सरसप्राण्यांची कातडी, हाडे किंवा संयोजी (जोडणारी) ऊतके यांपासून बनविलेल्या आसंजक चिकटविणाऱ्या) द्रव्यांना सरस म्हणतात. कधी कधी केसीन हे दुधातील प्रथिन वनस्पतिज उदा., सोयाबिनातील) प्रथिने व प्लॅस्टिक यांच्यापासून बनविलेल्या आसंजकांसह सर्व आसंजकांना सरस म्हटले जाते. या नोंदीत मुख्यतः प्राणिज सरसांची माहिती दिली असून इतर प्रकारच्या बंधक व आसंजक द्रव्यांच्या माहितीसाठी मराठी विश्वकोशातील ‘आसंजके’ ही नोंद पहावी. शिवाय ‘जिलेटीन’ अशीही स्वतंत्र नोंद आहे.

व्यापारी दर्जाचे, अंबरसारख्या रंगाचे, कच्च्या रूपातील अशुद्ध जिलेटीन म्हणजे सरस होय. याचे तपशीलवार रासायनिक संघटन माहीत नाही. प्राणिज कोलॅजेन या तंतुमय प्रथिनाचे जलीय विच्छदेन करून सरस बनवितात. पाण्यातील विद्रावात याचे जिलेटिनीकरण (आळण्याची क्रिया) होते आणि सुकल्यावर यापासून बळकट आसंजक पटल निर्माण होते. अशा प्रकारे कायमचा बंध निर्माण होऊ शकतो. कारण चिकटा-वयाच्या पदार्थांच्या पृष्ठभागांवरील छिद्रांमध्ये सरस घुसतो व थंड झाल्यावर त्याचे कठीण बंध निर्माण होतात. अशा रीतीने सरसाने पदार्थ चिकटविले जातात. सरस अनेक शतकांपासून बनविण्यात येत असून हा आसंजक पदार्थ व्यापकपणे वापरला जातो.

इ. स. पू. ३००० काळातील सरसाचा वापर केलेल्या फर्निचरसारख्या वस्तू ईजिप्तमध्ये आढळल्या आहेत. इ. स. पू. सु. १३५० दरम्यान लाकडी पातळ पटले जोडण्यासाठी मासे व प्राणी यांच्यापासून बनविलेला सरस वापरीत असत. त्यानंतर इ. स. १५०० सालापर्यंत सरसाविषयीचा उल्लेख आढळत नाही. तेव्हापासून पुन्हा प्राणिज सरस वापरला जाऊ लागला. १६९० साली नेदर्लंड्समध्ये सरसाचा कारखाना उभारला गेला तर १७०० साली इंग्लंडमध्ये सरसाचा उदयोग स्थिरावला होता. १८०८ साली एलिया अप्टन यांनी बॉस्टन येथे अमेरिकेतील पहिला सरसाचा कारखाना सुरू केला. एकोणिसाव्या शतकात अमेरिकेतील सरसाची बहुतेक मागणी न्यूयॉर्क येथील पीटर कूपर यांच्या कारखान्यामार्फत भागविली जात होती.

प्रकारप्राण्याची हाडे, कातडी, तसेच मासे यांच्यापासून बनविण्यात येणारे सरसाचे तीन प्रकार आहेत. हाडे व कातडी यांच्यापासून बनविण्यात येणारा सरस बहुधा चूर्णरूप किंवा कणमय भुकटीच्या रूपांत असतो. तो पाण्यात विरघळवून चिकटविण्यासाठी वापरतात. हा सरस कोरड्या स्थितीत दीर्घकाळ साठवून ठेवता येतो. माशाची हाडे, त्वचा, डोके यांपासून बनविलेला सरस दाट द्रवरूप असतो व त्यात सु. ४५ टक्क्यांपर्यंत घन पदार्थ असतात. निर्मितीनंतर दोन वर्षांनी या सरसाची चिकटविण्याची क्षमता कमी होऊ लागते.

आइसिंग्लास किंवा इक्थिओकोला हा माशांपासून बनविलेला सरस संयोजक द्रव्यांत व छपाईच्या शाईतही वापरतात. स्टर्जन व इतर माशांच्या वाताशयाच्या आतल्या त्वचेपासून हा सरस बनवितात. हा सरस म्हणजे चव नसलेले पांढरे जिलेटीन असते. रक्तातील फायबीन व रक्तकणिका केंद्रोत्सारण तंत्राने अलग करून अल्ब्युमीन हे प्रथिन मिळवितात. ते तापविल्यास गोठते (साखळते). ते पाण्यात विरघळत नाही. गुरांच्या रक्तातील सुकविलेल्या रक्तरसापासून असा अल्ब्युमीन सरस बनवितात. याचा वापर मोठया प्रमाणात वाढत आहे.

दुधात केसीन हे फॉस्फोप्रथिन असते. टाकणखार, चुना यांसारख्या अल्कली द्रव्याबरोबर सुकविलेल्या दह्यातील केसिनाच्या कलिली [→कलिल] गुणधर्मात फेरबदल करून केसीन सरस बनवितात. हा सरस कातडयापासून बनविलेल्या सरसापेक्षा अधिक चांगला जलरोधक आहे. केसीन सरस घराबाहेरील कामे व प्लायवुड निर्मिती यांत वापरतात. वनस्पतींच्या विविध भागांपासून बनविलेल्या सरसाला वनस्पतिज सरस म्हणतात. जहाजावरील जोड, सांधे व भेगा बुजविण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या डांबराला चुकून सागरी सरस म्हटले जाते.

उत्पादन प्राण्यांची हाडे, कातडी इ. पाण्यात शिजवून त्यांपासून सरस बनवितात. शिजण्याच्या कियेमुळे प्राण्याच्या ऊतकांतील (समान रचना व कार्य असलेल्या कोशिकासमूहांतील म्हणजे पेशीसमूहांतील) प्रथिनाचे तुकडे होतात व ते मग पाण्यात विरघळते. अशा प्रकारे मिळालेला विद्राव गाळून संहत (दाट) केला की सरस बनतो. सरसाच्या प्रकारानुसार शिजविण्याची पद्घत व निर्मितीचे टप्पे वेगळे असतात. मांस उदयोग, कातडी कमाविण्याचे कारखाने येथून हाडे, कातडी, त्वचा यांसारख्या कच्चा माल उपलब्ध होतो. 


 कातडी प्रथम पाण्याने धुतात त्यामुळे रक्त व घाण निघून जाते आणि कोलॅजेन (विशेषतः संयोजी ऊतकांत आढळणारे तंतुमय प्रथिन) मऊ होते. नंतर ही कातडी अनेक दिवस वाढत्या संहतीच्या चुन्याच्या निवळीत बुडवून ठेवतात. यामुळे राहिलेले रक्त, केस, नको असलेली प्रथिने निघून जातात व त्वचेचे तंतू फुगतात. मग कातडी धुवून बहुतेक चुना काढून टाकतात. चुन्याचा उरलेला अंश काढून टाकण्यासाठी तिच्यावर हायड्रोक्लोरिक किंवा ॲसिटिक यांसारख्या सौम्य अम्लाची प्रक्रिया करतात. नंतर अम्लाचा अंश काढून टाकण्यासाठी ती पाण्यात खंगाळून काढतात. नंतर ती उघडया पात्रांत किंवा दाबपात्रांत शिजवितात. मग तिच्यावर वाढत्या तापमानाला पाण्याव्दारे तीन-चार वेळा निक्षालन प्रक्रिया करतात. अशा रीतीने बनलेल्या सरसातून द्रवाचा निचरा होऊ देतात. मग गाळून त्याचे ऊर्ध्वपातन करतात किंवा निर्वात बाष्पित्रांच्या मदतीने तो दाट बनवितात. थंड होऊन सुकल्यावर बहुधा घनरूप सरस मिळतो. मग तो दळतात आणि त्याची कणमय भुकटी वा चूर्ण विकीसाठी आवेष्टित करतात. नितळ सरस बनविण्यासाठी त्याच्या सौम्य विद्रावावर सल्फ्यूरस अम्ल, तुरटी किंवा फॉस्फोरिक अम्ल यांचे संस्करण करतात. झिंक ऑक्साइड टाकून पांढरा सरस बनवितात. द्रवरूप सरस बनविण्यासाठी तो गरम असतानाच त्यात जेलीकरणाला प्रतिबंध करणारी द्रव्ये घालतात. यामुळे थंड होताना तो घनरूप न होता द्रवरूप राहतो.

हाडांपासून सरस बनविताना काहीशी निराळी प्रक्रिया केली जाते. प्रथम हाडे पाणी, काही विद्रावक व हायड्रोक्लोरिक अम्लासारखे सौम्य अम्ल यांनी धुतात. पाण्यामुळे घाण व इतर पदार्थ, तर विद्रावकामुळे तेलकट अंश निघून जातात. अम्लामुळे मुख्यतः कॅल्शियम फॉस्फेटासारखी द्रव्ये विरघळतात. यामुळे मऊ, उपास्थिमय कोलॅजेन मागे राहते. मग हाडे भरडून उघडया टाकीत पाण्यात शिजवितात. असे संस्करण न केलेली हाडे दाबपात्रांत दाबाखाली शिजवितात. यानंतरची प्रक्रिया ही कातडीच्या सरसासाठी वापरण्यात येणाऱ्या प्रकियेसारखी असते.

माशांपासून बनविण्यात येणारा बहुतेक सरस माशांची धुतलेली त्वचा व हाडे यांपासून बनवितात. पाण्याने धुतल्यामुळे त्यांतील लवणे व घाण निघून जातात. मग त्वचा व हाडे शिजवून दाट रस्सा तयार होतो. तो थंड केल्यावर सरस तयार होते. या सरसासाठी सामान्यपणे तेलाचा कमी अंश असलेल्या कॉड माशांचा उपयोग करतात.

उपयोगसरसाचा उपयोग मुख्यत: उदयोगधंद्यांमध्ये अनेक कामांसाठी होतो. लाकडी सामान बनविणारे बहुतेक उदयोजक फर्निचर, खेळणी, वादये इत्यादींमध्ये आसंजक म्हणून सरस वापरतात. चिकटपट्ट्या, चिकट पृष्ठभाग तयार करण्यासाठी इतर उदयोगांत कागद, कापड, प्लॅस्टिक यांच्यावर सरसाचा लेप देतात. घासकागद, सहाणयंत्र यांसारखी ⇨ अपघर्षक साधने बनविताना अपघर्षक द्रव्य (उदा., रेती, एमरी) पृष्ठभागावर चिकट-विण्यासाठी सरस वापरतात. कापड व कागद उदयोगांत कांजीसाठी सरस वापरतात. यामुळे कापड ताठ व चमकदार होते. तर कागदाचा पृष्ठभाग गुळगुळीत व तुकतुकीत होतो. पुस्तकबांधणी, तिकिटे, लिफाफे, पुठ्ठ्याची व कागदी खोकी, नीलप्रतीचा कागद, अनुरेखन कापड, पन्हळी पुठ्ठे, प्लॅस्टिक लाकूड निर्मिती, प्लायवुड निर्मिती इत्यादींसाठी सरस वापरतात. औदयोगिक प्रकियांतही सरस वापरतात. एपॉक्सीसारख्या संश्लेषित रेझिनांनी अनेक उदयोगांत सरसांची जागा घेतली आहे. तरीही सरसाचा मोठया प्रमाणावर उपयोग होत आहे.

पहा : आसंजके जिलेटीन डिंक.

ठाकूर, अ.ना.