फ्लॅनेल : साधी व टि्‌वल (भरावयाचे सूत एका ताण्यावरून – उभ्या सुतावरून – आणि मग दोन वा अधिक ताण्यांच्या खालून घेऊन तयार होणारी व कर्णाच्या दिशेत वैशिष्ट्यपूर्ण आकृतिबंध असलेली) वीण असलेल्या कापडात विणकाम करतानाच थोडा पीळ असलेल्या आखूड तंतूंची भर घालून आणि या तंतूंची अग्रे हळूवारपणे ओढून घेऊन कापडाच्या पृष्ठभागावर आणून तयार केलेल्या कापडाला ‘फ्लॅनेल’ असे म्हणतात. तंतूंची अग्रे पृष्ठभागावर आणण्याच्या क्रियेला नॅपिंग असे म्हणतात व ही क्रिया ताठ तारांचे ब्रश बसविलेले फिरते दंडगोल असलेल्या एका यंत्रातून (नॅपिंग यंत्रातून) कापड नेऊन करतात. नॅपिंग क्रिया सामान्यतः कापडाच्या एकाच पृष्ठभागावर करतात, क्वचित् दोन्ही बाजूंवर करतात. नॅपिंग क्रियेनंतर वर आलेल्या तंतूंची उंची अत्यल्प ते टि्‌वल वीण न दिसेल इतपत असते. वापरामुळे तंतूंची उंची कमी झाल्यास ब्रशाने ती उंचवता येते. नॅपिंग क्रियेमुळे फ्लॅनेल कापडाला सौंदर्य प्राप्त होऊन ते मऊ व उबदार होते, तसेच त्याची शोषकता वाढते पण ते लवकर खराब होऊन आकारहीन होते. नॅपिंगमुळे फ्लॅनेल कापडात हवा स्थिर राहते म्हणून ते सापेक्षतः गरम कापड आहे.

फ्लॅनेलचे कापड फक्त कापसाचे, फक्त लोकरीचे वा दोन्हींच्या मिश्रणाचे, तसेच रेयॉन तंतूंपासून तयार करतात. काही वेळा त्यात नायलॉन वा ॲक्रिलिक वा पॉलिएस्टर या कृत्रिम तंतूंचे मिश्रण करतात. क्वचित रेशमाचेही मिश्रणही करतात. कापडाच्या वापराच्या हेतूवर नॅपिंगचे प्रमाण व तंतूंची संरचना अवलंबून असते. नायलॉन, ॲक्रिलिक यांसारख्या कृत्रिम तंतूंच्या मिश्रणामुळे फ्लॅनेलचे आकारस्थैर्य, झीजरोधकता व आयुष्य वाढते. ॲक्रिलिक तंतूंमुळे फ्लॅनेलच्या वस्त्राची घडी टिकवून ठेवता येते, तर इतर काही कृत्रिम तंतूंच्या मिश्रणामुळे फ्लॅनेलची ताणशक्ती कमी होते. लोकरीचे फ्लॅनेल हे दोन पदरी वर्स्टेड सुताचे व सामान्यतः टि्‌वल विणीचे असते.

फ्लॅनेल कापड प्रथम वेल्समध्ये तयार झाले. ‘फ्लॅनेल’ हा शब्द Gwlamen म्हणजे ‘लोकरीबरोबर’ निकट संबंध असलेल्या या अर्थाच्या वेल्श शब्दावरून आलेला आहे. इंग्रजी लोकांनी प्रथम त्याचे Flannen असे रूप केले व पुढे त्याचे Flannel असे रूपांतर झाले.

लोकर व लोकर मिश्रित फ्लॅनेल: शर्ट, पॅन्ट, कोट यांसारख्या बाह्य कपड्यांसाठी लोकरीचे वा लोकर-मिश्रीत फ्लॅनेल वा लोकर-कृत्रिम तंतू फ्लॅनेल वापरतात. यात सामान्यतः टि्‌वल वीण असते. सर्व प्रकारच्या फ्लॅनेलपासून उत्तम प्रकारचे कपडे तयार करता येतात. कृत्रिम तंतुमिश्रित फ्लॅनेलचे कपडे आकसत नाहीत. धुता येतील असे कपडे नायलॉन, ॲक्रिलिक वा पॉलिएस्टर मिश्रित फ्लॅनेलपासून करतात.

व्हियेला फ्लॅनेलमध्ये ५०% लोकर व ५०% कापूस असतो. यात टि्‌वल वीण वापरतात. याचे कपडे दिसण्यास पूर्ण लोकरीच्या कपड्यांसारखे दिसतात. सॅक्सनी लोकरीपासून केलेले फ्लॅनेल सॅक्सनी फ्लॅनेल या नावाने ओळखले जाते. ते मऊ व उत्कृष्ट अंतिम संस्करण केलेले असते. फक्त लोकरीपासून केलेले व इंग्लंडमध्ये लोकप्रिय असलेले सॅलिस्बरी फ्लॅनेल पांढऱ्या रंगाचे व विविध वजनाचे असते.

कापूस व कापूस-मिश्रित फ्लॅनेल: वापरानुसार याचे अनेक प्रकार तयार करण्यात येतात. सामान्यतः भर म्हणून मऊ व पिंजलेले कापसाचे सूत वापरतात.

(१) फ्लॅनेलेट : हे फ्लॅनेल वजनाने हलके असून त्यावर एकाच बाजूने नॅपिंग करतात. यावर छपाई करता येते. तसेच ते आधी आकसून घेऊन वापरता येईल असेही तयार करतात. पायजमे व झोपताना घालावयाचे लांब झगे यांसाठी त्यांचा वापर करतात. (२) डायापर : ह्यात दोन्ही बाजूंना नॅपिंग करतात. नॅपिंग उंच केलेले असते. यामुळे हे कापड मऊ व शोषक बनते. (३) बेबी : डायापर सारखेच असते. मात्र नॅपिंगनंतरची तंतूंची उंची जास्त असते व त्यांची अग्रेही जवळजवळ असतात. बेबी व डायापर या कापडांचा उपयोग लहान मुलांच्या कपड्यांसाठी करतात. (४) स्वेढ डूव्हेटिन : यात आखूड व जवळजवळ नॅपिंग केलेले असते. ते कापून मऊ व सपाट करतात. यांचा उपयोग जाकिटे व क्रीडावस्त्रांसाठी करतात. (५) मळखाऊ (रोधी) : हे फ्लॅनेल विशिष्ट रसायनात भिजवून तयार करतात. यात गंधकाच्या वाफा शोषल्या जातात. चांदीची भांडी व दागिने ठेवण्याच्या पेट्यांतील अस्तरांसाठी वापरतात. (६) डोमेट (किंवा आऊटिंग) : रंगीत सूत वा रंजनक्रिया केलेल्या सुताचा वापर करून हे फ्लॅनेल तयार करतात. ह्यात दोन्ही बाजूंनी हळूवारपणे नॅपिंग करतात. याचा उपयोग झोपण्याच्या वेळी वापरावयाच्या कपड्यांसाठी करतात. (७) कँटन : ह्यात टि्‌वल वीण असते व मागील बाजूने नॅपिंग करतात. याचा उपयोग कामाच्या वेळी वापरण्यात येणाऱ्या मोजांसाठी करतात. (८)प्लॅड : यात टि्‌वल वा साधी वीण असून एका वा दोन्ही बाजूंनी नॅपिंग करतात. वजनाने जड असलेले कापड क्रीडावस्त्रांसाठी तर हलके असलेले स्तरयुक्त वस्त्रांसाठी वापरतात. (९) झेफीर : हे साधे असून त्याच्या सुतात रेशीम मिसळलेले असते.

रेयॉन फ्लॅनेल: यात रेयॉन ५०-७०% तर ॲसिटेट तंतू ५०-३०% असतात. याला विविध रंगछटा देता येतात. अंतिम संस्करण करतानाच यावर अल्पशी नॅपिंग क्रिया करतात.

मिठारी, भू. चिं.