंबावरील खैरा, भुईमुगावरील टिक्का, पानवेली, टोमॅटो, हळद, पपई इत्यादींच्या पानांवरील ठिपक्यांच्या रोगावर ते वापरतात. काही वेळा त्याच्या फवारण्यामुळे काही फळझाडांवर वाईट परिणाम दिसून आला आहे. उदा., सफरचंद. तसेच ते बनविणे त्रासदायक आहे. काही पाश्चात्य देशांत मात्र निर्जलित बोर्डो मिश्रण तयार मिळते.


(२) बर्गंडी मिश्रण : सन १८८७ साली मेसन या शास्त्रज्ञांना बोर्डो मिश्रण तयार करण्यासाठी उत्तम प्रतीचा कळीचा चुना मिळू न शकल्याने चुन्याऐवजी धुण्याचा सोडा वापरून बर्गंडी मिश्रण तयार केले. अशाच तर्‍हेचे मिश्रण आयर्लंडमध्ये बटाट्यावर वापरले गेले व त्याला ‘सोडा बोर्डो’ असे नाव पडले. बर्गंडी मिश्रण तयार करण्याची पद्धत बोर्डो मिश्रणासारखीच असून ते १.८ किग्रॅ. मोरचूद, २.३ किग्रॅ. धुण्याचा सोडा व २२५ लिटर पाणी यांपासून करतात. ज्या ठिकाणी चांगल्या प्रतीचा कळीचा चुना मिळत नसे तेथे हे मिश्रण उपयोगात आणले गेले. बोर्डो मिश्रणाने ज्याप्रमाणे फळावर डाग पडणे, कोवळी पाने करपणे यांसारखे दुष्परिणाम होतात तसे बर्गंडी मिश्रणाने होत नाहीत.

(३) अल्पविद्राव्य ताम्रयुक्त कवकनाशके : बोर्डो मिश्रण तयार करण्यास होणारा त्रास, साठविण्याची अडचण व त्याचा काही वेळा आढळून येणारा दुष्परिणाम लक्षात घेऊन शास्त्रज्ञांनी नवीन ताम्रयुक्त कवकनाशके शोधून काढली. ही कवकनाशके अल्पविद्राव्य असल्यामुळे त्यांचा अनिष्ट परिणाम आढळत नाही. बोर्डो मिश्रणाऐवजी या कवकनाशकांचा वापर आता सर्वत्र आढळत आहे. यांमध्ये मुख्यत्वे कॉपर ऑक्सिक्लोराइड या रसायनाचा वापर आढळतो. यांमध्ये पाण्यात मिसळणारी व भुकटी स्वरूपात वापरता येणारी कवकनाशके उपलब्ध आहेत. ५० टक्के ताम्रयुक्त कवकनाशके फवारणीयोग्य असतात व ४ ते १२ टक्के तांबे असणारी भुकटी स्वरूपात वापरतात.

क्युप्रस ऑक्साइड असलेली काही ताम्रयुक्त कवकनाशकेसुद्धा उपलब्ध आहेत. उदा., बेसिकॉप, स्प्रे कॉप इत्यादी. त्यांचा उपयोग बियाणे व पालवी संरक्षक म्हणून करतात. ताम्रयुक्त कवकनाशके मुख्यत्वे द्राक्षे, भोपळा, कांदा इत्यादींच्या केवडा रोगावर तसेच उसावरील पिवळा ठिपका रोग, कॉफीवरील तांबेरा, बटाट्यावरील करपा, भाताच्या पानांचा ठिपका रोग, भुईमुगावरील टिक्का इ. रोगांवर परिणामकारक आहेत.

पारायुक्त कवकनाशके : पारा जंतुनाशक असल्याचे फार पूर्वीपासून माहीत होते. त्याचा प्राण्यांवर आणि पिकांवर विषारी परिणाम होत असल्यामुळे त्याचा फवारण्याकडे सहसा उपयोग करत नाहीत, पण कवकनाशक म्हणून बीजसंरक्षणासाठी याचा मोठ्या प्रमाणावर उपयोग होऊ लागला. पारायुक्त कवकनाशकांचा बियाण्याच्या रुजण्यावर वाईट परिणाम न होता रुजण्याच्या ठिकाणी संरक्षणात्मक क्षेत्र निर्माण होऊन अंकुराची वाढ चांगली होते. पारायुक्त कवकनाशकामध्ये (१) अकार्बनी व (२) कार्बनी असे दोन प्रकार आहेत.

(१) पारायुक्त अकार्बनी कवकनाशके : करोझिव्ह सब्लिमेटाचा (मर्क्युरिक क्लोराइडाचा) उपयोग अयुकानेट यांनी प्रथम गव्हाच्या चिकट्या काणीवर केला. त्याचप्रमाणे केलरमान व स्विंगल यांनी पण हे रसायन वापरून प्रयोग केले, परंतु त्यांना फारसे यश आले नाही. त्यानंतर हिल्टनेर यांनी १९१० च्या सुमारास राय पिकावरील फ्युझेरियम रोगावर मर्क्युरिक क्लोराइडाचा यशस्वी रीत्या उपयोग केला. या रोगाचे कवकजाल बियाण्यामध्ये असते. या संशोधनाच्या निरीक्षणावरून पुष्कळशी बीजसंरक्षक पारायुक्त कवकनाशके उपलब्ध झाली. मर्क्युरिक क्लोराइडाचा उपयोग बियाणे, कंद इ. निर्जंतुक करण्यासाठी करतात. याच्या १:१,००० अशा सौम्य द्रावणात बियाणे, कंद काही मिनिटे बुडवून मग लागण करतात. याचे द्रावण धातूच्या भांड्यात करू नये. कोबी, टोमॅटो वगैरे पिकांवरील रोगास तसेच कोबीवरील मुळाच्या गाठी रोगास व बटाट्याच्या काही रोगांस या रसायनाने प्रतिबंध होतो. याचा उपयोग प्रयोगशाळेतील वस्तू व पदार्थ निर्जंतुक करण्यासाठी तसेच हिरवळीवरील रोगांवरही करतात. हे रसायन विषारी असल्यामुळे वापरताना काळजी यावी लागते व वापरल्यानंतर हात स्वच्छ धुणे आवश्यक असते. कार्बनी पारायुक्त कवकनाशके उपलब्ध झाल्यामुळे हल्ली याचा उपयोग जास्त केला जात नाही.

(२) पारायुक्त कार्बनी कवकनाशके : पारायुक्त अकार्बनी कवकनाशके अतिशय विषारी असल्यामुळे कमी विषारी अशा पारायुक्त कार्बनी कवकनाशकांचा वापर बराच वाढला. बेसनबर्ग यांनी १९१३ साली अशा कार्बनी कवकनाशकांबद्दल सुचविले होते. १९१४ साली राइम या शास्त्रज्ञांना क्लोरोफिनिल मर्क्युरी हे संयुग गव्हावरील चिकट्या काणीवर परिणामकारक बीज निर्जंतुक आहे असे आढळले. १९१५ मध्ये बायर कंपनीने ‘उस्पूलन’ हे कवकनाशक तृणधान्याच्या बियाण्याला चोळण्यासाठी तयार केले. त्यानंतर अशी पारायुक्त कार्बनी कवकनाशके मोठ्या प्रमाणावर तयार होऊ लागली. ही कवकनाशके एथिल मर्क्युरिक क्लोराइड, फिनिल मर्क्युरिक ॲसिटेट इत्यादींपासून तयार केली जातात.

पारायुक्त कार्बनी कवकनाशके प्रायः बियाणे निर्जंतुक करण्यासाठी भुकटी किंवा द्रावण स्वरूपात वापरतात. क्वचित प्रसंगी वनस्पतीवर फवारलीसुद्धा जातात. उदा., सफरचंदावरील खपली रोग. भुकटी किंवा द्रावण स्वरूपात बियाणे निर्जंतुक करण्यासाठी वापरण्यात येणाया कवकनाशकामध्ये १ किंवा ३ टक्के पारायुक्त घटक असतो व त्याचा उपयोग एक भाग भुकटी व २५० ते ५०० भाग बियाणे या प्रमाणात करतात. द्रावणाचा उपयोग करताना ते ज्या पिकाकरिता वापरावयाचे त्यानुसार त्याची तीव्रता ठेवतात. उसाच्या बेण्याकरिता ३ टक्के पारायुक्त घटक असलेल्या कवकनाशकाच्या ०⋅५ टक्के द्रावणाचा उपयोग करतात. बटाट्यासाठी ०⋅२५ टक्के द्रावण वापरतात. कपाशीवरील करपा, ओटवरील काणी, बटाट्याचे काही रोग, ज्वारीवरील काणी, उसाचा पाइन-ॲपल रोग, टोमॅटोच्या रोपांचू मृत्यू, हळदीमधील मूळ आणि गड्डा कूज इ. अनेक रोगांवर या पारायुक्त कार्बनी कवकनाशकांचा उपयोग होतो.

पारायुक्त कवकनाशके विषारी असल्यामुळे वापर करताना जरूर ती काळजी घेणे आवश्यक आहे. पिकावर कवकनाशके फवारून रोग आटोक्यात आणण्यापेक्षा बी निर्जंतुक करून पेरल्यास रोगास आळा घालणे सोईचे असते. ही कवकनाशके अत्यंत अल्प प्रमाणात लागत असल्यामुळे कमी खर्चाची आहेत. काही देशांत बियाण्याचे निर्जंतुकीकरण बियाणे विकणाऱ्‍या व्यापारी कंपन्या करतात. त्यामुळे ही विषारी कवकनाशके शेतकऱ्‍याला हाताळावी लागत नाहीत. अर्थात हे प्रक्रिया केलेले बियाणे फक्त पेरण्यासाठीच वापरावे लागते, ते केव्हाही मनुष्य किंवा प्राण्याच्या खाण्यात येणार नाही याची काळजी यावी लागते. पारायुक्त कवकनाशके ऍग्रोसान, सिरेसान, ऍरेटॉन इ. व्यापारी नावांनी उपलब्ध आहेत.

कार्बनी कार्बामेट कवकनाशके : कार्बनी कवकनाशके १९३० नंतरच्या काळात बरीच महत्त्वाची गणली गेली आहेत. १९३१ साली द्यु पाँ कंपनीच्या प्रयोगशाळेत कार्बामेट कवकनाशक म्हणून वापरता येण्याची शक्यता अजमावण्यात आली. सध्या प्रचलित असलेली कार्बामेट कवकनाशके डायथायोकार्बामिक अम्लापासून तयार केलेली आहेत. उदा., डायथायोकार्बामेट-झायरम, फेरबाम बिसडायथायोकार्बामेट-झायनेब, मॅनेब व नाबम थायरम.

(१) डायथायोकार्बामेट : (अ) झायरम : (झिंक डायमिथिलडायथायोकार्बामेट). हे जस्त धातूवर आधारलेले कार्बनी कवकनाशक आहे. याचा उपयोग पुष्कळशा भाजीपाल्यांवरील रोगांवर होतो. काकडी वर्गातील वेलींवरील कवडी (अँथ्रॅक्नोज) रोग, बटाट्यावरील लवकर पडणारा करपा, तंबाखूवरील कवडी इ. रोगांवर हे कवकनाशक उपयुक्त आहे. (आ) फेरबाम : (फेरिक डायमिथिलडायथायोकार्बामेट). हे लोह धातूवर आधारित असून बऱ्‍याच रोगांवर उपयुक्त आहे. ज्या फळझाडांच्या जातीवर गंधक फवारण्याने अपाय होतो अशा फळझाडांवर फेरबामचा उपयोग होऊ शकतो. सफरचंदावरील खपली रोगावर ते उपयुक्त आहे तसेच केळीच्या पानावरील ठिपके, कांद्यावरील ठिपके काजळी, भातावरील करपा, उसाच्या पानावरील ठिपके, टोमॅटोवरील काही रोग यांवर फेरबाम परिणामकारक आहे. सामान्यतः ते फवारण्यासाठी वापरतात, पण क्वचित ते बियाणे निर्जंतुक करण्यासाठीही वापरले जाते. हे कवकनाशक इतर बऱ्‍याच कवकनाशकांसमवेत व कीटकनाशकांबरोबर वापरले जाते.


(२) बिसडायथायोकार्बामेट : (अ) झायनेब : (झिंक एथिलीनबिसडायथायोकार्बामेट). बाजारात ते कवकनाशक डायथेन झेड –७८ व पारझेट या नावाने उपलब्ध आहे. प्रामुख्याने हे कवकनाशक पिकावर

फवारले जाते. याचा उपयोग गव्हावरील तांबेरा, सफरचंदावरील खपली, स्ट्रॉबेरी, ज्वारी, बटाटा, कांदा यांच्या पानांवरील ठिपके, भातावरील करपा इ. रोगांवर होतो. ०⋅१५ टक्के ते ०⋅२० टक्के द्रावण फवारणीसाठी वापरतात. (आ) मॅनेब : (मँगॅनीज एथिलीनबिसडायथायोकार्बामेट). हे कार्बनी कवकनाशक झायनेबप्रमाणेच असून मँगॅनीजवर आधारित आहे. बाजारात ते डायथेन एम–४५ (७० टक्के मॅनेब) व मानझेट या नावांनी उपलब्ध आहे. याचा उपयोग बटाटा व टोमॅटोवरील करपा रोगावर करतात. तसेच ते घेवडा, काकडी इत्यादींच्या कवडी रोगावर परिणामकारक आहे. ते सफरचंदाच्या काही जाती, तंबाखू व काकडी वर्गीय वेली यांना अपायकारक आढळते. (इ) नाबम : (डायसोडियम एथिलीनबिसडायथायोकार्बामेट). कार्बामेट कवकनाशकामधील नाबम हे प्रथम उपलब्ध झालेले कवकनाशक आहे, पण ते अस्थिर असल्यामुळे त्याच्यामध्ये सुधारणा सुचवल्या गेल्या व नंतर झायनेब हे कवकनाशक उपलब्ध केले गेले. नाबमचा उपयोग टोमॅटो व बटाट्यावरील करपा रोगावर करतात.

(३) थायरम : (टेट्रामिथिल थायरम डायसल्फाइड, टीएमटीडी). हे कवकनाशक मुख्यत्वे बियाणे निर्जंतुक करण्यासाठी वापरतात. सामान्यतः भाजीपाला व फुलझाडांच्या बियांसाठी याचा वापर केला जातो. द्रावण स्वरूपात वापरल्यास रोपांचे रोग, अपमृत्यू आणि मूळकूज रोगाला आळा बसतो. ज्वारी, गहू, मका, टोमॅटो इ. पिकांच्या बियाण्यासाठी ते वापरतात.

  

क्विनोन कवकनाशके : यामध्ये क्लोरॅनिल व डायक्लोन ही दोन कवकनाशके उपलब्ध आहेत.

(अ) क्लोरॅनिल : (२, ३, ५, ६ टेट्राक्लोरो १–४ बेंझोक्विनोन). हे कवकनाशक ‘स्परगॉन’ या नावाने उपलब्ध असून त्याचा उपयोग बी निर्जंतुक करण्यासाठी व पिकावर फवारण्यासाठी करतात. रोपांचे अपमृत्यू, बी कुजणे यांवर तसेच कोबी, कांदा इत्यादींवरील केवडा रोगावर उपयुक्त आहे.

(आ) डायक्लोन : (२, ३ डायक्लोरो १–४ नॅप्थाक्विनोन). या कवकनाशकाचा उपयोग मुख्यत्वे बी निर्जंतुक करण्यासाठी होत असला, तरी ते पिकावर फवारण्यासाठीसुद्धा वापरले जाते. ते सफरचंदावरील खपली रोग, टोमॅटोच्या पानावरील ठिपके, उसाचा पाइन-ॲपल रोग इत्यादींवर उपयुक्त आहे.

संकीर्ण कवकनाशके : (१) कॅप्टन : याचे रासायनिक नाव एन-ट्रायक्लोरोमिथिल-थायो–४ सायक्लोहेक्झीन –१, २–डायकार्‌बॉक्सिमाइड असे असून ते ऑर्थोसाइड ४०६, एस्सो कवकनाशक ४०६, कॅप्टन ७५ इ. नावांखाली उपलब्ध आहे. या कवकनाशकाचा प्रामुख्याने पिकाच्या पालवीवर फवारण्यासाठी उपयोग करतात. हे कवकनाशक बऱ्‍याच कीटकनाशकांबरोबर वापरता येते. भाजीपाला व तृणधान्याचे बी निर्जंतुक करण्यासाठी हे वापरले जाते. लहान रोपांचे अपमृत्यू टाळण्यासाठी बी पेरल्यानंतर वाफ्यांत त्याचे द्रावण टाकतात. सफरचंदावरील खपली व इतर रोग, अंजिरावरील तांबेरा, केळीच्या पानावरील ठिपके, टोमॅटो व बटाटा यांच्यावरील करपा, द्राक्षावरील केवडा इ. रोगांवर ते वापरतात. फवारण्यासाठी सामान्यतः ०⋅२ टक्के द्रावणाचा उपयोग करतात. नासपती व स्ट्रॉबेरीच्या रोगांवरही ते उपयुक्त आहे.

(२) फोल्फेट : हे कवकनाशक फल्टन या नावानेही परिचित असून कॅप्टन कवकनाशकाशी सदृश आहे. कॅप्टन ज्या रोगांवर वापरतात त्या रोगांवर हेही परिणामकारक आहे. काही वेळा ते भुरी रोगावर उपयुक्त असल्याचे आढळते. उदा., गुलाब.

(३) डिनोकॅप : (डायनायट्रो फिनिल क्रोटोनेट). हे कवकनाशक कॅरॅथेन, क्रोटोथेन, ॲराथेन इ. व्यापारी नावांनी उपलब्ध आहे. गंधकाचा उपयोग पुष्कळ पिकांच्या भुरी रोगावर जरी होत असला तरी काही वनस्पतींवर उदा., काकडी, सफरचंद इत्यादींवर ते वापरता येत नाही. डिनोकॅप कवकनाशक हे गंधकाऐवजी वरील वनस्पतींच्या भुरी रोगावर वापरता येते. त्यामुळे ते सफरचंद, काकडी वर्गीय वेली नासपती, गुलाब, द्राक्षे, गूजबेरी इत्यादींवरील भुरी रोगावर वापरतात.

(४) डोडीन : याला डोडीन ॲसिटेट असेही म्हणतात. याचे रासायनिक नाव एन-डोडिसिलग्युनिडाइन ॲसिटेट असे असून ते सायप्रेक्स व मेलप्रेक्स या नावांखाली उपलब्ध आहे. मुख्यत्वे ते सफरचंदावरील खपली रोगावर वापरले जाते, पण सफरचंदाच्या काही जातींवर त्याचा वाईट परिणाम आढळला आहे.

(५) क्विन्टोझीन : याचे रासायनिक नाव पेंटाक्लोरोनायट्रोबेंझीन (पीसीएनबी) असून हे ब्रासिकॉल, टेट्राक्लोर इ. नावांनी परिचित आहे. हे कवकनाशक मुख्यत्वे जमिनीमधील रोगोत्पादक कवकावर वापरतात. यामुळे रोपांच्या अनेक रोगांना आळा बसतो. कोबीवरील मुळांचा गाठी रोग, शर्करा कंदाची (शुगर बीटची) कूज, भुईमुगाच्या मुळांची कूज, गव्हावरील चिकट्या काणी इ. अनेक रोगांवर ते परिणामकारक आहे.

प्रतिजैव पदार्थ : (अँटिबायॉटिक्स). फ्लेमिंग या शास्त्रज्ञांनी १९२९ साली पेनिसिलीन या प्रतिजैवाचा शोध लावल्यावर नवीन नवीन प्रतिजैवांची भर पडत गेली. उदा., स्ट्रेप्टोमायसीन, ऑरिओमायसीन, ऑरिओफंजीन इत्यादी. हल्ली प्रतिजैवांचा पिकावरील रोग निवारण्याकडे बराच वापर होत आहे. ही प्रतिजैवे वनस्पतीत शोषली जातात आणि रोगाला आळा बसतो. त्यामुळे त्यांचे कार्य दैहिक कवकनाशकाप्रमाणे आढळते.

(१) ऑरिओफंजीन : हे प्रतिजैव हिंदुस्तान अँटिबायॉटिक्स लि., पिंपरी यांनी तयार केले असून काही पिकांच्या रोगांवर वापरले जाते. मोसंबीवरील डिंक्या, सफरचंदावरील भुरी, नाचणीवरील करपा इ. काही रोगांवर ते परिणामकारक असल्याचे आढळले आहे.

(२) ऑक्टिडिओन : (सायक्लोहेक्झिमाइड). हे प्रतिजैव भुरी रोगावर व काही पिकांच्या तांबेरा रोगावर उपयुक्त आहे.

दैहिक कवकनाशके : प्रतिजैवे व निरनिराळ्या दैहिक कीटकनाशकांच्या उपलब्धतेनंतर दैहिक कवकनाशकांच्या उपलब्धतेकडे सर्वांचे लक्ष लागले होते व आता अशी दैहिक कवकनाशके उपलब्ध होऊ लागली आहेत.


(१) ऑक्झॅथीन : यामध्ये डी ७३५ व्हिटॅवॅक्स व एफ ४६१ प्लॅन्टवॅक्स ही दोन दैहिक कवकनाशके अंतर्भूत आहेत. व्हिटॅवॅक्सच्या वापरण्यामुळे बार्ली, गहू व ओट या पिकांवरील काजळी रोगाला आळा बसतो. या कवकनाशकाची बियाण्यावर प्रक्रिया करून मग पेरतात.

(२) बेन्लेट : (कवकनाशक १९९१). या दैहिक कवकनाशकाच्या उपयोगाने काकडी वर्गीय वेलींवरील व तृणधान्यावरील भुरी, भातावरील करपा, सफरचंदावरील खपली, शर्करा कंदाच्या पानावरील ठिपके, द्राक्षावरील भुरी इ. रोगांना आळा बसतो.

नवीन नवीन दैहिक कवकनाशके उपलब्ध होत असून काही प्रायोगिक अवस्थेत आहेत. क्लोरोनेब (डेमोसान), टेरॅझोल, पी. पी. १४९ इ. दैहिक कवकनाशके उपलब्ध झालेली आहेत.

कवकांचा नाश करण्यासाठी रासायनिक कवकनाशक पदार्थांव्यतिरिक्त उष्ण जल प्रक्रिया, सूर्याची उष्णता इत्यादींचाही उपयोग होतो.

(१) उष्ण जल प्रक्रिया : कवकनाशासाठी उष्ण जल प्रक्रियेचा उपयोग १८८८ साली डेन्मार्कमधील जेन्सन या शास्त्रज्ञांनी केला. बियाच्या आतमध्ये सुप्तावस्थेत राहून रोगाचा फैलाव करणाऱ्‍या कवकांवर ही क्रिया परिणामकारक आहे. विशेषतः गहू, बार्ली, ऊस यांच्या काणी रोगाच्या प्रतिबंधासाठी ही पद्धती वापरली जाते. या पद्धतीमध्ये बियाणे ४ ते ६ तास अगोदर थंड पाण्यात भिजवतात व नंतर ते ५४ से. तपमान असलेल्या पाण्यात १० मिनिटे बुडवतात. या वेळी उष्ण पाणी सतत ढवळणे आवश्यक असते. त्यानंतर बी थंड पाण्यात टाकून मग सावलीत वाळवतात.

उसाचा गवताळ वाढ हा रोग व्हायरसमुळे (अतिसूक्ष्म जंतूंमुळे) होतो. रोगाचा प्रसार मुख्यत्वे दूषित बेण्यापासून होतो. रोगाला प्रतिबंध करण्यासाठी उष्ण जल प्रक्रिया हा एकमेव उपाय आहे. यासाठी उसाचे बेणे ५०० से. तपमानाच्या पाण्यात २ तास बुडवून मग लागण करतात.

(२) सौर उष्णता पद्धती : उष्ण जल प्रक्रियेऐवजी सूर्याची उष्णता वापरूनही कवकांचा नाश केला जातो. गव्हाचे बी काणी रोगापासून मुक्त करण्यासाठी याचा उपयोग करतात. एप्रिल-मे महिन्यात ज्यावेळी कडक ऊन पडते अशा वेळी ही प्रक्रिया करतात. प्रथम थंड पाण्यात बी सु. पाच तास भिजत ठेवतात. त्यामुळे बी फुगून आतील सुप्तावस्थेतील कवकाची वाढ होण्यास सुरुवात होते. त्यानंतर जस्ताच्या पत्र्यावर कडक उन्हात १ ते ४ वाजेपर्यंत बी पसरतात व मधून मधून त्यावर हात फिरवून सर्व बियांना उष्णता लागू देतात. नंतर सावलीत बी सुकवून साठवतात. त्यामुळे काणी रोगाच्या बुरशीचा नाश होतो.

धांडे, गो.वा.

भारतातील कृषि-कवकनाशकांचे उत्पादन : कवकनाशकांच्या मोठ्या प्रमाणावरील उत्पादनाला अलीकडेच सुरुवात झाली आहे. पाश्चिमात्य देशांत हा व्यवसाय दुसऱ्‍या महायुद्धानंतरच वाढला आहे. भारतात चुना व मोरचूद यांच्या मिश्रणाचा कवकनाशक म्हणून उपयोग दुसऱ्‍या महायुद्धापूर्वीपासूनच होत होता. पण कवकनाशकांच्या उत्पादनाला साधारणपणे १९५२ सालापासून सुरुवात झाली व काही खाजगी कंपन्यांनी त्यामध्ये स्पृहणीय यश मिळविले आहे. काही कंपन्यांनी त्यांच्या उत्पादनाकरिता नावाजलेल्या पाश्चिमात्य कंपन्यांकडून सहकार्याने तांत्रिक ज्ञान मिळविले आहे.

भारतातील काही कवकनाशकांचे उत्पादन (मेट्रिक टनात) 

कवकनाशके 

१९७०-७१ 

चालू उत्पादनक्षमता 

नवीन वाढीच्या योजना 

तूट 

थायोकार्बामेटे 

थायरम / कॅप्टन

कॉपर ऑक्सिक्लोराइड 

पारायुक्त कार्बनी कवकनाशके

५,३०० 

१,८०० 

५,३०० 

५० 

२,६०० 

१०० 

७,२०० 

९१ 

१,२४४ 

१,००० 

— 

— 

१,४५६ 

७०० 

— 

भारतात कवकनाशकांची अतिशय गरज आहे तथापि गरजेच्या मानाने उत्पादन पुष्कळच कमी आहे.

मानवी रोगावरील कवकनाशके : अनेक प्रकारच्या कवकांचे मानवी शरीरावर परजीवी म्हणून वास्तव्य असते. त्यांपैकी सु. ५० प्रकारांपासून मानवी रोग उद्‌भवू शकतात. 

मानवाच्या कवकसंसर्ग रोगावर रसायनचिकित्सा व प्रतिजैव कवकनाशक औषधे फारशी आशादायक ठरलेली नाहीत. ट्रायकोफायटॉन रूब्रम या कवकामुळे होणाऱ्‍या त्वचारोगावर (गजकर्ण, नायटा) ग्रिझिओफलव्हीन (नव्या स्वरूपात ग्रिझिओफलव्हीन एफ. पी.) हे प्रतिजैव औषध फार गुणकारी ठरले आहे. हे प्रतिजैव पेनिसिलियम ग्रिझिओफलव्हीन यापासून तयार केले असून १९५९ साली ते वापरण्यास उपलब्ध झाले. त्याचप्रमाणे किरणकवक रोगावर (ऍक्टिनोमायकोसीस) पेनिसिलीन (अधिक प्रमाणात वापरल्यास), नोकॉरडिओसीस (म्हणजे नोकॉरडिया व स्ट्रेप्टोमायसीस ह्या कवकांमुळे होणाऱ्‍या मानवी रोगावर पेनिसिलीन व सल्फाडायझीन यांचा संयुक्त इलाज), ॲस्परजिलस कवकामुळे होणाऱ्‍या ऍस्परजिलोसीस रोगावर अँफोटेरिसीन-बी आणि पोटॅशियम आयोडाइड (थोडे थोडे वाढवून रोज ३० ग्रॅमपर्यंत) हे इलाज उपयुक्त ठरले आहेत. [→ कवकसंसर्ग रोग].


औद्योगिक कवकनाशके : नेहमी वापरात असणाऱ्‍या बऱ्‍याच पदार्थांवर कवकांचा प्रादुर्भाव होऊन ते खराब होतात. त्यांच्या संरक्षणाकरिता कवकनाशकांचा वापर करणे जरूरीचे असते. लाकूड, कापड, रंग, प्लॅस्टिक, काचेची भिंगे अशा अनेक वस्तूंवर कवकांचा अनिष्ट परिणाम होतो. लगद्यापासून कागद अगर द्राक्षापासून मद्यनिर्मिती अशा अनेक उद्योगधंद्यांत अनिष्ट कवकांचा नाश करण्यासाठी कवकनाशके वापरणे अपरिहार्य असते. औद्योगिक कवकनाशके वापरताना त्यांच्या कवकनाशक गुणाबरोबरच त्यांचे इतर गुणधर्मही लक्षात घ्यावे लागतात. उदा., पारा हा मानव व प्राणिमात्राला विषारी असल्याने त्याचा उपयोग करताना हा विषारी गुणधर्म लक्षात ठेवूनच त्याचा वापर करणे वा न करणे हे ठरवावे लागते. औद्योगिक कवकनाशकांचे वर्गीकरण त्यांचे रासायनिक घटक अगर त्यांच्या क्रियेवरून न करता ते ज्या पदार्थांसाठी वापरतात त्यावरून करतात. उदा., लाकूड संरक्षक, कापड संरक्षक, कागद संरक्षक इत्यादी. 

(१) लाकूड संरक्षक : लाकडाचे संरक्षण तैलजन्य व जलजन्य अशा दोन प्रकारच्या रासायनिक पदार्थांमुळे होते. तैलजन्य कवकनाशके ही कार्बनी संयुगे असून पाण्यात अविद्राव्य असतात. त्यांच्या या गुणधर्मामुळे जेथे लाकडाचा संबंध पाण्याशी येतो अशा ठिकाणी त्यांचा वापर करतात. यामुळे लाकूड जास्त दिवस टिकते. जलजन्य कवकनाशके प्राय: अकार्बनी संयुगे असून ती पाण्यात विद्राव्य असतात.

लाकूड संरक्षणासाठी क्रिओसोटचा वापर बऱ्‍याच ठिकाणी केलेला आढळतो. काही वेळा क्रिओसोट व डांबर यांचा संयुक्त वापरही केला जातो. पेंटाक्लोरोफिनॉल खनिज तेलामध्ये मिसळून वापरण्यात येते. 

जलजन्य कवकनाशकांमध्ये पूर्वीपासून प्रचलित असलेल्या झिंक क्लोराइड, मोरचूद इत्यादींचा समावेश होतो. क्रोमियमयुक्त संयुगांचा वापरही होत आहे. ही पाण्यात कमी प्रमाणात विद्राव्य आणि धातूवर प्रक्रिया न करणारी अशी आहेत.

(२) कापड : कापड, सुती दोरे व दोरखंडे यांच्या संरक्षणाकरिता वापरण्यात येणाऱ्‍या रासायनिक पदार्थांमध्ये बिनविषारीपणा, रंगहीनता, जलरोधकता, धागा कमजोर न करणे व अनावश्यक रंगछटा न आणणे या गोष्टी असणे आवश्यक असते. बऱ्‍याच कवकनाशकांच्या परीक्षणावरून फारच थोड्या कवकनाशकांमध्ये असे गुणधर्म आढळून आले आहेत.

कापड, सुती दोरो इत्यादींकरिता सामान्यतः तीन कवकनाशके प्रचारात आहेत : (१) कॉपर नॅप्थलेट, (२) कॉपर ८-क्विनोलिनेट (३) २, २’ मिथिलीन बिस (४ क्लोरोफिनॉल). याव्यतिरिक्त झिंक नॅप्थलेट, सॅलिसिलानाइड कॉपर ओलिएट, कॉपर रेझिनेट, झिंक डायएथिल-डायथायोकार्बामेट इत्यादींचाही वापर करतात.

   (३) रंगलेप : सूक्ष्मजीवांचा परिणाम रंगलेप ओला असताना अगर कोरडा (वाळलेला) असतानासुद्धा होतो. रंगलेपात सूक्ष्मजीवांमुळे अनेक बदल होतात. उदा., त्याची श्यानता (दाटपणा) कमी होणे. आर्द्र व दमट हवेत रंगलेपाच्या पृष्ठभागावर कवकांचा परिणाम आढळतो. काही रंगद्रव्ये उदा., जस्त, ताम्र इत्यादींची ऑक्साइडे कवकनाशक गुणांनी युक्त असतात त्यामुळे त्यांत कवकांची वाढ होत नाही. तसेच कॅल्शियम कार्बोनेट, बेरियम मेटाबोरेट अशी रंगामध्ये वापरली जाणारी रसायनेसुद्धा कवकांची वाढ थांबवितात. काही वेळा रंगामध्ये कवकनाशके मिसळून वापरतात. यासाठी कार्बनी अम्लाच्या फिनिल मर्क्युरी लवणांचा उपयोग करतात. पाऱ्‍याच्या विषारीपणामुळे बऱ्‍याच वेळा ट्रायब्युटेलीन हायड्रॉक्साइड, सॅलिसिलानिलीड वगैरे बिनविषारी रसायनांचा वापर अटळ ठरतो.

   (४) कातडी : कातडी व कातडी वस्तू उबदार हवा व हवेतील आर्द्रतेमुळे खराब होतात. कवकांमुळे कातडी वस्तूच्या पृष्ठभागावर वाईट परिणाम होत असल्यामुळे अशा वस्तू तयार करणारे कारखानदार व विक्रेते यांना विशेष काळजी यावी लागते. याकरिता नायट्रोफिनॉलच्या काही प्रकारांचा वापर करतात. कातडी संरक्षक रसायनांमध्ये एथिल मर्क्युरिक क्लोराइड, फिनिल मर्क्युरिक नायट्रेट इत्यादींचा समावेश होतो. पण त्यांच्या विषारीपणामुळे त्यांच्या वापरावर मर्यादा पडते. कॉपर ८-क्विनोलिनेटचा मात्र अनुकूल परिणाम दिसून आला असून सर्वसाधारणपणे त्याचा वापर कातडी वस्तूंच्या संरक्षणासाठी केला जातो. 

   (५) प्लॅस्टिक : नेहमीच्या वापरातील प्लॅस्टिकमध्ये बहुवारिके (अनेक रेणूंच्या संयोगाने तयार झालेल्या जटिल रेणूंनी युक्त असलेली संयुगे), प्लॅस्टिसायझर (प्लॅस्टिक पदार्थांचे लवचिकता इ. गुणधर्म सुधारण्यासाठी त्यांत मिसळण्यात येणारे पदार्थ), रंगद्रव्ये व इतर पदार्थ असतात. बरेच प्लॅस्टिसायझर कवक प्रतिबंधक असले तरी काही प्लॅस्टिसायझरांवर कवकांचा प्रादुर्भाव आढळतो. त्याकरिता कॉपर ८-क्विनोलिनेट आणि कधीकधी पारायुक्त कवकनाशके वापरण्यात येतात. 

कवकांचा प्लॅस्टिकवर जरी प्रत्यक्षात प्रादुर्भाव आढळत नसला, तरी त्यांच्या पृष्ठभागावरील वाढीमुळे वस्तूंचा आकार बदलणे अगर कवकापासून तयार होणाऱ्‍या कार्बनी अम्लामुळे पृष्ठभाग खराब होणे असे परिणाम आढळतात.

    (६) खनिज तेल पदार्थ : इंधनातील सूक्ष्मजीवांचा व कवकांचा जेट विमानातील इंधनाशी संपर्क येऊन ज्वलन यंत्रणा खराब होते असे आढळून आले आहे. सूक्ष्मजीवांपासून तयार होणाऱ्‍या श्लेष्मलयुक्त (बुळबुळीत) अवशेषांमुळे व कवकजालांमुळे इंधन गाळणी व नळ्या बंद होतात व सूक्ष्मजीवांच्या चयापचयी (शरीरात सतत होणाऱ्‍या भौतिक-रासायनिक बदलांमुळे तयार होणाऱ्‍या) पदार्थांमुळे टाकीचे रबरी अस्तर खराब होते. इंधन टाकीतील पाणी पूर्णपणे काढून टाकणे अशक्य असल्याने कवक व सूक्ष्मजीवांच्या प्रतिबंधासाठी २-६ डाय-टर्ट-ब्युटालफिनॉलचा वापर करतात.

  (७) औषधे व सौंदर्यप्रसाधने : यांच्यावर कवकांचा प्रादुर्भाव झाल्यास त्यामुळे श्यानता कमी जास्त होणे, रंगहीनता, वायू निर्मिती असे अनेक बदल घडून येतात. कवकांपासून मुक्त राहण्यासाठी त्यांच्यात अल्कोहॉल किंवा ग्लिसरॉल ५० टक्क्यांपर्यंत वापरतात. शर्करा ५० टक्क्यांपेक्षा जास्त वापरली तर कवकांची वाढ होत नाही, पण सर्वच कवकांच्या वाढीला त्यामुळे आळा बसतोच असे नाही. याकरिता साबण, स्नो वगैरे सौंदर्यप्रसाधनांत मिथिल-, एथिल- आणि प्रोपिल-एस्टरे वापरतात.


   (८) कागद : कवकांपासून कागद सुरक्षित ठेवण्यासाठी लाकूड व कापड यांच्याकरिता वापरण्यात येणारी कवकनाशकेच वापरतात. कागद तयार करताना सूक्ष्मजीवांपासून तयार होणारे श्लेष्मलयुक्त अवशेष नाहीसे करणे आवश्यक असते. अन्यथा हे श्लेष्मलयुक्त अवशेष कागदाच्या लगद्यामध्ये मिसळून कागदावर वर्णहीन ठिपके इ. परिणाम दिसतात. हे टाळण्याकरिता क्लोरीनयुक्त फिनॉले व पारायुक्त फिनिल कवकनाशकांचा उपयोग करतात. झिंक सल्फेट, पेंटाक्लोरोफिनॉल, सोडियम फ्ल्युओराइड, डायथायोकार्बामेटे इ. रसायनांचाही वापर करतात.

   (९) प्रकाशीय व छायाचित्रण सामग्री : प्रकाशीय उपकरणांवर (सूक्ष्मदर्शक, दुर्बिण इत्यादींवर) कवकांचा तसा प्रत्यक्ष प्रादुर्भाव जरी होत नसला तरी दमट हवामानात त्यांमध्ये वापरलेल्या गोंद, रबर इ. वस्तूंवर कवकांची वाढ होऊन त्यांचे कवकजाल भिंगांवर पसरले जाते. यामुळे भिंगांना धूसरपणा येऊन कवकामुळे तयार होणाऱ्‍या कार्बनी अम्लामुळे भिंगावर ओरखडे उमटतात. याकरिता दुर्बिणीसारख्या उपकरणाभोवती किरणोत्सर्गी (भेदक कण वा किरण बाहेर टाकणाऱ्‍या) धातूंच्या वर्खाचा उपयोग करतात. काही वेळा क्रिसेटीनयुक्त ॲल्युमिनियम नलिकेचा (कॅपसूलचा) वापर करतात.

उष्णकटिबंधात संस्कारित छायाचित्रांवर कवकाचा परिणाम होतो. याकरिता संस्कारित छायाचित्रे रॉकालच्या विद्रावात बुडवतात. 

मिठारी, भू.चिं. 

संदर्भ : 1. Hubert, M. The Scientific Principles of Crop Ptotection, London, 1964.

    2. Reddy, d. Bap, Plant Protection in India, Bombay, 1968.

    3. Rose, G. J. Crop Protection, London, 1963.

   4. Sharvelle, E. G. The Nature and Uses of Modern Fungicides.