शृंगशिल्पन : प्राण्यांच्या शिंगांपासून विविध आलंकारिक वस्तू तयार करण्याची, तसेच शिंगांवरील कोरीव नक्षीकाम करण्याची हस्तकला. या हस्तकलेची परंपरा फार प्राचीन आहे. गुहेत राहणाऱ्या आदिमानवाला प्राण्यांची शिंगे व हाडे ही कलाकुसरीसाठी सहजपणे उपलब्ध होणारी आद्य माध्यमे होती. अर्थातच भटक्या, आदिवासी जमातींचे कोरीव कामाचे तंत्र प्राथमिक स्वरूपाचे होते. अश्मयुगात दगड, हाडे, शिंपले यांबरोबरच शिंगांपासूनही अनेक प्रकारच्या वस्तू, दागदागिने इ. बनविले जाई. विशेषतः ताईत, छोटी उपकरणे इ. तयार करण्यासाठी शिंगांचा प्रामुख्याने वापर होत असे. आदिमानवी गुहांतून अशा अनेक वस्तूंचे अवशेष सापडले आहेत. प्राण्यांची हाडे, शिंगे इ. माध्यमे तुलनेने जास्त लवचिक व ठिसूळ असल्याने त्यांच्यावर अणकुचीदार गारगोटीसारख्या साधनांनी कोरीव अलंकरण करणे, तसेच त्यांना निरनिराळे आकार देऊन अनेकविध शोभिवंत वस्तू बनविणे सुलभ होते. पुढे कोरीव कामाचे तंत्र जसजसे प्रगत होत गेले, तसतशी शृंगशिल्पनाची कलाही विकसित होत गेली. रेडा, गवा, गेंडा, कॅरिबू, रेनडियर इ. प्राण्यांची शिंगे कोरीव नक्षीकामासाठी व आलंकारिक वस्तुनिर्मितीसाठी सुरुवातीपासूनच जास्त प्रमाणात वापरली जात. वॉलरसच्या (मॉर्स) सुळ्यांचा वापरही कोरीव कामासाठी केला जाई पण ते हस्तिदंतापेक्षा दुय्यम प्रतीचे माध्यम मानले जाई. स्कँडिनेव्हियन लोक तिमि–अस्थींवर (देवमाशाची हाडे) कोरीव काम करीत. एस्किमोंनीही त्यांचा वापर पुढे मोठ्या प्रमाणावर केला. अकराव्या शतकातील अस्थि–शृंग–शिल्पनाचे काही मोजके नमुने उपलब्ध आहेत. ब्रिटिश संग्रहालयामध्ये असलेली, त्या काळातील दोन सिंहांच्या आकृत्या कोरलेली सुरीची मूठ, स्कँडिनेव्हियन प्रभावाची निदर्शक आहे. शृंगशिल्पन व अस्थिशिल्पन या हस्तकलांमध्ये तंत्र-माध्यमादी दृष्टींनी खूपच साधर्म्य आढळते. हस्तिदंतशिल्पन हाही तत्सदृश असा वैशिष्ट्यपूर्ण प्रकार आहे.    

प्राचीन काळापासून मानवाने शिंगांचा वापर करून अनेकविध गृहोपयोगी व इतर वस्तू तयार केल्या. उदा., कंगवे, फण्या, लहान पेट्या किंवा डब्या, पेयपात्रे, चमचे, गुंड्या, विविध चित्रे तसेच शेती व शिकारीची हत्यारे इत्यादी. काहींवर कोरीव नक्षीकामही करण्यात येई. कित्येकदा त्यांवर चांदीची सजावट केली जाई.

प्राचीन काळी शिंगांचा उपयोग एक संगीतवाद्य म्हणूनही केला जात असे. त्यातून कालांतराने विकसित झालेल्या सुषिर वाद्यांचा एक गट ‘हॉर्न’ ह्या नावाने ओळखला जाऊ लागला. त्या प्रकारातले गुरवाचे शिंग हे वाद्य, विशेषतः महाराष्ट्रात प्रचलित आहे.

शिंग हे घडणसुलभ असे मृदू व ठिसूळ माध्यम आहे. उष्णता वा आर्द्रता यांमुळे ते लवचिक बनते. नित्याची लाकूडकामाची हत्यारे वापरून ते कापता येते व हव्या त्या आकारात त्याची घडण करता येते, तसेच त्यावर अंतिम सफाईकामही करता येते. शिंगांची उपयुक्तता व टिकाऊपणा यांमुळे कलामाध्यम म्हणून त्यांना आजही ग्राह्यता आहे.

भारतात म्हैसूर व सावंतवाडी येथे रेडा, गवा इ. प्राण्यांच्या शिंगांपासून तपकिरीच्या डब्या, फण्या, पेले, तसेच निरनिराळ्या वस्तूंच्या (उदा., छत्री, काठी, सुरी, कट्यार इ.) मुठी तयार करण्यात येतात. नेपाळमध्ये गेंड्याच्या शिंगांपासून पूजापात्रे बनवितात.

पहा : अस्थिशिल्पन तक्षण हस्तिदंतशिल्पन.                                            

इनामदार, श्री. दे.