दर्शनी बाजू मागची बाजू कुलगुरु - सुवर्णपदक, पुणे विद्यापीठ

पदक: धातूचे ओतीव पद्धतीने किंवा ठोकून बनविलेले कलात्मक बोधचिन्ह. सामान्यतः पदकांचा आकार लहानमोठ्या गोल नाण्यांसारखा असतो. बहुधा सोने, चांदी किंवा ब्राँझ यांचा उपयोग पदकनिर्मितीत होतो. एखाद्या महत्त्वाच्या घटनेचे स्मृतिचिन्ह म्हणून किंवा वैशिष्ट्यपूर्ण गुणवत्ता वा कर्तृत्व यांचे पारितोषिक अथवा पुरस्कार म्हणून, युद्धातील शौर्य किंवा विजय यांचे निदर्शक म्हणून पदके बहाल करण्याची प्रथा निर्माण झाल्याचे दिसते. अगदी प्राचीन पदके ग्रीकांची मानली जातात. व्यायामी खेळांतील विजयी खेळाडूंनाही पदके दिली जात वा ती सोने, रूपे किंवा ब्राँझची असत, तथापि ग्रीक ऑलिंपिक क्रीडासामन्यांतील विजयी खेळांडूंना मात्र ऑलिव्हच्या डहाळीचा मुकुट देण्यात येई. आधुनिक ऑलिंपिक विजेत्यांना सोने, रुपे व ब्राँझ यांचीच पदके देण्यात येतात. सम्राट ऑगस्टसच्या कारकीर्दीपासून (इ. स. पू. २७ ते इ. स. १४) रोमन सम्राट आपल्या स्मृतिप्रीत्यर्थ ओतीव पदके काढत असल्याचे दिसते. इंग्लंडमधील अशी राजपदके विल्यम द काँकरर (इ. स. १०६६ ते १०८७) यांच्या नावाची आढळतात. सामान्यतः राजपदकांवर एका बाजूला राजाचा मुखवटा किंवा प्रतिमा असे व दुसऱ्या उलट बाजूला काही वेळा राजाच्या जन्ममृत्यूच्या किंवा राज्याभिषेकाच्या तारखा तसेच काही संस्मरणीय घटना कोरलेल्या असत. इटली, फ्रान्स, जर्मनी येथील राजांचीही अशी राजपदके आढळून आली आहेत. दुसऱ्या पॉलपासून (कार. १४६४–७१) पोपची पदके प्रचलित झाल्याचे दिसते तर अमेरिकेत जॉर्ज वॉशिंग्टनपासून प्रत्येक नव्या राष्ट्राध्यक्षाच्या स्मृत्यर्थ पदके निर्माण केल्याचे आढळते.

पिसानेल्लोने घडविलेले व आठव्या बर्फावरील हॉकीचे ऑलिंपिक जॉन पालेओलॉग याची प्रतिमा असलेले सुवर्णपदक, १९६४ ब्रांझ पदक, १४३८

भारतात प्राचीन वा ऐतिहासिक काळी पदके देण्याची पद्धत नव्हती तथापि एखाद्या व्यक्तीने एखादी महत्त्वाची कामगिरी पार पाडली, तर तिला सोन्या-रूप्याचे कडे-तोडे, जमीनजुमला वा गाव इनाम देऊन त्या व्यक्तीचा गौरव करण्याची रूढी होती. क्वचित प्रसंगी सोन्या-रुप्याचे दागिने वा हिऱ्या-मोत्याचे कंठेही देण्यात येत असत. अल्लसानी  पेद्दण्णा या तेलुगु कवीच्या काव्यावर खूष होऊन कृष्णदेवरायाने त्याच्या पायात ‘कविगेंडपेंडार’ नावाचा सुवर्णालंकार अडकविल्याचा उल्लेख मिळतो तर शिवशाहीत वा पेशवाईत शाहीर अथवा शूरवीर योद्धे यांच्या सन्मानार्थ त्यांना सोन्या-चांदीचे कडे-तोडे दिल्याचे निर्देश आढळतात. मोगल अमदानीत बादशहाने आपल्या सरदारादी प्रियजनांच्या कामगिरीबद्दल त्यांना तत्कालीन सोन्या-रुप्याची नाणी, विडे वा चित्रांची पुस्तके नजराणा म्हणून दिलेली आढळतात. त्या पुस्तकांना ‘मुरक्के’ म्हणतात. असे अनेक मुरक्के आढळले असून पारितोषिक म्हणून दिलेला एक विडा पुण्याच्या भारत इतिहास संशोधक मंडळात उपलब्ध आहे.

पश्चिमी प्रबोधनकाळात पदकनिर्मिती ही एक कला म्हणूनच पुढे आली, पीसानेल्लो, फिलीप्पो लिप्पी, चेल्लीनी बेन्‌व्हेनूतो, आल्ब्रेक्त ड्यूरर इ. प्रसिद्ध कलावंतांनी पदकनिर्मितीची कला समृद्ध केली. एकोणिसाव्या शतकात फ्रान्स हा कलात्मक पदकांच्या निर्मितीत अग्रेसर होता. पदके तयार करण्यासाठी मेण, लाकूड किंवा क्विचित दगड यांचे साचे बनवून त्यांतून पदके ढाळण्यात येत तर काही वेळा पदक आतून ठोकून ठोकून त्याच्या बाहेरच्या बाजूला पार्श्वोत्थित पद्धतीने चित्राकृती उमटविली जाई.

आधुनिक काळात पदकांचा वापर सार्वत्रिक झाला आहे. सैनिकी दलांतून तसेच विद्यापीठे, कलासंस्था, व्यापारी संस्था व संघटना, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय क्रीडासंस्था आणि विविध प्रकारच्या राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्पर्धा यांच्यातर्फे मानचिन्ह म्हणून पदके दिली जातात. पदकांचे आकार-प्रकार व कलात्मकता यांतही विविधता आढळून येते.

पहा : मानचिन्हे, सैनिकी.

बोराटे, सुधीर खरे, ग. ह.