शाल : स्त्रीपुरुषांच्या नित्यनैमित्तिक – वेशभूषेतील एक शोभादायक, कलापूर्ण व उपयुक्त प्रावरण. अंगावर परिधान करण्याचे वा लपेटून घ्यावयाचे हे वस्त्र सामान्यतः आयताकार असते. शाल ही सामान्यपणे लोकरीपासून तयार करतात. तथापि सुती, रेशमी व अन्य धाग्यांचीही शाल असू शकते. कशिद्याने व छपाईने केलेली नक्षी व वेलबुट्टी, हे या लोकर प्रावरणाचे वैशिष्ट्य होय. शाल हा मूळ फार्सी शब्द आहे. कलात्मकतेने विणलेला हा सुंदर वस्त्रप्रकार शिलाईयुक्त अशा इतर वस्त्रांपेक्षा (गार्मेंट) वेगळा व वैशिष्ट्यपूर्ण आहे. प्राचीन काळी इराणमध्ये (पर्शिया) शाल मेखलेप्रमाणे कंबरेभोवती गुंडाळण्याची प्रथा होती. भारतात प्रायः खांदयावरून घेण्याची प्रथा आढळते. पौर्वात्य देशांमध्ये पुरुष आणि युरोपात स्त्रिया अधिक प्रमाणात शाली वापरतात. शालीच्या लोकरीचा दर्जा सामाजिक प्रतिष्ठेचा निदर्शक ठरतो.

प्राचीन काळापासून शाली वा तत्सम उपरणे, मफलर यांसारखी वस्त्रप्रावरणे जगभर प्रचलित आहेत. मेसोपोटेमिया, पर्शिया, ईजिप्त येथील स्त्रीपुरुष घागरे, कोट, अंगरखे (ट्यूनिक) यावरून शाली लपेटून घेत. प्राचीन ग्रीक समाजात पुरुषांसाठी आखूड ‘क्लॅमिज’, तर स्त्री व पुरुष दोघांसाठीही लांब ‘हिमेशन’ ही अंगाभोवती लपेटून घ्यावयाची वस्त्रे प्रचलित होती. पुढे हिमेशनपासूनच रोमन शालींचे अनेक प्रकार विकसित झाले. त्यांत पुरुषांचे ‘टोगा’ व ‘पॅलियम’, तर स्त्रियांचे ‘पाल्ला’ हे शालवजा वस्त्र इ. मुख्य प्रकार होते. यांसारखी अनेकविध वस्त्रप्रावरणे युरोपमध्ये मध्ययुगापर्यंत प्रचलित होती.

तलम पोताच्या व नाजुक भरतकाम केलेल्या शाली मोगल काळात तयार होऊ लागल्या. एकोणिसाव्या शतकात भारतीय शालींची कीर्ती जगभर पसरली. प्राचीन भारतात मौर्य, शुंग, सातवाहन इ. राजवटींत (इ.स. पू. तिसरे– इ. स. पहिले शतक) शालींचे अनेकविध प्रकार वापरात होते.

पांढरा, तांबडा व मिश्र तांबडा अशा रंगांच्या त्या शाली असत. मेंढीच्या लोकरीपासून तयार केलेल्या शालींची वीण मोठी कौशल्यपूर्ण असे. ज्या शालींवर विणीमध्येच आकृतिबंध उमटविण्यात येत, तिला ‘वानचित्र’ तर अनेक तुकडे जोडून तयार केलेल्या शालीला ‘खंड संघात्य’ अशी नावे होती.

काश्मीर हे भारतातील शालींचे प्रमुख निर्मितिकेंद्र होते व काश्मीरी शालींना युरोपीय बाजारपेठेत अठराव्या-एकोणिसाव्या शतकांत प्रचंड मागणी होती. विशेषतः इंग्लंडमध्ये ह्या शाली मोठ्या प्रमाणावर आयात केल्या जात. शालीच्या विणकामाची कला झैन-उल्‌-अबिदिन (१४२०-७०) याने तुर्की कारागिरांना बोलावून काश्मीरमध्ये विकसित केली, असे स्थानिक परंपरेनुसार मानले जाते. डोंगराळ प्रदेशातील रानमेंढ्यांच्या उच्च प्रतीच्या ‘अलसी तुस’ नामक लोकरीपासून विणलेल्या शाली फार किमती असत. ही लोकर सुरुवातीला तिबेटमधून, तर पुढे एकोणिसाव्या शतकात भटक्या, किरगीझ जमातींकडून आयात केली जात असे. हिमालय पर्वतातील रानमेंढ्या, मार्खोर (आयबेक्स) इत्यादींची लोकर उत्कृष्ट प्रतीची मानली जाई. थंडीपासून शरीराचे रक्षण करण्यासाठी ह्या लोकरी शालींचा उपयोग होत असे. तसेच शोभादायक प्रावरण म्हणूनही त्यांना वेशभूषेत खास स्थान होते. मोगल काळात उच्च प्रतीच्या लोकरीपासून विणलेल्या शाली इतक्या तलम, अलवार असत, की त्या अंगठीमधूनही आरपार जाऊ शकत, असे म्हटले जाते. शालीच्या विणकामाची पद्धत ⇨ चित्रजवनिकेच्या विणकामपद्धतीशी मिळतीजुळती होती. केवळ आडव्या धाग्यापासून (वानक) निरनिराळे आकृतिबंध विणले जात. हे विणकाम अत्यंत क्लिष्ट व किचकट असून, त्यासाठी उच्च प्रतीचे कौशल्य लागत असे. विणकामात सुताची प्रतवारी व कताई करणाऱ्या स्त्रियांपासून ते ज्येष्ठ कुशल विणकरापर्यंत अनेक कारागिरांचा सहभाग असे. ‘नकाश’ म्हणजे आकृतिबंधकाराला सर्वांत अधिक मोबदला दिला जाई. एक शाल एका मागावर विणून पूर्ण करण्यासाठी साधारण दीड वर्षांचा कालावधी लागे. ‘जामावार’ हा शालीचा प्रकार सर्वांत क्लिष्ट व गुंतागुंतीचा होता. एका शालीच्या रचनाबंधाचे वेगवेगळे भाग करून ते वेगवेगळ्या मागांवर विणण्याची व नंतर ते तुकडे सुईच्या विणकामाने एकत्र सांधण्याची पद्धत, एकोणिसाव्या शतकापासून रूढ झाली. एकोणिसाव्या शतकातच शालीचा ‘अमली’ नामक एक वेगळा प्रकार निर्माण झाला. साध्या विणलेल्या पृष्ठावर, हाताने भरतकाम करून वेगवेगळे आकृतिबंध उमटवले जात. मागावर आकृतिबंध विणून तयार केलेल्या  शालींना ‘तिलिकार’ ही संज्ञा होती.  सुरुवातीच्या काश्मीरी शालींमध्ये फक्त काठ  (सु. ३० सेंमी. रुंद) सुशोभित केले जात. पान-फुलांचे आकृतिबंध (बूटा) सजावटीत मुख्यत्वे वापरले जात. पुढे इराणी सुलेखनातील वेलबुट्ट्या व सतराव्या शतकातील मोगल निसर्गशैली यांच्या मिलाफातून अनेक आकृतिबंध शालींवर दिसू लागले. अठराव्या शतकाच्या उत्तरार्धात सांकेतिक शंक्वाकार रचनाबंध सर्वत्र वापरात आले आणि एकोणिसाव्या शतकात शुद्ध आकारिकतेच्या निदर्शक अशा गुंडाळीवजा आकृत्यांनी व्यापलेल्या समग्र रचनाबंधाने त्यांची जागा घेतली. शालींवरील कैरी आकृतिबंध सर्वांत लोकप्रिय ठरला व कैरीबंधाच्या अनेक रूपांतरित आवृत्त्या निर्माण झाल्या. कोनीय भौमितिक आकृतिबंधाचे अगणित प्रकार, तसेच आडव्या-उभ्या रेषा व पट्टे स्वस्तिकासारखी चिन्हे यांचेही आकृतिबंध शालींवर दिसू लागले. ह्या शालींमध्ये रंगसंगतीचे व विविध प्रकारच्या रंगजुळणींचे अक्षरशः अगणित प्रकार निर्माण झाले. हिमाचल प्रदेशातील मंडी, कुलू, चंबा ही अशा प्रकारच्या शालींची प्रमुख उत्पादनकेंद्रे होती. पंजाबमध्येही शालींचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर होत होते पण उच्च प्रतीची लोकर उपलब्ध नसल्याने त्यांचा दर्जा सामान्य राहिला. पश्मीना शालींच्या विणकामाचा उद्योग श्रीनगर व बसोली येथे विशेष स्वरूपात केंद्रित झालेला आहे. काश्मीरच्या लडाख प्रदेशातील पश्मीना लोकरीचे उत्पादन वाढविण्याच्या दृष्टीने प्रयत्न केले जात आहेत. यासाठी मेंढ्यांच्या संकरित जाती तयार करण्याचा प्रयत्न केला जातो.

युरोपमध्ये पौर्वात्य शालींचे आगमन १७९८ च्या सुमारास झाले. भारतातील काश्मीरी शाली सर्वाधिक लोकप्रिय ठरल्या. पाश्चात्य वस्त्रप्रावरणांच्या दुनियेत एकोणिसाव्या शतकाचा काळ (विशेषतः १८७० च्या दशकापर्यंत) शाल –कालखंड म्हणून ओळखला जाई. त्या काळात युरोप–अमेरिकेतील स्त्रिया आपल्या सर्व प्रकारच्या वेशभूषेत शालीचा आवर्जून वापर करीत असत. एकोणिसाव्या शतकारंभी फॅशनेबल स्त्रियांच्या कपडेपटात शाल ही आत्यंतिक गरजेची वस्तू बनली होती. कारण पोषाख सामान्यतः पातळ, झिरझिरीत व खोल गळ्याचे असत व त्यांवरून मोहक नजाकतीने शाल गुंडाळून घेणे, हे प्रतिष्ठितपणाचे लक्षण मानले जाई. शालींची ही वाढती मागणी पूर्ण करण्यासाठी स्कॉटलंडमधील पेझ्‌ली येथे यंत्रोत्पादनाने शालींची मोठ्या प्रमाणात निर्मिती करण्यात आली. ह्या पेझ्‌ली शालींमध्ये बव्हंशी काश्मीरी शालींच्या आकृतिबंधांचे अनुकरण असे. मात्र त्यांचा तांत्रिक दर्जा खूपच प्रगत होता. आयताकार शालींबरोबरच चौकोनी, त्रिकोणी आकारांच्या शालीही प्रचारात आल्या. ‘चांद-दर’ हा चौकोनी शालीचा प्रकार लोकप्रिय होता.  मध्यभागी एक मोठे पदक व चारी कोपऱ्यांत पदकाचे चतुर्थांश, हा आकृतिबंध त्यांवर सामान्यतः विणलेला असे. नॉर्विजमध्ये (इंग्लंड) १८०३ पासून काश्मीरी शालींच्या आकृतिबंधांचे अनुकरण करून वयांच्या मागांवर शाली विणल्या जात, या शालींना ‘फिल्‌ओव्हर्स’ म्हणत. एकोणिसाव्या शतकानंतर पाश्चात्त्य  समाजातील शालींची टूम हळूहळू मागे पडत गेली आणि गळपट्टे, मफलर, सैलसर झगे, कोट अशा वस्त्राप्रावरणांनी शालींची जागा घेतली .

पहा : भरतकाम लोकर वस्त्रे विणकाम.                                                                         

इनामदार, श्री. दे.


   शालींचे काही नमुने
 

चित्रजवनिका विणकाम पद्धतीची लोकरी 'कणी' शाल, जम्मू व काश्मीर.

 सिकंदरनामा शाल : पश्मीना शालींचा एक नमुना  
 लोकरी शाल, मिझोराम  मोंपा जमातीने विणलेली सुती शाल, अरुणाचल प्रदेश.  
 

मणिपुरी सुती शाल

 कुलू शाल, हिमाचल प्रदेश