जामदानी कलाकाम : एक प्राचीन कलात्मक प्रकार. हातमागावर विणलेल्या या अतितलम सुतीकापडामध्ये निरनिराळ्या आकारांचे नक्षीदार वेलबुट्टीचे, आकर्षक कशिदाकाम केलेले असे. डाक्का येथील तलम मलमलीच्या जोडीचेच, पण त्यापेक्षा भारी प्रतीचे हे उत्पादन असे. जामदानी कापड राजघराण्यातील व दरबारी लोक वापरीत. ही कला पुढे साडीच्या पदरकिनारीमध्येही विकसित झाली. ठेवणीतील जामदानी वस्त्रे ही आज बंगाली घराण्यांची अमूल्य ठेव समजली जाते. जामदानी वस्त्रे बंगालमधील लोकांच्या वापरात होती, असा उल्लेख चंद्रगुप्ताच्या दरबारी येऊन गेलेल्या मीगॅस्थीनीझच्या प्रवासवर्णनात आढळतो, यावरून ही कला भारतात पुरातन काळापासून चालत आलेली आहे, असे दिसून येते. याला चिकनकारी असेही म्हणतात. छाया- प्रकाशाचा वेधक परिणाम साधणारा हा वस्त्रप्रकार आजही लोकप्रिय आहे.

जामदानी विणकाम जलदगतीने करण्यास एका मागावर दोन विणकर लागतात. विणकाम करताना प्रथम विणावयाच्या आकृतिबंधाचा आकार काढलेला कागद उभ्या धाग्यांखाली ठेवतात. मग रंगीत व जरीचे धागे भरलेल्या बाबिनी योग्य वेळी आडव्या धाग्याबरोबर सरकवितात. हे धागे कागदावरील आकृतिबंधानुसार येण्यासाठी वेळूच्या दोन टोकदार सळ्यांच्या साह्याने उभ्या धाग्यांनी ते मर्यादित करण्यात येतात. डाक्का येथील तलम जामदानी कापड नाजूक व बारीक सूतधाग्यांनी विणलेले असे. हे सूत कातणारे कुशल कारागीर पूर्वी डाक्का येथे फार प्रसिद्ध होते. ते अतितलम सूत हातानेच कातीत. तसेच कापड विणताना एखादा जाडाभरडा धागा मध्येच विणला गेला, तर रफूगार तो ओढून काढीत व त्याजागी योग्य तलम धागा सहजतेने भरीत. रफूकाम करणारे हे कारागीर विणलेल्या जामदानी साड्यांतील अथवा वस्त्रांतील दोष आपल्या कौशल्यपुर्ण पद्धतीने नकळत काढून टाकीत तसेच ते केवळ सुईदोऱ्याच्या साह्याने चिकनकारी भरतकामही कौशल्यपूर्ण पद्धतीने करीत असत. त्याचे ते काम अप्रतिम असे त्यामुळेच जामदानी कलाकामात त्या रफूगारांचे स्थान फार महत्त्वाचे होते.

डाक्क्याच्या जामदानी कलाकामाचा नमुना 

उत्तर प्रदेशातील टांडा येथील जामदानी विणकाम पांढऱ्या कापडात त्याच प्रतीच्या पांढऱ्या धाग्यांनी करतात, त्यामुळे ते सौम्य व प्रसन्न वाटते. पुष्पाकार आकृतिबंध ठराविक अंतरावर विणलेली असतील, तर त्या वस्त्राला ‘बुट्टीदार’ म्हणतात, तिरप्या रेषेत असतील तर ‘तिरछा’ म्हणतात, सलग ओळीत असतील तर ‘झालर’ म्हणतात. जामदानी वस्त्रातील विशेष उल्लेखनीय प्रकार म्हणजे ‘पन्ना हजार’ हा होय. यातील फुलांच्या नक्षीसाठी जरीचा धागा वापरलेला असतो त्यामुळे ती फुले चमकतात. 

कानडे, गो. चिं.