२. ‘मोरिबाना’ : जपानी पुष्परचना.

पुष्परचना: फुले, पाने, छोट्या डहाळ्या, फळे आदींची पुष्पपात्रातून केलेली आकर्षक मांडणी. पुष्परचनेत या सर्वांचे रंग, आकारमान, पोत इ. घटक लक्षात घेऊन त्यांतून प्रसन्नकारक आकृतिबंध साधले जातात. नित्यनेमाने किंवा प्रसंगपरत्वे पुष्परचना केली जाते.

आधुनिक कुटुंबात पुष्पपात्रे ही गृहशोभनाची एक आवश्यक बाब ठरली आहे. सभा-संमेलनप्रसंगी पुष्पपात्रे ठेवण्याची पद्धत दिसते.

 

या कलेच्या दोन ठळक पद्धती आढळतात: (१) गुच्छपद्धत व (२) जपानी इकेबानापद्धत. या दोहोंचे मिश्रणही आधुनिकपुष्परचनेत झाल्याचे दिसते. पूर्ण उमललेली टवटवीत फुले आणि त्यांच्या तजेलदार रंगसंगतीवर भर देणारी गुच्छाकार गोठवण यांवर पारंपरिक पाश्चात्त्य पुष्परचनेचा भर असतो उलट कळ्या, अर्धोन्मीलित व पूर्ण उमललेली फुले, पाने, फांद्या, फळे या सर्वांचा प्रतीकात्मक आकृतिबंध साधणे, हे जपानी पुष्परचनेचे उद्दिष्ट असते. उदा., मुग्ध कलिका, अर्धोन्मीलित कलिका व पूर्ण उमललेले फूल यांतून अनुक्रमे भूतकाळ, वर्तमानकाळ आणि भविष्यकाळ यांचे प्रतीकात्म संसूचन करण्याचा संकेत आढळतो. जपानी पुष्परचनेला सु. १,४०० वर्षांची दीर्घ परंपरा असल्याने या कलेवरील जपानी प्रभाव सर्वत्र दिसून येतो.

१. पुष्पगुच्छ पद्धतीची पश्चिमी पुष्परचना

पुष्परचनेच्या कलेत पुष्पपात्र हे अत्यंत आवश्यक साधन होय. चीनमधील ब्राँझची आणि चिनीमातीची प्राचीन पुष्पपात्रे वैशिष्ट्यपूर्ण असत. पुष्पपात्रांची निर्मिती हा एक स्वतंत्र उद्योग म्हणूनच तेथे विकसित झाला. एकोणिसाव्या शतकाच्या मध्यास जपानमध्ये होड्या, चंद्र यांसारख्या नानाविध आकारांची पुष्पपात्रे तयार होत. भारतातील तांब्यापितळेची पुष्पपात्रे, यूरोपमधील चिनीमातीची, काचेची  व चांदीची पुष्पपात्रे आणि नॉर्वे, स्वीडन, डेन्मार्क इ. देशांतील स्टेनलेस स्टीलची तसेच मातीची पुष्पपात्रे उल्लेखनीय आहेत. पुष्परचनेचे स्वरूप व सौंदर्य पुष्पपात्रांवर अवलंबून असते. विविध माध्यमांतील आणि आकारप्रकारांतील पुष्पपात्रे आणि त्यांतून मांडलेली फुले यांच्यात संगती राखली, की पुष्परचना वेधक बनते. पुष्पपात्रात फुले, पाने, फांद्या गोठविण्यासाठी बारीक तारा, दोरा, गोट्या किंवा इतर आधारभूत साहित्य वापरले जाते. पसरट पुष्पपात्रात पानाफुलांना आधार म्हणून कुणीधारकाचा (‘केंझन’) उपयोग करतात. उभ्या खोलगट पुष्पपात्रात प्लॅस्टिकच्या तारांचा वापर करून पानाफुलांची रचना करणे सोयीचे ठरते. जपानी पुष्परचनेत पुष्पपात्रांची बैठक म्हणून ‘डाई’ चा उपयोग करतात. पुष्पपात्र व डाइ यांत परस्परसापेक्ष आकारभिन्नता राखली जाते. उदा., गोल पुष्पपात्रासाठी चौकोनी वा आयताकार बैठक वापरतात. कलात्मक पुष्पपात्रांची व बैठकींची निर्मिती हा एक आधुनिक काळातील स्वतंत्र उद्योगच झालेला आहे.

 

जपानी पुष्परचना: ओनो-नो-इमोको हा जपानी पुष्परचनेचा आद्य जनक. इ.स. ६०७ च्या सुमारास तो चीनमध्ये जपानचा प्रातिनिधिक दूत म्हणून गेला. चीनमध्ये बुद्धमूर्तीपुढे ब्राँझच्या किंवा चिनीमातीच्या पात्रांतून फुले रचून ठेवण्याची पद्धत होती. तत्त्कालीन चिनी पुष्पपात्रे कलात्मक असली, तरी पुष्परचनेची खास शैली तेथे विकसित झालेली नव्हती. पण यातूनच ओनो-नो-इमोको याने प्रेरणा घेऊन जपानमध्ये परतल्यावर पुष्परचनेची स्वतंत्र कला विकसित केली. तत्कालीन बौद्ध भिक्षू त्याच्या मठात ही कला शिकण्यासाठी येत. क्योटो शहरातील ‘इकेनोबो’ (म्हणजे तळ्याजवळचा भिक्षूचा मठ) ही जपानी पुष्परचनेची आद्य शाळा ठरली.

 

इकेनोबोच्या परंपरेत निर्माण झालेली पहिली अभिजात शैली म्हणजे ‘रिक्का’. चिनी निसर्गचित्रांचे हुबेहूब प्रतिबिंब रिक्का या अतिशय गुंतागुंतीच्या पुष्परचनेत आढळते. रिक्का म्हणजे उभी मांडलेली फुले. समग्र निसर्गदृश्याबरोबरच फुलांनी बहरलेली फांदी उभी करणे, हे या मांडणीचे वैशिष्ट्य. त्यातून भव्यता व धार्मिक संकेत जाणवतात. या मांडणीत चिनी पुष्पपात्रे वापरीत. रिक्का शैलीत पुढे अनेक प्रकार उदयास आले.

 

बाराव्या शतकात झेन पंथाचा प्रसार जपानमध्ये झाला. या पंथानुसार घरात ध्यानधारणेसाठी स्वतंत्र जागा व तिची उचित सजावट आवश्यक ठरली. गुंतागुंतीची रिक्का पुष्परचना यात अनुकूल नव्हती त्यामुळे ‘नागेइरे’ किंवा ‘हैका’ ही शैली पुढे आली व जपानी घराघरांतून तिचा प्रसार झाला. नागेइरे म्हणजे स्वैर मांडणी. नैसर्गिकता व अकृत्रिमता यांचा परिणाम साधण्यासाठी नागेइरे पुष्परचनेत फुले काहीशा स्वैरपणाने गोठवीत. झेन पंथाच्या प्रभावाखालीच जपानी चहापानाला औपचारिक समारंभाचे स्वरूप प्राप्त झाले. यातूनच ‘चाबाना’ ही शैली निर्माण झाली. चाबाना म्हणजे चहा-फुले. साध्या पुष्पपात्रात पूर्ण उमललेल्या फुलांची पर्णयुक्त अशी एकच डहाळी डौलदार रीतीने ठेवणे, हे तिचे वैशिष्ट्य आहे. तिची रचनाशैली अत्यंत निखळ स्वरूपाची असते. नागेइरे व चाबाना या शैलींमुळे पूर्वी केवळ राजघराण्यात व सरदारवर्गात मर्यादित झालेली पुष्परचनेची कला सर्वसामान्यांच्या घरांतून पसरण्यास मदत झाली. पंधराव्या शतकात क्योटो येथील गिन्-काकुजी मंदिर (सिल्व्हर पॅव्हिनियन) सर्वच जपानी कलांचे केंद्र बनले व तेथून पुष्परचनेच्या कलेचाही पद्धतशीर विकास करण्याचे कार्य होऊ लागले.

 

अठराव्या शतकाच्या अखेरीस रिक्काची प्रतीकात्मकता व नागेइरेची नैसर्गिक सहजता यांचा मिलाफ करणारी ‘शोका’ किंवा ‘सेइका’ ही शैली पुढे आली. ‘मूलभूत त्रिकोण’ हे या पुष्परचनेचे अधिष्ठान होय. सेन ((स्वर्ग), ची (पृथ्वी) व जिन (मानव) या तत्त्वत्रयीचा प्रतीकात्म बोध करणारी तीन फुले, पाने वा फांद्या यांची त्रिकोणात्मक मांडणी केली जाते. अनेकदा तिच्यात फूजी पर्वताचे त्रिकोणी शिखर, विविध चंद्रकला यांसारख्या निसर्गदृश्यांची प्रतिकृतीही साधली जाते. या शैलीतूनच ‘काकुवाकी’ ही उपशाखा पुढे निर्माण झाली.

 

एकोणिसाव्या शतकाच्या मध्यापर्यंत पारंपरिक जपानी पुष्परचना पूर्णतः विकसित झाल्याचे दिसते. या काळात पुष्पपात्रांचे नानाविध आकारप्रकार, पुष्परचनेच्या स्वतंत्र शिक्षणसंस्था आणि नियमबद्ध पुष्परचनेच्या विविध प्रणाली यांचा विकास घडून आला. १८५८ पासून पश्चिमी राष्ट्रांशी व्यापाराच्या निमित्ताने जपानचा जवळचा संबंध आला. पश्चिमी कलाविषयक कल्पनांचा प्रभाव जपानी पुष्परचनेवरही उमटू लागला. विसाव्या शतकाच्या प्रारंभी उन्‌शिन्‌ ओहारा याने ‘मोरिबाना’ ही नवी रचनाशैली प्रवर्तित केली.मोरिबाना म्हणजे फुलांची रास. तिच्यातून रुंद पसरट पुष्पपात्रात फुलांची रास रचून निसर्गदृश्याचा आभास निर्माण केला जातो. मोरिबानाच्या आकृतिबंधाचे वैशिष्ट्य म्हणजे त्यातील प्रत्येक फुलाचे स्वतंत्र अस्तित्व डोळ्यात भरणे, हे होय. या आकृतिबंधात बैठकीशी संगती राखणारी फुले, पाने, डहाळ्या आदींची लयबद्ध रेखा साधली जाते.

 

जपानी पुष्परचना ही सतत विकसित होत आलेली कला आहे. विसाव्या शतकात सोफू तेशिहारा (तेशिवारा)ने ‘सोगेत्सु संप्रदाय’ प्रवर्तित करून त्याद्वारे परिवर्तनशील अशी ‘सोगेत्सु’ शैली प्रस्तृत केली. या शैलीत आत्मप्रकटीकरणाला विशेष वाव असतो. त्यामुळेच ‘जियुबाना’ (स्वैर पुष्परचना) व ‘झेनेइबाना’ (नवप्रवर्तक शैली) या नव्या शैली लोकप्रिय ठरल्या. पुष्परचना ही इतर ललित कलांप्रमाणेच आत्माविष्कारी कला आहे व म्हणून तिच्यात पुष्परचनाकाराच्या स्वतंत्र व्यक्तिमत्त्वाचे प्रतिबिंब उमटले पाहिजे, या भूमिकेतून रूढ संकेतांच्या व नियमांच्या पलिकडे जाण्याची प्रवृत्ती तेथे वाढत आहे. शुद्ध आकार व रंग यांचे अप्रतिरूप आकृतिबंध पुष्परचनेतून साधण्याची नवी दृष्टी प्रभावी ठरत आहे. पुष्परचनेच्या साधनसामग्रीत धातूंचे तुकडे, पोलादी चक्रे, दोरखंड, बूच, प्लॅस्टिकच्या तारा यांसारख्या नव्या नव्या साधनांची भर पडत आहे.


पश्चिमी पुष्परचना: यूरोपीय देशांतील पारंपरिक पुष्परचना पुष्पपात्रात ठेवलेल्या गुच्छ (मास रेंजमेंट) पद्धतीची होती. सतराव्या शतकातील डच चित्रकारांनी ट्यूलिप फुलांची चित्रे रंगविली हेच पश्चिमी गुच्छरचनेचे मूळ होय. वेगवेगळ्या रंगांची व आकाराची फुले विविध प्रकारच्या पुष्पपात्रांतून रचून ठेवण्याची पद्धत विसाव्या शतकापर्यंत रूढ होती परंतु पुढेपुढे जपानी पुष्परचनेच्या प्रभावाखाली ही पारंपरिक रचना बदलत गेली. फुलांचे रंग आणि आकार यांचा अप्रतिरूप आविष्कार साधण्याकडे आधुनिक कल दिसतो. पूर्वीच्या ठसठशीत रंगसंगतीवर देण्यात येणारा भर कमी झाला असून आधुनिक पश्चिमी पुष्परचनेत रंगांचा सौम्य-सूचक परिणाम साधण्याकडे अधिक लक्ष दिलेले आढळते. फुलांचे देठ पुष्पपात्रातील पाण्यात स्थिर राखून प्रत्यक्ष फुले मात्र वरच्या मुक्त अवकाशात विशिष्ट आकृतिबंध साधण्यासाठी गोठविली जातात. यासाठी पुष्कळदा फुलांना बारीक तारांचा आधार देऊन ती वर उचलतात किंवा हव्या त्या दिशेकडे वळवितात. काच, धातूंचे व लाकडाचे तुकडे, छोट्या शिल्पाकृती, फळे, गवत आदींची पूरक सामग्रीही एकूण आकृतिबंधाच्या दृष्टिने वापरण्यात येते. त्या वस्तूंचा आकारप्रकार, पोत व रंग यांचा मेळ मुख्य रचनेशी राखण्यात येतो. बैठ्या पुष्पपात्राबरोबरच टांगत्या पुष्पपात्राचा वापर आणि नियमबद्ध चाकोरीऐवजी मुक्त रचनातंत्राचा अवलंब हे अत्याधुनिक रचनाशैलीचे वैशिष्ट्य मानता येईल. (चित्रपत्र १०).

 

पहा: गृहशोभन.

 

संदर्भ:1. Clements, Julia, Flower Arrangements in Stately Homes, London, 1966.

2. Coe, Stella, The Art of Japanese Flower Arrangement, London, 1964.

3. Hodgson, Tomasins, The Gentle Art of Flower Arrangement, London, 1963.

4. Sato, Shozo, The Art of Arranging Flowers, New York.

5. Tangye, Enid, Flowers For All Occasions, London, 1964.

टिळक, इंदू जोशी, चंद्रहास जाधव, रा. ग.

 

‘चाबाना’: जपानी पुष्परचना. ‘नागेइरे’: जपानी पुष्परचना.
सृजनाची प्रतीकात्मकता असलेली भारतीय पुष्परचना पाश्चात्त्य मुक्त पुष्परचनेचा एक प्रकार
पर्णसंभारयुक्त भारतीय पुष्परचना ‘रिक्का’: जपानी पुष्परचना.
पाश्चात्त्य पुष्परचनेचा आणखी एक प्रकार धार्मिक प्रतीकात्मकता असलेली भारतीय पुष्परचना