लॅकरकाम : (लॅकरवर्क) लॅकरच्या उपयोगाने करण्यात येणारे कलाकाम किंवा सुशोभन. ‘लॅकर ’ हा शब्द ‘लॅक’ या शब्दापासून तयार झाला असून ‘लॅसिफर लॅका’ ह्या भारतातील लाखेच्या किड्यावरून आलेला आहे. चीन हे लॅकरकामाचे मूलस्थान मानले जाते.

लॅकरचा उपयोग तैलरंगाप्रमाणे भित्तिपत्रिका, भित्तिपत्रे आणि छोट्या पेट्यांवरील शिकारीचे देखावे यांचे संरक्षण होण्याच्या दृष्टीने मध्ययुगीन काळात करण्यात येऊ लागला. फ्रान्समध्ये राजवाड्याच्या सुशोभनासाठी, तर सोळाव्या शतकात ग्रंथवेष्टने, लेखनसामग्री ठेवण्याच्या पेट्या व शाईच्या बाटल्या यांवर मृगयेची चित्रे व फुले रंगविण्यासाठीदेखील लॅकरचा उपयोग केला जाई.

लॅकरकामयुक्त फर्निचर १६९०-१७३० या काळात अतिशय लोकप्रिय ठरले. ते देवदार किंवा ओक वृक्षापासून बनलेले, अलंकृत व तैलरंगांनी सुशोभित असे होते. अमेरिकेत तयार झालेले लॅकरकामयुक्त फर्निचर हे पाइन वृक्षाच्या लाकडापासून बनविलेल्या फर्निचरसारखे होते. त्याच्या पृष्ठभागास तैलरंग, धातुपत्रे आणि चूर्ण यांनी आगळेच स्वरूप (झिलई) प्राप्त झालेले आढळते.

लॅकरकामयुक्त अलंकरणाच्या विविध पद्धती अस्तित्वात आहेत. त्यांपैकी दोन प्रमुख मानल्या जातात : कोरीव (खोदीव) अलंकरण व पृष्ठभागावरील अलंकरण. चिनी लॅकरकाम कोरीव व अलंकरणयुक्त आहे. लाकडाचे अनेक स्तर कापून त्यांवर विविध रंगांचे लॅकरकाम केलेले आढळते. पृष्ठभागावरील लॅकरकाम करण्यात जपानी लोक अग्रेसर आहेत. त्यांच्या लॅकरकाम पद्धती संमिश्र प्रकारच्या व कालानुरूप बदलणाऱ्या ओहत. जपानी लॅकरकाम-प्रक्रियांत ‘माकी’ ही पद्धत लोकप्रिय झाली. लॅकरकामात, बरीच विविधता असली, तरी हवे ते नक्षीकाम करण्यासाठी सोन्याचा वा चांदीचा मुलामा देण्याची माकी ही पद्धत प्रभावी मानतात. किरिकानी (कापलेला धातूचा तुकडा) हा जपानी अलंकरणाचा दुसरा प्रकार. यात धातूंच्या तुकड्यांत सोने, चांदी किंवा पत्र्याचे चौरस तुकडे वापरून अलंकरण करतात. ‘राडेन ’ (धातूचे वेष्टन) हा जडावकामाचा दुसरा प्रकार. चिनी लोकांचा हा आवडता प्रकार मानला जातो. त्यांचे लॅकरकाम अलंकरणयुक्त व चकाकणाऱ्या  निळ्या आणि हिरव्या रंगांच्या धातुपत्र्यांनी केलेले असते. यांशिवाय हरित मणी, पोवळे हस्तिदंत-शिल्पन यांचा चिनी लोक जडावकामासाठी उपयोग करतात.

यूरोपमध्ये सोळाव्या शतकात कलासंशोधनाला बराच वाव होता. चिनीमातीची भांडी व लॅकरकाम यांच्या लोकप्रियतेमुळे युरोपीय कारागिरांनी या धंद्यात प्रवेश केला. सतराव्या शतकानंतर यूरोपमध्ये विविध भागांत लॅकरकामचे संशोधनकार्य सुरू झाले. त्यामुळे शुद्ध लाख-उत्पादनाचे प्रयत्न सुरू झाले. याचा परिणाम जपानमधील फर्निचर व दागिन्यांची मागणी वाढून लॅकरकाम व्यापाराचा अधिक प्रसार झाला. 

लाकडावर तैलरंगाचा वापर करून लॅकरकामयुक्त वस्तूंच्या उत्पादनात जपानी प्रक्रिया (जॅपॅनिंग) अधिकच लोकप्रिय ठरली आहे. जपानमधील धंदेवाईक लोकांनी ह्या प्रक्रियेचे संशोधन करून तिचा प्रसार केला. त्यामुळे अधिक आलंकारिक वस्तूंचे उत्पादन होऊन त्यांची लोकप्रियता वाढली व संबंधित वस्तु-उद्योग स्थिरस्थावर झाला. स्टालकर आणि पारकर यांनी लिहिलेल्या ‘जपानी प्रक्रिया व तैलरंग’ यांवरील विवेचनग्रंथ १६८८ मध्ये प्रकाशित झाला. अठराव्या शतकात यूरोपात वरील लॅकरकाम वस्तु उद्योगाचा अधिक प्रसार झाल्यामुळे ते शतक ‘यूरोपीय लाखेचे सुवर्णयुग’ या नावाने संबांधिले जाते.

संदर्भ : 1. Mecane, E. The Art of Korea, Tokyo, 1962.

           2. Okada, J. History of Japanese Art, Tokyoa, 1954.

           3. Strange, E. F. Catalogue of Japanese Lacquer, London, 1924-25.

मिसार, म. व्यं.