शंखशिंपल्यांचे कलाकाम : अपृष्ठवंशी मृदुकाय प्राण्यांच्या अंगावर जे संरक्षणात्मक कवच असते, त्याला शंख, शिंपले असे म्हणतात. ते एकसंध किंवा द्विपुटी असतात. शंखशिंपल्यांचे सु. एक लाख प्रकार आढळतात. शंखशिंपल्यांच्या प्रकारांतील कवड्या प्राचीन काळी चलन म्हणून वापरल्या जात [⟶ कवडी]. टाचणीच्या डोक्याएवढ्या आकारापासून ते सु. एक मीटरपर्यंत शंखशिंपल्यांचे आकार-प्रकार आढळतात. त्यांच्या रचनेत तीन थर असून सर्वांत वरचा थर पातळ, मधला थर जाड व आतील थर चकचकीत असून व आकर्षक असतो. आतील थराला मुक्तामाता म्हणतात. शिंपल्यातील मृदुकाय प्राण्यांना मृत्यू आल्यास, त्या शिंपल्यात अन्य सागरी प्राणी काही काळ निवास करतात त्यात खेकड्याचा समावेश जास्त असतो. संकटसमयी प्राणी शिंपल्याचे दार बंद करून घेतात. असे शिंपले त्यांच्या दारांसह जपून ठेवण्याची काळजी शंखशिंपल्यांचे संग्राहक घेतात.

प्राचीन काळापासून जगभर शंखशिंपल्यांचा विविध प्रकारे वापर होत आल्याचे दिसून येते. वैशिष्ट्यपूर्ण शंखशिंपल्याच्या दुर्मीळतेमुळे त्यांचा आवर्जून संग्रह करण्यात येतो. संग्राहकांना शंखशिंपल्याची विशेष निगराणी ठेवावी लागत नाही. एकदा ते स्वच्छ करून व्यवस्थितरीत्या मांडले की, त्याच्याकडे फारसे पाहावे लागत नाही. व्यावसायिक संग्राहकांना जागतिकदृष्ट्या प्रतिष्ठा असून त्यांच्याकडील शंखशिंपल्यांना भावही चांगला येतो.

एकोणिसाव्या शतकाच्या प्रारंभी (इ.स.१८११ मध्ये) जॉर्ज पेरी या निसर्गवादी लेखकाने आपल्या कॉकॉलॉजी या ग्रंथात निसर्गाच्या इतिहासाची एक शाखा म्हणून शंखशिंपल्यांकडे जगाचे सर्वप्रथम लक्ष वेधले. पुढे १८४७ च्या सुमारास ह्यूज क्युमिंगने फिलिपीन्स बेटांवर मिळालेल्या चकचकीत, रंगीत शिंपल्यांचा फार मोठा साठा प्रदर्शनांच्या रूपाने अमेरिकनांच्या नजरेला आणून दिला. तेव्हापासून शंखशिंपल्यांना वाढती मागणी येऊ लागली. त्याचप्रमाणे मोठमोठ्या वस्तुसंग्रहालयांत शंखशिंपल्यांचा प्रवेश झाला.ब्रिटिश वस्तुसंग्रहालयाच्या ब्रॉडरिप विभागात जगातील निवडक व सुंदर असे शंखाचे नमुने ठेवलेले आहेत.

प्राचीन काळापासून शंखशिंपल्यांची आभूषणे वापरण्याची प्रथा आढळते. आदिम जमातींमध्ये ही प्रथा आजही आढळते. दागदागिने, स्थापत्य आणि मूर्तिकला यांत शंखशिंपल्यांना महत्त्वाचे स्थान लाभले आहे. ईजिप्शियन रत्नजडित अलंकारांत शंखशिंपल्यांचाही उपयोग करीत. त्याचप्रमाणे सोनेरी रंगाच्या कवड्याही वापरत.

भारतामध्ये प्राचीन काळापासून शंखशिंपल्यांचा विविध प्रकारे उपयोग करण्यात येतो. पौराणिक काळापासून शंखपालन करणारा एक वर्ग समाजामध्ये होता. धार्मिक सण व उत्सव, पराक्रमी पुरुषांचे आगतस्वागत, विजयोत्सव, युद्धे इ. प्रसंगी शंखध्वनी करण्याची प्रथा होती. छ. शिवाजी महाराजांचे शंखपालन करणारी संकपाळ घराणी मालवणच्या सिंधुदुर्ग किल्ल्यावर असून त्यांच्या वंशजांमध्ये आजही धार्मिक कार्यात शंखाची पूजा करण्यात येते. भारतीय नाण्यांच्या इतिहासातही शंखशिंपल्यांच्या कोरलेल्या प्रतिकृतींचे उल्लेख येतात. भारतीय राजघराण्यांनी आपापल्या नाण्यांवर प्रतीक म्हणून शंखशिंपल्यांचा वापर केलेला आढळतो. अगदी अलीकडील त्रावणकोरच्या राजांच्या नाण्यांवर शंखशिंपल्यांची चित्रे आढळतात. शंखशिंपल्यांतील नैसर्गिक सौंदर्य, रंगसंगती, पोत, आकृतिबंध यांचा कलात्मक उपयोग करून त्यांपासून अनेक आकर्षक वस्तू तयार केल्या जातात. शंखशिंपल्यांचा उपयोग करून गुंड्या, मणी, चाकू-सुऱ्यांच्या मुठी तयार करतात. त्यांच्यावर नक्षीकाम करताना मधल्या थरातून आकृती आणि आतील थरापासून पृष्ठभाग तयार करतात. मुक्तामातांचा उपयोग सुशोभित डब्या, वाद्यांवरील अलंकरण आणि भिंतीवरील चौकटी तयार करण्यासाठी होतो. कर्णशुक्तिशिंपले आकर्षक हिरव्या आणि गुलाबी छटांचे असतात. ते सजावटीसाठी वापरतात. लहान मत्स्यालयांत शिंपले पसरून त्यांचा सागरसदृश तळ बनवितात, शंखांना भोके पाडून त्यांचा तुतारीसारखा उपयोग करतात. लहानलहान शंखांचा उपयोग तंत्रात्मक तोडगे, कंकण, ताईत, आलंकारित पिना, नक्षीचे उठावकाम, कड्या इ. तयार करण्यासाठी होतो. शंखशिंपल्यांची आकर्षक कंकणे वापरण्याची प्रथा फार प्राचीन आहे. त्यावरील सुंदर कोरीव काम लाखेने रंगवून, ताईत सोन्याच्या वर्खाने सजवितात किंवा त्यात मणी बसवितात. शंखशिंपल्यांचा उपयोग करून रुंद आणि चपट्या अंगठ्या तसेच पातळ व नाजूक कड्यांचे विविध प्रकार करतात. कड्यांना गोलाकार देतात, खाचा पाडतात किंवा मण्यांसारख्या कडा करतात. वाद्यांचे तोंड कोरून किंवा इतर प्रकारचे सुशोभित कोरीव काम करून त्यावर झिलई देतात. माशांचे किंवा कबुतरांचे आकार दिलेल्या साखळ्यांचे प्रकार लोकप्रिय दिसतात. शिंपल्यांच्या कडांवर कोरीव काम करून त्यांना भोके पाडून ते साखळीसारखे जोडतात. त्यांच्या मध्यभागी चौकटी कोरून कोरीव कामात लाख, हिरवा किंवा तांबडा रंग भरतात आणि शेवटी सफाईकाम करतात. बांगलादेशातील डाक्क्याच्या परिसरात हा कलात्मक व्यवसाय चालत असे. आसाम, भूतान, नेपाळ, थायलंड इ. प्रदेशांतील पोवळे, तृणमणी आणि कासवे यांची कवचे कलात्मक वस्तुनिर्मितीसाठी वापरतात. शिंपल्यांवर कोरीव काम करून जयपूर येथे त्यांचे दागिने तयार करतात. विशाखापट्टनम येथे कासवाच्या कवचांच्या पृष्ठभागांवर कोरीव कामे करतात. गुजरात, मुंबई या भागांत शंखशिंपल्यांचे लहानलहान दागिने तयार करतात. पश्चिम बंगाल आणि दक्षिण भारतात अनेक प्रकारांच्या डब्या तयार करून त्यांवर कवड्या बसवून आतील भागावर रंगीत कापड लावतात. राजस्थानात शंखशिंपल्यांपासून उंट आणि इतर प्राण्यांचे सुशोभित साज तयार करून त्यांत लहानलहान आरसे आणि रंगीत कापड बसवितात. हल्ली मोठ्या शिंपल्यांपासून राख टाकावयाची भांडी, दिव्यांच्या शेड्स, लहानलहान बश्या, मानवाच्या तसेच चित्रविचित्र प्राण्यांच्या चित्राकृती तयार करतात.

शंखशिंपल्यांचे कलाकाम लघु-उद्योगात मोडत असले, तरी या उद्योगाला पुरेशी चालना मिळालेली नाही .

पहा : अलंकार शंख शिंपले हस्तव्यवसाय.

गोखले, श्री. पु. महाम्बरे, गंगाधर

शंखशिंपल्यांचे कलाकाम