उत्कीर्णन : (एन्ग्रेव्हिंग). धातू, लाकूड, दगड, काच, मूल्यवान रत्ने यांसारख्या कठीण माध्यम-पृष्ठांवर त्यांच्यापेक्षाही कठीण हत्याराच्या तीक्ष्ण टोकाने रेषांची आकृती खोदून काढणे किंवा त्या आकृतीचा छाप मारून कागदावर आकृती उमटविणे म्हणजे उत्कीर्णन होय. ताम्रपटावर अक्षरे अथवा आकृती खोदणे, नाणी पाडण्याच्या मुद्रा बनविणे, स्वाक्षरी करण्याच्या अंगठ्या तयार करणे, सोन्याचांदीच्या पत्र्यांवर धार्मिक प्रसंगांची चित्रे वा अन्य आकृत्या कोरणे, जडावाच्या दागिन्यांवर नक्षीकाम करणे, भांड्यांवर चित्रे खोदणे, कागदावरील रंगीत चित्र-छपाईचे लाकडी ठोकळे तयार करणे इत्यादींसाठी या तंत्राचा वापर भारत, चीन व इतर देशांतही फार प्राचीन काळापासून आजतागायत होत आहे. दगड, धातू व मूल्यवान रत्नांच्या पृष्ठभागावरील उत्कीर्णनास किंवा खोदण्याच्या प्रक्रियेला ‘इंटॅग्लिओ’ व दगड, धातू इत्यादींवर उत्थित आकृती किंवा आकार देण्याच्या प्रक्रियेला ‘कॅमिओ’ म्हणतात. या दोन्ही प्रक्रिया ग्रीक व रोमन लोकांना चांगल्या अवगत होत्या व त्याच पुढे यूरोपीय प्रबोधनकाळात अधिक प्रगत झाल्या.
उत्कीर्णनाची सर्वसामान्य पद्धत : सोने, चांदी, तांबे व इतर धातूंची नाणी पाडण्याच्या उत्कीर्णित मुद्रा यांत्रिक पद्धतीने करतात. परंतु उत्तमोत्तम चित्रांचे कलात्मक उत्कीर्णन साधण्यासाठी कलाकार हातानेच काम करतो. हाताने उत्कीर्णन करण्याचे एक साधे हत्यार असून त्याची एकंदर लांबी १० ते १२ सेंमी. असते. यातील पोलादी सळईचा छेद लांबट चौकोनी असतो. सळईचा पुढचा भाग तिरपा कापून व घासून पुढचे टोक अतिशय तीक्ष्ण केलेले असते. सळईच्या मागच्या बाजूस गोल लाकडी मूठ बसविलेली असते. ही मूठ हाताच्या पंजात धरून सळईचे पुढचे टोक धातूमध्ये घुसवून पुढे रेटले म्हणजे धातूच्या पृष्ठावर त्रिकोणी छेदाची बारीक खाच पडते. खाचा पाडावयाचे माध्यम लहान आकाराचे असले, तर ते टेबलावर ठेवलेल्या कापडाच्या घडीवर दाबून धरतात व जरूरीप्रमाणे फिरवत जातात. माध्यमावर निर्माण होणाऱ्या खाचेची खोली व रुंदी हत्यारावर दिलेल्या दाबावर अवलंबून असते त्यामुळे काम करताना हत्यारावरचा दाब कमीजास्त करून खाचेच्या रुंदीत व खोलीत पाहिजे तसा बदल सहज करता येतो. तांब्याच्या पत्र्यावर प्रथम पेन्सिलीने सबंध आकृती काढतात किंवा तशी आकृती काढलेला कागद चिकटवितात व नंतर उत्कीर्णन करतात. उत्कीर्णन चालू असताना काही वेळा चूक होते व ती दुरुस्त करावी लागते. अशा वेळी पृष्ठभागावरील कोरलेला भाग कानशीने घासून साफ करतात व नंतर पृष्ठभागाच्या मागील बाजूवर लाकडाने ठोकून पृष्ठाचा सर्व भाग पुन्हा समपातळीत आणतात व त्यावर नव्याने काम करतात. कागदावर छापण्याच्या चित्रासाठी वापरण्याच्या माध्यमावर उत्कीर्णन करताना छापलेल्या चित्रातील उजवीकडील भाग माध्यमाच्या डावीकडे येतो व चित्रातील डावीकडचा भाग माध्यमाच्या उजवीकडे कोरावा लागतो. चित्रातील अक्षरे माध्यमावर उलट्या दिशेने कोरावी लागतात. ते काम सहज होण्यासाठी अक्षरे लिहिलेला मजकूर एखाद्या आरशासमोर धरतात व त्यात दिसणाऱ्या उलट्या अक्षरांप्रमाणे कोरीव काम करतात. सबंध पृष्ठावरचे उत्कीर्णन पूर्ण झाल्यावर माध्यमाच्या संपूर्ण पृष्ठावर छपाईची शाई लावतात. ही शाई कोरलेल्या खाचेमध्ये बसते. नंतर माध्यमाच्या मूळ पृष्ठभाग कापडाने पुसतात त्यामुळे तेथील शाई निघून जाते, पण खाचांमध्ये आलेली शाई तेथेच राहते. अशा पृष्ठावर ओलसर केलेला कागद ठेवतात व त्यावरून रबराचा रूळ दाबून लाटतात. असे केल्याने खाचांमध्ये अडकलेली शाई कागदाला चिकटते व कागदावर आकृती उमटते. या पद्धतीला सरळ छपाई म्हणतात.
प्रत्यक्ष किंवा साधे (ड्राय पॉइंट) उत्कीर्णन : ही संज्ञा Gravure a’ pointe se’cne’ ह्या फ्रेंच शब्दप्रयोगाचे शब्दशः भाषांतर आहे. ह्या पद्धतीत तांब्याचे पत्रे वापरले जातात. त्याशिवाय जस्त व ॲल्युमिनियमचे पत्रे वापरतात. अलीकडे कचकडेही वापरले जाते. माध्यमाच्या पृष्ठावर फक्त बारीक रेषा उकरून जी आकृती तयार करतात, त्या आकृतीला रेषात्मक उत्कीर्णन म्हणतात. माध्यमाच्या पृष्ठावर खाचा पाडण्याच्या दुसऱ्या पद्धतीला ओरखडण म्हणतात. धातूचा पृष्ठभाग ओरखडून काढण्यासाठी उच्च कार्बनी पोलाद, हिरा, माणिक किंवा निळा रत्नखडा अशा कठीण पदार्थाचा लांबट तुकडा घासून व त्याला पेन्सिलीच्या टोकासारखा बनवून तो लहानशा मुठीत धरतात व त्याने माध्यमावर ओरखडे काढतात. ‘मेझोटिंट’ ही ओरखडणाचीच दुसरी पद्धत आहे. या पद्धतीत एका वेळी अनेक ओरखडे काढण्यासाठी पोलादी फणीसारखे खवणी हत्यार वापरतात. या हत्याराला अनेक बारीक दात असतात. ओरखडण्याच्या दोन्ही पद्धतींमध्ये ओरखडलेल्या चऱ्यांच्या दोन्ही काठांवर बारीक कडा वर येतात. त्या कानशीने घासून माध्यमाचा पृष्ठभाग शक्य तितका सपाट करतात. या ओरखडलेल्या चऱ्यांवर शाई लावली, तर त्याचा छाप सलग कापडासारखा दिसतो. या भागावर नंतर कमीजास्त घासून त्यापासून निरनिराळ्या घनतेचे छाप तयार करता येतात व सर्व माध्यमापासून पडद्यासारखा परिणाम साधता येतो. या प्रकारचे तंत्र रंगीत चित्रांच्या नकला करण्यासाठी वापरतात.
खवणी (स्टिपल) उत्कीर्णन : या पद्धतीमध्ये माध्यमाच्या पृष्ठभागावर तीक्ष्ण पोलादी हत्याराने टोचे मारून निरनिराळ्या घनतेच्या छटा निर्माण करतात. टोचे मारून बारीक टिंबे किंवा तुटक रेषा काढल्या म्हणजे त्यांपासून चित्रामध्ये ढग किंवा पाण्याचा भाग उठावदारपणे दाखविता येतो. साध्या तांब्याच्या माध्यमावर पोलादी हत्याराने कोरलेल्या चित्रावर शाई लावून त्यापासून फार तर ३०० चांगली चित्रे छापता येतात. तांबे हा धातू नरम असल्याने लवकर झिजतो. तांब्याच्या माध्यमापासून हजारो चित्रे छापावयाची असतील, तर त्या माध्यमावरच्या आकृतीवर प्रथमच पोलादाचे विद्युत्-विलेपन करतात, म्हणजे छापण्याचा भाग चांगला टणक होतो.
अम्ल-उत्कीर्णन (इचिंग) : अम्ल-उत्कीर्णन म्हणजे अम्लाच्या मदतीने धातूच्या माध्यमाचा पृष्ठभाग विरघळवून खोलगट जागा उत्पन्न करण्याची पद्धत. रेखाचित्रण करण्यासाठी ही पद्धत वापरताना माध्यमाच्या सर्व पृष्ठभागावर प्रथम अम्लरोधी रोगण लावतात. हे रोगण वाळले म्हणजे त्यावर पेन्सिलीने आकृती काढतात. नंतर या आकृतीवरून दाभणासारख्या उपकरणाने तीक्ष्ण टोक घासून तेथील रोगण खरडून काढतात. अशा रीतीने उघड्या पडलेल्या माध्यमाच्या पृष्ठभागावर अम्लद्रावण सोडले, म्हणजे काही वेळाने तेथील रेषेचा भाग विरघळून जातो व त्या ठिकाणी रेषा कोरल्याप्रमाणे चर पडतो. कोरलेल्या चरावर आणखी जितक्या जास्त वेळ अम्ल सोडावे, तितकी चराची खोली वाढत जाते. त्यामुळे निरनिराळ्या ठिकाणी अम्ल ठेवण्याचा काल कमीजास्त करून माध्यमावर निरनिराळ्या खोलीचे विभाग उत्पन्न करता येतात. या पद्धतीत माध्यमावर लावण्याच्या रोगणाचे अनेक प्रकार आहेत. त्यामध्ये नैसर्गिक मेण, बिट्यूमेन व राळ यांच्या मिश्रणाने बनविलेले दाट रोगण काळ्या रंगाचे असते व ते माध्यमाला घट्ट चिकटून बसते. काही रोगणे अगदी पातळ असतात.
अम्ल-उत्कीर्णन पद्धतीने छापण्याच्या आकृतीचे उत्कीर्णित माध्यम तयार करताना ते क्रमाक्रमाने सुधारून त्यास अंतिम स्वरूप दिले जाते. अशा क्रमातील प्रत्येक अवस्थेचा स्वतंत्र छाप घेऊन तो नीट तपासून पाहतात व त्यावर जरूर असल्यास लगेच दुरुस्तीही करतात. धातूचे माध्यम कोरण्यासाठी तीन भाग अम्ल व पाच भाग पाणी मिसळलेले नायट्रिक अम्ल वापरतात.
अम्ल-उत्कीर्णनाच्या दुसऱ्या पद्धतीमध्ये माध्यमावर सैल स्वरूपाचे पातळ रोगण लावतात व त्यावर एक कागद ठेवतात. या कागदावर पेन्सिलीने आकृती काढतात. त्यामुळे आकृतीच्या रेघेखालचा कागद रोगणातून खाली उतरून माध्यमाच्या पृष्ठापर्यंत जातो व तेथील रोगण कागदाला चिकटते. हा कागद काढून घेतला म्हणजे रेषेखालचा माध्यमाचा पृष्ठभाग उघडा पडतो. या उघड्या भागावर अम्ल सोडले, म्हणजे तेथे चर पडतो.
ॲक्वाटिंट उत्कीर्णन : ॲक्वाटिंट पद्धतीत प्रथम स्वच्छ केलेल्या माध्यमावर पेन्सिलीने आकृती काढतात. नंतर त्यावर राळेच्या भुकटीचा पातळ थर पसरतात व भुकटी तापवून तिला विरघळवितात. असे केल्याने माध्यमावर रवाळ (ग्रॅन्युलर) आणि थोडा पारदर्शक थर बसतो. या थरातून पेन्सिलीच्या रेघा दिसतात. या रेघांचा भाग वगळून बाकीच्या भागावर अम्लरोधी रोगण लावतात व रेघांच्या भागावर अम्लद्रावण सोडतात. हे अम्लद्रावण पारदर्शक थरातून खाली जाते व तेथे चर पडतात. ज्या ठिकाणी सूक्ष्म रेषा पाहिजे असतील, तेथील भाग थोड्या वेळाने अम्लरोधी रोगण लावून बुजवून टाकतात व बाकीच्या रेषा जास्त खोल होण्यासाठी अम्लाखाली तशाच राहू देतात. अशा पद्धतीने निरनिराळ्या खोलीच्या चरा पाहून पाहिजे तशी छटा उत्पन्न करता येते.
ॲक्वाटिंट पद्धतीच्या एका विशेष एका प्रकारात साखर मिसळलेल्या विशिष्ट प्रकारच्या शाईने माध्यमाच्या पृष्ठावर आकृती काढतात. ही शाई चांगली वाळली म्हणजे सर्व पृष्ठावर पातळ रोगणाचा थर देतात. हे रोगण वाळले म्हणजे ते माध्यम साध्या पाण्यात किंवा अगदी दुर्बल अम्लद्रावणात बुडवून ठेवतात. असे केल्याने आकृतीच्या रेषेतील साखर प्रसरण पावते व त्यामुळे रेषेवरचे रोगण फाटते व रेषेचा भाग उघडा होऊन अम्लाने उकरला जातो.
उत्कीर्णन छपाई : माध्यमाच्या पृष्ठावरचा आकृतीचा भाग कोरून काढल्यानंतर कोरलेल्या भागात शाई न भरता बाकी उरलेल्या भागाला शाई लावून जो छाप उमटवितात, त्याला उत्थित छपाई म्हणतात. कापडावर रंगीत चित्रे छापण्यासाठी लाकडाचे आणि लिनोलियमाचे ठोकळे बनविताना रंग उमटविणारा भाग जसाच्या तसाच राहू देतात व पांढरा राहणारा भाग हत्याराने उकरून खोलगट करतात. लाकडावर आणि लिनोलियमावर रेषात्मक सरी पाडण्यासाठी धातू उकरण्याचेच हत्यार वापरतात परंतु उत्थित काम करण्यासाठी गोलाकार पटाशी वापरतात. ही पटाशी उच्च कार्बनी पोलादाची असते. या पटाशीचे पुढचे टोक अर्धवर्तुळाकार असते व त्याला तीक्ष्ण धार असते. हे टोक हाताने दाबून लाकडात थोडेसे घुसवून पुढे रेटले म्हणजे लाकडावर नक्षी पडते व लाकडाचा चुरा बाजूच्या पृष्ठभागावर पडतो. लिनोलियम हा हस्तिदंतासारखा दिसणारा पण जरा नरम जातीचा कृत्रिम पदार्थ आहे. त्याच्यावर कोरलेल्या रेषांचे काठ लाकडावरच्या काठाइतके तीक्ष्ण होत नाहीत परंतु कित्येक प्रकारच्या रंगीत कामासाठी हे माध्यम सोईस्कर वाटते. लाकडाच्या पुष्कळ जाती आहेत परंतु सागवान आणि बॉक्सवुड ही लाकडे माध्यमासाठी उत्तम असतात.
ऐतिहासिक आढावा : उत्कीर्णन करण्यासाठी जे माध्यम वापरावयाचे असते, त्याच्या समांगतेच्या गुणधर्माप्रमाणे उत्कीर्णनकलेच्या मर्यादा ठरविल्या जातात. उत्कीर्णन करणारे कलाकार आपले खरे सामर्थ्य माध्यमावर केलेल्या निरनिराळ्या प्रक्रियांतूनच व्यक्त करतात. यूरोपीय देशांत पुस्तके छापण्याचा धंदा सुरू झाल्यावर पुस्तकात घालण्याची चित्रे छापण्यासाठी उत्कीर्णित ठोकळ्यांना जोराची मागणी येऊ लागली. त्यामुळे उत्कीर्णित ठोकळे बनविण्याचा एक नवीन व स्वतंत्र धंदा सुरू झाला. सुरुवातीच्या दिवसात हा धंदा सोनार करीत असत. हे लोक प्रसिद्ध चित्रकारांकडून चित्रे काढून घेत व त्यांची नक्कल करून खोदकाम करीत असत. अशा कामाला परकल्पित उत्कीर्णन म्हणतात. पुढे काही चित्रकारांनी आपण काढलेली चित्रे आपण स्वत:च कोरण्याची पध्दत सुरु केली. अशा कामाला स्वकल्पित उत्कीर्णन म्हणतात. स्वकल्पित उत्कीर्णनामुळे कोरीव कामाची पुष्कळ प्रगती झाली व त्या कामात रंगीत चित्राप्रमाणे सर्वच तर्हेचे नैसर्गिक देखावे आणि व्यक्तीचे हावभाव चांगल्या प्रकारे दर्शविता येऊ लागले.
लाकडाचा पृष्ठभाग कोरून ठसे बनविण्याची कला उत्तर यूरोपात सुरू झाली व तेथेच तिची पुष्कळ प्रगतीही झाली. या कामात जर्मन कलाकार आल्ब्रेक्त ड्यूरर (१४७१–१५२८) याने विशेष प्रयत्न केले, फ्रेंच व इटालियन कलाकारांनी ठसे बनविण्याची पूर्वापार पद्धतच चालू ठेवली परंतु ड्यूरर याने माध्यमाच्या पृष्ठावर निरनिराळ्या यांत्रिक प्रक्रिया करून उमटविलेल्या आकृतींमध्ये चित्राप्रमाणेच अनेक प्रकारच्या व कमी अधिक घनतेच्या छटा उत्पन्न करण्याची पद्धत पुढे आणली आणि माध्यमाच्या वस्तूचे महत्त्व कमी केले. लाकूड कोरण्याच्या कलेतील प्रमुख कलावंतांमध्ये लूकास क्रानाक (१४७२–१५५३), आल्ब्रेख्त आल्तदोरफर (१४८०–१५३८) व हान्स होल्बाइन (१४९७–१५४३) हे विशेष प्रसिद्ध आहेत.
तांब्याच्या पट्टीवर रेखापद्धतीचे उत्कीर्णन करून बनविलेल्या ठशांनी जी चित्रे छापली जात, त्यांत अनेक भव्य व चमत्कारिक कल्पना आविष्कृत करून अँटोनिओ पोल्लिवोलो (१४२९–१४९८), मार्टिन शोनगौअर (१४४५–१४९१) व ड्यूरर या कलाकारांनी त्यास उच्च दर्जा प्राप्त करून दिला व लोकप्रियताही मिळवून दिली. अम्लउत्कीर्णन पद्धतीने चित्रे कोरण्याची जुनी पद्धत हॉर्मेन्स्झ रेम्ब्रँट (१६०६–१६६९) याने पुष्कळ सुधारली व तिच्या उपयुक्ततेत मोलाची भर घातली. त्यानंतर फ्रान्समधील झां ऑग्यूस्त दॉमीनीक अँग्र (१७८०–१८६७) आणि अमेरिकेतील जेम्स ॲबट व्हिस्लर (१८३४–१९०३) त्यांनी त्यात आणखी सुधारणा केली. या कलेचा उपयोग करून पॅरिसचे आंरी मातीस (१८६९–१९५४) आणि पाब्लो पिकासो (१८८१-१९७३) या कलाकारांनी उच्च दर्जाची चित्रे छापून या कलेला एक महत्वाचे स्थान मिळवून दिले. ड्राय पॉइंट पद्धती व अम्ल उत्कीर्णन यांचे मिश्रण करून द्युन्वाये द सगाँनझाक (१८८४– ) याने नवीन प्रकारची मिश्र पद्धत सुरू केली व तिला लोकप्रियताही मिळवून दिली. छाया प्रकाशचित्रण कलेमध्ये चांगली प्रगती झाल्यावर चित्रे छापण्याच्या अनेक नवीन प्रक्रिया निघाल्या व त्या फार लोकप्रिय झाल्याने उत्कीर्णन पद्धती मागे पडली.
पुढे वास्तववादी चित्रांऐवजी अमूर्त आणि अत्याधुनिक प्रकारच्या चित्रांना महत्त्व येऊ लागले आणि उत्कीर्णन पद्धतीला पुन्हा थोडीशी ऊर्जितावस्था आली. टॉमस ब्युइक (१७५३–१८२८) याने काष्ठमाध्यम वापरताना लाकडाच्या लांबट भागाचा उपयोग न करता त्यातील आडव्या छेदांचा उपयोग करण्याची प्रथा सुरू केली व ती चांगली परिणामकारक ठरली. या कलेला उजाळा देण्याच्या दृष्टीने पॉल गोगँ (१८४८–१९०३), राउल द्युफी (१८७७–१९५३) व आंद्रे दरँ (१८८०–१९५४) यांनी विशेष परिश्रम केले. नॉर्वेतील एडव्हार्ट मुंक (१८६३–१९४४) याने रंगीत चित्रे छापण्याची एक स्वतंत्र पद्धत सुरू केली व तिच्याद्वारे दर्जेदार चित्रे छापून ती पद्धत लोकप्रिय केली. १९५० पासून तंत्रविषयक संकल्पनांचा प्रभाव जाणवू लागला. आता कित्येक कलाकार माध्यमाच्या विशिष्ट गुणावरच आधारलेले उत्कीर्णन करतात. त्यांमध्ये रंगीत चित्रांची केवळ नक्कल असते.
संदर्भ : 1. Andrews, M. F. Creative Printmaking, New Jersey, 1964.
2. Heller, Jules, Printmaking Today, London, 1958.
3. Wechsler, H. J. Great Prints and Printmakers, London, 1967.
ओक, वा. रा.