हस्तव्यवसाय :कारागिरांनी पूर्णपणे हातांनी किंवा पारंपरिक साधनांद्वारे बनविलेल्या कलाकुसरयुक्त दैनंदिन जीवनातील कलावस्तूंचा किंवा शोभेच्या विविध वस्तूंचा निर्मिती व्यवसाय. पारंपरिक व्यवसायांपैकी हा एक महत्त्वाचा व्यवसाय असून कारागीर आपली कल्पकता व कौशल्ये वापरून नैसर्गिक आणि टाकाऊ वस्तू व पदार्थ, साहित्य, कपडे व कागद इत्यादींचा वापर करून आकर्षक वस्तूंची निर्मिती करतात वस्तूंच्या उपयोगितेच्या दृष्टीने त्या वस्तूंची जडणघडण, घाट, रंग, आकार, पोत या घटकांचा नियोजनपूर्वक वापर करतात. कृतिसौकर्य हा यावस्तूंच्या निर्मितीमागील महत्त्वाचा निकष असतो. उपयुक्ततेबरोबरच सौंदर्य-दृष्टी असणाऱ्या व्यक्तींकडून अशा वस्तूंसाठी जगभरातून मोठी मागणी असते. दैनंदिन उपयुक्त वस्तूंचे सुनियमन करून त्यांचे रूक्षत्व घालविणे, त्यांना सौंदर्यरूप देणे हे हस्तव्यवसायाचे उद्दिष्ट आहे. आपला छंद जोपासत उपजीविका करण्याचे साधन म्हणून हस्तव्यवसायाकडे पाहिले जाते. अलीकडे यास पूर्ण वेळ व्यवसायाचे स्वरूप प्राप्त झाले आहे. हस्त-व्यवसायाची मुळे पूर्वाश्रमीच्या प्राचीन ग्रामीण संस्कृतीत व विशिष्ट प्रदेशात सीमित असली, तरी कालांतराने त्यामध्ये आधुनिकतेची भर पडूननिमशहरी भागांतूनही तो केला जातो. बहुसंख्य कारागीर नैसर्गिक अथवा उपलब्ध स्थानिक साहित्याचा विनियोग करून कलाकुसरीच्या वस्तूबनवीत असले, तरी काही कारागीर आधुनिक, अपारंपरिक व कार-खान्यातील निरुपयोगी पदार्थांना यासाठी पसंती देतात. हस्तव्यवसायात हस्तकलेला महत्त्व असल्याने मोठ्या प्रमाणावर अगर यांत्रिक पद्धतीने उत्पादित केलेल्या तत्सम वस्तू यात मोडत नाहीत. अनेकदा विद्यार्थ्यांच्या कलागुणांना, नवनिर्मितीच्या ऊर्मींना चालना देण्यासाठी औपचारिक तसेच अनौपचारिक शिक्षण व्यवस्थेचा भाग म्हणूनही हस्तकलेच्या वस्तूंची निर्मिती केली जाते. अशा वस्तू तयार करण्यासाठी कौशल्याबरोबरच संयमाची गरज असते. इच्छा असलेल्या कोणाही व्यक्तीला अशी कौशल्ये आत्मसात करता येतात.

 

भारताला हस्तव्यवसायाची ऐतिहासिक पार्श्वभूमी आहे. सिंधू संस्कृतीत (इ. स. पू. २७५०–१७५०) तिची पाळेमुळे दिसून येतात. हस्तकलेच्या वस्तुनिर्मितीतून उपजीविका करणारे असंख्य लोक या व्यवसायात कार्यरत असल्याचे दिसून येते. परकीय आक्रमणे व सामाजिक स्थित्यंतरे होऊनही हस्तव्यवसायात खंड पडलेला नाही. माती, धातू , दगड, कापड व तत्सम वस्तूंच्या साहाय्याने कलाकुसरीच्या वस्तू बनविण्याची हातोटी व प्रावीण्यहे सिंधू संस्कृतीचे वैशिष्ट्य मानले जाते. हडप्पा, मोहें-जो-दडो येथील उत्खननांत सापडलेल्या अनेक वस्तू याची साक्ष देतात. तत्कालीन ग्रामीण व निमशहरी भागातील कारागीर केवळ स्थानिक गरजांपुरतीच निर्मितीन करता, अशा अनेक उपयुक्त वस्तू समुद्रमार्गे अन्य देशांत पाठवीत असल्याचेही पुरावे मिळतात.

 

मौर्य काळात (इ. स. पू. ३२१–१८५) बांधलेल्या प्रसिद्ध सांची स्तूपासारख्या जवळपास अनेक स्तूपांचे बांधकाम भारतात झाले. या असंख्य स्तूपांवर दागिन्यांनी मढवलेली तत्कालीन स्त्रियांची अनेकशिल्पे आहेत. त्यावरून दागिने घडविण्याच्या उद्योगाला चालना देण्याचा प्रयत्न त्या काळी होत असे, हे दिसून आले आहे. मौर्यकाळानंतर मध्य आशियातील राजवटींकडून झालेल्या अतिक्रमणामुळे ग्रीक संस्कृतीचा प्रभाव भारतीय हस्तकलेवर जाणवतो. शिल्पकला तसेच कपडे, चामड्याच्या व धातूंच्या वस्तूंवरील कलांबाबत हे ग्रीकांश अनुकरण केले गेले. अजिंठा व वेरूळ लेण्यांतील कारागिरांच्या कोरीव नक्षीकामात विणकामाचे काही नमुने आढळतात. भारतात मध्ययुगात दिल्लीच्या सल्तनत राजवटीत मातीची भांडी, धातू , लाकूड यांवरील नक्षीकाम, दागिनेघडविणे या कलांची भरभराट झाली व त्याचबरोबर हा व्यवसायउत्तरेकडून दक्षिणेकडील राज्यांकडे सरकला. दक्षिणेतील चोल व विजयानगर राजवटीत धातुशिल्प, रेशीम विणकाम, दागिने घडविणे, मंदिरावर कोरीव नक्षीकाम करणे या गोष्टींना प्राधान्य देण्यात आले. दक्षिण हिंदुस्थानात ब्राँझच्या मूर्ती बनविण्याचा हस्तव्यवसाय मोठ्या प्रमाणावर होता. त्यांतील काही सुबक मूर्ती जगप्रसिद्ध आहेत [→ ब्राँझशिल्प]. दक्षिण भारतातील हस्तव्यवसायावर तेथील धार्मिक रूढींचा मोठा प्रभाव दिसून येतो.

 

भारतातील हस्तव्यवसायास विविध सत्ताधाऱ्यांनी मोठे प्रोत्साहन दिले. परिणामतः हस्तकलेत सांस्कृतिक विविधता, सौंदर्यदृष्टी, धार्मिक व पारंपरिक गोष्टींचे दर्शन घडते. देशात पारंपरिक हस्तकलेला नावीन्याची जोड देऊन राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील प्रदर्शनांच्या माध्यमातून प्रगती साधली जात आहे. महाराष्ट्रात हस्तकलांची दीर्घ परंपरा आहे. यांतीलकाही व्यवसाय कालानुरूप लोप पावले असले, तरी बरेचसे व्यवसायटिकून आहेत आणि ते वाढत आहेत. पेण येथील सुबक गणेशमूर्ती, डहाणू येथील वारली पेंटिग्ज, कोल्हापुरी साज व चामडी चप्पल, हुपरी येथील चांदीच्या विविध कलाकुसरयुक्त वस्तू (विशेषतः नक्षीकाम केलेली ताटे, अत्तरदाण्या, गुलाबदाण्या, कुंकवाचे करंडे, विविध आकारातील भांडी इ.), पैठण व येवल्याच्या पैठणी, त्याचबरोबर खडीकाम केलेली काळी चंद्रकळा साडी, सातारा जिल्ह्यातील घोंगडी, वेल्ह्यातील (पुणे जिल्हा) अडकित्ते व विळ्या इ. उत्पादने प्रसिद्ध असून त्यांची निर्यातहोते. राजस्थानात हस्तकला हा एक पारंपरिक व सुस्थितीतील व्यवसाय असून त्या राज्यातील अंबर, अजमीर, बुंदी, जयपूर, कोटा, उदयपूर आदी शहरांतून तो सांप्रत प्रगतिपथावर आहे. त्यामध्ये कापडावर रंगकाम व नक्षीकाम करणे, चित्रांना आकर्षक तैलरंग देणे, विविध प्रकारच्या नाट्यबाहुल्या व संगमरवरी हस्तिदंती मूर्ती, लाखकाम व तारकाम वस्तूया बाबींचा अंतर्भाव होतो. येथे केवळ उपजीविकेचे एक साधन म्हणून नव्हे, तर ऐतिहासिक वारसा लाभलेला व्यवसाय म्हणून त्याकडे पाहिले जाते. राजस्थानात बांधणी रंगकाम, विणकाम, चांदीचे दागिने, मीनाकरी, लाकूड कोरीवकाम, पेंटिंग, लघुचित्रकला, टेराकोटा अशा अनेक हस्त-कलाकृती तयार होतात. शेजारच्या गुजरात राज्यामध्येही त्या आढळतात. सुती कापडाच्या निर्मितीबरोबर विणकाम, भरतकाम, रंगकाम करणारे कारागीर मोठ्या प्रमाणावर तेथे आहेत. आकर्षक दुपट्टा, घागरा, फेटे यांशिवाय प्लॅस्टिक तसेच धातूंच्या चकाकणाऱ्या, शिंपल्यांचा वापर केलेल्या बांगड्या ही येथील काही वैशिष्ट्ये होत. काश्मीरमधील उत्तम कशिदाकाम केलेल्या आणि विणलेल्या रेशमी शाली व गालिचे जगभर प्रसिद्ध आहेत. शिवाय येथील चांदीचे दागिने, चामड्याच्या विविध वस्तू , लाकडी शोभेच्या वस्तू व खेळणी प्रसिद्ध आहेत. भारताच्या ईशान्येकडील आसाम राज्यात सुती कापड तसेच वेतकामाच्या टोपल्या, खुर्च्या, चटयाइ. कलात्मक वस्तूंची निर्मिती मोठ्या प्रमाणावर होते. आसामी रेशमी किड्यापासून तयार होणारे मुलायम मुगा रेशीम सर्वत्र प्रसिद्ध आहे.येथील पंचवीस हजारांहून अधिक कुटुंबे रेशीम व कापड उद्योगातील कारागिरीशी संबंधित आहेत. ओडिशा राज्यात बांबूपासून बनविलेल्या वस्तू , लाकडी कोरीवकाम केलेले फर्निचर, काचेवरील नक्षीकाम, कागदाच्या लगद्यापासून बनविलेल्या वस्तू , दागिने, खेळणी, चामड्याच्या पर्स, पाकिटे अशी अनेक हस्तव्यवसायाची उत्पादने बाजारात आढळतात. तमिळनाडू येथे गृहोपयोगी भांडी, विविध आकारातील फुलदाण्या, चामडी पर्स, कापड, लोकर, माती, कागद अशा हलक्याफुलक्या वस्तूंपासून बनविलेली पारंपरिक खेळणी इ. पहावयास मिळतात. हातमागाच्या व्यवसायावर येथील अनेक कुटुंबे उदरनिर्वाह करतात. कांचीपुरम्च्या कांजीवरम् या कशिदाकाम केलेल्या साड्या प्रसिद्ध असून रेशमी वस्त्र-प्रावरणे बनविण्याच्या हस्तव्यवसायात येथील अनेक कुटुंबे गुंतलेली आहेत. हरियाणातील सूरजकुंड येथील जत्रा हस्तकलेद्वारा उत्पादित वस्तूंच्या व्यापारासाठी प्रसिद्ध असून येथे देश-विदेशातील पर्यटक मोठ्या प्रमाणावर भेट देतात.

 

सद्यःस्थितीत जागतिकीकरणाच्या पार्श्वभूमीवर या व्यवसायाचे अस्तित्व टिकविण्यासाठी शासकीय, निमशासकीय व स्वयंसेवी संस्थांच्या पातळीवर प्रयत्न होत आहेत. देशातील नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ फॅशन टेक्नॉलाजी (निफ्ट) ही संस्था पारंपरिक हस्तकलेबरोबरच त्यात नावीन्यता आणण्या-साठी विविध अभ्यासक्रम राबवीत आहे. कच्च्या मालाचे चढे दर वउपलब्धतेच्या मर्यादा यांमुळे या व्यवसायाचा मूळ आधार असलेल्या कारागिरांना झगडावे लागत आहे. अडचणी असल्या, तरी गेल्या पन्नास वर्षांत तेवीस कोटींवरून नऊ हजार कोटी रुपयांची निर्यात या व्यवसायाच्या माध्यमातून झाल्याचे ऑल इंडिया हँडीक्राफ्ट बोर्डाच्या आकडेवारीतून स्पष्ट होते. सेंट्रल कॉटेज इंडस्ट्रीज कार्पोरेशन प्रायव्हेट लिमिटेड (१९४८), राष्ट्रीय पातळीवर स्थापन केलेले ऑल इंडिया हँडीक्राफ्ट बोर्ड (१९५२), हँडीक्राफ्ट ॲण्ड हँडलूम एक्स्पोर्ट कार्पोरेशन ऑफ इंडिया (१९६२), तसेच विविध राज्यांतील संबधित शासकीय विभाग हस्तव्यवसायाला चालना देण्याबरोबरच कुटीर उद्योगांना अर्थपुरवठा व विपणनवृद्धीसाठी साहाय्य करीत आहेत. यांशिवाय संबंधित व्यापारी व कारागिरांच्या संघटनाही व्यवसायवृद्धीसाठी प्रयत्नशील आहेत. पारंपरिक वस्तूंबरोबरच कापड, चामडे, हस्तिदंत, साधा व कॅनव्हास कागद, लाकूड, छोट्या वनस्पती, दगड, माती, धातू , काचसामान आदींपासून नावीन्यपूर्ण व सुबक कलाकुसरीच्या वस्तूंची निर्मिती करण्यात येत आहे. शाळा, महाविद्यालये तसेच स्वायत्त संस्थांच्या माध्यमातून तरुणांना हस्तव्यवसायाचे प्रशिक्षण दिले होते.

 

रोजगारनिर्मितिक्षमता, कमी भांडवल गुंतवणूक, उच्च किमती प्राप्तता आणि निर्यातक्षमता या दृष्टीने भारतीय अर्थव्यवस्थेत हस्तव्यवसायास महत्त्वपूर्ण स्थान आहे. या व्यवसायातून जवळजवळ ६५ लाख हस्तकला कारागिरांना रोजगार प्राप्त झाला असून त्यांत अनुसूचित जाती आणि जमातींच्या लोकांची संख्या अधिक आहे (२०१०). हस्तव्यवसायात कार्य करणाऱ्या या कारागिरांसाठी केंद्र सरकारने २००७ मध्ये राजीव गांधी शिल्प स्वास्थ्य विमा योजना सुरू केली असून त्याद्वारे या कुटुंबांनाआरोग्य सेवा पुरविल्या जातात. भारतीय अर्थव्यवस्थेत विदेशी चलन प्राप्त करण्यात हस्तव्यवसाय अग्रेसर असून (चलन रुपयांत) ७१३ कोटी (१९९१), २०,९६३ कोटी (२००६-०७), १७,५३७ कोटी (२००७-०८), आणि १०,८९२ कोटी (२००८-०९) एवढे विदेशी चलन या व्यवसायाने प्राप्त केले आहे.

 

चौधरी, जयवंत