काचपात्रे : उपयोगिता व कलात्मकता या दोन्ही दृष्टींनी काचपात्रे तयार करण्यात येतात. त्यात कुप्या, फुलदाणी, विविध आकारांची भांडी, मदिरापात्रे, सौंदर्यप्रसाधनासाठी वापरण्यात येणाऱ्या डब्या, सुरया, खुजे, हुक्कादाणी, खेळणी, मणी, रत्नजडित अलंकार, खिडक्या – दरवाज्यांची तावदाने, मेजपात्रे व मोजपात्रे, हंह्याझुंबरे, कलात्मक आरसे अशा विविध तऱ्हेच्या पात्रांचा समावेश होऊशकतो. अशा काचपात्रांची बनावट, त्यांवरील रंगकाम, सुशोभन, त्यांचे आकार आणि प्रकार या सर्व अंगोपांगांची प्रगती कालपरत्वे व देशपरत्वे घडून आलेली दिसते. ही प्रगती बहुधा त्या त्या काळी, त्या त्या देशात उपलब्ध असलेला कच्चा माल, कारागिरांचे तंत्रज्ञान, लोकांची अभिरुची आणि गरज या गोष्टींवर अवलंबून होती.

जडावकाम केलेले भारतीय काचपात्र, १८ वे शतक

पश्चिमात्य देशांत काचपात्रांची सुरुवात इ.स.पू.१५०० नंतर झाल्याचे आढळत असले, तरी भारतामध्ये अतिप्राचीन काळापासून काचपात्रांची निर्मिती होत असावी, असे रोमन पंडित प्लिनी याने केलेल्या उल्लेखावरुन मानता येते. ती काचपात्रे, कुटून भुकटी केलेल्या स्फटिकांपासून तयार करण्यात येत असल्यामुळे अन्य देशांतील काचपात्रांपेक्षा ती सरस आणि सौंदर्यपूर्ण असते. त्यामुळे अर्थातच त्यांना परदेशातही खूप मागणी असे असा प्लिनीचा अभिप्राय आहे.

गोफाच्या नक्षीची भारतीय थाळी, सु. १८ वे शतक

यजुर्वेद, युक्तिकल्पतरु, महाभारत इ. ग्रंथांतील वर्णनांवरुन प्राचीन काही भारतामध्ये काचेचे सुंदर सुंदर दागिने, अलंकृत व सौंदर्यपूर्ण पानपात्रे, नारारंगी वा नाना तऱ्हेच्या कौशल्यपूर्ण बांगडया तयार होत असत. असे म्हणता येईल. या बांगडया तयार करण्याच्या पद्धतीत उत्तरोत्तर सुधारणा होत गेल्या. ऐतिहासिक काळात तर या निर्मितिपद्धती विविध होत्या. कधी लाखेच्या तप्त रसावर काचभुकटी फवारुन विविध प्रकारच्या बांगड्या तयार करण्यात येत, तरी कधी लाखेऐवजी काचमणी, रंगीत काचतुकडे अथवा सोन्याचांदीचे पत्रे यांचाही वापर करुन त्या तयार करीत असत. शिवाय त्यांचे रंगही अस्मानी, उदी (जांभळा), जर्दा (पिवळा), सब्जा (हिरवा) आणि तांबडा अशा नाना प्रकारचे असत आणि त्या सुशोमित करण्यासाठी त्यावर दोन भिन्न रंगी काचतंतूंची गुंफण करीत. त्यामुळे त्यांवर ठिपक्यांचा आभास निर्माण होऊन त्यांच्या सौदर्यांत भर पडे. अशा बांगड्यांना `सर’ असे नाव होते. या बांगडयांच्या जोडीला सुरई, ताटल्या, पुष्पपात्रे, कुप्या, हुक्कादाणी आणि काचेच्या काठया तयार करीत असत. ही काचपात्रे आकाराने जरा लहान असली, तरी अत्यंत रेखीव, सुबक व कौशल्यपूर्ण असून ती सर्व काचस्फटिकी स्वरुपाची असत. कारागीर ही भांडी कुंभारकामाला उपयुक्त पडणाऱ्या साध्या चाकासारख्या उपकरणाच्या साहाय्यानेच तयार करीत असत.

भारतात सध्या प्रचलित असलेल्या काचकारखान्यांमध्ये महाराष्ट्रतील ओगलेवाडी येथील काचकारखाना सर्वात जुना आहे. या कारखात्यात आजही तोंडाने फुंकुनच विविध आणि उत्कृष्ट पद्धतीची नित्योपयोगी काचपात्रे, विविध प्रकारच्या दिव्यांच्या काचा इ. वस्तू बनविण्यात येतात. हे काम पिढीजात कारागीरवर्गच करतो. तळेगाव व मुंबई येथील काचकारखान्यांतही रंगीत काचतुकडयांपासूनकुर्ऱ्हम (मोझेइक) पद्धतीची रंगीबेरंगी काचपात्रे तयार करण्यात येतात, तरी गुजरातराज्यातील बडोदे येथील ऍलेंबिक ग्लास इंडस्ट्रिज लि., या कारखान्यात नित्योपयोगीकलात्मक काचपात्रांबरोबरच औषधांच्या बाटल्या व शास्त्रीय उपकरणे वगैरे वस्तू तयारकरण्यात येतात.


मोगलकालीन भारतीय फुलदाणी व गुलाबदाणी, १८ वे शतक.

स्टुबेन काच कंपनीचे इ.स. १९५६ च्या सुमारास मुंबई येथे एक काचपात्रांचे प्रदर्शन भरविले होते. ह्या प्रदर्शनात आशियातील निवडक कलावंतांच्या काच कलाकृती तसेच खोदून नक्षीकाम केलेली विविध आकारांची स्फटिकी काचपात्रे इ. वस्तू मांडण्यात आल्या होत्या. त्या वस्तू पाहून काच ही वस्तू प्रतिभावंताच्या हस्तस्पर्शाने कलात्मक व वैभवशाली कलामाध्यम कसे ठरु शकते, याची साक्ष पटत ईजिप्तमध्ये काचपात्रांचा वापर इ.स.पू.३२०० मध्ये सुरु झाला. तेथील सुरुवातीची भांडी आकाराने लहान, प्रकाराने मोजकी, अपारदर्शक व आकर्षक रीतीने रंगविलेली असत. त्यावर कधीकधी रंगीत तंतूने आकृतीही उठविलेल्या असत, तरी कधी पुष्पपात्र किंवा कळशी यांसारख्या काचपात्रांमध्ये गोमेद, वैदूर्य, निलमणी अथवा अन्य मूल्यवान रत्नांच्या रंगछटांचा आभास निर्माण करण्यात येत असे. हे सर्व काम त्या काळी कारागीर हातानेच करीत. ते त्यासाठी वाळूच्या तप्तरसालाच हवा तो आकार देत व त्या मूळ आकारावरच नागमोडी वळणे देऊन ती पात्रे सुशोभित करीत. यासाठी ते वाळूचा रस तप्त स्थितीत असतानाच त्यावर अपारदर्शक रंगीत काचतंतू लपेटून हवी ती आकृती उठवीत, तरी कधी ते हत्याराने खोदून त्याला फाशांचा आकार देत कधी त्यावर नागमोडी वळणे काढीत, तरी कधी इंग्रजी `व्ही’ अक्षराचा आकार देऊन तो त्या भांडयांच्या अंगाला गुंडाळीत व घट्ट बसवीत. अशा वेळी भांडयाचा पृष्ठभाग बहुधा कृष्णनील किंवा फिकट हरितनील अथवा जांभळट वा लाल रंगाचा असे. हे रंगकाम अर्थातच फिकट पण चमकदार असे सर्वच पात्रांचा आकार लहान असून मर्यादित तंत्रज्ञानामुळे त्यांचे प्रकारही मर्यादितच असत. बहुधा सौंदर्यप्रसाधनाच्या कुप्या, अंगराग वा उटणी ठेवण्यासाठी लहान आकाराचे गोलाकार व उभट करंडक इ. पात्रांचा त्यात समावेश होई. त्यांचे आकारप्रकारही तत्कालीन मुत्तिकापात्रांप्रमाणे वा धातुपात्रांप्रमाणे असत. पुढे मात्र त्यावर ग्रीक पात्रांचा परिणाम घडून आला. तथापि ईजिप्तमधील ही काचपात्रे कौशल्यपूर्ण व विलोभनीय असत. त्या काळी या पात्रांची त्या काळी या पात्रांची गणना रत्नासारख्या मूल्यवान पण दुय्यम प्रतीच्या वस्तूत होई.

टोपाझ : एक ईजिप्शियन काचपात्र, ११ - १२ वे शतक.

इ. स. पू. चौथे ते पहिले शतक या काळातील रोममधील काचपात्रे केवळ फुंकनळीने फुंकून केलेल्या साध्या आकाराची नसत तर फुंकतानाच त्याला कधी फासळयांचा, तर कधी खोबणयुक्त, तरी कधी बहुकोनाकृती आकार दिलेला असे. याशिवाय कधी त्याला एखाद्या प्रसिद्ध धर्मवेत्याचा, तर कधी मानवाचा अथवा एखाद्या जनावराच्या मुखाचा आकारही दिलेला असे. पुष्कळदा त्यावर द्राक्षांचे घोस, धर्मचिन्हे, शिलालेख अथवा स्वाक्षरी यांसारख्या प्रतिमाही उठविलेल्या असत. काचपात्रावरील अशा या सुशोभनासाठी नितळ व वर्णहीन पार्श्र्वश्वभूमीवर रंगीत व लवचिक काचतंतूंचा वापर प्राचीन काळातच सुरु झाला होता व त्याचाच प्रसार पुढील काळात होत राहिला. या रोमन कौशल्याचे पडसाद नंतरच्या मध्ययुगीन यूरोपीय व पौर्वात्य देशांतील काचपात्रांमध्ये उमटलेले दिसतात.

यानंतर अकराव्या शतकात मुस्लिमांचे काचकलाकाम पुढे आले. यातील रंगीत मीनाकारी व सुबक कलाकुसर उत्कृष्ट प्रकारची असे. अलेप्पी व दमास्कस ही कलाकेंद्रे यासाठी प्रसिद्ध होती. दमास्कसमधील कलाकुसरीत ईजिप्त व सिरिया येथील पद्धतींचे मिश्रण आढळून येते. प्रथम काचपात्रांच्या पृष्ठभागावर सुवर्णपत्राच्या साहाय्याने हवा तो आकृतिबंध उठविण्यात येतो. नंतर ते काचपात्र तापविण्यात येते. मग त्यावर तांबडया ⇨ मीनाकारीने बाहयरेषा स्पष्ट करण्यात येतात व आकृतिबंधाच्या विस्तृत भागावर विविध रंगांचे घट्टसर लेपन करण्यात येऊन शेवटी पुन्हा आच्छादिलेल्या वीटभट्टीत ते पात्र तापविण्यात येते. त्यामुळे आतील मीना वितळून काचेशी तो सांधला जातो. अशा मीनाकारीमुळे रंग प्रकाशभेद्य बनतात व अपारदर्शक पृष्ठभाग शुभ्र होतो. या पद्धतीने तयार करण्यात आलेल्या तत्कालीन काचपात्रांमध्ये बाटल्या, पंचपात्री, तसराळी, ताटल्या, दीपदाणी, भूमितीय पद्धतीने एकमेकांमत गुंफलेल्या शोभेच्या आकृती, मानव व पशुपक्ष्यांच्या प्रतिकृती, पौर्वात्यजीवनातीलदेखावे, अरबीभाषेतील⇨सुलेखनयुक्तउतारेइत्यादींचाअंतर्भावहोतो.


मीनाकाम केलेले एक काचपात्र, सु. १७ वे शतक.

मद्यपात्राचा एक नमुना, सु. १८ वे शतक.

चौदाव्या शतकातील यूरोपीय प्रबोधनकालीन काचपात्रांत व्हेनिसमधील काचपात्रे आहीही जड, चांदीच्या पात्रांच्या धर्तीची, मीनाकारीने अलंकृत केलेली व मुलामा चढविलेली असत. त्यातच उत्तरोत्तर विकास घडवून आणून विविध प्रकारची काचनिर्मिती होऊ लागली. पंधराव्या शतकात प्रसिद्ध स्फटिकी व रंगविहीन काच, सोळाव्या शतकात लॅटिसिनिओ काच, तंतू अथवा पट्टिका काच, वेत्रकाच, दुधीकाच, क्रॉक्लड काच, संकीर्णस्वरुपी काच इ. विविध काचप्रकार निर्माण झाले व त्या विविध प्रकारच्या काचांपासून विविध प्रकारच्या काचपात्रांचे उत्पादन होऊ लागले. मग त्यांतील काहींवर फुंकणक्रिया करुन, तर काहींना बाक देऊन विविध आकारप्रकारांची, अतिशय पातळ स्वरुपाची, मनोवेधक काचपात्रे रुपास येऊ लागली. विशेषतः मदिरापात्रे आकाराने उभट असून त्यांचा तो पातळ उभट दांडा व त्यांवरील आश्र्चर्यकारक सर्पाकृती त्या काचपात्रांचे सौंदर्य खुलवीत असे. त्यातच मग त्यावरील रेशमी बंधसदृश व नाजूक आकृती म्हणजे कारागिराने केलेली एक विलक्षण चमत्कृतीच वाटे. त्यामुळे व विविध रंगलेपनामुळे त्या काचपात्राला आगळेच सौंदर्य प्राप्त होई. तथापि त्यामुळे काचपात्राची वातानुकूलता व प्रकाशानुकूलता यांना यांना यत्किंचितही बाध येत नसे. किंबहुना तेच व्हेनिसच्या काचकलेचे आकर्षण व ठळक लक्षण मानण्यात येईल.

जर्मन काचपात्राचा एक नमुना. १६ - १७ वे शतक.

अठराव्या शतकातील जर्मन व बोहीमियन काचपात्रेही मोठी सौंदर्यपूर्ण व नक्षीकाम केलेली असत. त्यांवरील शंख, पाने, गुंडाळया इ. सौंदर्याकृती अत्यंत नयनरम्य असत. अठराव्या शतकांनंतर बोहीमियन कारागिरांनी निर्मिलेली `सॅंडविच’ पद्धतीच्या काचपात्रांची निर्मिती खूपच वैशिष्टयपूर्ण होती. अशा पद्धतीच्या काचपात्रांत सोने किंवा चांदीच्या पष्यावर एक आकर्षक आकृतिबंध कोरण्यात येई व तो पत्रा काचेच्या दोन अतिशय पातळ थरांमध्ये घट्ट बसविण्यात येई. योहान मिल्डनर या ऑस्ट्रियन कारागिराने एका पदकावर सोन्याचांदीच्या चित्रांचे कोरीव काम व एका मोठया जाड पेल्यावरील कोरलेल्या जागांच्या बाजूवर कोरीव लेख उठविले होते.

स्पेनमधील काचनिर्मितीची दोन केंद्रे प्रसिद्ध होती. दक्षिण स्पेनमधील आल्मेरीआ व उत्तर स्पेनमधील बार्सेलोना येथील काचपात्रांत पौर्वात्य व व्हेनिशियन पद्धतींचे मिश्रण दिसून येते. तथापि दक्षिणेकडील निर्मितीवर मूरिश शैलीचा प्रभाव तीव्रतेने जाणवतो. तेराव्या शतकात आल्मेरीआची अशा प्रकारच्या काचपात्रांसाठी प्रसिध्दी होती. या पद्धतीची भांडी बहुधा हिरवट किंवा पिवळसर रंगांची असून त्यांचा आकार एककेंद्री स्वरुपाचा असे. त्यांना विविध मुठी असून सुतांचे गोंडे लावीत व फित इत्यादींनी ते सुशोभित करीत.

फ्रान्समध्ये उपयुक्त काचपात्रांचीच निर्मिती अधिक होई. त्यांत खिडक्यांची तावदाने, आरसे व शोभादायक झुंबरे इ. असत. १७६५ मधील बॅकॅरेट वर्क्स पद्धतीने स्फटिकी काचेला कापून त्यापासून शोभाय मान वस्तू तयार करण्यास सुरुवात केली. पुढे एकोणिसाव्या शतकात शोभनकला म्हणून कारागिरांनी तिचे पुनरुज्जीवन केले.

जर्मन व इटालियन काचपात्रांच्या धर्तीवर नेदर्लंड्समध्ये सोळाव्या शतकात काचपात्रांच्या निर्मितीला प्रारंभ झाला. त्यांमध्ये काचेच्या दर्जापेक्षा काचपात्रावरील कलाकसरीला फार महत्व असे. त्यावरील उत्कीर्णन हिरकणीच्या साहाय्याने करण्यात येई. या कामाला उपयुक्त ठरणाऱ्या `लेड’ काचेची सतराव्या शतकात इंग्लंडमधून मुद्दाम आयात करण्यात येई. एवढेच नव्हे, तर काही इंग्रज कंपन्यांनी आपली काच व्यवसायाची केंद्रेही हॉलंड व बेल्जियम येथे उघडली. डेव्हिड व्होल्फ, फ्रान्स ग्रीनवुड इ. कलाकारांच्या कलाकृती त्या काही सर्वश्रेष्ठ ठरल्या होत्या. काचेच्या पृष्ठीभागावर हिरकणीने लहान लहान बिंदूंनी उठविलेले आकृतिबंध मोठेच वैशिष्टयपूर्ण असत. त्यातच मग कधी मेझोटिंट पद्धती वापरली जाई व कधी नाजूक कलाकुसर करुन मानवाकृती किंवा निसर्गदृश्ये उठविण्यात येत असत.

इंग्लंडमध्ये एलिझाबेथ राणीच्या कारकीर्दीत म्हणजे १५७५ च्या सुमारास व्हेनिशियन पद्धतीच्या काचपात्रनिर्मितीला सुरुवात झाली व तीच काचपात्रे पुढे यूरोपीय संस्कृतीच्या परंपरेची प्रतीके म्हणून प्रसिध्दीस आली. अठराव्या शतकातील बिस्टलची काचपात्रे बहुरंगी असून त्यात निळया, तांबडया, पिवळया व दुधिया रंगांच्या मोहक छटा असत. तसेच अतिशय ठिसूळ व नाजूक अशा चिनी काचेसारख्या दुधिया काचेचीही निर्मिती सुरु झाली. या काचपात्रांवर चिनी पद्धतीची कलाकुसर करण्यात येई. काचपात्रांप्रमाणेच नाना अलंकार व तंतुरेषा असलेल्या बहुविधरंगी काचवस्तू तयार होऊ लागल्या. अठराव्या शतकाच्या अखेरीस आयर्लडमध्ये उच्च प्रतीच्या `लेड’ काचनिर्मितीला सुरुवात झाली. अशा काचेपासून पैलूदार सुशेभित काचवस्तू तयार होत असत. त्यांची केंद्रे कॉर्क व वॉटरफोर्ड येथे होती. एकोणिसाव्या शतकात पैलू पाडणाऱ्या यंत्राचा शोध लागल्यावर या पैलूदार काचवस्तू खूपच प्रसिद्ध झाल्या व त्यांची मागणीही बरीच वाढली होती.


कट ग्लास प्रकारातील एक काचपात्र, २० वे शतक.

उत्तर अमेरिकेतील काचपात्रांची निर्मिती अठराव्या शतकातही केवळ ऐश्वर्यप्रदर्शनाच्या दृष्टिकोनातून होत नसून, उपयुक्ततेच्या दृष्टिकोनातूनही केली जाई. हाताळण्यायोग्य व उपयुक्त असा आकार, चकाकीयुक्त रंगलेपन, बटबटीत पण साधे आकृतिबंध हे त्या काचपात्रांचे वैशिष्ट्य होते. स्टेगल काचप्रकारामुळे निर्माण करण्यात येणाऱ्या काचपात्रांतील जलकुंभ, पानपात्रे, मदिरापात्रे इत्यादींवर विविध प्रकारचे स्स्थानिक अथवा चमत्कृतिजन्य आकृतिबंधांचे उत्कीर्णन करणे किंवा रंगीत मीनाकारी उठविणे शक्य झाले. एकोणिसाव्या शतकात दाबप्रक्रियेमुळे काचपात्रनिर्मितीच्या प्रक्रियेमध्ये बराच बदल घडून आला व त्यामुळे मेजकाच, अलंकृत काचपटले इत्यादींच्या मोठया प्रमाणवरील उत्पादनास योग्य वाव मिळाला. या प्रक्रियेमुळे काचेला बाक देऊन फ्रेंच व इंग्रजी पद्धतीची भांडी तयार करणे किंवा या दोहोंच्या संमिश्रणातून भिन्न भिन्न प्रकारची काचपात्रे निर्माण करणे, त्यावर भूमितीय व बरोक शैलीतील आकृतिबंध उठविणे इ. प्रकार सुरु झाले. त्याबातीत बॉस्टन व सॅंडविच काच कंपनी प्रसिद्ध होती. त्यावेळेपासून त्यापुढील काळात अमेरिकेमध्ये काचवस्तूंच्या क्षेत्रातही झपाटयाने औद्योगिकीकरण होण्यास सुरुवात झाली.

जोशी, चंद्रहास

एक रोमन काचपत्र,१ ले शतक 'पेगॅासस' काचपत्र,१९ वे शतक ईजिप्शियन काचपात्राचा नमुना, इ.स.३ रे १ ले शतक. दुधी काचपत्र,सु. १८ वे शतक.
व्हेनिशियन काचपत्र,सु. १६ वे शतक.भारतीय काचकला : विविधरंगी बांगडेच्यांचे नमुनेभारतीय काचकला : विविधाकार व विविधरंगी मण्यांच्या माळा