कागदलगद्याचे कलाकाम : कागदाच्या लगद्यापासून विविध प्रकारच्या कलात्मक वस्तू निर्माण करण्याची हस्तकला. यालाच काश्मीरमध्ये कारीकलमदारी असे म्हणतात. कसलाही कागद पाण्यात पुरेसा भिजवल्यानंतर तो कुटून किंवा घुसळून त्याचा लगदा तयार करतात. लगद्यातील जादा पाणी काढून टाकल्यावर त्याला चिकटपणा आणण्यासाठी त्यात जरुरीप्रमाणे डिंक  मिसळतात. काही ठिकाणी या लगद्यात विशिष्ट प्रकारची माती, वाळू, चुना, मीठ किंवा टाकणखार मिसळतात. अशा लगद्यापासून बनविलेल्या वस्तूंना चांगला आकार देता येतो. त्यात सोडियम फॉस्फेट हे रसायन मिसळले, तर तो अग्निरोधक होतो. लगदा साच्यात दाबून मुखवटे, बाहुल्या, बाहुल्यांचे मुखडे, खेळण्यांतील शिरस्त्राणे इ. अनेक वस्तू तयार करतात. उठावाचे नकाशे, छपाईसाठी लागणाऱ्या मातृका (मॅट्रिक्स) करण्यासाठी कागदाच्या लगद्याचा अत्यंत मोठया प्रमाणावर उपयोग करण्यात येतो. हा लगदा वाळला, की पुरेसा कठीण आणि टिकाऊ होतो व त्यावर चांगले रंगकाम करता येते.

यूरोपमध्ये या कलेचा प्रसार होण्यापूर्वी कागदी लगद्याचा उपयोग पौर्वात्य देशांत अनेक शतके करीत असत. त्यावर पौरस्त्य पध्दतीची कामे करुन लाखेचे रंगकाम करण्यात येई. अठराव्या शतकाच्या प्रारंभी प्रथम फ्रान्समध्ये साच्यातून काढलेल्या कागदी लगद्याच्या वस्तू तयार करण्यास सुरुवात झाली. त्या काळात कागद महाग पडत असे. त्याचा पुन्हा उपयोग करण्याच्या हेतूने हा प्रयत्न तेथे सुरु झाला. अठरावे शतक संपण्यापूर्वी या बाबतीत जर्मन व इंग्लिश कारखानदारांनी फ्रान्सवर आघाडी मारुन चांगल्या प्रतीच्या वस्तू मोठया प्रमाणात करावयास सुरुवात केली. फ्रीड्रिख द ग्रेटने कागदी लगद्याचा एक कारखाना 1765 सालीच सुरु केला होता. बर्मिंगहॅमच्या (इंग्लंड) हेन्री क्ले यांनी 1772 साली विशेष प्रकारचा कागद एकावर एक चिकटवून त्याच्यापासून कागदाच्या वस्तू तयार करावयाची कल्पना प्रथम शोधून काढली. हे जाड कागद साच्यात दाबून ट्रे, फर्निचरच्या चौकटी इ. अनेक वस्तू तयार करावयास त्यावेळी प्रारंभ झाला होता.

कागदलगद्याच्या मानवाकृती

कागदी लगद्यात डिंक, रेझिन, वाळणारे तेल व लेड ऍसिटेट मिसळलेले म्हणजे चिनी मातीसारखा लगदा तयार होतो. त्यापासून खेळणी, चित्रचौकटी, लहान पुतळे व इतर अनेक शोभिवंत वस्तू तयार करता येतात. कागदाचा लगदा वाळवून त्याची पूड केल्यावर त्यात योग्य ती चिकट द्रव्ये आणि पोटॅश मिसळून ते मिश्रण अनेक वस्तू करण्यासाठी वापरण्यात येते. पश्र्चिमात्म देशांत कागदी लगद्याचा उपयोग विशेषतः उठावाचे नकाशे तयार करण्याकडे करण्यात येतो.

कागदी लगद्याच्या वस्तू हळूहळू वाळू द्याव्या लागतात. त्या वाळविण्यासाठी कोणतीही कृत्रिम उष्णता वापरता येत नाही. भारतीय लगदाकामासाठी पूर्वी स्स्थानिक व जवळपास मिळणाऱ्या वस्तूंपासून रंग तयार करीत असत. रंग पाण्यात भिजवून, कुटून ते वाळविल्यानंतर पिवळसर व्हार्निश आणि पाणी यांत मिसळून त्या मिश्रणाचे निवळलेले रंग बकऱ्याच्या केसांच्या ब्रशाने लावीत असत. हल्ली मात्र रंगकामासाठी जलरंग वापरतात व त्यावर टर्पेटाइन लावून चकाकी आणतात. यूरोपात या वस्तूंवर चकाकी येण्यासाठी तैलरंग वापरतात. पूर्वी भारतातचकाकीसाठी बकरीचे पातळ कातडे त्यांवर लावीत असत.

अलीकडे काश्मीरमध्ये खरे व उत्तम प्रकारचे कागदी लगदाकाम करीत नाहीत. त्याऐवजी कमी प्रतीच्या लाकडांचा भुस्सा वापरतात आणि रंगकामावर व्हार्निशचा जाड थर लावतात. क्वचित लाकडी लगद्याच्या वस्तूंवर कागदी लगद्याचा पातळ थर लावण्यात येतो.

कागदलगद्याचे मुखवटे

कागदी लगद्याची जयपूरची खेळणी आणि मुखवटे उल्लेखनीय आहेत. गेल्या शतकात राजस्थानातील या वस्तू प्रसिध्द होत्या. तेथे वराह, नरसिंह यांची रुपे, मुखवटे इ. तयार करीत असत. त्याचप्रमाणे लगद्यापासून तयार केलेली पूर्ण मानवाकृती व जनावरे धार्मिक उत्सवात वापरीत. तसेच हत्तींच्या व उंटांच्या प्रतिकृती मिरवीत नेत असत. तंजावर आणि दक्षिण भारतातील मान व प्शू यांच्या पूर्णाकृती मनोवेधक व वास्तवपूर्ण असतात. कागदाचा लगदा, डिंक आणि राख यांच्या मिश्रणाचे दुजोडी नमुने करुन त्यांना पाय, शेपटी, पंख व हात जोडतात. त्यावर प्लॅस्टर ऑफ पॅरिस, रंग आणि व्हार्निश यांची हात देतात. ग्वाल्हेरच्या कुंभारांनी स्वस्त दराच्या खेळण्यांसाठी कागदी लगदा आणि मातीचे मिश्रण वापरण्यास सुरुवात केली. ही खेळणी हलकी असतात आणि सहजासहजी मोडत नाहीत. साच्यातून काढलेल्या या वस्तू पुन्हा पातळ लगद्यात बुचकळल्या की त्यांचा खडबडीतपणा जातो. वाळल्यावर त्यांवर रंगकाम करतात.

दक्षिण भारतातील नाचणारी व हलणारी खेळणी कागदी लगद्याची आणि आकर्षक रंगीत पेहरावाची असतात. ही खेळणी वर्तुळाकृती बैठक व पाय, कमरेखालील भाग, कमरेवरचा भाग व हात आणि तोंड अशा चार भागांत तयार करुन ते सर्व भाग तारेने जोडतात. त्यामुळे थोडीशी हालचाल झाली, तरी सर्व भाग लयीत हलतात.

कारीकलमदारी : काश्मीरी पध्दतीच्या कागदाच्या लगदाकामाला कारीकलमदारी असे म्हणतात. हा व्यवसाय मोगल काळात भरभराटीत होता. या काळातल्या काश्मीरी वस्तू, त्यांचा रेशमासारखा मऊ कागद, त्यांची चकाकी व कलापूर्ण रंगकाम यांसाठी प्रसिध्द होत्या. काश्मीरच्या बाजारातून फुलांचे व इतर पध्दतीचे रंगकामकागदलगद्याच्या डुलत्या बाहुल्याकागदलगद्याच्या डुलत्या बाहुल्या केलेल्या भुकटीमंजूषा, गुलदानी दिव्याच्या व मेणबत्यांच्या बैठकी, चेंडू, पेन ट्रे, आगपेटयांची आवरणे इ. अनेक वस्तू पाहणारांचे मन आकर्ष्ज्ञित करतात. या वस्तू भारतातच नव्हे, तरी परदेशांतही काही प्रमाणात खपतात. आता त्यांना व्यावसायिक चढाओढीला तोंड द्यावे लागत असल्याने तेथील कलेचा ऱ्हास होऊ लागलेला आहे. तरीही काश्मीरची ही पारंपरिक कला आणि कलात्मक वृत्ती आजही टिकून आहे.


कागदलगद्याच्या डुलत्या बाहुल्या

युरोपीय आणि भारतीय काश्मीरी कामाच्या पध्दतींत फरक आहे. यूरोपात कागदाचा पूर्ण लगदा करीत नाहीत. तेथे एकावर एक कागद चिकटवीत योग्य त्या जाडीचे तक्ते तयार करतात. तक्ता ओला करुन पुरेसा मऊ झाल्यावर साच्यात दाबतात. साच्यात दाबलेली वस्तू ओलसर असतानाच त्यावर डिंकात भिजविलेल्या प्लॅस्टर ऑफ पॅरिसचा पातळ थर देतात. नंतर ती ओल्या दगडाने घासून, मऊ व चकचकीत झाली की त्यावर रंगाचा पहिला हात देतात. किंमती वस्तू करताना डिंकात मिसळलेला सोनेरी किंवा रुपेरी वर्ख लावतात. व्हार्निश व तऱ्हेतऱ्हेचे रंगकाम त्यावर करतात. अशा रीतीने केलेल्या वस्तू कमी वेळात आणि कमी श्रमात तयार होतात.

काश्मीरच्या बहुतेक कलाकृतीत शाल आणि गुलाबाच्या बारीक फुलांची रचना प्राचीन काळापासून चालत आलेली असून त्या आजही लोकप्रिय आहेत. त्या विविध रचना अलीकडच्या काळातील असून त्यांचे विविध प्रकार पुढीलप्रमाणे आहेत..

अरबीपद्धत : यांत बदामी, राखी किंवा मंद तपकिरी रंगाच्या पार्श्र्वभूमीवर सोनेरी रंगकाम करतात.

हातरुमालाचानमुना : यांत पौराणिक प्रसंग किंवा शिकारीची दृश्ये असत.

आधुनिकरचना : हे रंगकाम फिकट रंगांचे आणि वास्तवपूर्ण स्वरुपाचे असते. ते पांढरे, फिकट, निळे, गुलाबी किंवा सोनेरी रंगाचे असल्यास पृष्ठभागाचे काम प्रथम करतात.

गुलाबांचीरचना : यातील कलाकुसर उत्तम असते. यात गुलाब व इतर फुले, लहान लहान पक्षी विशिष्ट पध्दतीने रंगवितात. अलीकडील रचनेत विखुरलेले गुलाबगुच्छ भडक रंगात चित्रित केलेले असतात. त्यात कलात्मकतेचा खऱ्या अर्थाने अभावच जाणवतो.

शालीचेनमुने : जुने असले, तरी चांगले असतात. यांत पृष्ठभाग पांढरा किंवा फिकट रंगी ठेवून त्यावर जलरंगांनी चित्रे काढतात.

पांढरेवसोनेरीनमुने : यांत पृष्ठभाग पिवळसर पांढरा काढून त्यावर नागमोडी पध्दतीच्या सोनेरी आकृत्या काढतात. भडक रंगांच्या किनारीत फिकट निळा रंग प्रामुख्याने दिसतो.

यारकंदनमुना : यांत पृष्ठभागावर सोनेरी रंगातील नागमोडी रचनेचे लहान गुलाब वेगवेगळया केंद्रातून निघालेले दाखवितात. तसेच सोनेरी गुंडाळीवर पांढरी फुलेही रंगवितात. हे नमुने आकर्षक वाटले, तरी आता फारसे दिसत नाहीत.

गोखले, श्री. पु. जोशी, चंद्रहास

संदर्भ: Cones, J. G. Cone’s Book of Handicrafts, London, 1961.