सोनार कलाकाम : सोने किंवा मौल्यवान धातूंपासून (उदा., चांदी) दागिने, भांडी, सजावटीचे सामान, उत्सव व समारंभा-साठी लागणाऱ्या वस्तू, वास्तुशिल्पात लागणारी सजावट, मूर्ती वगैरे तयार करणाऱ्या कारागिरीस सोनारकाम असे म्हणतात. सोन्याच्या विलक्षण गुणधर्मामुळे व त्याच्या अंगभूत सौंदर्यामुळे त्याला जगातील सर्व संस्कृतींमध्ये असाधारण महत्त्व प्राप्त झाले आहे. देवदेवतांच्या मूर्तिमखरापासून राजांच्या-स्त्रियांच्या अलंकार-सिंहासनापर्यंत सोन्याचा वापर झालेला असून त्यात सुवर्णकाराच्या कलाविष्काराचे गुणविशेष प्रकट होतात.

या कलावस्तूंचे मुख्यत्वे चार प्रकारांत वर्गीकरण करण्यात येते : (१) स्त्री-पुरुषांनी वापरावयाचे व्यक्तिगत अलंकार-दागिने. यात अभिजात कालापासून ते आजपर्यंतच्या अलंकारांचा [जड सुवर्णयुक्त पिळीच्या (टॉर्क) अलंकारापासून अंगठीपर्यंतच्या सर्व जडजवाहिरांचा] अंतर्भाव होतो. (२) समारंभासाठी वापरात असणारी विविध साधने (फ्लॅट वेअर). जसे ताट, वाटी, वाडगा, चमचे, केटली, भांडी इत्यादी. (३) नाणी, पदके, तबके इत्यादी. (४) मुखवटे, शिरोभूषणे, ढाली, कट्यारी, शस्त्रास्त्रे वगैरे.

सामान्य प्रक्रिया आणि तंत्रे : आज सोनारकामात वापरल्या जाणाऱ्या बहुतेक प्रक्रिया प्राचीन काळापासून वापरात असलेल्या आहेत. उदा., हातोड्याने केलेले काम (घडाई), उठावरेखन, चेसिंग, जडावाचे काम, वेष्टन, तारनिर्मिती, तसेच लुकण (एनॅमल), निएल्लो आणि रत्ने यांनी युक्त वस्तू तयार करणे.

हातोडीकाम व ओतकाम : सर्व तऱ्हेचे सजावटीचे सोनारकाम मूलतः हातोडीने केले जाते. वस्तूतील विविध भाग स्वतंत्र रीत्या तयार करून नंतर ते एकत्रितपणे जोडले जातात. जेव्हा डाखकामाचा शोध लागला नव्हता तेव्हा खिळमाने (रिबिट मारून) ठोकली जात अथवा घट्ट गाभ्यात ठोकली जात.

साधारणतः इ. स. पू. पंचविसाव्या शतकानंतर धातूचे हातोडीकाम आणि ओतकाम याच्या प्रमाण पद्धती समांतरपणे विकसित झाल्या. मेणाद्वारे ओतकाम करण्याची पद्धत ईजिप्तमध्ये इ. स. पू. पंचविसाव्या शतकापासून प्रचलित होती ईजिप्तमधील कारागिरांनी ही कला बहुधा सुमेरियन कारागिरांकडून शिकली असावी. ओतकामाची पद्धती अस्तित्वात आल्यानंतर प्राचीन खिळे वा रिबिट ठोकण्याची किचकट पद्धती कमी प्रमाणात वापरण्यात येऊ लागली, मात्र मौल्यवान धातूंसाठी हातोडीकामच वापरात राहिले आहे. प्राचीन ॲसिरियन, इट्रुस्कन आणि ग्रीक सोनारांनी जे अद्वितीय काम केले आहे, ते हातोडी आणि मुद्राकारक यांचा वापर करूनच केलेले आहे. [ ⟶ ओतकाम].

उठावरेखन : उठावरेखन म्हणजे धातूच्या पत्र्यांच्या विरुद्ध बाजूवर रेखांकित सजावटीला उठावदारपणा आणणे. धातूच्या पृष्ठभागावर सर्वप्रथम सजावटीच्या आकाराचे रेखांकन केले जाते व अन्वेषकाद्वारे बाह्यरेषा निश्चित केली जाते. ज्यामुळे रेखाटनाची आवश्यक सजावट पाठीमागच्या पृष्ठभागावर दिसू लागते. वरचा पृष्ठभाग खाली करून अस्फाल्टाच्या (एक घट्ट व काळे द्रव्य आशुपाल) चौकटीत वर आलेला भाग अस्फाल्टाच्या भागात हातोडीने ठोकला जातो. ही हातोडीने ठोकण्याची आणि आकार रुतविण्याची प्रक्रिया अनेकदा केली जाते. त्यानंतर सर्वात शेवटी साच्यानुसार सोन्याच्या पत्र्यांला अंतिम स्वरूप प्राप्त होते.

आ.१. (१-१४) सोनारकामातील हातोड्यांचे विविध प्रकार, (१५) ठोकळा छाप, (१६) फांसे छाप

अनुरेखन करण्यासाठी, नक्षीदट्ट्या (उठावरेखनासाठी) आणि साचा तयार करण्यासाठी महत्त्वपूर्ण साधनांची आवश्यकता असते. त्याचप्रमाणे काही विशेष साधनांचीही गरज असते उदा., लवचिक दांडा. याचा वापर किचकट जागेवर जेथे सहज पोहोचणे शक्य नसते अशा ठिकाणी केला जातो. यांत्रिक पद्धतीने देखील नक्षीकामे, सजावटींच्या वस्तू बनविता येणे शक्य असते. वेगवेगळ्या साच्यात, चौकटीत किंवा मुद्रा ठशात पातळ व लवचिक पत्रा वापरून उठावरेखन करता येते. या सर्व पद्धती ग्रीक-रोमन काळापासून वापरात आहेत.

 चेसिंग : पत्र्यांच्या पृष्ठभागावर ठोके व मुद्राकारक मारून चेसिंग करण्यात येते. हे मुद्राकारक किंवा छापटंक एवढे आकारबद्ध असतात की त्यांद्वारे कुठलाही परिणाम साध्य करता येऊ शकतो. उत्कीर्ण मुद्रण (धातूच्या खालच्या पृष्ठावर छेदणे) किंवा धातुकामाच्या उठावाच्या आवश्यकतेनुसार पृष्ठभागावर नक्षीकामाचे अनुरेखन केले जाते आणि लगत भागाला ठोकून उठाव आणून पार्श्वभूमी तयार केली जाते. असे चेसिंग झालेले उठावकाम कधीकधी उठावरेखनसदृश भासते. मात्र नंतरच्या प्रक्रियेत नक्षीकाम मागील बाजूने अधिक उठावदार करण्यात येते. चेसिंग झाल्यानंतर उठावरेखनाच्या कामात परिपूर्णता येते. चेसिंग ही संज्ञा हाताने छापटंक वापरून साचा कामावर अंतिम हात फिरवून काम पूर्ण करण्याच्या प्रक्रियेलाही वापरतात.

उत्कीर्णन : कठीण हत्यारांच्या तीक्ष्ण टोकाने सोने, चांदी इ. धातूंच्या पृष्ठांवर रेषांची आकृती खोदून काढणे म्हणजे उत्कीर्णन होय. हे नेहमीच कापण्याच्या हत्यारांनी हस्तदाबाद्वारे केले जाते. जेव्हा ही प्रक्रिया हातोडीने दाब देऊन केली जाते, तेव्हा तिला तक्षण म्हणतात. नाणी पाडण्याच्या मुद्रा बनविणे, सोन्या-चांदीच्या पत्र्यांवर धार्मिक प्रसंगांची चित्रे वा अन्य आकृत्या कोरणे, जडावाच्या दागिन्यावर नक्षीकाम करणे इत्यादींसाठी उत्कीर्णन तंत्राचा वापर करतात. सोने, चांदी व इतर मौल्यवान धातूंची नाणी पाडण्याच्या प्रक्रिया उत्कीर्णित मुद्रा यांत्रिक पद्धतीने करतात, परंतु उत्तमोत्तम चित्रांचे कलात्मक उत्कीर्णन साधण्यासाठी कारागीर हातानेच काम करतो.[ ⟶ उत्कीर्णन].


जडावाचे काम : या अलंकार निर्मिती प्रक्रियेला दमास्कनीय म्हणतात. दमास्कस या देशातील सोनार या प्रकाराचे काम करीत असत, त्यामुळे यास हे नाव पडले आहे. सोन्याची (कधीकधी चांदी किंवा तांब्याची) तार लोखंड, पोलाद किंवा जस्ताच्या पृष्ठभागावर जडविण्याची (डकविण्याची) ही कला आहे. ज्या पृष्ठभागावर नक्षी अनुरेखित करावयाची असते, तो शेवटी अणकुचीदार हत्याराने अधःकृत्त करतात. सोन्याची तार अथवा धागा अधःकृत्त केलेल्या पृष्ठभागावर लहानशा खोबणीत सुरक्षित रीत्या हातोडीने ठोकतात.

निएल्लो प्रक्रियेत निएल्लोच्या (सिल्व्हर सल्फाइड किंवा सल्फाइडांचे मिश्रण) मदतीने कोरीव अलंकरण नक्षीकामाचे जडावकाम केले जाते. निएल्लो निर्मितीची प्रक्रिया व तिचे चांदीवर उपयोजन यासंबंधी सर्वप्रथम बाराव्या शतकात एराक्लिअस आणि थिओफिलस यांनी तसेच सोळाव्या शतकात बेनव्हेन्युटो चेल्लीनी यांनी लिहिले. या सर्व लेखकांनुसार चांदी, तांबे आणि शिसे यांचे मिश्रण सायुज्यित करून आणि नंतर ती मिश्रधातू गंधकासोबत एकत्रित करून निएल्लो तयार करतात. चांदी, तांबे आणि शिसे यांच्या सल्फाइडांचे मिश्रण काळ्या रंगाच्या भुकटी (पावडर) स्वरूपात असते. ते धातूवर कोरीवकाम झाल्यानंतर साधारणपणे चांदी चिकटविण्यासाठी मदत करणाऱ्या अभिवाहकासोबत ओलाव्यासाठी वापरतात. धातूवर थोडी भुकटी पसरवून कडकपणे ती गरम केली जाते. निएल्लो वितळून कोरीवकाम केलेल्या मार्गातून वाहते. जोपर्यंत जडावाचे कोरीवकाम उठून दिसत नाही, तोपर्यंत जादा झालेले निएल्लो खरवडून काढून टाकले जाते आणि शेवटी पृष्ठभाग घासून स्वच्छ केला जातो. पाश्चिमात्य देशांत निएल्लो प्रक्रिया वापरलेली आढळते.

मीनाकारी : (एनॅमलिंग). सोने व चांदी यांसारख्या धातु-वस्तूंच्या पृष्ठभागावर विविध रंगांचा वापर करून हिरे-माणके वापरल्याचा आभास निर्माण केला जातो. धातुपृष्ठावर लुकण भरण्याचे दोन प्रकार आहेत : (१) शालव्हे (ओतीव) : यामध्ये धातुपृष्ठावर कोरलेल्या नक्षीदार खाचांमध्ये लुकण भरतात. भारतात मुख्यत्वे या प्रकारचाच अवलंब करण्यात येतो. (२) क्लाँसोने (घडीव) : धातूच्या पृष्ठभागावर पट्ट्या चिकटवून कोश बनवून ते कोश लुकणाने भरतात. [ ⟶ मीनाकारी].

सोन्याचे वर्खकाम व मुलामे : (गिल्डिंग). लाकूड, धातू, गिलावा (प्लास्टर) किंवा कुठलीही वस्तू सोन्याच्या वर्खाने अथवा भुकटीने सजविणे म्हणजे वर्खकाम होय. ही संज्ञा चांदी, पॅलॅडियम, ॲल्युमिनियम आणि तांब्याच्या मिश्रधातूंवर केलेल्या कामासाठी देखील वापरली जाते. सोने आणि चांदी यांचे मुलामे शोभेकरिता, मालिन्यप्रतिकाराकरिता वा परावर्तनांक वाढविण्याकरिता वापरतात. याकरिता निमज्जन (स्थानांतर विलेपन) या पद्धतीचा वापर करतात. [ ⟶ धातूंचे मुलामे].

प्राचीन सोनारकाम करणारे कारागीर वर्खकाम करण्यात अत्यंत निष्णात होते. प्राचीन ईजिप्तमधील शाही घराण्याच्या ममींच्या ताबूतांवर आणि लाकडीकामावर सोन्याचा मुलामा देऊन केलेली कामे तसेच प्राचीन चिनी सोन्यामधील लाकूड, मृत्पात्रे आणि वस्त्रांवरील सुंदर नक्षीकाम हे पुरावे आहेत [ ⟶ तूतांखामेन]. ग्रीकांनी वर्खकामात विशेष कौशल्य प्राप्त केले होते. त्यांनी लाकूड, पाषाण व संगमरवरी शिल्पांवर वर्खकाम केलेले आहे, तसेच धातूंवर सोन्याचा पारदमेल (अमालगम) आगीत तापवून त्यावरून पारा उष्णतेने सारून (फासून) धातूच्या पृष्ठभागावर सोन्याचे आवरण देण्याची कला त्यांना साध्य होती. रोमनांनी वर्खकामाची कला ग्रीकांकडून घेतली आणि आपली मंदिरे व प्रासाद अत्युत्कृष्ट वर्खकामाने सजविली. भारतात देखील अनेक मंदिरांवर सोन्याचे वर्खकाम प्रामुख्याने दिसून येते. अमृतसर येथील सुवर्ण मंदिर, तिरुपती येथील बालाजीचे मंदिर ही प्रसिद्ध उदाहरणे होत. मुंबईचे सिद्धिविनायक तसेच शिर्डीचे साईबाबा मंदिरांवर सोन्याचे कोरीवकाम केलेले वर्खकाम आढळते.

सोन्याचा पत्रा हाताने (कधीकधी यंत्राद्वारे) ठोकून अतिशय पातळ (०·००००१ सेंमी.) केला जातो. नंतर तो चौकोनी आकारात (९·८४ सेंमी. या प्रमाणभूत मापात) बनवून टिपकागदात गुंडाळून वर्खकाम करणाऱ्या कारागिरांना वापरासाठी दिला जातो.

आपले काम अधिक सुंदर व परिपूर्ण होण्याच्या दृष्टीने वर्खकाम करणारे विविध पदार्थ वापरतात. तसेच स्वतःच्या वेगवेगळ्या सुधारित पद्धतीही वापरल्या जातात. तरी देखील काही पद्धती सर्व प्रकारच्या वर्खकामासाठी समर्पक असतात. उदा., ज्या पृष्ठभागावर वर्खकाम करावयाचे आहे, तो भाग प्रायमिंगद्वारा (घासून सपाट, गुळगुळीत व एकत्रित करणे) काळजीपूर्वक तयार करून घेतात. रंग, चिकटविणारे पदार्थ व लाख (रोगण) पृष्ठभागाच्या स्वरूपानुसार वापरले जातात. ज्या धातूंची झीज होते असे धातू लाल शिसे किंवा आयर्न ऑक्साईड रंगांनी रंगवून प्राईम व संरक्षित केले जातात. पृष्ठभाग पूर्णपणे तयार आणि कोरडा झाल्यावर वर्खकाम करणारा कारागीर शिसपेन्सिल किंवा खडूने नक्षी आखतो.

वर्खकाम करावयाचा पृष्ठभाग विशिष्ट आकारात सोन्याचे वर्ख सुरक्षितपणे चिकटविण्यायोग्य बनवितात. पृष्ठभागानुरूप आकाराचे प्रमाण ठरविले जाते, तसेच सुकण्याच्या दृष्टीने (जलद किंवा हळू) विचार केला जातो. जेव्हा नक्षीचा आकार पुरेसा सुकतो (म्हणजे फक्त बोटाचे टोक थोडेसे चिकटते), तेव्हा सोन्याचा वर्ख किंवा भुकटी सुरक्षितपणे चिकटण्यायोग्य होते.

टिपकागदातून थेट इच्छित आकारावर सोन्याचा वर्ख लावता येऊ शकतो. वर्खकाम करणारा कारागीर साधारणपणे टिपकागदात गुंडाळलेला सोनेरी वर्ख आवश्यक तेवढा एखाद्या टोकदार हत्याराने (तासलेली अडकणी) काढून घेतो. नंतर तो भाग वर्खकाम टोचणीवर (उंटाच्या केसांचा पुठ्ठ्यांत बसविलेला कुंचा) घेतो आणि हळूवार नक्षीच्या भागावर लावतो. टोचणीवर सोन्याचा वर्ख स्थिर विद्युत् भारामुळे टिकून राहतो, हा भार कारागीर ब्रश आपल्या केसांत फिरवून निर्माण करतो. काही वर्ख कामांसाठी कारागीर सोन्याचा वर्ख पकडण्यासाठी उशीचा वापर करतात. ही लाकडाची उशी आयताकृती (साधारण २३ x १५ सेंमी.ची) बनविलेली असते. त्यावर लोकरीच्या मऊ कापडाची घडी गायीच्या चामड्याने आच्छादलेली असते. एका बाजूला चर्मपत्राची फळी बनविलेली असते, ज्यामुळे सोन्याचा नाजूक वर्ख वाऱ्याने उडून जात नाही. वर्खकाम पूर्ण झाल्यानंतर वर्खाने झाकलेला पृष्ठभाग उत्तम दर्जाच्या कापसाच्या थापीने थापतात. कापसाने घासल्यामुळे सोन्याची चमक अधिक वाढते. वर्खकाम करणारा कारागीर चमक आणण्यासाठी अकीकाचा खडा वापरतात. त्यामुळे धातूवर अत्युत्तम चमक निर्माण होते. अंतिम झालेल्या कामातील वर्खाचे ढिले किंवा असमतल कण उंटाच्या केसांनी बनविलेला कुंचा वापरून काढून टाकले जातात.

सोनेरी वर्खावर नंतर चाळणी वापरून भुकटी पसरविली जाते. सोन्याची भुकटी खूप महाग असल्याने जगभर सर्वत्र मौल्यवान धातूंऐवजी काशाची (ब्राँझ) भुकटी वापरली जाते. जेव्हा सोन्याचा वर्ख इमारतींच्या घुमट वा छतांवर वर्खकाम करण्यासाठी वापरला जातो, तेव्हा तो पट्टीच्या (रिबिन) स्वरूपात वापरतात.[ ⟶ वास्तुकला].

आ. २. (१) मोठी ज्वाला असलेला स्टोव्ह (२) भट्टी: (३-९) सोन्याला आकार देण्यासाठी वापरण्यात येणारी विविध साधनेच (१०) फुंकनळीच (११) भाता.

सोनारकामासाठी लागणारी हत्यारे : अगदी प्राचीन काळापासून ते आजच्या आधुनिक काळापर्यंत कालमानानुसार सोनारकामासाठी लागणाऱ्या हत्यारांमध्ये गरजेनुरूप उत्क्रांती होत गेली आहे. हस्त साधनां-पासून ते यंत्रसामग्रीपर्यंत तसेच प्रदेशपरत्वे हे बदल झाले आहेत. तरी दागिने घडविण्यासाठी आवश्यक असलेली मूलभूत हत्यारे फारच कमी प्रमाणात बदलली आहेत. खाली काही प्रमुख हत्यारांची थोडक्यात माहिती दिली आहे.

(१) हस्तसाधने : ही साधने पोलादी वा लोखंडी असतात. यांद्वारे कापणे, वाकविणे, आकार देणे, धातू ठोकून पातळ करणे आदी कामे केली जातात.

 

(२) कानस : वस्तू व दागिने घासण्यासाठी विविध आकारांच्या कानशी वापरतात. कानशींचे सपाट, मऊ, रू, अर्धगोलाकार, गोलाकार, त्रिकोणी, चौकोनी इ. प्रकार असतात. [ ⟶ कानसकाम].

 

(३) सवाणे : कातरकाम करण्यासाठी कातर, करवत, छिन्नी आदी हत्यारे वापरली जातात. तसेच कातरण्या, मुख्य कातर, स्प्रींग कातर, पत्रा कापी, रूळ कापी, बारीक कामांसाठी कडी कापी इ. वापरतात.

 

(४) छिद्र (ड्रिल) यंत्र : छिद्र पाडण्यासाठी हस्तछिद्रयंत्र, विजेवर चालणारे यंत्र आदी वापरतात.

याखेरीज वस्तूंची पकड घट्ट ठेवण्यासाठी सांडशी तसेच लहान-मोठ्या विविध आकाराच्या गरजेनुसार पकडी व लाकडी धारक वापरतात. आकार देण्यासाठी लाकडी वा लोखंडी हातोडा, ऐरण इ. वापरतात. झळाळी देण्यासाठी कोरण्या वापरतात. सोने तापविण्यासाठी भट्टी, वायुनलिका, वायुतापक वापरतात. दागिने, वस्तूंच्या मोजमापासाठी इंचपट्टी, गुण्या, खुणा करण्यासाठीचे साधन, जाडी मोजण्यासाठी मापक आदींचा वापर केला जातो.


  इतिहास :पूर्व-मायसीनिअन : सोने, चांदी आणि त्यांच्या नैसर्गिक किंवा कृत्रिम मिश्रणाचा (इलेक्ट्रम किंवा पांढरे सोने) वापर प्राचीन ग्रीस व इटलीमध्ये दागिने, भांडी, तीर आणि शस्त्रे, नाणी, सजावट आदी कामांसाठी केला जात असे.

इजीअन भूप्रदेश (क्रीट बेटे, सायक्लॅडस् आणि इतर बेटे, ग्रीसची मुख्य भूमी, पेलोपीनीज, मध्य ग्रीस, थेसाली, मॅसिडोनिया, थ्रेस आणि ॲनातोलियाचा समुद्रकिनारा) मौल्यवान धातूंनी समृद्ध होता. ट्रॉय येथील खणनात सापडलेला खजिना इ. स. पू. २००० सालाच्या आधीचा आहे. त्यातील सर्वांत मोठ्या भागाला ‘प्रायमचा खजिना’ म्हणतात, तो त्या काळातील दागिन्यांचा व थाळ्यांचा प्रातिनिधिक संग्रह आहे. त्यामध्ये चांदीच्या मोठ्या कपात स्तनांवर पांघरले जाणारे सोन्याचे दागिने, ६ हातकंगण, ६० कर्णफुले किंवा केसात माळल्या जाणाऱ्या अंगठ्या आणि जवळपास ९,००० मणी आहेत. ⇨ लूव्ह्‌र वस्तुसंग्रहालयातील सुरईसारखे पात्र पूर्व-मायसीनिअन ग्रीकमधील प्रारूपिक सोनारकामाचा नमुना आहे.

मिनोअन आणि मायसीनिअन : सोन्याच्या दागिन्यांचे संमिश्रण ओखलॉस येथील सुरुवातीच्या मिनोअन दफनविधी केलेल्या जागेत आणि तीन चांदीची पाते असलेल्या कट्यारी कुमासा येथील थडग्यात सापडल्या आहेत. या काळातील चांदीच्या मुद्रा व आभूषणे असामान्य नाहीत. गुरनीआ येथील चांदीचा सुबक चषक मध्य मिनोअन काळातील (इ. स. पू. २००० वर्ष) आहे. मायसीनी येथील पात्रे चांदी, सोने आणि काशात बनविलेली आढळतात, मात्र पिण्याचे चषक, लहान वाडगे आणि पेट्या साधारणपणे फक्त सोन्याचीच आणि सुरया चांदीच्या बनविलेल्या असत. थडग्यामधील सामान (फर्निचर) सोन्याचेच बनविलेले असे. विशेषतः मृताच्या चेहऱ्यावरील मुखवटा सोन्याचा बनविलेला असे. अनेक थडग्यांत खूप मोठ्या प्रमाणात (एकात जवळपास ७००) सोन्याच्या लहान थाळ्या, लाकडी शवपेटिकेवर ठोकलेल्या आढळल्या. त्यांची भौमितिक रचना थक्क करणारी आहे. वर्तुळाकार, नागमोडी, ताऱ्यांच्या आणि गुच्छांच्या आकाराची तसेच पाने, फुलपाखरे आणि अष्टपाद यांसारख्या नैसर्गिक आकारातही त्यांची रचना केलेली आढळते. कफनाचे नमुने तसेच इतर आभूषणे देखील सोन्याने बनविलेली असत. या काळात बनविलेले अनेक अप्रतिम सोनारकामाचे नमुने सापडले आहेत. काळ्या स्टीअटाईटावर कोरलेली चांदीची थाळी, नॉसस येथील बैलाच्या शिराच्या आकाराचे पात्र, त्यावरील सोन्याची शिंगे, सोन्याचे आवरण असलेली मुस्की (प्राण्यांना खाता वा चावता येऊ नये म्हणून तोंडावर बांधलेले आवरण),टाळूवरील सोन्याने बनविलेले गुच्छ, कान आणि डोळे हे सर्व त्याकाळची सोनारकामातील कलाकुसर किती प्रगत होती ते दर्शवितात.

आ.३ (१) शेगडा सरकपट्टी (२-५) शेगडा घट्ट धरणाऱ्या पकडी (६) व्यासमापक (७) लोखंडी पट्टी स्क्रू (८) कात्री (९-११) पकडीचे विविध प्रकार.

मायसीनी येथील चषक मुख्य दोन प्रकारचे आहेत : ट्रॉय येथील चांदीची भांडी आणि पात्रे व मिनोअन परंपरेतील मीनाकाम केलेली कोनीय पात्रे. स्पार्टा येथील व्हाफियो थडग्यात सापडलेले दोन सोन्याचे चषक कारागिरीचे उत्कृष्ट नमुने आहेत. त्यांच्यावर सपाट सोन्याच्या रेषा आहेत, ज्या काठावरील उठावरेखन केलेल्या बाजूंवर झाकल्या जातात.

क्रीटन आणि मुख्यभूमीतील थडग्यांतून अनेक सोन्याने मढविलेली हत्यारे मिळाली आहेत. काही हत्यारात पाते व मूठ ठोकलेल्या खिळ्यांवर सोन्याची टोपी आढळते. मात्र बहुतांशी हत्यारांच्या संपूर्ण मुठी सोन्याच्या बनविलेल्या आढळतात. मायसीनी येथील एका मुठीवरील पाकळ्यांवर लॅपीस लॅझ्युलीचा (नीलाश्माचा) वापर असलेली सोन्याची फुले मढविलेली असून त्यात स्फटिके भरलेली आहेत, तर मुठीचा संरक्षक भाग ड्रॅगनच्या आकारात बनविला आहे. मायसीनीमधील पाते काशाचे बनविलेले असून त्यावर सोने, इलेक्ट्रम, चांदी आणि निएल्लो आदी धातूंचे जडावकाम केलेले आहे. हे काम देखील तांब्याच्या साच्यांमध्ये बनविलेले आहे. हॅटशेपसूट राणीच्या थडग्यात या प्रकारचा खंजीर सापडला आहे. ती मायसीनिअन काळाची समकालीन (सोळावे शतक) होती. थिरा येथील कट्यारीवर मेंढ्यांच्या डोक्यांसारखे तर अर्गोस येथील कट्यारीवर डॉल्फिनासारखे जडावकाम केलेले आहे. व्हाफियो येथे पात्याच्या एका तुकड्यावर उडत्या माशांमध्ये एक माणूस पोहताना दाखविला आहे. हे सगळे मिनोअन कारागिरीचे सर्वोत्कृष्ट नमुने आहेत. मायसीनिअन काळाच्या ऱ्हासाला सुरुवात झाल्यानंतर कुठलीही नवीन शैली वा निर्मिती झाली नाही. नंतरच्या सोनारकाम करणाऱ्यांनी पारंपरिक शैलीनुसारच आभूषणांची जडणघडण केली.

इराण : ॲकिमेनीडी काळापासून (इ. स. पू. ६५९-३३१) पर्शियामध्ये कुशल सोनारकाम करणारे कारागीर होते. त्यांना चेसिंग, उठावरेखन, ओतकाम, मौल्यवान खड्यांचे जडावकाम आदी तंत्रे अवगत होती. इ. स. पू. पाचव्या शतकापासून सोने व चांदीचे लहान पुतळे त्यांना ज्ञात झाले, तर याच काळात सोने व चांदीच्या भांड्यांचे आकार वाडगे, कोनीय चषक, मृत्पात्रे आणि ऱ्हायटा (प्राण्यांच्या शिराच्या आकाराचे पिण्याचे चषक) यांसारखे झाले. ब्रिटिश वस्तुसंग्रहालयातील ऑक्झस खजिना व लूव्ह्र् (पॅरिस) येथील स्यूसा खजिना यांसारख्या कामाची उत्तम उदाहरणे आहेत. पार्थियन काळापासून (इ. स. पू. २४९ -इ. स. २२६) सोनारकामावर मोठ्या प्रमाणावर ग्रीकांश (हेलेनिस्टीक) शैलीचा प्रभाव पडला. इराणी सोनारकामातील कलाकुसरीचा सर्वोच्च बिंदू सासानीद काळात (२२४-६५१) गाठला गेला. त्या काळात कारागिरांनी आकार, सजावट आणि तंत्रात खूप मोठ्या प्रमाणावर वैविध्य प्राप्त केले होते. यानंतरच्या काळात दागिन्यांमध्ये लुकण वापरण्यास सुरुवात झाली.

ग्रीक आणि इट्रुस्कन : ब्राँझ युगातून लोह युगात प्रवेश करण्याच्या काळात इजीअन प्रदेशाचे आंतरराष्ट्रीय संबंध हिंसेमुळे मोठ्या प्रमाणावर बिघडलेले होते. तो काळ संपत्ती व कला दोन्हींसाठी योग्य नव्हता. त्यामुळे ग्रीकमध्ये या काळातील सोनारकामाचे अवशेष फार कमी प्रमाणावर आढळून येतात. त्यातही फिनिशियन कारागिरांनी बनविलेल्या भांड्यांवर उठावरेखन व कोरीवकाम आढळते.

इट्रुस्कन थडग्यांमध्ये चांदीची भांडी व सौंदर्यप्रसाधने आढळली आहेत, मात्र ती जास्त प्रमाणात काशाचीच आहेत. उदा., मेट्रपॉलिटन म्यूझीयममधील चौथ्या शतकातील उटण्याचा डबा व ठोकून बनविलेला चांदीचा छोटा रथ.

रोमन : इ. स. पू. चौथ्या शतकात चांदीच्या भांड्यांवर उठावदार सजावट करण्याची शैली सुरू झाली. या प्रकारच्या कामाचा विस्तार ग्रीकांश काळात आणि मुख्यतः अँटिऑक आणि ॲलेक्झांड्रिया येथे झाला. रोमन साम्राज्याच्या अस्तापर्यंत हीच शैली चांदीच्या वस्तूंची सजावट करण्याकरिता वापरात राहिली.

रोमन काळात चांदीच्या थाळ्या असणे सौंदर्यासक्तीची व अभिमानाची बाब होती. उठावरेखनाला सामान्यपणे तांत्रिक नावे (उदा., एंब्लेमॅटा, सिगिल्ला, क्रस्टी) वापरात होती. तत्कालीन मालक थाळ्यांचे वजन विक्रमी रीत्या वाढवीत, त्याबाबत तुलना करीत व वजने डामडौलात वाढवून सांगत असत. इ. स. पू. दुसऱ्या शतकात रोमनांनी ग्रीस व आशियातून मोठ्या प्रमाणावर सोने व चांदी लुटून आणली. दुसरा प्लिनी याच्या सांगण्यानुसार प्रजासत्ताक काळातही रोम शहरात प्रत्येकी १०० किग्रॅ.च्या १५० पेक्षा जास्त चांदीच्या थाळ्या होत्या.

रेन येथे सापडलेल्या (बिब्लिओथेक नॅशनलमध्ये ठेवलेल्या) अत्यंत दुर्मिळ अशा वाचलेल्या सोन्याच्या बाऊलच्या (वाडगा) तुकड्यावर सविस्तरपणे सजावट केलेली आहे. त्याची लांबी २५ सेंमी. असून वजन १ किग्रॅ. ३०४ ग्रॅ. इतके आहे. केंद्रभागातील पदकावर बाक्खूस आणि हरक्यूलिझ यांच्यातील मद्य पिण्याची स्पर्धा चित्रित केलेली आहे. कोरीव चित्रात आणि कड्यापर्यंत नाजूक पुष्पगुच्छांच्या चौकटीत १६ सोन्याची नाणी आहेत. ही नाणी हेड्रीयन ते कारासेल्ला प्रकारची आहेत. याच संग्रहात खूप मोठ्या थाळ्या देखील आहेत, त्यांच्या संपूर्ण पृष्ठभागावर पौराणिक किंवा ऐतिहासिक विषयांचे उठावरेखन केलेले आहे. यांतील सर्वांत मोठी सापिओची ढाल ७० सेंमी. व्यासाची असून तिचे वजन १० किग्रॅ. २९१ ग्रॅ. एवढे आहे.

सुरुवातीचा ख्रिस्ती आणि बायझंटिन काळ : सुरुवातीच्या ख्रिस्ती सोनारकामावर पेगन कामाची त्यातील नैसर्गिक सहजता, सुशोभिकरण आणि उठावरेखन व चेसिंग या पारंपरिक तंत्राची दाट छाया होती. कधी कधी त्यातील विषय देखील अभिजात होते. रोम येथे सापडलेल्या एस्क्विलीन खजिन्यातील चौथ्या शतकातील प्रोजेक्टा आणि सेकंद्स यांच्या लग्नाचा संदूक पेगन दृश्यांनी सजविलेला आहे. तो आता ब्रिटिश वस्तुसंग्रहालयात ठेवलेला आहे.

या काळाच्या उत्तरार्धातील बहुतांशी सोनारकाम पूर्व-ख्रिस्ती भागात आढळते. सिरिया, ईजिप्त, सायप्रस, आशिया मायनर आणि रशिया या देशांत बहुतकरून चर्चच्या वस्तूंच्या स्वरूपात आढळते. उदा., चषक, धूपपात्रे, मेणबत्ती मांडण्या (स्टँड), वाडगे, थाळ्या इत्यादी. या काळातही चेस करणे व उठावरेखन प्रामुख्याने केले जात होते, मात्र अमूर्त आकार व ख्रिस्ती चिन्हे यांच्या निएल्लोमधील जडावकाम वाढताना आढळून येते. या पदार्थांवर सहाव्या व सातव्या शतकांत राजचिन्हांच्या नियंत्रणमुद्रा प्रकट होऊ लागलेल्या दिसतात. कोणते शहर सोनारकामासाठी मध्यवर्ती होते हे ज्ञात नाही. मात्र पूर्वेची राजधानी कॉन्स्टँटिनोपल (इस्तंबूल) हे महत्त्वाचे शहर होते.

सुरुवातीच्या ख्रिस्ती काळातील फक्त खाजगी दागिने शाबूत राहिले आहेत मात्र सहाव्या व सातव्या शतकानंतर इतर वस्तू देखील सापडतात. नंतरच्या काळात सर्वांत महत्त्वाचे स्पेन आणि इटलीच्या राजघराण्यांतील सरदारांनी चर्चना दिलेले संकल्प मुकुट आणि क्रॉस होते. यांपैकी सर्वोत्तम टोलिडो प्रांतातील ग्वाराझार येथे सापडले आहेत. ते दागिने रत्नांनी जडविले आहेत. ते आता नॅशनल आर्किऑलॉजिकल म्यूझियम (माद्रिद) आणि म्यूसे द क्लूनी (पॅरिस) येथे पहावयास मिळतात. मोन्झा चर्च (इटली) येथील ॲजिलुल्फ राजाचा क्रॉस आणि थेओडोलिंडा राणीने बनवून घेतलेली सोन्यात कोरलेली पुस्तकांच्या आवरणाची जोडी इत्यादी. या आवरणांवर मोती, रत्ने आणि कॅमिओ (उठावाच्या नक्षीला एक रंग आणि पाठीमागे दुसरा रंग असलेला दागिना) मढविले असून सोन्याचे क्लाँसोने काम खड्यांनी जडविलेले आहे. ब्रिटनमधील जडावकामाचे क्लाँसोने दागिन्यांचे सोनारकाम अतिउच्च प्रतीला पोहोचले होते. पिशव्यांची आवरणे, तलवारी आणि सेनोटॅफ (ज्यांचा मृतदेह इतरत्र कुठे दफन असेल, अशा व्यक्तीच्या सन्मानार्थ बनविलेले स्मारक) यांमधील दागिन्यांत ते दिसून येते, तसेच सोनारकामाचे अवशेष सातव्या शतकातील पूर्वअँग्लियन राजाचे स्मारक सुटॉन हू (सुफ्फॉल्क) येथे देखील आढळतात. आता ते ब्रिटिश वस्तुसंग्रहालयात संग्रहित आहे.


 मध्ययुग : मध्ययुगातील मौल्यवान धातूंचे शाबूत राहिलेले बहुतेक काम चर्चशी निगडित आहे : जसे (१) सोन्याची वेदी उदा., मिलान येथील सेंट ॲम्ब्रॉजिओ (सन ८५०) वेदीवर येशू ख्रिस्त आणि सेंट ॲम्ब्रॉस यांच्या आयुष्यावरील प्रसंग कोरलेले आहेत. ते क्लॉईसोने एनॅमलच्या चौकटीत बंदिस्त आणि खुले काम केलेले आहेत (२) अवशेषमंजूषा आणि पुस्तक रत्नांनी जडविलेली, दृश्य आणि आकृत्यांचे उठावरेखन असलेली आवरणे उदा., सेंट एम्मेराचे कोडेक्स ऑरियसचे (सन ८७०, बायरिश स्टॅॲट्सबिब्लिओथेक, म्यूनिक) आवरण. या अवशेषांवरून कॅरोलिन्जियन कामाची अपूर्वता दिसून येते. अकराव्या शतकापर्यंत सोनारकामाच्या या शैलीचे प्रभुत्व होते.

आ. ४. (१-२) ऐरणी (३) मुद्रा बेचकी पकड (४) कांटा बसविण्यासाठी लहान शिक्का (५) गोलाकार चापरपट्टी (६) पोकळ चापरपट्टी (७) चापरपट्टी (८) चमचे कोरणी (१०-१२) गोलाकार कोन बैठक (१३) डोक्यासह चमचा कोरणी (१४-१५) मुद्राकारक

रोमनेस्क : बाराव्या शतकात चर्चने धर्मनिरपेक्ष राज्यकर्त्यांना प्रमुख कलाश्रयदाता बनविले आणि मोठमोठ्या मठांमध्ये कलाकाम करण्यात आले. या काळातील सोनारकाम करणारे कारागीर अज्ञात राहिले नाहीत. हेल्मार्हौझनचा रॉजर, यूवीचा राइनर व गॉडफ्रा दी क्लेर, व्हर्दनचा निकोलास आणि इतरांची कामे ओळखता येतात. ऱ्हाईन आणि म्यूझ या सोनारकाम केंद्रांवर त्यांनी नेतृत्व केलेली कामे ओळखता येतात. यांची सर्वोत्कृष्ट उपलब्धी म्हणजे शाल्व्हे मीनाकारीचा विकास या पद्धतीने आधीच्या क्लाँसोने तंत्राला बदलले. सोने आणि चांदी यांचा मीनाकारीत तसेच वेदींसाठीच्या चौकटींसाठी किंवा लहान धार्मिक द्विपुटचित्रे वा त्रिपुटचित्रांसाठी, चर्चच्या गाभाऱ्यातील उठावरेखन केलेल्या आकृती आणि ताम्रपटांसाठी मौल्यवान धातूंचा वापर होत होता. [ ⟶ रोमनेस्क वास्तुकला].

गॉथिक कला : सतत वाढत्या संपत्तीमुळे राजघराणे, सरदार व श्रीमंत व्यापारी यांनी पॅरिसमध्ये व मोठ्या शहरांत १२०२ मध्ये धर्माशी निगडित नसलेले सोनारकामाचे कारखाने तसेच सोनारकाम करणाऱ्यांचे संघ स्थापन करण्यात पुढाकार घेतला.

रोमनोत्तर काळात सोनारकाम, वास्तुकला, स्मारक शिल्पे आणि हस्तिदंत कला यांमध्ये जर्मनी आणि इतर लहान देशांचा पुढाकार होता. तो पुढे फ्रान्सकडे आला. वास्तुशिल्पाचे आकार नेहमीप्रमाणेच मौल्यवान धातूत तयार केले जात. उदा., एव्हर येथील सेंट तुरिन यांची चांदीची समाधी हे गॉथिक चर्च होय.

उत्तर गॉथिक काळात पंधराव्या शतकाच्या सुरुवातीला ‘गोल्डनेस रॉसेल’ (१४०३, स्टिफ्टस्कर्श, ॲल्टॉटिंग, पश्चिम जर्मनी) आणि थॉर्न अवशेषमंजूषा (ब्रिटिश वस्तुसंग्रहालय) यांसारखे प्रादेशिक खजिने निर्माण झाले. मध्यम वर्गाच्या उदयामुळे ख्रिस्ती धार्मिक विषयांव्यतिरिक्त काम असलेले सोनारकाम निर्माण होऊ लागले. इंग्लिश मेझर (चांदीचे आवरण असलेला पिण्याचा चषक) आणि मोठ्या प्रमाणात विविधता असलेल्या स्तूपिका असणारे चांदीचे चमचे ही याची उत्तम उदाहरणे आहेत. मोठ्या प्रमाणावर सर्व प्रकारच्या अवेशषमंजूषा आणि वेदी अजूनही निर्माण होत होत्या. मध्ययुगाच्या शेवटी वास्तुकलेतील शैलीचा दाट प्रभाव पडून सोनारकामात विकास होऊन विविध राष्ट्रीय प्रतीके व प्रतिमा असलेल्या वस्तू निर्माण होत होत्या. उदा., इंग्लंडमधील भौमितिक लंब प्रकार आणि फ्रान्समधील नाजूक गुलमोहरासारखे नक्षीकाम.[ ⟶ गॉथिक कला].

सोने व चांदीची शुद्धता कठोरपणे नियंत्रित केली जात असे व त्यावर शिक्का (हॉलमार्क) छापलेला असे. इंग्लंडमध्ये अशा ओळखखुणा अत्यंत काळजीपूर्वक तपासल्या जात.

इस्लाम : कुराणात सोने व चांदी या धातूंना निषिद्ध मानण्यात आल्याने त्यांचा इस्लामी देशांत वापर मर्यादित प्रमाणात झाला आहे, मात्र यामुळे सोनारकामाच्या अमूल्य कारागिरीची मोडतोड करून ते धातू वितळविले जात असत. सुरुवातीच्या काळातील इस्लामी सोनारकाम वा दागिने अत्यंत दुर्मिळ आहेत. फातिमीद आणि मोगल काळातील काही बकले व हातकंगण पहावयास मिळतात. तसेच स्पेनमधील हेरोना येथील चांदीची आभूषणे (हस्तिदंतावरील नक्षीसारखी) आणि बर्लिन येथील तेराव्या शतकातील चांदीचा सॅसॅनियन प्राण्यांचे उठावमुद्रण असलेला तुकडा आदी उदाहरणे होत.

प्रबोधन ते आधुनिक काळ : चौदा ते सोळावे शतक : रोमन पुरातनशैलीचे पुनरुज्जीवन करून पुढे नेण्यात इटलीचे सोनारकाम करणारे कारागीर यूरोपात आघाडीवर होते. मात्र सोनारकामाचे पुरावशेष उपलब्ध नसल्याने त्यांना ब्राँझ आणि संगमरवरमधील फुलदाण्या (पात्रे) यांच्या प्रतिकृतींवरून काम करावे लागले. वेगळ्या माध्यमात कलाकारांनी बनविलेल्या जुन्या अवशेषांवरून सोनारकाम करणाऱ्या कारागिरांनी मुक्तपणे आपल्या परिप्रेक्ष्यातून काम केले. आज या कामांपैकी फारच थोड्या सोनारकामाच्या वस्तू शिल्लक आहेत. त्यांतील सर्वांत प्रसिद्ध पहिल्या फ्रान्सिससाठी फ्लॉरन्टाईन बेनव्हेनुनो चेलिनी याने एनॅमलमध्ये बनविलेली सोन्याची मीठदाणी होय (कुन्स्थिस्टोरीशेस वस्तुसंग्रहालय, व्हिएन्ना). सोळाव्या शतकाच्या उत्तरार्धात इटालियन आणि स्थलांतरित झालेले सोनारकाम कारागीर कॉसिमो (पहिला) व ग्रॅन्ड ड्यूक ऑफ तस्कनी यांच्याकडे काम करीत होते. त्यात विशेषतः एनॅमल व कठीण दगडांपासून बनविलेले आणि सोन्याने मढविलेली पात्रे आहेत. फ्लॉरेन्स येथील पिट्टी पॅलेसमधील म्यूसियो देग्ली अर्जेन्टी येथे आणि कुन्स्थिस्टोरीशेस वस्तुसंग्रहालयात ती उत्तम स्थितीत पहावयास मिळतात. याच प्रकारची कामे मिलानमधील साराशी कुटुंबाने केलेली आहेत.

फ्रान्समधील सोनारकाम कमी प्रमाणावर शाबूत राहिले आहे. शिल्लक राहिलेले बरेच काम लूव्ह्र् वस्तुसंग्रहालयातील ॲपोलो गॅलरीत ठेवलेले आहे. यूरोपातील इतर देशांतील सोनारकाम करणारे सोळाव्या शतकाच्या पूर्वार्धात गॉथिक शैलीतच काम करीत होते. स्पेनमधील कारागिरांनी आपल्या भरपूर नक्षीकामाने नटलेल्या शैलीला आपल्या ‘प्लॅटेरिया’ नावावरून त्या काळाला प्लॅटेरेस्क्यू असे नाव दिले होते. नवीन जगातून प्राप्त झालेल्या मौल्यवान धातूंचा वापर करून एनरिके आणि युआन डी आरफे या सोनारकाम करणाऱ्या कस्टोडिया म्हणून ओळखल्या जाणाऱ्या यजमानासाठी मोठ्या आकाराचे कवच बनविले होते. पोर्तुगालमधील सर्वांत महत्त्वाचे काम म्हणजे गिल व्हिसेंट याने (१५०६) बनविलेले बेलेम मठाचे प्रवेशद्वार. हे गॉथिक शैलीत बनविलेले आहे. नंतर पोर्तुगीज सोनारांनी स्पेनसारखी स्वतंत्र शैली विकसित केली. मात्र ती स्पॅनिश शैलीची नक्कल नव्हती. सोळाव्या शतकातील सर्वोत्कृष्ट सोनारकाम फ्लॉरेन्सच्या (इटली) सोनारांकडून झालेले आढळते. या कारागिरांना मॅनेरीस्ट शैलीविषयी विशेष आस्था होती, जी इटलीत निर्माण झाली होती. परंतु स्थानिक कोरीव काम करणाऱ्यांनी तिला परावर्तित केले होते. १५८० च्या सुमारास डच सोनारांनी फ्लॉरेन्सच्या सोनारांशी स्पर्धा सुरू केली.

सोळाव्या शतकात इंग्लंडमध्ये ख्रिस्ती धर्माचा प्रभाव नसलेले बरेच काम होते. पुनर्निर्माणाच्या संघर्षात चर्चसाठी बनविलेले बरेचसे काम नष्ट करण्यात आले. प्रबोधन शैलीची सुरुवात हान्स हेल्बेइन (लहान) याने राजासाठी फुलदाणी पात्रांची निर्मिती केली तेव्हा झाली. तिचा प्रसार नंतर निम्नस्तरीय देशांत व जर्मनीत झाला.

सतरावे शतक : या शतकाच्या पूर्वार्धात व्हान व्हायानेन्स आणि योहान्स लुत्मा या डच सोनार कारागिरांनी अलिंद (ऑरिक्युलर) या भरदार सजावटीच्या स्वरूपाचा विकास केला. ती उत्तर यूरोपात (इंग्लंडसह) सामान्य होती. ख्रिस्तीयन व्हान व्हायनेन हा चार्लस् पहिला याच्यासाठी राजसोनार म्हणून काम करीत असे. जर्मनीमध्ये सलग ३० वर्षे (१६१८-४८) युद्ध चालल्यामुळे तेथील सोनारकाम निर्मितीतील प्रमाण व दर्जा दोन्ही खालावले होते. शतकाच्या उत्तरार्धात डच सोनारकामात पातळ पत्र्यांवरील उठावरेखन केलेले काम आढळते. ते वापरापेक्षा प्रदर्शनाकरिताच वापरले जात असे. फ्रान्स निर्विवादपणे आधुनिक शैलीतील काम करण्यात आघाडीवर होता. चौदावा लूई याने सैन्याला वेतन देण्यासाठी सोन्याच्या शाही थाळीला वितळविले, तेव्हापासून या काळातले कोणतेही सोनारकाम शिल्लक नाही. १६८५ मध्ये फ्रान्स सोडलेल्या ह्यूगनॉट सोनारांच्या कामांमध्ये तत्कालीन कामाचा दर्जा दिसून येतो. फ्रान्सच्या प्रांतीय सोनारांनी इंग्लंडमध्ये स्थायिक झाल्यानंतर निवडीची व आवडीची कारागिरीची नवीन परिमाणे निर्माण केली.

व्हर्साय येथील राजे व उमरावांमध्ये चांदीचे फर्निचर वापरण्याची चाल (फॅशन) प्रसिद्ध होती. लाकडी चौकटीत चांदीचे पत्रे तयार करून ठोकत असत. प्रत्येक दिवाणखान्यात शृंगार मेज, आरसा व मेणबत्ती स्टॅन्डची जोडी असे. फ्रान्समध्ये राज्यक्रांतीनंतर असे फर्निचर शिल्लक राहिले नाही मात्र इंग्लंड, डेन्मार्क, जर्मनी आणि रशिया येथे बऱ्याच प्रमाणात वाचले. सलग ३० वर्ष युद्धकाळामुळे जर्मनीला आपली पत परत मिळविता आली नाही. तरीही प्राग व म्यूनिक येथील राजघराण्यांतील एनॅमलमध्ये केलेले सोन्याचे नक्षीकाम व अंत्यरूपण कला अद्वितीय आहे.[ ⟶ बरोक कला].


 अठरावे शतक : या काळात इंग्लंडमधील सोनारकामात साधेपणासह प्रारूपात लालित्य आढळून येते. तर डच आणि जर्मन सोनार याच तऱ्हेचे मात्र कमी आल्हाददायक काम करीत. या काळातील सर्व फ्रेंच सोनारकाम नष्ट झाल्यामुळे इंग्लंडच्या कामाला पूर्वप्रसिद्धी प्राप्त होऊ शकली जे काम बचावले ते नक्षीच्या अस्सलपणात आणि उत्कृष्ट अंत्यरूपण कलेत अद्वितीय आहे. फ्रेंच सोनारकामाला नक्षींची उत्कृष्टता आणि ओतकाम व चेसिंग कामातील उच्च गुणवत्तेमुळे वरिष्ठता प्राप्त झाली आहे. इतर सोनार धातू उठावरेखनात काम करीत, तर फ्रेंच कारागीर प्रतिरूप (मॉडेल) बनवून ओतकाम करून दागिने व आभूषणे बनवीत. या कामात जादा मौल्यवान धातूंची गरज भासत असे. फ्रान्समधील छोट्या गावातील सोनार मोठ्या शहरातील कारागिरांशी यशस्वी रीत्या स्पर्धा करीत, तर इंग्लंडमधील सर्व उत्तम सोनार लंडनमध्ये एकवटले होते. फ्रेंच रोकोको शैली १७३० च्या सुमारास इंग्लंडमधील ह्यूगनॉट व पारंपरिक सोनारांनी स्वीकृत केली.

आ. ५. (१) आरोहीत कोरणी (२-३) भारा कोरणी (४) पृष्ठभागावर अस्तर लावण्याची स्तंभिका (५) ऐरण (६) ऐरणीकरिता स्तंभिका-छिद्रे (७) स्तंभिका-छिद्र अडणी (८) धार देण्याची घडणी (९-१०) भारा अडणी (११) सपाट घडणी (१२-१४) काही ऐरणीचे प्रकार

वसाहती अमेरिका : नवीन जगातील वसाहती काळात जे सोनारकाम होते, ते यूरोप व इंग्लंड यांपासून तयार झालेले होते. इंग्रज कारागिरांनी सोनारकाम सतराव्या शतकात उत्तर अमेरिकेतील न्यू इंग्लंड येथे प्रथमतः आणले. बोस्टन, न्यूपोर्ट, न्यूयॉर्क शहर, फिलाडेल्फिया, बाल्टिमोर आणि ॲनापलीस ही सोनारकामाची महत्त्वाची केंद्रे होती. माबेल ब्रॅडी गार्व्हान संग्रह (येल विद्यापीठ), बोस्टन म्यूझीयम ऑफ फाईन आर्टस्, अमेरिकन विंग ऑफ द मेट्रपॉलिटन म्यूझीयम ऑफ आर्ट आणि फिलाडेल्फिया म्यूझीयम ऑफ आर्ट या ठिकाणी सर्वोत्कृष्ट सोनारकामांचा संग्रह आहे. त्या काळाचे उत्तर अमेरिकेतील काम साधेपणा आणि डौलदार ब्रिटिश रूपामुळे ओळखता येते. तर मेक्सिको, ब्राझील, कोलंबिया, पेरू, चिली आणि बोलिव्हिया येथील काम यूरोपीय कल्पनेसारखे आहेत. त्यात आयबेरीयन नक्षी आणि रूप यांचे संमिश्रण दिसते, त्याच्यावर पूर्व-हिसपॅनिक काळाचा प्रभाव आढळतो. यातील बहुतेक अवशेष चर्चमध्ये दैवी (पवित्र) पात्रे म्हणून टिकले आहेत. मात्र काही खाजगी संग्रह देखील आहेत.

एकोणिसावे शतक : नेपोलियनच्या साहसामुळे फ्रान्समधील सोनारकामातील फॅशन प्रमुख व्हायला सुरुवात झाली आणि तेथील शैली संपूर्ण यूरोप खंडात पसरली. इंग्लंडमधील राजसोनार कारागिरांनी (मुख्यतः पॉल स्टॉर्‌र) फ्रान्सच्या शैलीत बदल करून स्वतःची ठळक अशी शैली निर्माण केली. या काळातील (१८१३-१६) सर्वोत्कृष्ट स्मारक ‘घरकामवाली’ लिस्बनमध्ये बनविले गेले व पोर्तुगाल स्वतंत्र झाल्यामुळे ड्यूक ऑफ वेलिंग्टनला ते भेट दिले. ते स्मारक आता ॲप्सले हाऊस, लंडन येथे ठेवलेले आहे.

एकोणिसाव्या शतकाच्या मध्यावर सुरुवातीच्या शैली पुनरुज्जीवित करून त्यात व्हिक्टोरियन शैलींचे संमिश्रण करण्यात आले. त्यासाठी आवश्यक ती सविस्तर माहिती विविध स्रोतांवरून रेखाटण्यात आली. सोनारकामातील कलाकुसरीतील कौशल्य उच्च स्तरावर होते, मात्र खेड्यातील काम अनुसाधित केलेले व निवडलेले होते. कारागीर त्यांवरील नैसर्गिक परिणाम दाखविण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करीत असत. या शतकाच्या उत्तरार्धात सोनारकाम कारखान्यांत आणि सोनारकाम करणारे लोककामगारांत परिवर्तित झाले. एकोणिसाव्या शतकाच्या शेवटी सोनारकामातील मानके बदलली आणि दुसरी महत्त्वपूर्ण चळवळ विल्यम मॉरीस आणि आर्ट नोव्हू (आधुनिक कला) शैलीमुळे सुरू झाली. इंग्लंडमध्ये आल्फ्रेड गिल्बर्ट या शिल्पकाराने महत्त्वपूर्ण काम केले. त्यांनी शृंगारिक (रोमान्टिक) विषयांत हस्तिदंत व मौल्यवान खडे वापरून आभूषणे तयार केली.

आधुनिक काळ : सन १९१४ नंतर यांत्रिकीकरण झालेल्या जवळपास सर्व देशांत व्यापाराचे स्वरूप सामाजिक बदलांमुळे पूर्णपणे बदलले. सोनारकाम करणाऱ्या काही कलावंत कारागिरांनी स्वतंत्र कामाचे स्टुडिओ उभारून, व्यापारीदृष्ट्या कमी नफ्याचे मात्र कलात्मकदृष्ट्या लक्षणीय काम केले. त्यातील अनेक कलावंतांनी कला विद्या-लयात शिक्षक व कारखान्यात आकृतिबंध सल्लागार म्हणून काम केले. कारखान्यात वापरल्या जाणाऱ्या यांत्रिक कामामुळे (उदा., मुद्रा उत्कीर्णन, दाबकाम, कातकाम, ओतकाम आणि चकाकी आणणे वगैरे) आर्थिक दृष्ट्या फायदा झाला, तरी कलात्मक काम अभावानेच होऊ लागले. सोन्याचे दागिने, आभूषणे, वस्तू आदींचा किरकोळ व्यापार करणारे व्यापारी कारखाने व घाऊक विक्रेत्यांकडून मोठ्या प्रमाणावर घेऊन तो माल निनावी विकत. त्यामुळे शैलीमधील उत्क्रांती होण्यास नवीन यंत्रांची किंमत, घाऊक व किरकोळ व्यापाऱ्यांची सावधगिरी, लोकांची खरेदी आणि सोन्याच्या उत्पादांची सौंदर्यमूल्यापेक्षा गुंतवणूक म्हणून पाहण्याचा लोकांचा दृष्टिकोण या बाबींचा अडथळा होत होता. याच्या परिणामस्वरूप वेशभूषेसाठी केलेली आभूषणे सजीव वाटतात. सर्वोत्कृष्ट आधुनिक कलात्मक काम सामान्यतः कमी प्रमाणात झाले. त्याचा व्यापारावर खूपच कमी प्रभाव पडला.

पॅरिसमधील रेनो लेलिक याच्या कामामुळे आर्ट नोव्हू चळवळीला प्रेरणा मिळाली. ती चळवळ आधी बेल्जियममध्ये व नंतर संपूर्ण यूरोप व अमेरिकेत पसरली. पीटर कार्ल फॅबर्गी याने लहान आभूषणांसाठी कलाकुसरीचे सरस मानके निर्माण केली. डेन्मार्कमधील सुप्रसिद्ध सोनार कारागिरांनी डॅनिश शैली निर्माण करून कारखाने स्थापन केले व विक्रीसाठी जगभर दुकाने उभारली. ज्यायोगे कलावंतांनी निर्मिलेली कलाभूषणे त्यांच्या स्टुडिओपुरती मर्यादित न राहता सामान्य जनतेपर्यंत पोहोचली. जॉर्ज जेन्सन, योहान र्‍होड यांसारख्या सोनार कलावंतांचा प्रभाव स्कँडिनेव्हियन देशात पसरला. १९६० पर्यंत फक्त जर्मनी कामाचा दर्जा व कलावंत कारागिरांची संख्या यांबाबतीत स्कँडिनेव्हियन देशांशी बरोबरी करू शकला. गिसलिंगेन येथील डब्ल्यूएम्एफ् (वुर्टेम्बर्गश मेटलवॉरेन फॅब्रिक) कारखाना हा चांदीच्या वस्तू तयार करणारा बहुधा यूरोपातील सर्वांत मोठा असावा. इंग्लंडमध्ये सर्वांत जास्त वैशिष्ट्यपूर्ण कामे झाली आहेत. सोनारकाम कारागिरांच्या कंपनीने १९४५ पासून उदयोन्मुख कलावंताना पुढे येण्यासाठी मदत केली आहे.

भारतातील सोनारकाम : भारतात सोने ही धातू अत्यंत प्राचीन काळापासून ज्ञात असून वापरात आहे. तिला सुवर्ण वा हिरण्य असा शब्द योजलेला आढळतो. ऋग्वेद, अथर्ववेद, रामायण, महाभारत आदी ग्रंथांत सोन्याचे व सोनारकामाच्या कौशल्याबाबत वारंवार उल्लेख आलेले आढळतात. त्यांतील सुवर्णालंकार किंवा वास्तुशिल्पात सोन्याचा झालेला वापर यांतील वर्णनांवरून तत्कालीन सोनारकाम कारागिरांचे कौशल्य व निपुणता लक्षात येते.

 आ. ६. मध्ययुगीन काळात झालेले वैशिष्ट्यपूर्ण सोनारकाम : (१)पाण्याची सुरई (२)मेणबत्ती-पात्र (३) चहाची किटली (४) झाकण असलेला पाण्याचा जग (५)साखर-पात्र व (६) झाकण असलेले खोलगट, वाटोळे भांडे (सूप किंवा खीर-पात्र).

 कौटिल्याच्या मते सोनारकामाचे क्षेपण, गुण व क्षुद्रक हे तीन प्रकार आहेत. हिरे-माणकांच्या जडावाच्या कामाला ‘क्षेपण’, सोन्याची तार ओढून केलेल्या कामाला ‘गुण’, तर भरीव किंवा पोकळ दागिने तयार करण्याला ‘क्षुद्रक’ असे म्हणतात. मढविणे व मुलामा देणे हे देखील सोनारकामाचे प्रकार होत. सोनारकाम करणाऱ्यांचा उल्लेख ऋग्वेद, अथर्ववेद, यजुर्वेद इ. ठिकाणी आहे. नंतरच्या काळात सुवर्णकार व सुवर्णकर्तार असा देखील उल्लेख आढळतो. सोन्याच्या परीक्षेत हे लोक अत्यंत निपुण व तरबेज असल्याने पाणिनीने त्यांना आकर्षिक हे विशेषण लावलेले आहे. रामायणात उल्लेखिलेले पुष्पक विमान हे सोनारकाम कारागिरीचे उत्तम उदाहरण आहे.

भारतातच नव्हे तर संपूर्ण जगभरात अशी समजूत प्रचलित आहे की, विशिष्ट प्रक्रियेद्वारे सामान्य धातूंपासून (विशेषतः तांबे) सोने तयार करता येते. रसशास्त्रात वर्णन केलेली हेमवती ही सोने बनविण्याची विद्या आढळते. रसरत्नाकर या ग्रंथात प्रसिद्ध रसशास्त्रज्ञ नागार्जुन याने तांबे व चांदी या धातूंपासून सोने बनविण्याचे प्रयोग दिलेले आढळतात. अलंकार व आभूषणांसाठी सोन्याचा वापर प्राचीन काळापासून मोठ्या प्रमाणावर होत आहे. हे अलंकार लहान मुले, स्त्री-पुरुष तसेच पशूंसाठीही बनविले जात. बाहुभूषणे, उरोभूषणे, कुंडले, रत्नमाला, वळी, अंगठी, कंठा आदी प्रकारचे दागिने बनविण्यात तत्कालीन सोनारकाम कारागीर निष्णात होते. पाणिनीच्या अष्टाध्यायीत कर्णिका, ललातिका, अंगुलिका आदी अलंकारांचे उल्लेख आहेत. भारतातील सांची, मथुरा, भारहूत, अमरावती आदी स्तूपांतील मूर्तिशिल्पांतून आणि अजिंठा, भाजे आदी लेण्यांतील भित्तिचित्रे यांतून विविध अलंकाराचे नमुने आढळतात.

वेदकालीन सोनार स्त्रियांसाठी कुरीरम्, ओपश (केसांत माळली जाणारी आभूषणे) निष्कंठ्य, निष्कग्रीव (गळ्यात घातले जाणारे) तसेच हिरण्यकंठी, सुवर्णशतकंठी यांसारखे दागिने घडवीत असत. घोड्यांना सालंकृत भेट देण्याची पद्धती प्राचीन काळी होती. हत्तीच्या सुळ्यांना सोन्याने सजविले जात असे. विविध विधींसाठी सोन्याचे जानवे, गाय, पाळणा, निरांजन इ. वस्तू घडविल्या जात. स्फ्य, कुर्च इ. यज्ञात लागणारी भांडी, भोजपात्रे, विविध भांडी इ. अनेक वस्तू मुबलक प्रमाणात सोन्याच्या बनविलेल्या असत. सोनारकाम करणाऱ्यांना मूर्तिकलाही ज्ञात असे. रामायणात सुवर्णमूर्त्यांचा वारंवार उल्लेख आढळतो. विनिमयाचे साधन म्हणून सोन्याची नाणी पाडली जात. ऋग्वेदात मना, निष्क इ. नाण्यांचा उल्लेख आढळतो, तसेच ‘शतमान’ नावाचेही नाणे होते.


भारतात धातूंचे हस्तकलाकाम हा फार प्राचीन व्यवसाय असल्यामुळे त्याची प्रचिती सिंधू संस्कृतीतील (इ. स. पू. २७५०-१७५०) मोहें-जो-दडो येथील उत्खननात सापडलेले चांदीचे फुलपात्र आणि चकचकीत सुवर्ण रत्ने यांतून येते. प्राचीन काळी सोन्याच्या मुबलकतेमुळे निरनिराळ्या वस्तू सोन्यापासून बनविल्या जात, तसेच वास्तुनिर्मितीतही सोन्याचा मुक्तपणे वापर केला जात असे. अथर्ववेदात सोन्याच्या नौकेचा व वल्ह्यांचा उल्लेख आहे. सैन्यासाठी लागणारे रथ, वाद्ये, चिलखते, शिरस्त्राणे सोन्याची बनविलेली असत. इ. स. पू. पहिल्या शतकातील सुत्तुकेनी येथील थडग्यात सुवर्ण कमळे-कलिका आणि वर्तुळाकार जाडजूड कर्णभूषणे मिळाली तर बिमरान (अफगाणिस्तान) येथील अवशेषांत सोन्याच्या मण्यांनी-माणकांनी सुशोभित केलेली मंजूषा आढळली. गंधार (अफगाणिस्तान) कलेतील दागिन्यांवर ग्रीकांश संस्कृतीचा प्रभाव आढळतो. मध्ययुगातील मंदिर शिल्पांतून विशेषतः खजुराहो, कोणार्क, हळेबीड, सोमनाथ येथील मंदिरांतून विविध प्रकारच्या दागिन्यांची रेलचेल आढळते. कर्नाटकातील मंदिर शिल्पांतून दागिन्यांची विशेष रेलचेल असून कारागिरीमधील कौशल्य आढळते. मुसलमानांच्या भारतातील आगमनानंतर पुनरुत्थान प्रक्रियेला सुरुवात होऊन कोफ्तगारी कलेला ऊर्जितावस्था प्राप्त झाली. ती इराण-काबूलमधून (अफगाणिस्तानातून) भारतात प्रविष्ट झाली. सोन्याच्या पत्र्यांचा पृष्ठभाग खोदून जडावाचे काम तलवारींच्या मुठी, ढाली, बिचव्याची मूठ यांच्या अलंकरणासाठी करण्यात येऊ लागले. मोगल काळात (१५२६-१७०७) चिलखतींच्या अलंकरणात सोन्याचा सर्रास उपयोग उच्चभ्रूत प्रचलित झाला. मुस्लिम कारागिरांनी कुराणातील वचने, काव्यपंक्ती किंवा शुभेच्छा दर्शक वाक्ये उठविण्यात आपले कौशल्य प्रकट केले (भारत इतिहास संशोधक मंडळातील कुराणाची प्रत). मोगलांनी भारतभर जवाहिरांना व सुवर्णकारांना आश्रय देऊन उत्तेजन दिले पण त्यांतील सर्वोत्तम कारागीर आग्रा आणि दिल्ली येथे होते. कोहिनूर हिरा बसविलेले रत्नजडित सोन्याचे मयूर सिंहासन हे भारताच्या वैभवाचे द्योतक होते. उत्तर भारतात मीनाकारी कला अधिक लोकप्रिय होती. प्रदेशपरत्वे स्थानिक केंद्रातून पर्यायी भिन्न तंत्रे विकसित झाली. काश्मीरमध्ये ‘सुराही’ नामक सोन्यावर प्रक्रिया करण्याची एक विशिष्ट पद्धती प्रचलित होती. या पद्धतीत फुलांसारखा रचनाबंध सोन्याच्या ठिपक्यांच्या चांदीच्या (ठोकलेल्या) पत्र्यांवर रेखाटण्यात येई. गुजरात, सियालकोट, जयपूर, अलवार व सिरोही या ठिकाणी कोफ्तगारी कला अद्यापि प्रसिद्ध आहे. येथील कारागीर लोखंड व पोलाद या मूळ धातूंवर सोन्याच्या तारांनी अत्यंत कुशलतेने विविध आकृतिबंध उठवून वस्तू अलंकृत करतात. अशा प्रकारच्या वस्तूंमध्ये सुरई, मंजूषा, तबके, थाळ्या, चाकू, अडकित्त्ये, कातऱ्यां, फुलदाण्या, हुक्क्याच्या बैठकी आणि तत्सम शोभादायक वस्तूंचे अलंकरण करण्यासाठी कोफ्तगारीचा कलात्मक उपयोग या ठिकाणी केला जातो. त्रावणकोरमध्ये केस बांधावयाच्या सुवर्ण पिनांत फुलांच्या आकृतिबंधांचा उपयोग केलेला आढळतो. तसेच अन्य नीतिवचने आणि सांस्कृतिक चिन्हे उठविण्याचे कसब कलाकारांनी दाखविले आहे. लखनौ, जयपूर, त्रिचनापल्ली, तिरुपती आणि बंगलोर या शहरांतून आजही सुवर्ण कलाकाम मोठ्या प्रमाणावर होते.

मराठा अंमलात सोन्याचे सिंहासन बनविण्याची परंपरा शिवकाळापर्यंत अस्तित्वात असलेली आढळते. छ. शिवाजी महाराजांचे सुवर्णांकित सिंहासन रामजी प्रभू चित्रे यांनी बनविले होते आणि त्यावरील कलाकुसरयुक्त सुवर्णांकित छत्र या कलेची साक्ष देते मात्र शिवकाळात अलंकार वा दागिने फार मर्यादित होते परंतु पेशवेकाळात (१७२०-१८१८) कर्नाटक, गुजरात, माळवा, बुंदेलखंड, दिल्ली, आग्रा, बंगाल आदी प्रदेशांतील मराठ्यांच्या संचारात तेथील अलंकारांची ओळख झाली. कलगी तुरा, शिरपेच ही शिरोभूषणे, भिकबाळी, चौकडा, कर्णफुले, नथ आणि कंठी, गोफ, रत्नहार, चंद्रहार, मोहनमाळ, तन्मणी, चपलहार ही कंठभूषणे व अन्य दागिने आणि देवदेवतांच्या मूर्ती सोन्याचांदीच्या, हिऱ्यामाणकांच्या बनविण्यात येऊ लागल्या. कर्नाटकातील श्रीरंगपट्टणमच्या टिपू सुलतानाचे सिंहासनही सोन्याचे असून त्याच्याकडील फर्निचरवर सुवर्णांकित कलाकुसर आढळते.

विविध गोष्टींना मुलामा देण्याच्या कामासाठीही सोन्याचा वापर प्राचीन काळी होत असे. सोनारकामाचा विणकामाशीही संबंध आहे. अनेक भरजरी वस्त्रे सोन्याचा उपयोग करून विणलेली असत.

सोन्याचा अपहार करणे ही सोनारकाम करणाऱ्यांची एक प्राचीन काळापासून चालत आलेली मनोवृत्ती आहे. खोटे वजन देणे, दागिन्यातील सोने काढून त्यात हीन धातू मिसळणे, जुने दागिने वितळविताना त्यांतील सोने काढणे, सोन्याच्या पत्र्यांच्या आत शिशाचा वा तांब्याचा पत्रा घालणे इ. प्रकार कौटिल्याने सांगितले आहेत. या प्रकारांना आळा घालण्यासाठी त्याने दंडही सांगितला आहे, तसेच सोनारांना कोणत्या जागी बसवावे याचेही नियम त्याने ठरवून दिले आहेत. (चित्रपत्रे).

पहा : अंगठी अलंकार कंठभूषणे कटिभूषणे कोफ्तगारी जडजवाहीर नासिकाभूषणे पादभूषणे बांगडी बाहुभूषणे सिंहासन सोने सौभाग्यालंकार हस्तभूषणे.

संदर्भ : 1. Came, Richard, Silver, London, 1961.

           2. Huges, Graham, Modern Jewelry, London, 1963.

           3. Jackson, Charles J. English Goldsmiths and their marks, Dover, 1986.

           4. Larkman, Brian Metalwork Designs of Today, London, 1969.

           5. Reid, F. H. and Goldie, W. Gold Plating Technology, 1980.

देशपांडे, सु. र. वाघ, नितिन भरत


चांदीचा ऱ्हायटा, तुर्कस्तान, ॲकिमेनीडी काळ (इ.स.पू. पहिल्या सहस्रकात पूर्वार्ध). हीरकॅनियम सोन्याचा कप, माझानदारान, ॲकिमेनीडी काळ (इ.स.पू. पहिले शतक पूर्वार्ध). सोन्याचा पेला, ॲलेक्झांड्रिया, बायझंटिन काळ (सातवे शतक).
चांदीची थाळी, बर्लिन, रोमन काळ (इ.स.पू. पहिले शतक). सोन्याचा रथ, ताजिकिस्तान, ॲकिमेनीडी काळ (इ.स.पू. पाचवे शतक). हार (सोने लॅपीस लॅझ्युली व कार्‌नेलियन), इराक (इ.स.पू. सव्वीसावे शतक).
सोन्याच्या सपाता, ईजिप्त (इ.स.पू. चौदावे शतक). सोन्याचा ताईत, ईजिप्त (इ.स.पू. सातवे शतक).  चांदीची द्रव्यार्पण थाळी, फ्रान्स, ग्रीकांश काळ (इ.स.पू. तिसरे शतक).
सोन्याचे कर्णफूल, नॅक्रोपोलीस, इट्रुस्कन काळ (इ.स.पू. चौथे शतक).    

सेंट ॲम्ब्रॉजिओ वेदी, मिलान, मध्ययुगीन काळ (इ.स. नववे शतक). थॉर्न अवशेषमंजुषा, गॉथिक शैली, पॅरिस, फ्रान्स (इ.स. चौदावे शतक).
मेणबत्ती पात्र (सोने, चांदी, एनॅमल व काच), गिल व्हिसेंट कृत, बेलेम मठ, लिस्बन (इ.स. सोळावे शतक). सोन्याचा कमरपट्टा, पारंपरिक शैली, भारत.
अल्तापिस, स्टॅव्हलो ॲबे, बेल्जियम (इ.स. बारावे शतक). सोन्याचे पेंडन्ट, ईजिप्त, फातिमीड काळ (इ.स. अकरावे शतक).
शोभेचे पात्र (सोने व लॅपीस लॅझ्युली), हान्स डोम्स कृत, फ्लॉरेन्स (इ.स. सोळावे शतक).  

पेंडन्ट (सोने, मोती, एनॅमल व हिरे, बरोक शैली, इटली (इ.स. सतरावे शतक). हार (सोने व एनॅमल), रोकोको शैली, फ्रान्स (इ.स. अठरावे शतक).
साडीपिन (सोने, एनॅमल व काच), अमेरिका (इ.स. एकोणिसावे शतक). ब्ल्यू-बर्ड ब्रोच (सोने, हिरे व पोलाद), अमेरिका (इ.स. विसावे शतक).
पेंडन्ट (लोखंड, काच व रत्न), अल्फ्रेड गिल्बर्ट कृत, आर्ट नूव्हो शैली, इंग्लंड (इ.स. एकोणिसावे शतक). हार (पांढरे सोने व हिरे), ॲडलर, पॅरिस (इ.स. एकविसावे शतक).
अंगठी (सोने व हिरे), भारत (इ.स. एकविसावे शतक).