अक्षरण : अक्षरांच्या सजावटीची व प्रमाणबद्ध, सुवाच्य मांडणीची कला. अक्षरणाचे तंत्र लिपीच्या जन्माबरोबर उदयास आले. नंतरची सुलेखन कला ही याची निव्वळ कलात्मक परिणती मानता येईल. सुलेखन हे स्वयंपूर्ण असते, तर अक्षरण मुद्रणावलंबी असते.

अक्षरणाचा वापर शिलालेख, ताम्रपट व ग्रंथ यांमध्ये प्राचीन काळापासून होत होता. ज्या काळी मुद्रणाचा किंवा धातूच्या टंकांचा शोध लागला नव्हता, त्या काळातील हस्तलिखित पुस्तके व पोथ्या

अक्षरणाचे काही नमुने

यातून प्रमाणबद्ध लेखन सजविण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न होत असे. लिपीतील सांकेतिक अर्थाबरोबरच तिच्या रेखनातील कौशल्याकडेही लक्ष पुरवले जात असे.

हस्ताक्षरांतून यांत्रिक टंकाक्षरांची व त्यांतून आधुनिक छायाटंकांची उत्क्रांती झाली. आज उलट यांत्रिक टंकांतून व छायाटंकांतून अक्षरणाच्या नव्या प्रयोगांसाठी स्फूर्ती घेतली जाते.

जोपर्यंत जाहिरातकलेने मुद्रणप्रांत व्यापला नव्हता व मुद्रणकला केवळ पुस्तके व नियतकालिके यांपुरतीच मर्यादित होती, तोपर्यंत रोमन व देवनागरी अक्षरवळणे पुरेशी वाटत होती. परंतु आरेख्यक कलांच्या व विशेषत: उपयोजित कलांच्या प्रसाराबरोबर त्या कलाक्षेत्रातील कलावंतांना जुळणी-खात्यातील टंकवळणे व यांत्रिक संतुलन अक्षरयोजनेसाठी अपुरे वाटू लागले. व्यावसायिक जाहिराती, सूचिपत्रे, प्रसिद्धिप्रत्रके वा हस्तप्रत्रके यांतील महत्त्वाचे मथळे, शीर्षक किंवा ज्याकडे वाचकाचे लक्ष मुद्दाम वेधवावयाचे असा मजकूर यांसाठी कोणत्यातरी निखालस वेगळ्या वळणातील अक्षरण हवे, असा सुप्त आग्रह सुरू झाला. अशा खास कारणांसाठी भूमितिबद्ध मोजमापातील ठराविक साच्यांची अक्षरे कलावंतांना त्यातील असंतुलनामुळे नकोशी वाटू लागली. त्यातच विषयानुकूल वातावरणनिर्मितीसाठी अक्षरयोजना ही कल्पना कलेच्या प्रांतात रूढ झाली व हीच कल्पना अक्षरणकलेचे अधिष्ठान मानावे लागेल.

याशिवाय जाहिरातकलेच्या गतिमान प्रसाराबरोबर चित्रांकित प्रसिद्धिफलक व भित्तिपत्रक, दुकानांवरील दर्शनी पाट्या, उघड्या जागेतील मोठ्या आकाराचे जाहिरातफलक, चित्रपटगृहातील पडद्यावरील रंगीत जाहिराती इ. प्रकार व्यावसायिक क्षेत्रात रूढ होऊ लागले. साहजिकच त्यात चित्रकल्पनेबरोबर अक्षररेखाटनाला आगळे महत्त्व प्राप्त झाले. ग्रंथांची बाह्य वेष्टने, नानाविध जीवनोपयोगी वस्तू व खाद्यपेये यांच्या बाटल्या, डब्या, खोकी यांवरील वेष्टने वगैरेंसाठी अक्षरणाचा वापर होतो. समुचित कल्पना साकार व अर्थपूर्ण करण्यासाठी अक्षरारेखकाची आवश्यकता असते. कारण वातावरणनिर्मिती व विषयानुकूल अक्षरण यांशिवाय कित्येक चांगल्या कल्पना निष्प्रभ ठरतात व त्या पाहणाराची दृष्टी वेधून घेऊ शकत नाहीत.

अक्षरणकला ही अनुप्रयुक्त कलेतील खास प्रावीण्यशाखा मानली जाते. अक्षरणकलेत प्रावीण्य संपादण्यासाठी अक्षररेखाटनाच्या अनेक तऱ्हा व प्रकार तसेच विषयानुरूप अक्षरयोजना यांची दखल घ्यावी लागते. अर्थात अक्षरारेखकाने अक्षररचनेत संतुलित अंतरयोजन, दृक्‌संतुलन, सुवाच्यता इ. गोष्टी सांभाळाव्या लागतात. दोन अक्षरांतील, दोन शब्दांतील व दोन ओळींतील अंतर याला ‘संतुलित अंतरयोजन’ म्हणतात. याबाबत प्रारंभापासून दक्षता घ्यावी लागते. अर्थात पुष्कळदा हे अंतर केवळ दृष्टीवरच अधिष्ठित ठेवावे लागते. भूमितीवर भिस्त ठेवून तांत्रिक साधनांच्या साहाय्याने अंतर राखण्याचा प्रयत्न फारसा उपयुक्त ठरत नाही. हाताने अक्षररेखाटन करताना आरेखकाने अक्षरांतील अंतरयोजनेचा कच्चा आराखडा तयार करणे सोईस्कर असते.

अक्षरणकलेत प्रावीण्य मिळवण्यासाठी हस्तलिखित अक्षररेखाटनाचे विविध मुद्रित नमुने अभ्यासण्याची आवश्यकता असते. अनेकविध भाषांतील निरनिराळ्या विषयांच्या नियतकालिकांच्या तसेच वर्तमानपत्रांच्या जाहिरातींमधून निरनिराळ्या अक्षररेखाटनांचे नमुने पाहावयास मिळतात. रोमन, देवनागरी व अन्य भाषालिपींच्या टंकक्षेत्रांत अनेक आकर्षक वळणे आहेत. विशेष परिणामांसाठी ती जशीच्या तशी वापरावयाची नसली, तरी त्यांच्या उत्तम परिचयासाठी त्यांचे हाताने रेखाटन करणे आवश्यक ठरते.

अक्षररेखाटनास मनुष्याकृतिरेखाटनाइतकाच सखोल अभ्यास व नित्य रिवाज लागतो. अक्षरांपासून शब्द निर्माण होतात व शब्दांतून अर्थबोध होतो. प्रत्यक्ष अर्थापेक्षा अक्षरे अधिक बोलकी व मनावर एका निश्चित भावनेचा परिणाम करणारी असतात. कोमल भावांसाठी नाजूक चणीची व डौलदार घाटाची रौद्ररसयुक्त वातावरणनिर्मितीसाठी जाडजूड आकाराची, बोथट व पसरट घाटाची भीतियुक्त भावनेच्या आविष्कारासाठी करवतीसारखी दिसणारी अक्षरे वापरण्याचे संकेत रूढ आहेत. अर्थातच हे नियम नाहीत. कोणत्या पद्धतीच्या अक्षररेखाटनाने कोणते वातावरण निर्माण करावयाचे हे कलावंताने स्वत:  ठरवावे लागते. अक्षररेखाटन व भावनिर्मिती यांचा घनिष्ठ संबंध आहे.

अक्षरणकलेच्या अभ्यासात टंकक्षेत्रातील विविध वळणे, त्यांचे घाट आणि वैशिष्ट्ये हे विषय प्रामुख्याने अंतर्भूत होतात. कारण टंकारूढ वळणांचा वापर केव्हा प्रभावी असतो व त्याच्या मर्यादा केव्हा संपतात, हे टंकवळणांच्या सखोल अभ्यासाशिवाय ठरविता येत नाही.

नावीन्यपूर्ण अक्षररेखाटन करताना ज्या ठळक प्रकारांचा वापर होतो ते असे : (१) टंकवळणांचा आधार घेऊन पण जरूरीनुसार त्यांत इष्ट ते बदल करता येतात. टंकनिर्मितिक्षेत्रात अक्षरांचे आकार, उंची, जाडी, समप्रमाण यांबाबत निश्चित नियम असतात. अशा नियमांनीच त्यात प्रमाणशीरता येते. पण काही खास परिणामांसाठी हाताने अक्षररेखाटन करताना आरेखकाला स्वातंत्र्य घेता येते व आरेखनात वैशिष्ट्य निर्माण करण्यासाठी प्रमाणभूत वळणांतील काही अक्षरांचे वळणही बदलता येते. व्यापार-चिन्हे तसेच नाटक, चित्रपट, ग्रंथ इत्यादींची नावे वाचकांच्या नजरेत भरण्यासाठी या इष्ट बदल-पद्धतीचा उपयोग होतो. व्यापारी संस्थेचे अथवा विक्रय-वस्तूचे नाव विशिष्ट अक्षरांनी निश्चित करणाऱ्या शब्दमुद्रा बनविताना हे अक्षरण उपयुक्त ठरते.

कित्येकदा अक्षरतज्ञ छायाचित्रणकलेच्या साहाय्याने टंकारूढ वळणांस अपेक्षित मोजमापात आणू शकतो. कारण टंकारूढ वळणे, मग ती कोणत्याही भाषेच्या लिपीतील व कोणत्याही घाटाची असोत, त्यांची मोजमापे पॉइंट अथवा पायका या पद्धतींमध्येच असतात व कित्येकदा ती अक्षरतज्ञ जशीच्या तशी वापरू शकत नाही. त्यामुळे गुळगुळीत कागदावर त्याचे मुद्रित काढून घेतले जाते व त्यास छायाचित्रणकलेच्या साहाय्याने अपेक्षित आकार मिळतो.

अक्षरणकलेत परिपूर्णता आणण्यासाठी छायाचित्रणकलेच्या साहाय्याची व्याप्ती आता कल्पनेपलीकडे वाढली आहे. उदा., वेगवेगळ्या भिंगांच्या मदतीने भरीव अक्षरे पोकळ करणे अथावा उभट अक्षरे पसरट करणे, ताठ उभी अक्षरे मधोमध वाकविणे वा सपाट करणे, कापल्यासारखी धारदार वा म्हाताऱ्याच्या यष्टीप्रमाणे थरथरणारी अक्षरे बनविणे आदी किमया आता शक्य कोटीत आल्या आहेत.

(२) अक्षरणाच्या नावीन्यपूर्ण प्रकारांत सर्वस्वी नव्या धर्तीची, नव्या घाटाची व नव्या प्रमाणांची सरळ, उभी अथवा तिरपी अक्षरे रेखाटता येतात. काही वेळा विषयानुरूपही अक्षरे चितारता येतात. ज्या वस्तूची जाहिरात करावयाची, तिच्या अस्तित्वाचा आभास उत्पन्न करणारी अक्षरे चितारता येतात. उदा., ‘तुरुंगातील तारे’ या शीर्षकातील अक्षरे गजांआड दिसतील, अशा तऱ्हेने अथवा पोकळ अक्षरे काढून त्यांवर गजांचा आभास दाखविणाऱ्या किंचित जाड, काळ्या, उभ्या रेषा चितारून अपेक्षित वातावरण निर्माण करता येते. दोरखंडावरील जाहिरातीत त्या वस्तूच्या निर्मात्याला प्राधान्य हवे असेल किंवा ज्या व्यापारी नावाखाली दोरखंड विकले जातात, ते नाव ठळक करावयाचे असेल, तर अशा वेळी दोरखंडाची कल्पना देणारी अक्षरे रेखाटता येतात मात्र अशा कल्पना रेखाटताना अक्षरे सुवाच्य असावीत.

(३) मुक्तहस्ताक्षर-पद्धतीस अक्षरणकलेत विशेष स्थान आहे. या अक्षरांचे रेखाटन मुक्तपणे, धावत्या शैलीत करावे लागते. असे अक्षररेखाटन खरखरीत कागदावर कुंचलीत कमी शाई वा रंग ठेवून केल्यास त्यात एक प्रकाशचा जोश वाटतो. ते तिरप्या अथवा सरळ-उभ्या धावत्या लिपीत सारख्याच परिणामकारकतेने करता येते. रेखाटनात गतीला कोठेही बाध येणे इष्ट नसते. या पद्धतीचा वापर जाहिरातींची सूचनावजा शीर्षके, उद्गारवाचक वाक्ये, वेळेसंबंधी माहिती देणारी —‘आता फक्त चार दिवस राहिले!’—यासारखी स्पष्टीकरणवजा शीर्षके यांच्यासाठी केला जातो. पण हा वापर मितप्रमाणात होणे चांगले.

(४) नाजुक चणीची कित्तेवजा ताम्रपत्री अक्षरे : नुसत्या भूमितीच्या साधनांनी या अक्षरांतील सौंदर्य वा परिणामकारकता व्यक्त होत नाही, तर ही अक्षरेसुद्धा एका परीने मुक्तहस्त-पद्धतीचीच आहेत. असे अक्षररेखाटन प्रमाणपत्रे, प्रशस्तिपत्रके, हमीपत्रे, धनादेश, पत्रव्यवहाराचे कागद अशा विविध ठिकाणी वापरता येते.

वरील प्रकारांव्यतिरिक्त व्यक्तिपरत्वे भिन्नभिन्न कल्पनांतून अक्षररेखाटनाचे आणखी कितीतरी वेगवेगळे प्रकार संभवू शकतात. मात्र कोणतीही कल्पना साकार करताना ती परिणामकारक व सुगम होणे आवश्यक असते.

पहा : मुद्रानिर्मिति सुलेखन.

संदर्भ : 1. Leach, Mortimer, Letter Design in the Graphic Arts, New York, 1960.

2. Nesbitt, Alexander, Ed. Decorative Alphabets and Initials, New York, 1959.

3. Nesbitt, Alexander, The History and Technique of Lettering, New York, 1957.

4. Strange, E. F. Alphabets, London, 1898.

देवकुळे, ज. ग.