रेनकोट : रेनकोट हे खऱ्या अर्थाने वातावरणरोधी (वेदर प्रुफ) कोट आहेत. ह्या कोटांचे दोन प्रमुख गट आहेत : (१) पाणी आत येऊ न देणारा पावसाळी वा शॉवरप्रुफ कोट (२) जलरोधी व आर्द्रतारोधी कोट.

पावसाळी कोटासाठी लागणारे कापड मेण या धातवीय लवण वा दोन्ही मिळून तयार केलेल्या विद्रावात भिजवून तयार करतात. अशा कोटाच्या कापडाच्या विणीची छिद्रे बंद न झाल्याने त्यांतून पाणी आत येते व त्यामुळे पुरेसे जलरोधी वा जलाभेद्य होत नाही. यामुळे जोरदार पावसात पाणी कापडातून हळूहळू झिरपते तसेच जास्त वापराने कापडाची जलाभेद्यता हळूहळू नष्ट होऊ लागते. सुती वा लोकरी वा दोन्हींचा समावेश असलेले आणि रेयॉन, पॉलिएस्टर वा ॲक्रलोनायट्राइल यांसारख्या कृत्रिम तंतूंचे कापड जलाभेद्य कापडाला गॅबर्डीन वा पॉपलीन सदृश्य पोत येण्यासाठी वापरतात. योग्य प्रकाराचे रेझीन व सिलिकोने यांच्या वापराने जलाभेद्यतेस आवश्यक असलेला पोत कापडात निर्माण करता येतो. असे कापड नेहमीच्या व निर्जल धुलाईत टिकते.

मँचेस्टर येथील शर्ली इन्स्टिट्यूटने सुती कापड ओले असताना फुगते या गुणधर्माचा उपयोग करून एक प्रकारचे जलाभेद्य कापड तयार केले. हे कापड मऊ पीळदार सुताचा वापर करून जवळजवळ विणीचे व घट्ट पोताचे तयार करतात. हे कापड ओले झाल्यास त्याचे सूत फुगते व विणींची छिद्रे पूर्णपणे बंद होतात. त्यामुळे कापडात जादा पाणी शोषले जात नाही व पाणी आत येत नाही.

चार्लस मॅकिंटॉश यांनी १८२३ च्या सुमारास रबरमिश्रित सुती कापड वापरून जलाभेद्य कापड तयार केले. यानंतर या कापडाला मॅकिंटॉश असे संबोधिण्यात आले आणि पुढे त्याचेच रेनकोट तयार करण्यात येऊ लागले [⟶ रबर].

जलाभेद्य कोट व रबर रबरसदृश पदार्थाने स्तरित केलेल्या (मध्ये थर तयार केलेल्या) कापडापासून तयार करतात. जर कापड योग्य प्रकारे जलाभेद्य झाले, तर त्यातून हवाही आत बाहेर जाऊ शकत नाही व खऱ्या अर्थाने कापड जलाभेद्य होते. नैसर्गिक व कृत्रिम तंतूंचे कापड स्वतंत्रपणे व वेगवेगळ्या प्रमाणात एकत्रित स्वरूपात जलाभेद्य कापडासाठी वापरतात. यामुळे लेप देण्यास योग्य अशा मऊ पृष्ठाचे अनेकविध कापडांचे प्रकार तयार करता येतात.

रबरी कापड व स्तरित रबरी कापड यांचे रेनकोट प्रथम करीत असत. प्लॅस्टिकचा शोध लागल्यावर रबरी कोट मागे पडले व प्लॅस्टिकाचे कोट जास्त प्रमाणात वापरात आले. हे कोट वजनाला हलके, आकर्षक रंगाचे व स्त्री पुरुषांना सोयीस्कर असतात. याउलट रबरी कोट वजनाला जड, ठराविक रंगाचे व स्त्री पुरुषांकरिता वेगवेगळे बनवावे लागतात. प्लॅस्टिकाचे कोट पूर्णपणे छिद्ररहित असल्याने पाणी आत जाऊ शकत नाही पण आत तयार झालेले बाष्प बाहेरही जाऊ शकत नाही. तसेच प्लॅस्टिकाचे कोट उष्णतेने दाब देऊन शिवतात अथवा चिकटवितात. प्लॅस्टिक कोट सहज व लवकर फाटत असल्याने टिकाऊ नसतात.

मेणकापड हे जवस वा इतर शुष्कन तेलात (चटकन वाळणाऱ्या तेलात) कापड भिजवून तयार करतात. ही क्रिया करताना हवा आणि पाणी यांना रोध करणाऱ्या कोबाल्ट लिनिएटासारख्या शुष्कन पदार्थांचा वापर करतात. सुती, रेयॉन, रेशमी व कृत्रिम तंतूंचे योग्य पोताचे आणि बलाचे कापड मेणकापड तयार करण्यासाठी वापरतात. हे कापड वापरतात.

रेनकोट शिलाईसाठी जलाभेद्य दोरा वापरावा लागतो, नाही तर शिलाईच्या छिद्रांतून आर्द्रता, पाणी व हवा आत येऊ शकते.

भारतात वातावरणरोधी कोटांचा प्रवेश इंग्रजांच्या भारतातील आगमनाबरोबरच झाला. रेनकोट व तत्सम कोट तयार करण्याचा उद्योग हा प्रामुख्याने कुटिरोद्योग असून त्यासंबंधीची आकडेवारी उपलब्ध नाही.

पहा : छत्री जलरोधीकरण.

गोखले, श्री. पु. मिठारी, भू. चिं.