बीदरचे कलाकाम : भारतीय धातुकामाचा हा प्रकार बिद्रीकाम वा वीदरीकाम म्हणूनही ओळखला जातो. हैद्राबादजवळील बीदर हे गाव या कलाकामासाठी प्रसिद्ध असल्याने बिद्रीकाम हे नाव रूढ झाले. बिद्रीकामाचे मूळ तंत्र तारकशीचे आहे. उत्तर प्रदेशातील मैनपुरी येथे लाकडी खडावांवर नक्षी खोदून त्यात पितळेची तार कसण्यात येई. हेच तंत्र पुढे मणिपूर व बीदर येथील कारागिरांनी वापरले.⇨ कोफ्तगारीशी त्याचे बरेच साम्य आहे.

 भारतीय टपाल तिकिटावरील मोगलकालीन बिर्दीपात्राचे (सुरईचे) चित्र.

बिद्रीकामासाठी शिसे, तांबे व जस्त यांच्या मिश्रधातूंची भांडी तयार करून वापरतात. या भांड्यांवर नक्षी खोदून त्या नक्षीमध्ये चांदीची तार वा पातळसर पत्रा ठोकून बसविण्यात येतो. हा मिश्रधातू गंजत नाही आणि म्हणून त्यावरील नक्षीकाम अबाधित राहते. 

बिद्रीकामाचे सामान्यतः पुढीलप्रमाणे प्रकार अथवा शैली आढळून येतातः (१) तारकशी, (२) तैनिशान, (३) झारनिशान, (४) झारबुलंद व (५) आफ्ताबी. अनेकदा एकाच भांड्यावर मिश्र शैलीचाही वापर करण्यात येतो.

उत्तर प्रदेशातील मैनपुरीच्या तारकशीचा प्रसार सर्व भारतभर झाला असला, तरी पंजाब व दिल्ली येथील लाकडी फर्निचर-वस्तूंवरील तारकशीचे काम विशेष प्रसिद्ध आहे. केरळमधील त्रिवेंद्रम येथे बिद्रीकामात पितळेच्या तारेऐवजी चांदीची तार वापरतात. येथील सचित्र लाकडी फलक वेधक असतात.

तैनिशान पद्धतीत खोबणीमध्ये तारेऐवजी पत्रा वापरण्यात येतो तर झारनिशान पद्धतीत चांदीचा पत्रा उथळसर खोबणीत थोड्याशा उठावाने आणि झारबुलंद पद्धतीत खोलगट खोबणीत जास्त उठाव देऊन तो पक्का बसवितात त्यामुळे तो घट्ट बसतो. नंतर ते भांडे गंधक, मृत्तिका (चिकणमाती) व नवसागर यांच्या मिश्रणात बुडविण्यात येते. त्यामुळे जस्ताचे रूपांतर काळ्या मखमली रंगात होते आणि संपूर्ण भांडे काळेशार व चांदीची नक्षी पांढरी चकचकीत होऊन त्याची आकर्षकता वाढते. आफ्ताबी पद्धतीत भांड्यावर नक्षी काढली की, मग त्या भांड्याच्या उर्वरित पृष्ठभागावर रासायनिक क्रिया (अँसिड बाथ) करून तो खरखरीत करण्यात येतो त्यामुळे नक्षीकाम उठून दिसते. मुमाबतकारी हा प्रकारही वैशिष्ट्यपूर्ण असून त्यात उठावाचे चित्रांकन करण्यात येते. बिद्रीकामाच्या परंपरागत वस्तूंत हुक्के, चमचे, सुऱ्या, गुंड्या (कासंड्या), सुरया इ. अंतर्भूत होतात. फर्निचर-वस्तूंचे गोलाकार पाय वा लाकडी पलंगाचे लांबट पाय इत्यादीवर बिद्रीकाम अतिशयच वेधक दिसते. यांखेरीज पिसारा फुलविलेल्या मोराचे चित्र असलेल्या नक्षीदार अष्टकोनी मंजुषा, विड्याच्या पानाच्या आयताकार पेट्या, नारळाकृती दीपाधार, आरशाच्या वेलबुटीदर चौकटी, मत्स्याकार तबके व कमलाकार फुलपात्रे इ. बिद्रीकामयुक्त प्रकार वैशिष्ट्यपूर्ण वाटतात. हे सर्व प्रकार हैदराबाद व त्याच्या पंचक्रोशीत तयार होतात. विवाहप्रसंगी नववधूला बिद्रीवस्तूंचा संपूर्ण संच देऊन लग्नाचा मानपान पूर्ण करण्याचा तेथील मुस्लिम समाजाचा रिवाज आहे. भारत सरकारने १९६८ साली मुद्दाम बिद्रीपात्राचे तिकीट (दोन पैशांचे) काढले होते.

उत्तर प्रदेशातील लखनौ आणि प. बंगालमधील मुर्शिदाबाद व बिहारमधील पृर्णिया इ. ठिकाणीही बिद्रीकाम होते. तेथे पितळेवर जस्ताच्या तारेने बिद्रीकाम करण्याची प्रथा आहे.

पहा : धातुकलाकाम.

संदर्भ : 1. Chattopadhyay, Kamaladevi, Handicrafts of India, New Delhi, 1975,

           2. Mukharji, T.N. Art-Manufactures of India, New Delhi, 1974.

जोशी, चंद्रहास आपटे, ज. पां.