(१) असुरबनिपालकालीन (कार. इ. स. पू. ६६९ ते ६३०) ॲसिरियन युद्धरथ. (२) मिर्झापूर गुहेतील रथचित्र, भारत, इ. स. पू. ८००. (३) राजपरिवाराचे वाहन ꞉ चार घोड्यांचा भारतीय रथ, महाजन जातकावरून. (४) राजपरिक्रमाप्रसंगीचा रथ, भारत, सांची स्तूपावरील शिल्पचित्र, इ. स. पू. २-१ शतक. (५) हिटाइट युद्धरथ, इ. स. पू. १३ वे शतक. (६) सुमारे पाच हजार वर्षांपूर्वीचा चारचाकी सुमेरियन रथाचा नमुना. (७) ग्रीसमधील रथाचा नमुना, इ. स. पू. ४ थे शतक. (८) वेदकालीन रथांची रेखाचित्रे, भारत.

रथ : एक प्राचीन वाहनप्रकार. या वाहनप्रकाराचा प्रचार आणि महत्त्व ऋग्वेदकालापासून आढळते. ऋग्वेदात रथ ही एका ऋचाची (ऋग्वेद ६·४७·२६–२८) देवता आहे. ‘नमो रथेभ्यः रथपतिभ्यश्च वो नमः’ अशी रथप्रशस्ती यजुर्वेदात दिसून येते. ब्राह्मणग्रंथांतही यज्ञांच्या संदर्भात रथाला आणि रथचक्राला लक्षणीय स्थान मिळाले आहे. पुराणादी ग्रंथांवरून, रथाला चतुरंग सैन्यात दाखल केले आहे, असे दिसते. ⇨ कोनारकच्या सूर्यमंदिराच्या शिल्पातही रथाचे महत्त्व प्रतिबिंबित झालेले दिसते.

देवांचे सुतार सौधन्वन ऋभू रथ निर्माण करण्यात कुशल होते. सूत्रकाळी, ऋग्वेदीय ऋभूंची जातकुळी सांगणारी रथकारांची जात निर्माण झाली. अस्त्याधानाचा अधिकार प्राप्त होण्याइतकी या जातीची प्रतिष्ठा होती.

रथ हा उत्त जमातीच्या वनस्पतीचा (सुद्रवम् ऋग्वेद ७·३२·२०) बनवीत. रथाचे चाक किंशुक किंवा शाल्मली वृक्षाच्या लाकडाचे बनविले असल्याचा उल्लेख ऋग्वेदात (१०.८५.२०) आहे.

वाजपेय आणि राजसूय यज्ञांच्या संदर्भात सांग्रामिक रथांना ‘इंद्राचे वज्र’, ‘वार्त्रघ्न’ असे संबोधिले आहे. रथ म्हणजे वज्राचा तिसरा अंश असल्याचे अर्थवादही ब्राह्मणग्रंथांत आढळतात. रथ अतिशय वेगवान असत, म्हणून त्यांना ‘अशमरथ’ असे संबोधित. ध्वनी आणि वायू यांच्या बरोबरीने रथांची चाके पळत असल्याचा उल्लेख (‘ध्वान्तं वाताग्रमनुसंचरन्तौ’–तैत्तिरिय संहिता १·७·७) यजुर्वेदात मिळतो. ऋग्वेदात अशा रथांना ‘रघुद्रु’ (१·३८·१२) असे विशेषण लावलेले आढळते. त्यांना ‘स्वनद्रथ’ असेही म्हटलेले दिसते. ऋग्वेदातील ‘मनो अस्याः अन आसीत्‌’ या, जणू मनोरथाच्या संकल्पनेस जन्म देणाऱ्या रूपकावरूनही रथांचे मनोजवित्व स्पष्ट होईल. मरुतांचे वाहन असलेल्या विद्युत्‌-रथाचे किंवा ‘त्वेष-रथा’चे उल्लेख ऋग्वेदात उपलब्ध होतात. रथाच्या वेगाचे वर्णन कालिदासानेही शाकुंतल नाटकाच्या पहिल्या अंकात केले आहे.

‘पत्र्चार’, ‘षळर’, ‘द्वादशार’, ‘सप्तदशार’ अशा रथचक्रांच्या वैदिक उल्लेखांवरून रथांच्या चाकांना आरे असत, असे दिसून येते. चाकाच्या मध्यभागी असलेल्या नाभीत व भोवतीच्या वर्तुळाकार नेमींत आरे बसविलेले असत. नेमीभोवती ‘प्रधि’ म्हणजे धाव असे. रथाच्या दोनही झाकलेल्या बाजूंना बहुधा ‘उपाधि’ (ऋग्वेद २·४०·४) अथवा ‘अङ्क’ (तैत्तिरिय संहिता १·७·७) अशा संज्ञा होत्या. रथ प्रायशः बेलाच्या चामड्याने (गोभिः संनद्धः) मढवलेले असत. उत्तरकाळात पांढरे किंवा काळे कांबळे, गेंड्याचे अथवा हत्तीचे कातडेही यासाठी वापरीत.

सामान्यतः रथांना दोन घोडे आणि दोन चाके असत. तथापि ‘प्रष्टिमत्‌’ किंवा ‘प्रष्टिवाही’ रथांचाही वेदांत उल्लेख आहे. अशा रथांना तीन चाके असून तीन घोडे जुंपलेले असत. तीन चाकांपैकी कुठलेही चाक पुढे करून त्या दिशेला रथ सहजी वळविता यावा, अशा रीतीने तीन चाके बसविली जात. अशा रथांमध्ये डावीकडे आणि उजवीकडे बसणारे दोन सारथी असत.

सांग्रामिक रथांमध्ये ‘दूरेहेति’, ‘इन्द्रियावान्‌’ आणि ‘पतत्री’ (=पक्ष्याकार) नावांचे ‘अग्नि’ (अस्त्रे) (तैत्तिरिय संहिता १·७·७) ठेवलेले असत.

विश्रांतिकाळात रथ जमिनीवर न ठेवता रथवाहनावर, म्हणजे लाकडी पीठावर ठेवीत.

संग्रामाव्यतिरिक्त्त रथांचा वेगवान वाहन म्हणून उपयोग होत असे. अश्विनौ देवांचा रथ आणि उषादेवतेचा बृहद्रथ यांचाही वेदांत उल्लेख आहे. वैनयिक रथ हा सैन्यातील शिकाऊ सारथींना रथविद्येचे शिक्षण देण्यासाठी वापरीत. क्रीडारथ, पुष्य (पुष्प) रथयात्रांसाठी, सुखप्रवासासाठी वापरीत. गर्भार सीतेस वनात घेऊन जाणाऱ्या ‘अस्खलितसंपात’ रथाचा, म्हणजेच धक्के न बसणाऱ्या रथाचा उल्लेख भवभूतीने उत्तररामचरितात केला आहे.

रथांवर ‘केतु’ (ध्वज) लावण्याची प्रथा वेदकाळीही होती. कालिदासानेही चीनांशुक केतूचा उल्लेख केला आहे. अर्थशास्त्रात रथाच्या स्वतंत्र पथकाचा तपशील देणाऱ्या कौटिल्याच्या काळापर्यंत रथांचा सांग्रामिक आणि औपवाह्य म्हणून उपयोग होत असे.

देवादिकांच्या रथयात्रेसाठी तयार केले जाणारे रथ अनेक चाकांनी युक्त्त, क्वचित अनेकमजली आणि कलात्मकतेने सजविलेले असतात. ते दोरखंडाने, माणसे संथपणे ओढून नेतात. देवांच्या रथयात्रांचे वर्णन पुराणांत मिळते. अशा रथयात्रा आजही चालू आहेत.

देवालयांनाही रथाचा आकार देण्याची प्रथा वास्तुशिल्पशास्त्रात प्राचीन काळापासून असावी. हंपीच्या विठ्ठलस्वामी मंदिराची आणि कोनारकच्या सूर्यमंदिराची रचना ही याची उदाहरणे होत. पारशांच्या अवेस्ता ग्रंथातही रथ आणि रथाच्या चाकांचे उल्लेख आहेत (यश्त १९·४३–जाँम्‌ चख्रॅम्‌ अस्मनॅम्‌ रथॅम्‌…). त्यावरून प्राचीन इराणमध्येही रथ हा वाहनप्रकार अस्तित्वात होता, असे दिसून येते. ‘रथएश्ता’ (रथेष्ठाः) ही युद्धकर्त्या क्षत्रियांची जात प्राचीन इराणमध्ये होती.

प्राचीन काळी भारताप्रमाणेच सुमेरिया, ईजिप्त, ॲसिरिया, बॅबिलोनिया, खाल्डिया, ग्रीस इ. देशांत रथसदृश वाहनप्रकार प्रचारात होते.

 

सिंधू खोऱ्यातील छन्दुदारो व मेसोपोटेमियातील तेल अग्रच येथे रथाच्या ताम्र प्रतिकृती उपलब्ध झाल्या आहेत. मेसोपोटेमियातील अर येथील एका चित्रावरूनही तेथील युद्धरथाची कल्पना येते. इसवी सनापूर्वी चीनमध्ये रथांचा वापर होऊ लागला होता. चीनच्या शँगनामक राज्यकर्त्याने घोडे जुंपलेल्या व आरे असलेल्या चाकांच्या रथामुळे राज्यविस्तार केला, असा निर्देश मिळतो. अलेक्झांडरशी झालेल्या युद्धात पोरस राजाने रथांचा वापर केल्याचा निर्देश आहे. त्यानंतर मात्र सांग्रामिक व औपवाह्य रथांचा प्रकार प्रचारातून नाहीसा झाला.

लेखक : धर्माधिकारी, त्रि. ना.