पटवेगारी : (पटवेकारी). दागिने रेशमी दोऱ्यात पटवून गाठण्याची कला. संस्कृत ‘पट्’ या शब्दापासून ‘पटविणे’ हा शब्द निघाला असून त्याचा अर्थ ओवणे किंवा विणणे असा आहे. पटवेगाराची परंपरा थेट वेदकाळापर्यंत मागे नेता येते. मणी हा एक वैदिकअलंकार असून ऋग्वेदादी साहित्यात मणी हा शब्द रत्नासाठी वापरलेला आढळतो. त्याकाळी दुष्टापत्तीपासून स्वतःचे रक्षण करण्यासाठी रेशमी धाग्यात रत्न ओवून ते गळ्यात घालीत अथवा दंडावर बांधत. त्यानंतर पुढे पंचक व कटक ही बाहुभूषणे अस्तित्वात आली. केयूर नावाची बाहुभूषणे तर प्रसिद्धच आहेत. हे सर्वच अलंकार रेशमी धाग्यात गुंफलेले असत. दंडावर बांधल्यावरही त्यांचे लांब पदर लोंबत राहत. म्हणून त्यांच्या लांब पदरांच्या टोकांना गोंडे बसविलेले असत. पूर्व व उत्तर अश्मयुगात, तसेच सिंधू संस्कृतीत मणी बांधण्याची प्रथा रूढ होती. त्याकाळी मण्यांची वलये व कुंडले करीत. कालमानानुसार अलंकारांचे स्वरूप व त्याबरोबरच त्यांमधील रेशमी धाग्यांचे व गुंफणीचे स्वरूपही बदलत गेले परंतु सोन्यारुप्याचे मणी, मोती व रत्ने ही रेशमी धाग्यात गुंफून (पटवून) व त्याला गाठी मारून वा टाके घालून त्या अलंकारांना आकर्षक रूप देण्याची कलाकुसर मात्र आजही पटवेगारीच्या स्वरूपात टिकून आहे.
पटवेगारीसाठी एका दगडी ठोकळ्यात एक लाकडी दांडा उभा बसविलेला असतो. त्या दांड्याला लोखंडी आकडे असतात. पटवेकऱ्याच्या कामाचे हेच प्रमुख साधन असून लहान-मोठ्या कात्र्या, पकड व बारीकसा कंगवा इ. उपकरणांचाही ते वापर करतात. या आकड्यांमध्ये रेशमी धागे अडकवून आवश्यक त्या ठिकाणी त्याभोवती आडवे धागे कलात्मकतेने गुंडाळून पटवेकरी त्यापासून नाना प्रकारचे गोफ, गोंडे, गंडे इ. तयार करतात व त्याच प्रकारचे रेशमी पदर बनवितात. जाडी वाढविण्यासाठी धाग्यांचे वेठे द्यावे लागतात. क्रमाक्रमाने जाडी वाढवावयाची असेल, तर प्रथम एक गुंडाळी व नंतर त्यापुढे दोनदोन, तीनतीन याप्रमाणे अनेक गुंडाळ्या घेण्यात येतात. याच्या प्रक्रियेसाठी बराच सराव असावा लागतो. त्याच पद्धतीने क्रमाक्रमाने जाडी कमीही करता येते.
गळ्यात घालावयाच्या मोत्यांच्या व इतर अलंकारांना रेशमी धाग्यांचे दोन पदर असतात. त्यांच्या टोकांना गोंडे असतात. या दोन पदरांवर मागे-पुढे सरकणारी गोलसर गुंडी तयार केलेली असते. या गुंडीमुळे अलंकार हवा तेवढा सैल वा घट्ट करता येतो आणि तो काढण्यात वा घालण्यात सुकरता येते. तिरपे व उलटसुलट दिशेने धागे गुंडाळून ती गुंडी तयार केलेली असते. पूर्वी गोफ हाताने विणून तयार करीत परंतु आता यंत्रावर तयार झालेला गोफ दिसावयास चांगला असल्याने तोच वापरतात.
मोत्यांचे तन्मणी, लफ्फा, चिंचपेटी, मोत्यांचा कंठा, मोतीसर, मोत्यांच्या एकसरी बांगड्या, मोत्यांचे ब्रिजतोडे, रिटा पाटलीजोड, नागमोडी पाटली, इंग्रजी ‘एस्’ आकाराची पाटली, वज्रटिका, कोल्हापुरी साज, रामराज्य तोडा इ. अलंकारांत मोती व मणी रेशमी धाग्यात अत्यंत कौशल्याने पटविलेले असतात. वज्रटिकेसारख्या अलंकारात मागे टाके घातलेले असतात, तर मोल्यांच्या विविध प्रकारच्या बांगड्यांत पटवेकऱ्यांच्या कौशल्यामुळेच नाना प्रकारची नक्षी तयार होत असते. सर्वसामान्य दागिन्यांच्या संदर्भात मोती पटविताना कित्येक वेळा मागे गाठी माराव्या लागतात. त्या गाठी मुळात पक्क्या असतात पण त्या अधिकच पक्क्या करण्यासाठी त्यांना डिंक लावण्यात येतो, त्यामुळे सरातील एकही मोती निसटत नाही.
गोंडे तयार करण्यासाठी प्रथम गोफ एका आकड्याला अडकविण्यात येतो. नंतर रंगीत रेशीम कंगव्याने साफ करून घेऊन ते गोफाला बांधतात. त्यानंतर सर्व रेशीम उलटे करून वरच्या टोकाला एक अथवा दोन ठिकाणी रेशमी धागा आवळून गुंडाळतात. याच पद्धतीने त्यावर पुन्हा दुसऱ्या रंगाचे रेशीम बांधतात. त्याच्यावरून जरीचे धागे त्याच रीतीने बांधून तीनरंगी कलापूर्ण गोंडा तयार करण्यात येतो. नंतर गोंड्याची सर्व टोके सारख्या लांबीचो होऊन चांगले दिसण्यासाठी ती सर्व कात्रीने कापतात. असा झुपकेदार गोंडा अलंकारांना शोभा आणतो. पालखीचे गोंडेही याच पद्धतीने पण मोठ्या आकारात तयार करतात. साध्या गोंड्यांसाठी एकाच रंगाचे धागे वापरतात. दागिन्यांप्रमाणेच पटवेकरी घोड्यांचे साजही पटवितात. यांखेरीज गंडे, दोरे, कमरपट्टे, कडदोरे, ताईत, अनंत-अनंती यांचेही आकर्षक काम पटवेगार करतात.
पटवेकऱ्यांंना प्रदेशपरत्वे वेगवेगळी नावे असून महाराष्ट्रात पटवा, पटवी व पट्रा, तर कर्नाटकात पटवेगार या नावाने ते ओळखले जातात. ही कारागिरी वंशपरंपरेने चालत आलेली आहे. अलंकारांना कलात्मक आणि हाताळण्यास योग्य असे स्वरूप प्राप्त करून देण्यात पटवेकऱ्यांचे काम महत्त्वाचे ठरते. तथापि दिवसेंदिवस पटवेकऱ्यांची आर्थिक स्थिती खालावत असल्याचे दिसते. मोठ्या शहरांत मात्र कसबी कारागीर महिन्याला चारपाचशे रुपये मिळवू शकतो. चांगली कलाकुसर करणारांना चांगली मागणी असते तरीसुद्धा हंगाम नसल्यास त्यांना फार कमी पैसे मिळतात. या परिस्थितीमुळे नामांकित पटवेकऱ्यांची मुले शिकून इतर नोकऱ्या मिळविण्याच्या खटपटीत असतात. त्यामुळे दिवसेंदिवस कसबी व चांगले कारगीर मिळणे कठीण होत चालले आहे. पुण्यासारख्या शहरात यांची संख्या सु. तीसपस्तीसपर्यंत आढळते तर मध्यमवस्तीच्या शहरांत दहा ते बारा पटवेकरी असतात. खेड्यात तर कोणीच पटवेकरी कायम राहत नाही. ज्या गावात बाजार असेल, त्या गावात त्या दिवसापुरते पटवेकरी जातात. एका पिढीकडून तुसऱ्या पिढीकडे चालत आलेली ही कसबी कला आधुनिक काळातही फारशी बदललेली नाही.
कोकड, अ. दि.
“