फुलकरी : पंजाबी भरतकामाचा परंपरागत प्रकार. फुलकरीप्रमाणेच ‘बाग’ हा त्याचा आणखी एक प्रकार. सण-समारंभात पंजाबी स्त्रिया बागयुक्त शाल वा चादर परिधान करतात तर नववधूसाठी फुलकरीचा वापर करण्याची परंपरा फार जुनी आहे. ज्या शालीवर वा चादरीवर बगिच्याच्या नमुन्याचे भरतकाम केलेले असते, तो बाग आणि ज्यावर भौमितिक पद्धतीने वेलबुटीचे आकृतिबंध भरलेले असतात, ती फुलकरी होय. बाग हा प्रकार पंजाबात गुजर ह्या भटक्या लोकांमार्फत मध्य आशियातून आला असावा किंवा इराणमधील ‘गुलकरी’ म्हणजेच पंजाबातील ‘फुलकरी’ होय अशी मते आढळतात. रंगांची विविधता, मोहक रंगसंगती, आकृतिबंधातील ठसठशीतपणा आणि भरतकामातील नितळ सौंदर्य यांमुळे फुलकरी वा बाग हे पंजाबी स्त्रियांच्या अभिरूचीचे प्रतीक ठरले आहे.

फुलकरी : एक परंपरागत नमुना.

बाग या भरतकामप्रकाराचे उल्लेख प्राचीन वाङ्‌मयातही आढळतात. तर पंजाबी लोकगीतांतून बाग किंवा फुलकरी यांची भावपूर्ण वर्णने वाचावयास मिळतात. पंजाबातील बालिका बालवयापासूनच बाग किंवा फुलकरीचे तंत्र शिकू लागते. बालिकेची आई तिला एक गडद निळा खादीचा तुकडा व फिकट निळा धागा देऊन त्यावर साध्या टाक्याने मोठ्या फुलकरीची नक्कल करावयास शिकविते. तिला निळी फुलकरी म्हणतात.

परंपरागत फुलकरीचे भरतकाम, हाताने कताई केलेल्या सूतापासून व हातमागावर विणलेल्या खादीच्या अथवा अलवानाच्या कापडावरच करण्यात येते. त्याची पार्श्वभूमी पांढरी शुभ्र, किरमिजी, पिंगट किरमिजी किंवा निळी असते. त्यावर शुद्ध रेशमी धाग्याने भरतकाम करण्यात येते. बहुधा सोनेरी-पिवळाच रेशमी धागा वापरण्यात येत असला, तरी प्रसंगी तो शुभ्र पांढरा, गुलाबी, मेंदीसदृश हिरवा अथवा गडद जांभळा असू शकतो. हा धागा पूर्वी काश्मीर वा अफगाणिस्तान येथून आयात करण्यात येई व त्याचे रंगकाम अमृतसरला होई. नंतर तो धागा सर्व व्यापार-केंद्रांकडे पाठविला जाई. पुढे किरकोळ विक्रेते तो खेडूत स्त्रियांपर्यंत पोहोचवीत.

फुलकरीवरील भरतकाम साध्या सुईनेच करण्यात येते. त्यासाठी कापडावर कोणताही आकृतिबंध काढण्यात येत नाही. प्रत्यक्ष टाका भरण्याला सुरूवात एका टोकाकडून करण्यात येते आणि त्यातूनच पुढे एखादा आकृतिबंध आकार घेत जातो. हे टाके उलट भागावर घालण्यात येतात आणि त्यातूनच तो आकृतिबंध सुलट भागावर उठत जातो. टाका नेहमी लांब आडवा व उभट तिरपा असतो. त्यामुळे लंबाकृती, आडव्या व उभट तिरप्या आकाराच्या भौमितिक आकृत्या निर्माण होतात. सौंदर्यवर्धनाच्या दृष्टीने फुलकरीमध्ये अशा भौमितिक आकृतीचेच खरे महत्त्व असते. या आकृत्यांशी मेळ घालणाऱ्या हिरेमाणकादिकांच्या आकृत्याही कधी कधी भरण्यात येतात. रंगसंगतीसाठी त्या आकृत्या पिवळ्या वा तपकिरी रंगात भरतात. अलीकडे मात्र मध्यभागी कमळ आणि विविध पशुपक्ष्यांच्या वैशिष्ट्यपूर्ण प्रतिकृती वगैरेंचाही वापर करण्यात येतो तर कधी त्यात दागदागिन्यांची नक्षी उठविण्यात येते. शिवणकामासाठी रेशमी धागा वापरण्यात येत असला, तरी क्वचित प्रसंगी लोकरीचाही उपयोग करण्यात येतो. पांढऱ्या व हिरव्या रंगाच्या शिवणीसाठी मात्र दोराच वापरतात.

‘चोपे’ (चोबे) व ‘सुबर’ असे फुलकरीचे दोन प्रकार आहेत. त्यांपैकी चोपे या प्रकारात मात्र दुहेरी धावता टाका घालण्यात येतो. त्यामुळे आकृतीबंध दोन्ही बाजूंनी एकसारखा उठतो. या प्रकाराचे महत्त्व नववधूच्या वेशभूषेच्या दृष्टीने विशेष असते. सुबर या फुलकरीच्या खास प्रकारात भरतकाम लाल रंगाने करण्यात येते. मध्यभागी पंचफुलांचा आकृतिबंध असून डोक्यावरील घुंघटाला एक बारीकशी किनार लावलेली असते. कधी कधी यात फळाफुलांच्या अथवा पशुपक्ष्यांच्या वेधक आकृत्याही भरण्यात येतात. विवाहविधीत नववधूच्या प्रदक्षिणा घालण्याच्या प्रसंगी (भंवर) त्याचा वापर करण्यात येतो. यांखेरीज निकल, तीलपत्र असेही फुलकरीचे इतर प्रकार आढळतात. बाग या प्रकारात मात्र फुलकरीच्या मानाने खूप विविधता असते. यात चादरीचे वा शालीचे संपूर्ण पोतच नक्षीयुक्त असून त्या आकृत्या परस्परांशी संलग्न असतात. तसेच प्रत्येक आकृती स्वतः एक स्वयंपूर्ण आकृतिबंध असतो. त्यासाठी आडवा, उभा, तिरपा, लंबगोलाकार आणि वर्तुळाकार टाक्यांचा वापर करण्यात येतो. रंगांची विविधताही असते. वधूच्या आईकडून वधूला देण्यात येणारा ‘बरी-दा-बाग’ शुभ्र रेशमी धाग्याने भरलेला व आरशाप्रमाणे भासणारा ‘रेशमी शीशा’, ‘पंचरंग’, ‘सतरंग’, ‘धूपछाँव’, गडद निळ्या पार्श्वभूमीवर वर्तुळाकार आकृतिबंध असलेला ‘चंद्रमाबाग’, ‘मिर्झाबाग’, ‘शालीमार बाग’, ‘मिरची बाग’, ‘काकडी बाग’, ‘धनिया बाग’ तसेच ‘डोली’ व ‘करोवा चौथ’ इ. विविध प्रकार बागमध्ये आढळतात.

यांखेरीज आपले प्रादेशिक वैशिष्ट्य टिकवून ठेवणारेही काही फुलकरी व बाग-प्रकार प्रचलित आहेत. उदा., अलवानाचा प्रामुख्याने उपयोग करून नाजुक भरतकाम केलेली हजारा (पाकिस्तान) येथील मुसलमानी बाग-फुलकरी आणि आकृतिबंधाची सुबकता, भरतकामाचे कौशल्य व रंगांचा मेळ साधलेली हिंदू-शिखांची पंजाबमधील बाग-फुलकरी तसेच मध्यभागास धावत्या गाडीचे दृश्य आणि आजूबाजूला हवेलीचे उघडी दारे किंवा मध्यभागी हिरेमाणके व अवतीभोवती मनुष्याकृती वा पशुपक्ष्यांच्या प्रतिकृती यांनी सजलेली हिमालय प्रदेशातील रोहटकची मनोवेधक बाग-फुलकरी इत्यादी. गुरगाव, कर्नाल, हिस्सार, रोहटक व दिल्ली येथील फुलकरीचे उत्कृष्ट कामही प्रख्यात आहे.

पूर्वी फुलकरी ही विक्रीच्या दृष्टीने तयार करण्यात येत नसे. प्रत्येक कुटुंबात ती स्वतःसाठीच तयार करण्यात येई. आधुनिक काळात तरुण मुली पुस्तकातील आकृत्यांवरून ‘हेरिंगबोन’, ‘क्रॉसस्टिच’, ‘काश्मीरी टारोपर’, ‘कटवर्क’ व ‘शॅडोवर्क’ यांच्या साह्याने करतात. हल्ली सर्वच प्रकारच्या भरतकामयुक्त शाली वा चादरी यांना फुलकरीच म्हणण्याची प्रथा आहे.

पंजाब शासनाने या पारंपरिक कलेचे पुनरुज्जीवन करण्याचे प्रयत्न चालू केले आहेत. त्या दृष्टीने प्रशिक्षणाची सोयही केलेली असून या हस्तकलेचे उत्कृष्ट नमुने वेळोवेळी देशभर प्रदर्शने भरवून सादर करण्याचा उपक्रमही सुरू केलेला आहे.

संदर्भ : 1. Dongerkery, Kamala S. The Romance of Indian Embroidery, Bombay, 1951.

           2. Marg. Publications, Marg, Vol. XVII No. 2, Bombay, March, 1964.

           3. Mehta, Rustam, J.  The Handicrafts and Industrial Arts of India, Bombay, 1960.

जोशी, चंद्रहास