खुर्ची : एक अत्यंत उपयुक्त फर्निचर-प्रकार. ‘कुर्सी’ या अरबी शब्दाचा अर्थ ‘ओटा’ किंवा ‘चौथरा’ असून त्यावरूनच खुर्ची शब्द रूढ झाला. खुर्ची हा प्रकार तसा पुरातनच. सतराव्या शतकापूर्वी खुर्चीचा वापर प्रतिष्ठित वा सन्माननीय व्यक्तींपुरताच मर्यादित होता. श्रीमंतांच्या घरीही वडिलधारी मंडळी किंवा प्रतिष्ठित पाहुणे यांच्यासाठीच खुर्ची राखून ठेवलेली असे. इंग्रजीतील ‘चेअरमन’ हे पदनाम चेअर (खुर्ची) या इंग्रजी शब्दावरूनच बनविलेले आहे. गेल्या तीनशे वर्षात मात्र खुर्चीचा वापर सर्वत्र व सर्रास होऊ लागला.

सुवर्णखचित लाकडी खुर्ची, ईजिप्त, इ. स. पू. सु. १४ वे शतक.

कधी काळी आदिमानवाने बसण्यासाठी एखाद्या झाडाचे खोड सहजपणे वापरले असावे. आधुनिक खुर्चीचा प्रकार त्यातूनच पुढे उत्क्रांत होत गेला असावा. त्यामुळे तिच्यासाठी वापरले जाणारे माध्यम, आकार, रचना, सौंदर्य व उपयुक्तता इ. बाबतींत कालपरत्वे सतत बदल होत गेल्याचे दिसून येते.

ईजिप्तमधील खुर्ची ही ज्ञात असलेली अगदी प्राचीन खुर्ची होय. ती लाकूड व हस्तिदंत यांपासून बनविलेली, प्राण्याच्या पायासारखे पाय असलेली, कोरीव व रंगकाम केलेली होती. तिच्यावर कातडी किंवा कापडी आच्छादनही असे. प्राचीन ग्रीक खुर्च्याही वेधक स्वरूपाच्या असत. त्या बिनहाताच्या असून त्यांची पाठ व मागील पाय अर्धवक्राकार असल्यामुळे त्या इंग्रजी एस् (S) या वर्णासारख्या दिसत. त्यांच्या पायांची टोकेही अर्धवर्तुळाकार असत. त्यामुळे त्यांचे आकारसौंदर्य उठून दिसे. विसाव्या शतकातही या आकारवैशिष्ट्याचे अनुकरण केले जाते. प्राचीन रोमन खुर्चीचा आकार इंग्रजी एक्स् (X) वर्णासारखा असे. लाकूड, हस्तिदंत व ढाळलेल्या धातूंची ती बनविलेली असे. तिचा वापर न्यायाधीशासाठी होई.

 

व्हेनेशियन कातडी खुर्ची, सु. १८ वे शतक.

मध्ययुगात या दोन्ही प्रकारच्या खुर्च्यांमध्ये सुधारणा झाल्या. सुरुवातीला मध्ययुगीन खुर्चीची पाठ व हातांकडील बाजू उंच फळ्यांच्या असत. कधीकधी त्यावर छत्रही असे व ते वेलबुटीदार भरजरी कापडाने वा मखमलीने शृंगारलेले असे. त्यामुळे त्या खुर्च्या राजासनाप्रमाणे भासत. दगडांच्या वा धातूंच्याही खुर्च्या या काळात प्रचलित होत्या. चौदाव्या शतकामध्ये यूरोपीय देशांतून तत्कालीन वास्तुरचनेशी मेळ घालणाऱ्‍या खुर्च्या वापरात आल्या  परंतु पुढे सतराव्या शतकात मात्र खुर्चीच्या आकारप्रकारांत खूपच विविधता निर्माण झाली. याच सुमारास पोर्तुगीजांनी भारतातून नेलेल्या वेताच्या खुर्च्या यूरोपीय देशांत बऱ्याच लोकप्रिय ठरल्या. तसेच वक्रांकित असलेल्या व चित्राकृतींनी सुशोभित केलेल्या पाठींच्या चिनी खुर्च्यांचाही प्रभाव सरळसोट पद्धतीच्या पाश्चिमात्य खुर्च्यांवर पडला. परिणामतः पाश्चिमात्य खुर्चीच्या बनावटीत बरेच फेरफार झाले. आरामखुर्चीची निर्मिती अठराव्या शतकात झाली. तिच्या पाठीला, बैठकीला व हातांना गाद्या वापरीत तसेच लोकरी कापड, विणीचे सुशोभित कापड, ⇨ चित्रजवनिका (टॅपेस्ट्री), रेशीम अथवा मखमल यांचा वापर करूनही तिचे सौंदर्य वाढविण्यात येई. एकोणिसाव्या शतकात खुर्चीच्या निर्मितितंत्रात बरेच बदल झाल्यामुळे खुर्चीच्या आकारप्रकारांत झपाट्याने विविधता आली. खुर्चीच्या बैठकीत स्प्रिंगचा वापर होऊ लागला. सेंट पीटरची खुर्ची इतिहासप्रसिद्ध आहे. रोममधील सेंट पीटरच्या चर्चमध्ये ती ठेवलेली आढळते. लाकूड व हस्तिदंत यांपासून ती नवव्या शतकात किंवा तत्पूर्वीही बनविलेली असावी.  इंग्लंडमधील चिपेंडेल [→ चिपेंडेल, टॉमस], हेपलव्हाट इ. शैलींतील खुर्च्या, त्यांची वक्राकार ठेवण, व शोभिवंत आकार यामुळे आकर्षक वाटतात. अमेरिकन तसेच फ्रेंच व जर्मन खुर्च्या आणि कोच नावीन्यपूर्ण व आकर्षक असतात.

पूर्वेकडील देशांत विशेषतः चीनमध्ये हान राजवंशाच्या (इ. स. पू. २०२– इ. स. २२१) काळात खुर्चीचा वापर होत असल्याचे दिसून येते. अतिपूर्वेकडील देशांत फुलांसारख्या पायांच्या खुर्च्या असल्याचे आढळते.

वैदिक वाङ्‍मयात आसंदी किंवा आसंदिका या चौरंगासारख्या आसनाचा उल्लेख आढळतो. आसंदी खैर वा औदुंबर यांच्या लाकडाची बनविलेली असून, ती मुंज नावाच्या गवताने विणलेली असे. गोल, चौकोनी वा लांबट असे तिचे विविध आकार असत. तिच्यावर गादी, अभ्रा किंवा व्याघ्रचर्म यांचे आवरण घालीत. ती राजे व महाराजे यांचे सुखासन असे. धार्मिक प्रसंगीही तिचा उपयोग करीत असत. ती एक प्रकारची तत्कालीन खुर्चीच होती.

प्राचीन भारतामध्येही राजे व देवता यांच्यासाठी खुर्चीसदृश आसनांचा वापर करण्यात येई. त्यांना ⇨ सिंहासन  म्हणत. सिंहासनाचे पाय गजसिंहादी प्राण्यांच्या पायांसारखे असत. तसेच त्यांच्या सजावटीमध्ये सिंह, हत्ती, घोडे, हरिण, हंस, मोर, गरूड वा कमळ इत्यादिकांच्या आकारवैचित्र्यांचाही उपयोग करीत. उच्चपदस्थता दाखविण्यासाठी या आसनावर मोत्याचे छत्र आणि खाली तळवे विसावण्यासाठी मखमली पायदान असे. लाकूड, दगड, तांबे, रुपे, सुवर्ण इत्यादींचा वापर यासाठी केला जाई.


आधुनिक खुर्चीचा प्रवेश मात्र भारतात यूरोपियनांच्या आगमनाबरोबर झाला. त्याकाळी मुंबई येथे सागवानाच्या आणि अहमदाबाद, मोंघीर, बरेली इ. ठिकाणी शिसवीच्या लाकडाच्या खुर्च्या बनवीत. दुसऱ्या महायुद्धानंतर सुशिक्षित समाजात खुर्ची व गृहसजावटीला आवश्यक अशा तत्सम ⇨ फर्निचरचा वापर रूढ झाला. खुर्ची या प्रकारात आरामखुर्ची, मेज (टेबल), बाक व सोफा इत्यादींचाही समावेश होतो. आकर्षक सोफा हे खुर्चीचे अद्ययावत स्वरूप होय. पोलाद, वेत, बांबू, प्लॅस्टिक, फोम रबर, रेक्झिन, लॅमिनेटेड शीट्स, आकर्षक कापड अशा विविध माध्यमांचा वापर करून आज नाना प्रकारच्या खुर्च्या तयार केल्या जातात. जुन्या नक्षीकामातील सौंदर्याची जागा आता खुर्चीचा सुंदर आकार, आरामदायी रचना, मोहक रंग आणि सुटसुटीतपणा यांनी घेतली आहे. खुर्चीच्या आकारप्रकारांतही नवनवीन बदल घडून येत आहेत  त्यामुळे आरामखुर्ची, घडीची खुर्ची, फिरती खुर्ची, स्प्रिंगची खुर्ची, हातांची खुर्ची, बिनहातांची खुर्ची, वेताची खुर्ची, गादीची खुर्ची, प्लॅस्टिकची खुर्ची, सोफा-कम-बेड अशा कितीतरी प्रकारांतून खुर्ची या फर्निचरप्रकाराचा विकास झाल्याचे दिसते.

सभासंमेलने, विधिमंडळे, राजदरबार यांमधून सभापती, अध्यक्ष, राजाराणी यांच्यासाठी ऐश्वर्यद्योतक, भव्य व कलात्मक  अशा खुर्च्या वापरण्याची पद्धत आजही प्रचलित आहे.

सौंदर्य आणि उपयुक्तता या दोन्ही अंगांनी खुर्ची या फर्निचर प्रकाराचा सतत विकास होत असून, आज सर्वसामान्यांच्या कुटुंबांत ती एक गरजेची वस्तू बनलेली आहे.

जोशी, चंद्रहास कानडे, गो. चिं.

अकोडकाष्ठाची सोफेवजा खुर्ची ,इंग्लंड, १८ वे शतक मोत्यांनी सजविलेली कागदलगद्याची खुर्ची, इंग्लंड, १९ वे शतक अकोडकाष्ठाची कोरीव खुर्ची इंग्लंड, १६ वे शतक
बायो चित्रजवनिकायुक्त चमकदार खुर्ची, फ्रांस,सु.१८ वे शतक हेपलव्हाइट शैलीतील खुर्ची , इंग्लंड, १८ वे शतक 'ग्रोट्टो' : चिपेडेल शैलीतील खुर्ची , इंग्लंड, १८ वे शतक
ग्लँस्टनबरी शैलीतील लाकडी खुर्ची , इंग्लंड, सु . १७ वे शतक चकाकणारी शिंपलाकार खुर्ची ,व्हेनिस,१८ वे शतक रोझवुडची चिनी खुर्ची , १८ वे शतक