पिसांचे कलाकाम : विविध पक्ष्यांच्या रंगीबेरंगी पिसांचा उपयोग अलंकरणासाठी करण्याची प्रथा जुनी व सार्वत्रिक आहे. बाणाच्या पुच्छभागी पिसे लावणे, विविध प्रकारची शिरोभूषणे पिसांनी सजविणे, परांच्या गाद्या करणे, हंसपिसांचा लेखणीसारखा वापर करणे व मोरपिसांचे पंखे तयार करणे इ. प्रकार सर्वच समाजात कमीअधिक फरकाने आढळतात. 

प्राचीन काळापासून पुष्कळ आदिम जमातींत पक्ष्यांच्या पिसांचा उपयोग जमातीच्या चालीरीतीचा एक भाग म्हणून केला जाई. प्राचीन काळी अमेरिकेतील रेड इंडियन पुरुष आपल्या केसांत पिसे खोवीत. ते एक मानाचे चिन्ह मानले जात असे. त्यांचे केसांचे टोप गरुडाची पिसे लावून सजविलेले असत. आधुनिक काळातही अमेरिकेत पक् पक्षी, रानटी टर्की, सुतार पक्षी, घुबड, हंस व बहिरी ससाणा यांसारख्या पक्ष्यांच्या पिसांपासून पंखे तयार करण्यात येतात. आफ्रिकेतील काही आदिम जमातींत शहामृगाच्या मोठ्या पिसांचा उपयोग शिरोभूषणे म्हणून करीत.

हवाई बेटांतील सरदारवर्गात कोट, चिलखते इ. लाल, पिवळ्या, काळ्या पिसांनी अलंकृत करण्याची प्रथा असल्याचे दिसते. आपल्या देवतेला ते लाल रंगाच्या छोट्या परांनी शृंगारित असत.

मेक्सिकोमधील आदिवासी पिसांचे टोप तयार करताना खालच्या थरात लांब व वरच्या थरात आखूड पिसे गोठवून ते एका मऊ कापडावर चिकटवीत. त्याची वर्तुळरेषा गुलाबी पार्श्वभूमीवर सोनेरी रंगाची असे व मध्यभाग निळ्या रंगाचा करण्यात येई. दुसऱ्या एका प्रकारात मात्र ही पिसे मागील बाजूने एकमेकांत दोऱ्याने शिवून टाकण्यात येत. या पिसांचा रंग हिरवा असून ती क्केट्झल् या सुंदर पक्ष्याची असत.

दक्षिण अमेरिकेतील पेरूमधील वाका प्रिएटा येथील उत्खननात इ. स. पू. २००० वर्षांपूर्वीचा एक पिसांच्या वस्त्राचा नमुना आढळला आहे. त्यात दोन दोन पिसांची टोके कापूसधाग्यात गाठ मारून गुंफलेली आढळतात. ते वस्त्र रंगीत असून अतिशय उजळही दिसते. यावरून प्राचीन काळी पिसांची वस्त्रे विणण्याची प्रथा असल्याचे अनुमान करता येते.

आधुनिक काळात पिसांचा वापर गाद्या, उशा, रजई अशा विविध वस्तू बनविण्याकडे करण्यात येतो. त्यामुळे दरवर्षी हजारो टन पिसे खर्ची पडतात. सर्वप्रथम उपयोगात आणण्यात येणाऱ्या पिसांची निवड करून त्यांची वर्गवारी करण्यात येते. त्याचप्रमाणे त्याचा आकार, वजन, तणाव, पोत, घनता व वजन पेलण्याची क्षमता इत्यादींचाही विचार करण्यात येतो. पिसांचा शेंड्याकडील भाग अधिक मऊ असतो, तर खालचा भाग अधिक ताठर असतो. म्हणूनच परांच्या गाद्या करताना पिसांच्या या दोन्ही अंगांचा प्रमाणशीर मेळ घालून योग्य तो तणाव निर्माण होईल, याची काळजी घेतली जाते. याच दृष्टीने केवळ हंसाची, कोंबडीच्या पिलांची वा टर्कीची पिसे निरुपयोगी ठरतात. म्हणून हंस व बदक यांची पिसे एकत्र करून ती गाद्यांसाठी वापरण्यात येतात. एखाद्या पक्ष्याची पिसे जर कडक, लवचिकपणा नसलेली व वजनाने जड असतील, तर गादीमध्ये तणाव निर्माण न होता तिच्यात चटईसारखा सपाटपणाच येतो.

अशा पिसांपासून विविध प्रकारचे ब्रश वा कुंचले तयार करतात. उदा., चित्रकारांचे कुंचले, लेखण्या तसेच बाटल्या-नळ्या स्वच्छ करण्याचे ब्रश इत्यादी. पांढऱ्या शुभ्र पिसांपेक्षा रंगीत पिसांना सुंदर वस्तूंच्या दृष्टीने फार महत्त्व असते. पाळीव पक्ष‌्यांच्या पिसांचा वापर बहुधा हातपंखे, कृत्रिम फुले इ. तयार करण्यासाठी होतो. बाणाच्या पुच्छभागी पिसे लावलेली असतात तसेच मासे पकडण्यासाठी काठीचा गळ असतो, त्यालाही पीस लावलेले असते. स्त्रियांचे लोकरी वा रेशमी कोट व टोप्या अलंकृत करण्यासाठीही रंगीबेरंगी पिसे वापरली जातात. दुसऱ्या महायुध्दाच्या वेळी पिसांचा वापर ⇨ मायावरण म्हणूनही करण्यात आला होता, असा उल्लेख मिळतो. चीनमध्ये अजूनही कोंबडीची वा कबुतराची पिसे एका वेताच्या छडीभोवती चिकटवून त्यांचे पंखे तयार करण्याची पध्दत आहे. या पंख्यांचा उपयोग आरसे व काचेच्या वस्तू स्वच्छ करण्यासाठी करण्यात येतो.

भारतामध्ये मोरपिसांचा वापर प्राचीन काळापासून रूढ असल्याचे दिसते. श्रीकृष्णाचा मुकूट मोरपिसांचा असल्याचे उल्लेख प्राचीन वाङ्‌मयात आहेत. त्याला अनुसरून आजचा वासुदेवही मोरपिसांचा टोप वापरतो. मोरचेल हे राजचिन्हही मोरपिसांचेच असून त्याचा उपयोग पूर्वीचे राजे करीत असत. त्याकाळी सावंतवाडी, मुंबई, पुणे व कोल्हापूर येथील जिनगर लोक मोरचेल तयार करण्याचे काम करीत. आजही जैन मुनी मोरपिसांचे कुंचले वापरताना आढळतात. काही ठिकाणी हिंदूंच्या देवालयातही मोरपिसांचे कुंचले वापरण्यात येतात. मुसलमान समाजातही मोहरमच्या वेळी अंगात दुल्हा येणाऱ्या व्यक्तीचे तोंड मोरपिसांनी झाकण्याची प्रथा आहे तर कधीकधी सवारी मोरपिसांनी झाकलेली आढळते. याखेरीज कलात्मक पंखे तयार करण्यासाठीही मोरपिसे वापरतात. इतर पक्ष्यांच्या पिसांचा वापर कलात्मक चित्रचौकटीसाठी तसेच हस्तकलांच्या निर्मितीत केला जातो.

भारतातील काही आदिवासी जमातींत शिरोभूषणांना तसेच काही वस्त्रविशेषांना सजविण्यासाठी मोरपिसांचा उपयोग करतात. इतर पक्ष्यांच्या पिसांचाही या कामी वापर केला जातो. (चित्रपत्र ४२).

पहा : पीस. 

जोशी, चंद्रहास

अमेरिकन इंडियनांचा पिसांचा साजमोरपिसांचा सूर्यपंखा, नेपाळ.