काथ्या : नारळाच्या बाहेरील आवरणातील म्हणजे चोड्यातील भागाला ‘काथ्या’ म्हणतात. फार प्राचीन काळापासून काथ्याची निर्मिती चालू आहे. काथ्यापासून दोन, चटया, हातऱ्या वगैरे उपयुक्त वस्तू तयार करण्यास प्रथम मलबारमध्ये सुरुवात झाली. मलयाळम् भाषेत काथ्याच्या दोराला कायारू (Kayaru) म्हणतात व या शब्दाचाच इंग्रजीमध्ये कॉयर (Coir) असा उपभ्रंश झाला असावा.

काथ्याचा दोर टिकाऊ व खाऱ्या पाण्यात न कुजणारा असल्याने त्याचा उपयोग मुख्यतः जहाजावर करीत असत. अकराव्या शतकात जहाजे नांगरण्यासाठी अरब लोक मलबारी काथ्याचे दोर वापरीत. तेराव्या शतकातील इटालियन प्रवासी मार्को पोलो यांनीही पर्शियन आखातात जहाजे बांधण्यासाठी मलबारी काथ्या वापरीत, असा उल्लेख केलेला आहे. फार पूर्वीपासून मलबारात काथ्या उद्योग चालत असूनही एकोणिसाच्या शतकाच्या मध्यापर्यंत त्याला पुरेसे व्यापारी व औद्योगिक महत्त्व मिळालेले नव्हते. वेम्बले (इंग्लंड) येथील १८५१ च्या प्रदर्शनात काथ्याच्या विविध प्रकारच्या वस्तू मांडण्यात आल्या होत्या. तेव्हापासून काथ्या उद्योगाकडे व्यापारी दृष्टिकोनातून पाहण्यास सुरुवात झाली. १८६२ पर्यंत काथ्याच्या हातऱ्यांना चांगली लोकप्रियता मिळाली व ह्या उद्योगाकडे लोकांचे लक्ष वेधून त्याला स्थैर्य येऊ लागले.

भारतातील मोठया प्रमाणावरील काथ्या उद्योगाची सुरुवात १८५९ मध्ये जेम्स दराह यांनी केली. त्यांनी अलेप्पी (केरळ) येथे पहिली काथ्याची गिरणी काढली. त्यानंतर पुष्कळ यूरोपियनांनी व स्थानिक केरळवासियांनी गिरण्या सुरू केल्या. भारतातील काथ्या उद्योग हा मुख्यतः कुटिरोद्योग आहे.

चेडे निसणे : काथ्यासाठी नारळापासून चोडे वेगळे करणे आवश्यक असते. काथ्याला चांगली किंमत येण्यासाठी नारळात करवंटी तयार झाल्यापासून ६ ते ८ महिने ते झाडावर तसेच राहू देतात. काथ्यासाठी नारळ परिस्थितीनुरुप ४५ ते ६० दिवसांच्या अंतराने काढतात.

जमिनीत पुरलेल्या उभ्या लोखंडी किंवा लाकडी सुळक्यावर नारळ आपटून चोडे निसतात (वेगळे करतात). चांगल्या काथ्यासाठी चोड्यांचा हिरवेपणा अकविणे जरूर असते. ह्याकरिता चोडे वळणार नाहीत शी काळजी घ्यावी लागते म्हणून झाडावरुन नारळ काढल्याबरोबर लगेच चोडे निसतात व कुजत घालतात.

चोडे कुजविणे : काथ्याचे चांगल्या प्रतीचे, मजबूत आणि लांब तंतू मिळविण्यासाठी चोडे पाण्यात कुजत ठेवावे लागतात. त्यामुळे चोडयाच्या तंतुमय भागातील गाठींचा सूक्ष्मजीवांद्वारे क्षय होऊन तंतू सुटे होतात व सुंभ काढणे सोपे होते. चोडे कुजविण्याचा काल नारळाची पक्वता, पाण्याचा प्रकार व ऋतू यांवर अवलंबून असतो. हा काल चार महिन्यांपासून बारा महिन्यांपर्यंत असू शकतो.

चोडे कुजविण्याची ही प्रक्रिया काथ्या उत्पादनातील एक महत्वाची प्रक्रिया असून तिच्या निरनिराळया पद्धती प्रचारात आहेत. स्थानिक परिस्थितीनुरूप निरनिराळ्या ठिकाणी निरनिराळ्या पद्धती प्रचारात असून सर्वसाधारण प्रचारात असलेली पद्धत म्हणजे खड्ड्यात कुजविण्याची पद्धत होय. खाजणालगत बशीसारखा एक उथळ खड्डा खणून त्याच्या तळाशी वाळू पसरतात आणि भिंती नारळाच्या झावळांनी आच्छादतात. समुद्राच्या भरती – ओहोटीमुळे खड्ड्यात पाणी खेळत राहील अशी सोय केलेली असते. एका खड्ड्यात सु.२० ते ३० हजार चोडे मावू शकतात. तो चोड्यांनी भरल्यावर नारळाच्या झावळांनी झाकतात व वरून चिखल घालून बंद करतात. कुलविण्याची प्रक्रिया पूर्ण झाल्यावर तो उघडतात.

काही वेळा चोडे काथ्याच्या जाळयात घालून खाडीच्या पाण्यावर थोडे दिवस तरंगत ठेवतात आणि नंतर त्यावर चिखल घालून खाली बुडवितात. साठलेल्या उथळ पाण्यातही चोडे कुजविण्याची पद्धत आहे.

बरूआ नावाच्या दोघा शास्त्रज्ञांनी कुजविण्याच्या प्रक्रियेचा वेग वाढविण्यासाठी रासायनिक पध्दती शोधली असून ह्या प्रक्रियेत टाकीत चोडे भिजविण्यासाठी सोडलेल्या पाण्यात एक विशिष्ट प्रकारचे एंझाइम (जीवरासायनिक विक्रया घडवून आण्ण्यास मदत करणारा प्रथिनयुक्त पदार्थ) मिसळतात. त्यामुळे तंतूंतील गाठी लवकर कुजतात व तंतू लवकर सुटे होतात. काँक्रीटच्या टाक्या बांधून त्यांत चोडे कुजविणे आर्थिक दृष्टया थोडे महाग पउत असले, तरी अशा टाकीत चोडे चांगले कुजतात व त्यांपासून उत्तम दर्जाचा काथ्याही मिळतो म्हणून अशा टाकीत चोडे कुजविण्याचा प्रघात वाढत आहे. मोठमोठया टाक्यांपेक्षा छोटया टाक्या बांधणे सोईचे असते.

कुजविण्याची ही प्रक्रिया मुख्यतः सूक्ष्मजीवांकडून होत असून ती वातानपेक्षी (हवेशिवाय चालणारी) असते. प्रक्रिया चालू असताना पाणी प्रथम तपकिरी बनते. नंतर त्यावर निक्षेप (न विरघळणारा साका) साठून पाण्याचे तापमान वाढू लागते व हायड्रोजन सल्फाइडाचे बुडबुडे येऊ लागतात. हळूहळू बुडबुडे थांबतात, तापमान उतरते व पाणी स्वच्छ होऊ लागते. या सुमारास कुजण्याची क्रिया पूर्ण होत आलेलली आहे असे समजतात. ह्या प्रक्रियेत तयार होणाऱ्या हायड्रोजन सल्फाइडापासून गंधक मिळविता येईल असा शास्त्राज्ञांना विश्वास वाटत असून त्यावर संशोधन चालू आहे. प्रयोगशाळेतील चाचण्यांवरुन चांगल्या काथ्यासाठी ३ ते ५ आठवडे चोडे कुजविण्यासाठी पुरेसे असतात असे आढळले आहे.

सुंभ : कुजविलेल्या चोडयांपासून सुंभ सहज वेगळा काढता येतो. सुकलेल्या किंवा अर्धवट ओल्या चोड्यांपासून कुजवून चांगला काथ्या मिळत नाही म्हणून ही प्रक्रिया टाळून यांत्रिक पध्दतीने त्यांपासून सुंभ काढतात. अशा यंत्रावर काढलेला सुंभ चांगल्या प्रतीचा असतो. सुंभ काढण्यासाठी यंत्रांचा वापर करण्याचा प्रथम प्रयत्न जपान व इंग्लंड येथे झाला आणि श्रीलंका व फिलिपीन्स येथे ती प्रथम बसविण्यात आली. भारतातील नऊ केंद्रांत अशी यंत्रे बसविलेली असून महाराष्ट्रत वालावल (रत्नागिरी जिल्हा) येथे अशी यंत्रे बसविलेली आहेत. त्यांवर बुरणुसाचे आणि हातऱ्यांचे सूत काढले जाते. भारतात प्रथम अशा तऱ्हेचे अंशतः स्वयंचलित असलेले यंत्र तयार करण्यात मद्रास येथील नारायणस्वामी रामचंद्रन अय्यर यांना यश मिळाले आहे. या यंत्रात चोडे बडवून, विंचरुन, साफ करुन चार दिवसांत सुंभ तयार होतात. या यंत्रातून लांब व बळकट बुरणूस सुंभ आणि आखून हातरी सुंभ एकाचवेळी व वेगवेगळे मिळतात. बुरणूस सुंभ स्वच्छ असून तो वाळवून पुढील प्रक्रियांशिवाय तयाच वापरता येतो. मात्र हातरी सुंभ त्यातील मलिनता घालविण्यासाठी निराळया यंत्रांनी स्वच्छ करतात. या यंत्रात एका तासाला सु.तीन हजार चोडयांवर प्रक्रिया केली जाऊन त्यापासून आठ तासांत सु.५०० किग्रॅ. इतका सुंभ मिळतो. या यंत्राची उपयुक्तता लक्षात घेऊन काथ्या मंडळाने (कॉयर बोर्डाने) मोठया प्रमाणावर काथ्या उत्पादन करण्याच्या दृष्टीने या यंत्रांची शिफारस केलेली आहे.

चोडे पुरेसे नरम झाल्यावर खड्डयातून बाहेर काढतात व स्वच्छ पाण्याने धुतात. चोडयांवरील बाहेरचे आवरण आणि त्यांच्या टोकाजवळील आखूड तंतू हातानेच काढून टाकतात. त्यानंतर सर्व चोडे एका सपाट ठोकळ्यावर किंवा दगडावर ठेवून ठोकणीने बडवितात. त्यामुळे कुजलेला टाकाऊ भाग बाजूला उडतो व फक्त तंतुमय सुंभ शिल्लक राहतो. तो सावलीत वाहवितात. हे फार कष्टाचे काम असून एक बाई दिवसात ४५ चोडे बडवू शकते. अशा रीतीने मऊ केलेला सुंभ साफ करण्यासाठी फणीयंत्रात घालतात. यात एक पडघमासारखा वाटोळे फिरणारा दंडगोल असून त्यात करवतीसारखी आठ पाती असतात. ह्यात घातलेला सुंभ विंचरला जाऊन त्यातील तंतू सुटे होतात आणि कचरा काढला जातो.

सु.३,५०० ते ४,००० नारळांपासून एक कॅंडी (३०५ किग्रॅ.) एवढा काथ्या मिळतो. भरतातील एकूण उत्पादनापैकी निम्म्याहून अधिक नारळांचे चोडे काथ्यासाठी वापरले जातात. हे प्रमाण केरळमध्ये जास्त म्हणजे जवळजवळ ८० टक्के आहे. स्वच्छ केलेल्या काथ्यातून बुरणुसाचे सुंभ आणि हातरीचे सुंभ वेगळे करतात आणि त्यांच्या निरनिराळया गासड्या बांधतात. बुरणुसाचे सुंभ राठ व आखूड असतात, तर हातरीचे सुंभ नरम व लांब असतात. कताईसाठी ते पाठविण्यापूर्वी त्यांवर काही प्रक्रिया कराव्या लागतात. प्रक्रिया न केलेल्या काथ्याला कमी किंमत येते.

कताई : सुंभाला पीळ देऊन त्यापासून एकसारखे सूत मिळविण्यासाठी कताई आवश्यक असते. चरख्यावरील कताई व हातकताई या दोन्ही पध्दती प्रचारात आहेत. हातकताई पूर्वापार चालत आलेली आहे. सुंभापासून सूत तयार करण्यासाठी सु.१५ ते २३ सेंमी. लांब सुलट बाजूने पीळ भरुन एक पदर तयार करतात. असे दोन पदर घेऊन त्यांना उलटा पीळ देऊन दोन पदनांचे सूत तयार करतात.

सुताला दिलेला पीळ तितकासा घट्ट असत नाही व तो सुटू नये म्हणून टोकाला गाठ मारतात. चरख्यामध्ये दोन चाके असून एक चल आणि दुसरे स्थिर असते. चरख्यावर सूत कातण्यासाठी कमीत कमी तीन माणसांची जरुरी असते. सामान्यतः एखदा लहान मुलगा किंवा मुलगी स्थिर चाक वळविण्याचे व दोन कामगार, बहुधा स्त्रियाच, सूत बनविण्याचे काम करतात. प्रत्येक स्त्री एक सुंभ घेऊन त्याचे एक टोक बगलेत धरते आणि दुसऱ्या टोकाला फास तयार करुन तो स्थिर चाकावरील चातीच्या खाचेत अडकविते व हहूहहू मागे सरकते आणि अशा तऱ्हेने सुताला योग्य ती जाडी देते. याच वेळी सुताला एकसारखा पीळ मिळावा म्हणून स्थिर चाक वळविणारा ते सावकाश वळवितो. सु.१५ ते २५ मी. लांब सूत तयार झाले म्हणजे त्याची दोन्ही टोके एकत्र बांधतात आणि चल चाकावरील चातीच्या खचेत अडकवितात. सुताला पुरेसा पीळ बसल्यावर त्यावर गाठी राहू नयेत म्हणून ते खाचा असलेल्या रुळावरुन नेतात. नंतर त्यांच्या लडी करतात. तीन कामगार एका दिवसात सु.५ ते १५ किग्रॅ. सूत काततात.

प्रतवारी : सुताचा रंग, नरमपणा, एकसारखेपणा, पीळ, मजबुती इ. गोष्टींवरुन त्याची प्रतवारी करतात. सामान्यतः काथ्याचे सूत ते ज्या गावी तयार होते त्या गावाच्या नावाने ओळखले जाते. कारण त्या त्या ठिकाणी विशिष्ट गुणधर्माचे सूत स्वतःच्या खास पध्दतीने व कौशल्याने तयार केले जाते. भारतात अशा सोळा प्रकारची सुते वापरात असून अंजेंगो (केरळ) येथील `अंजेंगो सूत’ उत्कृष्ट समजले जाते. वायकोम (केरळ) येथील हातकताईने काढलेले सूत नरम असून आडव्या विणीसाठी चांगले असते. त्याला `वायकोम सूत’ म्हणतात. हलक्या प्रतीच्या काथ्यापासून हलक्या प्रतीचे सूत निघते. बीच सूत अशा प्रकारचे असते. अशा तऱ्हेने सुताची प्रतवारी करुन त्याच्या १५ किग्रॅ.च्या गुंडाळया करुन त्या काथ्याच्या गिरण्यांकडे पाठविल्या जातात.

विणकाम : काथ्याचे सूत खरबरीत असल्यामुळे विणकामासाठी भारतात यंत्रमाग फारसे वापरात नाहीत. तथापि अशा प्रकारचे मार्ग वापरात आणून उत्पादन व वेग वाढविण्याचे प्रयत्न चालू आहेत. काथ्याच्या हातऱ्या, गालिचे, चटया इ.विणण्यासाठी कापडाच्या मागासारखेच भाग आणि इतर यंत्रसामग्री असून फक्त ती अधिक दणकट असते.

चरख्यावर काढलेले सूत उभ्या विणीसाठी, तर हातकताईचे सूत आडव्या विणीसाठी सामान्यतः वापरले जाते. सूत गिरणीतच रंगवितात. काथ्याचे कलाकाम विविध प्रकारचे असते. काथ्यापासून आकर्षक स्वरुपाच्या चटया, गालिचे, हातऱ्या किंवा पायपुसण्या तयार करण्यात येतात. मऊ व खरबरीत अशा दोन्ही प्रकारांत हे कलाकाम आढळते. त्यांतील विविध रंग व कलात्मक आकृतिबंध मनोवेधक असतात. असे रंगीबेरंगी आकृतिबंध कधी स्टेन्सिलच्या साहाय्याने, तर कधी विविधरंगी तंतूंचे विणकाम करुन उठविण्यात येतात. सभागृहे, कार्यालये, घरातील बैठकीची दालने इ. ठिकाणी काथ्याचे गालिचे, चटया इत्यादींचा वापर करण्यात येतो.

पायपुसण्या, झाडण्या, बुरणूस वगैरे नित्योपयोगी वस्तू काथ्याच्या राठ सुतापासून करतात तर जाडसर सुतापासून दोर तयार करण्याच्या चरख्यासारख्या यंत्रावर दोन किंवा तीन पदरी दोर तयार करतात. काही वेळा चार पदरी दोरही वळतात. शेतकामात, बांधकामात, नावा वा पडावांवर, मासेमारीसाठी, तेलाच्या विहिरींवर अशा अनेक ठिकाणी तो उपयोगी पडतो.

काथ्याची इतर उत्पादने : नेहमीच्या वस्तूंशिवाय काथ्याचे इतरही अनेक उपयोग आहेत. नाजुक वस्तूंच्या आवरणात आतील वस्तूंना धक्का बसू नये यासाठी आवेष्टन म्हणून काथ्या घालतात. बाहेरचा गोंगाट, आवाज आत येऊ नये यांसाठी सभगृहे, इमारती, खोल्या वगैरेंच्या दारांत, खिडक्यांत व काही वेळा विभाजन भिंतीतही काथ्या वापरतात. याकरिता काथ्याच्या चटईच्या दोन्ही बाजूंना सिमेंट व वाळूचे मिश्रण यांचे लेपन करतात. त्यामुळे त्या घट्ट होऊन त्यांतून ध्वनी आरपार जात नाही. शिवाय त्यांना तडे पडून त्या खराबही होत नाहीत. त्या खर्चाच्या दृष्टीने स्वस्त पडतात. या पध्दतीतस मुलव्हन असे नाव आहे. कमी दर्जाच्या काथ्यापासून रेझिने वापरुन तक्ते केले जातात. ह्या कामी काथ्याचा चुराही उपयोगी पडतो. यांत्रिक प्रक्रियांनीही तक्ते तयार करतात. रबरयुक्त काथ्या खुर्च्यांच्या बैठका, फर्निचर, दिवाण, वाहनांतील बैठका, गाद्या वगैरे मऊ आणि आरामशीर करण्यासाठी वापरतात. कूप नलिकात तारांच्या गाळण्यांऐवजी काथ्याच्या दोरांच्या गाळण्या जास्त कार्यक्षम असतात व स्वस्तही पडतात असे आढळल्याने त्यांचा वापर वाढत आहे. काथ्याचा चुरा जाळून खत म्हणून वापरतात. तसेच त्यापासून इंधनासाठी वायू तयार करता येईल असे संशोधनान्ती आढळले आहे.

कॉयर रिसर्च इन्स्टिट्यूटच्या सहकार्याने क्लाबूर (केरळ) येथील ट्रेनिंग अँड डिझाइन सेंटर या संस्थेने काथ्याच्या दोरांपासून काथ्यालोकर (कॉयरवूल) तयार केली आहे. या लोकरीपासून तयार केलेल्या चटया-सतरंज्या परदेशी निर्यात करण्यात येतात.

ह्याशिवाय काथ्यावर चालू असलेल्या संशोधनातून त्यापासून सक्रियित कार्बन (अधिक क्रियाशील केलेला कार्बन), कागदाचा लगदा, छताच्या फरशा, बशा, उष्णता निरोधक पदार्थ यांसारख्या वस्तू मिळविणे शक्य होईल असे दिसते. काथ्यापासून प्लॅस्टिकासारखा कॉयरोलॉइट हा पदार्थ तयार करण्यात मुंबई विद्यापीठाच्या डिपार्टमेंट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजीला यश मिळाले आहे.

उत्पादन व व्यापार : हॉलंड, जर्मनी, ब्रिटन, फिलिपीन्स, मलाया, इंडोनेशिया, फिजी बेटे, श्रीलंका, बांगला देश, ब्रह्मदेश, भारत इ. देशांत काथ्या उद्योग मोठया प्रमाणावर चालतो. भारतात लहान मोठया प्रमाणावर सु.३०० गिरण्या असून हा उद्योग विशेषतः पश्चिम किनाऱ्यावर आणि केरळमध्ये पसरलेला आहे. हा उद्योग बहुतांशी कुटिरोद्योगावर अवलंबून असून अशा तऱ्हेची अंदाजे ५,००० कुटिरोद्योग केंद्रे केवळ केरळातच आहेत. त्यामुळे ह्या उद्योगाची आकडेवारी गोळा करणे अवघड आहे. भारतात प्रतिवर्षी सु.१,६२,००० टन काथ्या निघतो म्हणजे सर्व जगाच्याएकूण उत्पादनाच्या जवळजवळ ६० टक्के इतका काथ्या भारतात तयार होतो असा अंदाज आहे. भारताच्या खालोखाल श्रीलंकेचा क्रम लागतो.

भारतात ह्या उद्योगात अंदाजे आठ लाख कामगार गुंतलेले असून केरळ राज्यातील जवळजवळ १०,००० कुटुंबांचा हा मुख्य व्यवसाय आहे. महाराष्ट्रात सु.२,५०० कामगार ह्या व्यवसायात असून काथ्याचे उत्पन्न सु.१५० टन इतके आहे.

जगात काथ्याच्या वस्तूंना चांगली मागणी असून ह्या उद्योगापासून भारतात प्रतिवर्षी सु.तेरा कोटी रुपयांचे परकीय चलन मिळते.

                                        काथ्याच्या मालाची निर्यात व किंमत 

वर्ष (एप्रिल ते मार्च) माल (टनात) किंमत (लक्ष रुपये)
१९६६ – ६७ ६४,९०० १,३८९
१९६७ – ६८ ५४,२०० १,३२७
१९६८ – ६९ ६१,७०० १,४५०
१९६९ – ७० ५५,४८७ १,३६७
१९७० – ७१ ५२,२१८ १,३८७
१९७१ – ७२ ५२,४१२ १,४८६

निर्यात होणाऱ्या काथ्याच्या मालावर केंद्र सरकार एका क्विंटलला ९८ पैसे इतका कर घेते. ह्यया करापासून सरकारला प्रतिवर्षी सु.४.५ लाख रुपये मिळतात. काथ्यापासून परकीय चलन मिळत असल्यामुळे केंद्र सरकारने १९५२ च्या काथ्या उद्योग कायद्यानुसार काथ्यावरील संशोधनासाठी, दर्जेदार माल तयार करण्यासाठी, व्यापाराच्या पद्धती सुधारण्यासाठी व निर्यात वाढविण्यासाठी एर्नाकुलम् येथे ‘काथ्या मंडळा’ ची स्स्थापना केली.

दुसऱ्या पंचवार्षिक योजनेत ह्या उद्योगासाठी २.३ कोटी रुप्यांची तरतूद करण्यात आलेली होती. व त्यांपैकी ३० लाख रुपये केंद्र सरकारच्या योजनांसाठी राखून ठेवण्यात आले होते. या मंडळातर्फे केरळ राज्यात अलेप्पीजवळ कालाव्हूर येथे काथ्यावर मूलभूत स्वरूपाचे आणि त्याच्या निरनिराळ्या क्षेत्रांत होऊ शकणाऱ्या उपयोगांवर संशोधन करण्यासाठी एक मध्यवर्ती संशोधन संस्था स्थापण्यात आली. ह्या उद्योगाला आवश्यक असणाऱ्या पध्दतीत सुधारणा करणे, नव्या पध्दती शोधून काढणे या स्वरुपाचे संशोधन येथे केले जाते. निरनिराळया सहकारी संस्थांत काम करणाऱ्या अधिकाऱ्यांना प्रशिक्षण देण्यासाठी, नवनवीन अभिकल्प (योजना) तयार करण्यासाठी आणि गालिथे व हातऱ्या यांच्या विणकामात, रंगकामात व नक्षीकामात नावीन्य आणण्यासाठी एक केंद्रही ह्या मंडळातर्फे चालविले जाते. यूरोपातील काथ्याशी सपर्धा करु शकेल असा काथ्या तयार कण्यासाठी पूर्णपणे यंत्रांवर चालणारी एक गिरणी मंडळातर्फे सुरु होणार असून तिला एकूण १२ लाख रुपये खर्च येणार आहे. त्यापैकी परकीय मदत  ४.६ लाख रुपयांची आहे. निरनिराळया राज्यांत मंडळातर्फे काथ्या काढण्यासाठी २२ व रबरयुक्त काथ्या तयार करण्यासाठी ८ उत्पादन केंद्रे सुरू करण्यात आली आहेत.

निर्यात होणाऱ्या मालाचा दर्जा कायम राखण्यासाठी गुणवत्ता नियंत्रण व निर्यातीपूर्वी मालाची तपासणी हे खबरदारीचे उपाय योजण्यात आले. कुजविलेले अथवा न कुजविलेले चोडे हे १९५५ च्या अत्यावश्यक मालाच्या कायद्यान्वये `अत्यावश्यक माल’ म्हणून मानण्यात आलेले आहेत. त्यामुळे सरकारला त्यांच्या किंमतीवर नियंत्रण ठेवता येते. मंडळातर्फे सुंभाचे, सुताचे, हातऱ्याचे, दोरांचे वगैरे दर ठरवून दिले जातात. ह्या उद्योगांत मंडळाच्या मदतीने सहकारी संस्था स्स्थापन होत आहेत. देशात अशा तऱ्हेच्या एकूण ६४० संस्था कार्यकरीत आहेत. त्यापैकी ५५० केरळातच आहेत. अशा ६ संस्था प्रत्यक्ष निर्यात व्यापारात गुंतलेल्या आहेत.

काथ्याच्या कामाचा खप आणि लोकप्रियता वाढावी म्हणून मुंबई, कलकत्ता, मद्रास, बंगलोर, नवी दिल्ली यांसारख्या प्रमुख शहरांत मंडळातर्फे प्रदर्शक दालने व भांडारे उघडण्यात आलेली अहेत. चौथ्या योजनेत हया उद्योगासाठी मंडळाने सुचविल्याप्रमाणे ५.५ कोटी रुपये खर्च होणार असून त्यापैकी १.५ कोटी रुपये केंद्र सरकारच्या योजनांसाठी मंडळाकडे देण्यात येतील व उरलेले इतर राज्यांतील व केंद्रशासित प्रदेशांतील योजनांसाठी वापरले जातील.

संदर्भ : 1. C. S. I. R. Coir, its Extraction, properties and Uses, New Delhi, 1960.

2. Menon, K. P. V.; Pandalai, K. M.; The Coconut Palm, A Monograph, Ernaculum, 1960.

चार्लस्, डी. सी. (इं.); देशपांडे, ज. र. (म.)

चित्रपत्र :

                        कलात्मक आकृतिबंधांतील काथ्याच्या विविध वस्तूंचे वेधक नमुने.

 

केरळच्या प्रतिप्रवाह क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणावर चोडे कुजविण्याचे दृश्य
कुजलेले चोडे बाहेर काढणे
कुजलेले चोडे बडविणे
काथ्याच्या विणकामाचा हातमाग
बुरणूस व हातरी सुंभ बनविण्याचे अंशत: स्वयंचलित संयंत्र