गोबर वायू : (शेण वायू). शेणाचे हवेच्या अनुपस्थितीत किण्वन (सूक्ष्मजीवांद्वारे हळूहळू होणारे अपघटन म्हणजे घटकद्रव्ये सुटी होणे) केले असता तयार होणाऱ्या वायूला गोबर वायू किंवा शेण वायू म्हणतात. तसेच जैव वायू असेही आणखी एक नाव त्याला देतात. त्यात ५५% मिथेन, ४५% कार्बन डाय-ऑक्साइड, अल्प प्रमाणात हायड्रोजन व हायड्रोजन सल्फाइड हे वायू असतात. त्याचे कॅलरी मूल्य ५,००० किकॅ. / घ.मी. असते. oo से.पेक्षा खालच्या तापमानाशिवाय आणि अति-उच्च दाबाशिवाय त्याचे द्रवीभवन होत नाही. तो गंधहीन असतो. कोल वायू (दगडी कोळशापासून मिळणारा वायू) व द्रवरूप खनिज तेल वायू यापेक्षा याचे संघटन वेगळे असते. योग्य धारकात साठवून व ज्वालकाचा (नियंत्रित ज्वाला देणाऱ्या प्रयुक्तीचा) उपयोग करून तो स्वयंपाक करणे, दिवे व यंत्रे चालविणे यांसाठी वापरता येतो. 

कार्बनी द्रव्यांचे किण्वन करून मिथेन वायू तयार करण्याची कृती मानवाला अनेक शतकांपासून माहीत

गोबर वायू उत्पादनाचा यंत्रसंच : (१) शेण कालविलेले पाणी आत टाकण्याचा मार्ग, (२) मुख्य टाकी, (३) वायू नेण्याची नळी, (४) खतयुक्त पाणी बाहेर जाण्याचा मार्ग, (५) सिमेंटचे नळ.

आहे. तथापि शहरातील सांडपाण्याचा त्यासाठी उपयोग करणे ही बाब नवीनच आहे. १९३० च्या सुमारास शेणापासून वायू करण्याकडे शास्त्रज्ञांचे लक्ष गेले. भारतीय कृषी संशोधन संस्थेतील एस्. व्ही. देसाई यांनी शेणाचे किण्वन करून वायू तयार करण्याच्या पहिल्या यंत्रसंचाचा अभिकल्प (आराखडा) बनविला. १९४० मध्ये पुण्याचे एन्. व्ही. जोशी यांनी आर्थिक दृष्ट्या परवडेल असा यंत्रसंच बनविला. त्यात उत्तरोत्तर सुधारणा होत गेल्या व १९६० च्या दरम्यान खेड्यात लोकप्रिय होईल असा यंत्रसंच तयार करण्यात आला. त्याची रचना वरील आकृतीमध्ये दाखविली आहे.

या यंत्रसंचात जमिनीत एक गोल सिमेंट काँक्रिटची विहिरीसारखी टाकी असते. तिची खोली ३·५–६ मी. व व्यास १·२–६ मी. असतात. तिच्यामध्ये एक भिंत असते त्यामुळे तिचे दोन समान भाग होतात. त्यात एक वायुधारक असतो व तयार झालेला वायू नेण्यासाठी लोखंडी नळ असतो. दररोज टाकीत शेण व पाणी यांचे ४ : ५ या प्रमाणातील मिश्रण टाकण्यासाठी व्यवस्था असते आणि ते बाहेर जाण्यासाठी वेगळी वाट असते. वायुधारक मृदू पोलदी पत्र्याचा असून तो टाकीच्या तोंडात टोपीसारखा बसतो व तो टाकीच्या आतील बाजूला मुद्दाम बांधलेल्या कंगोऱ्यावर टेकतो. त्यात वायू साठू लागल्यावर तो वर उचलला जातो. हा वायू नळीवाटे जास्तीत जास्त ३० मी. लांब नेता येतो. वायुधारकावर ७·५ ते १५ सेंमी. जलस्तंभाचा दाब असतो. 

हे यंत्रसंच वीस भिन्न आकारमानांत उपलब्ध आहेत. अगदी लहान यंत्रसंचापासून दिवसाला दोन घ.मी. वायू मिळतो, तर सर्वांत मोठ्या यंत्रसंचापासून १०० घ.मी. वायू मिळतो. मानवी मलमूत्र व शेण यांपासूनही गॅस तयार करणारे यंत्रसंच उपलब्ध आहेत. पाच माणसांचे कुटुंब व तीन मोठी जनावरे असल्यास सर्वांत लहान यंत्रसंच आर्थिक दृष्ट्या परवडतो. हे यंत्रसंच उभारण्यासाठी खादी व ग्रामोद्योग आयोगाकडून ४०% अनुदान व ६०% कर्ज मिळते. ते नऊ सुलभ हप्त्यांनी फेडावयाचे असते. तसेच संडास बांधण्यासाठी ३०० रुपयांचे अनुदान देतात. शक्ती उत्पादनासाठी लागेल एवढा वायू उपलब्ध असेल तर प्रत्येक अश्वशक्तीमागे १,००० रुपयांचे कर्ज मिळते.

दीर्घ संशोधनानंतर ज्वालक, दिवे व किण्वन यांमध्ये सुधारणा करण्यात आल्या आहेत. खादी व ग्रामोद्योग आयोगाच्या अभिकल्पामध्ये अनेक सुधारणा करून टाटा एंजिनिअरिंग ॲण्ड लोकोमोटिव्ह लि.च्या पिंपरी येथील शाखेने सुधारित यंत्रसंच तयार केलेला आहे. ज्वालकांची कार्यक्षमता कोल वायू ज्वालकांसारखी असते. वायू जळताना त्याचा धूर होत नाही, स्वयंपाकघर स्वच्छ राहते व भांड्यांना काजळी लागत नाही. नेहमीच्या पद्धतीने चुलीत गोवऱ्या जाळल्या, तर त्यांची उष्णता क्षमता ११% असते व ह्या ज्वालकांची क्षमता पाचपट म्हणजे सु. ६०% असते. नेहमीच्या कंपोस्ट पद्धतीने केलेल्या खतापेक्षा गोबर वायू यंत्रसंचाद्वारे ४३% जास्त खत मिळते. त्यात नायट्रोजनाचे प्रमाण १·५%ने वाढलेले असते. तसेच ते ह्युमसने [अपघटित स्वरूपातील जैव द्रव्याने,  → ह्युमस] समृद्ध असल्यामुळे जमिनीची जलधारणक्षमता व निचरा सुधारून जमिनीत हवा खेळती राहते. ते जमिनीत चांगले मिसळते. त्यामुळे माश्यांचे प्रजनन (पैदास) होण्यास प्रतिबंध होतो. ह्या खताला कसलाच वास येत नाही.

गोबर वायूच्या निर्मितीतील अडचणीसंबंधी आणि यंत्रसंच अधिक टिकाऊ, कार्यक्षम व सुटसुटीत बनविण्याच्या दृष्टीने संशोधन चालू आहे. शेणाच्या किण्वनाचा वेग वाढविणे, कार्बन डाय-ऑक्साइड वेगळा करणे, थंडीत शेणाच्या किण्वनाची क्रिया मंद होते ती वाढविणे, वायूची टाकी गंजण्यावर उपाय, खताचा दर्जा वाढविणे इ. समस्यांवर नागपूर येथील सेंट्रल हेल्थ एंजिनिअरिंग रिसर्च सेंटर, बंगलोर येथील इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स, मुंबई येथील भाभा अणुसंशोधन केंद्र आणि गोबर गॅस रिसर्च अँड डेव्हलपमेंट सेंटर (बोरिवली) या संस्थांत संशोधन कार्य चालू आहे.

पहा : इंधन खादी व ग्रामोद्योग आयोग. 

जमदाडे, ज. वि.