हंड्या व झुंबरे : घरांच्या, भवनांच्या वा सभामंडपांच्या अंतर्गत सजावटीसाठी तसेच प्रकाशासाठी वापरण्यात येणारी साधने. अर्धगोल तळ आणि त्यावर पिंपाच्या आकाराचा वरून उघडा भाग असलेल्या काचेच्या पात्राला हंडी असे म्हणतात. विशिष्ट व्यास असलेल्या काचेच्या भांड्यात पणती वा दिवा ठेवला की हंडी तयार होते. ही हंडी छताला टांगली जाते वा रस्त्यावर प्रकाशासाठी विशिष्ट खांबावर ठेवली जाते. श्रीमंत लोकांच्या व राजेरजवाड्यांच्या मोठमोठ्या दिवाणखान्यांत अशा हंड्या रूढ होत्या. देवळांच्या सभामंडपांतही हंड्यांचा वापर करीत असत. घराच्या दिवाणखान्यात, भवनात वा सभामंडपात प्रकाशासाठी आणि त्या जागेला शोभा आणण्यासाठी झुंबराचा वापर करतात. आधारासाठी एक महत्त्वाचा दांडा घेऊन त्याला अनेक फांद्या काढून त्यावर दिवे ठेवून झुंबर करतात. या झुंबरावर विशिष्ट रंगांचे, आकारांचे दिवे ठेवले जातात. झुंबराच्या रचनेला एखादा नियमित व सममित आकार असतो.

हंडी हा प्रारंभी झुंबराच्या रचनेचा एक भाग होता. हंड्यांमुळे दिव्यांचा वाऱ्यापासून बचाव होत असे. त्यामुळे प्रकाशासाठी लावलेल्या झुंबरात हंड्या हमखास असत. कालानुरूप हंड्यांचा वापर आता वेगवेगळ्या ठिकाणी केला जातो. विजेचा वापर सार्वजनिक होण्याआधी सार्वजनिक उजेडासाठी रस्त्यांवर हंड्यांचा वापर केला जाई. त्यात मेणबत्त्या वा तेलाचे दिवे वापरले जात. आज चिनीमातीपासून बनविलेल्या, वेगवेगळ्या हस्तकलांनी कलाकुसर केलेल्या हंड्या गृहशोभनासाठी वापरल्या जातात. शयनकक्षात प्रकाशासाठी वा अभ्यासासाठीही हंड्यांचा वापर केला जातो.

झुंबर हा गृहशोभनातील एक प्रकार प्रारंभापासूनच वैभवाचे, श्रीमंतीचे व थाटामाटाचे प्रतीक राहिला आहे. पहिले ज्ञात झुंबर हे साध्या लाकडापासून बनविल्याचे आढळले असून, या झुंबराच्या हंड्यांमध्ये प्राण्यांच्या चरबीपासून बनविलेल्या मेणबत्त्यांचा प्रकाशासाठी वापर केला जात असे. इ. स. चौथ्या शतकापासून चर्चमध्ये अनेक मेणबत्त्या लावलेली झुंबरे लावीत असत. रोमच्या सेंट पीटर्स चर्चमधील आठव्या शतकातील झुंबरात १,३७० बत्त्यांची सोय असल्याचे निदर्शनास आलेले आहे. अकराव्या आणि बाराव्या शतकांतील झुंबरे भव्य आहेत. यांतील पुष्कळ मेणबत्त्यांसाठीच असली, तरी काही तेलाच्या दिव्यांचीही आहेत. ही झुंबरे लोखंड, तांबे, चांदी आणि सोने या धातूंची बनविलेली असून त्यात कलाकुसरीचे काम केलेले आहे. पंधराव्या शतकापासून शाही भवनांमध्ये छतावर मध्यभागी झुंबरे लावून शोभा वाढविण्याची पद्धत रूढझाली. अठराव्या शतकाच्या प्रारंभापासून बोहीमियन आणि व्हेनेशियन कारागिरांनी उत्कृष्ट अशी रूबाबदार आणि चित्तवेधक झुंबरे बनविण्यास सुरुवात केली. बोहीमियन पद्धतीची झुंबरे त्याकाळी यूरोपसह जगभर प्रसिद्ध होती. या झुंबरांमध्ये बिलोरी शीसेकाच वापरली जात असे. त्यामुळे या काचांद्वारा प्रकाशाचे वक्रीभवन होऊन त्रिपार्श्वाने सप्तरंगांची उधळण होऊन परिसराला शोभा येत असे. बोहीमियन कारागिरांनी बनविलेले जगातील सर्वांत मोठे बिलोरी काचांचे झुंबर इस्तंबूल येथील म्यूझीयममध्ये असून त्यात ७५० दिवे असून त्याचे वजन ४.५ टन आहे. १६७६ मध्ये जॉर्ज राव्हेन स्क्रॉफ या काचनिर्मिती उद्योजकास काचेत लीड ऑक्साइड मिसळले असता त्यापासून तयार होणारी काच प्रकाशाचे उच्च परावर्तन करते, हे आढळले. तेव्हापासून झुंबरे बनविण्यासाठी या काचेचा वापर होऊ लागला. पाने, फुले, फळे यांशिवाय निसर्गातील विविध प्रतिकृतींचावापर झुंबरातील अंतर्गत भागांच्या निर्मितीत केला जातो. आज झुंबरे उच्चभ्रू व मध्यमवर्गीय घरांत अनिवार्य गृहसजावटीचा भाग आहेत. भारतात राष्ट्रपती भवन, जयविलास पॅलेस याशिवाय अनेक उच्चतारांकित हॉटेलांमध्ये झुंबरे बघावयास मिळतात. अलीकडच्या काळात लळेललर ही हंड्यांची पद्धत रूढ झाली असून लळेललर चा शब्दशः अर्थ ‘फुलांची परडी’ असा होतो. हुबेहुब वाटणारी नकली फुले या प्रकारच्या हंड्यांमध्ये वापरतात. या प्रकारच्या हंड्या अंतर्गत गृहसजावटीसाठी प्रचलित आहेत.

भटकर, जगतानंद 


ऑटोमन पॅलेस म्यूझीयममधील झुंबर, इस्तंबूल. मानवी हाडांपासून बनविलेले झुंबर, कोस्टानिक सेडलेक, चेक प्रजासत्ताक.
अशोक हॉलमधील झुंबरे, राष्ट्रपती भवन, नवी दिल्ली. जयविलास पॅलेसमधील झुंबर, ग्वाल्हेर.
चौमहाल पॅलेस येथील झुंबरे, हैदराबाद. बिलोरी काचांपासून बनविलेले झुंबर
 शाही मशिदीतील झुंबर, मस्कत.  लीला पॅलेस येथील झुंबर, बेंगळूरू.