विरंजन : पदार्थामधील नैसर्गिक रंगद्रव्य काढून टाकून तो पांढरा करण्याची (म्हणजे रंग घालविण्याची) रासायनिक प्रक्रिया. रासायनिक उद्योगांत कापूस, लिनन, लोकर, रेशीम इ. नैसर्गिक तसेच कृत्रिम तंतू, कागदाचा लगदा, तेले, साखर, केस वगैरे पदार्थ विरंजनाने रंगहीन (पांढरे शुभ्र) करतात. फरश्या, घरगुती व व्यापारी धुलाई इत्यादींकरिताही विरंजनाचा वापर करतात. मुद्दाम दिलेला रंग काढून टाकण्याच्या क्रियेला वर्णहरण किंवा निर्लेपन म्हणतात.

विरंजनाचा सर्वांत जास्त वापर कापडावरील संस्करणामध्ये होतो. विरंजनापूर्वी निर्मलीकरण किंवा शुद्धीकरण प्रक्रिया करावी लागते. या प्रक्रियेमध्ये कृत्रिम रीत्या दिलेली खळ काढणे (डिसायझिंग) आणि नैसर्गिक रीत्या असलेला अनिष्ट थर काढणे (स्काउरिंग) यांचा समावेश असतो. पदार्थ निर्मळ झाल्यावर विरंजकाची त्यावर विनाअडथळा एकविधपणे (एकसारखी) क्रिया होऊ शकते.

विरंजन प्रक्रियेत स्थूलमानाने प्राणिजन्य तंतूंसाठी क्षपणकारक [⟶ क्षपण] द्रव्ये तसेच ऑक्सिडीकारक [⟶ ऑक्सिडीभवन] द्रव्ये विरंजके म्हणून वापरतात परंतु वनस्पतिजन्य तंतूंसाठी फक्त ऑक्सिडीकारक विरंजकांचाच वापर करतात. हायड्रोजन पेरॉक्साइड, क्लोरीन, सोडियम व कॅल्शियम हायपोक्लोराइटे, सोडियम क्लोराइट, क्लोरीन डाय-ऑक्साइड आणि पोटॅशियम परमँगॅनेट ही ऑक्सिडीकारक विरंजके आहेत. सल्फर डाय-ऑक्साइड, सल्फाइटे, हायड्रोजन सल्फाइडे वगैरे क्षपणकारक विरंजके आहेत.

इतिहास : सतराव्या शतकापूर्वी विरंजनाकरिता कापसाचे वा लिननचे कापड चुन्याच्या निवळीमध्ये उकळले जाई. नंतर ते ताकामध्ये बुडवून शेवटी पाण्याने धुवून मोकळ्या हवेमध्ये सूर्यप्रकाशात अनेक दिवस ठेवले जाई. अशा तऱ्हेने कापड पांढरे शुभ्र होत असे. या संपूर्ण क्रियेस महिने लागत.

वरील पद्धतीत ताकाऐवजी सल्फ्यूरिक अम्लाचा सौम्य विद्राव अधिक परिणामकारक असतो, असे होम यांनी दाखवून दिले (१७५०). लब्लां पद्धतीने [⟶ लब्‍लां, नीकॉल] धुण्याचा सोडा फार स्वस्त मिळू लागल्यामुळे चुन्याच्या निवळीऐवजी हा सोडा वापरण्यात येऊ लागला. १७८६ मध्ये सी. बर्थेलॉट (बेर्तलो) यांनी क्लोरीन वायूच्या साहाय्याने विरंजन करण्याचा शोध लावला पण या पद्धतीने कापड विरून जात असे. नंतर त्यांनी क्लोरीन वायू दाहक (कॉस्टिक) पोटॅशच्या विद्रावात विरघळून पोटॅशियम हायपोक्लोराइटाचा विद्राव तयार केला. त्याच्या साहाय्याने विरंजनक्रिया अत्यंत सुलभतेने, कापड फारसे विरू न देता करता येऊ लागली. त्यानंतर ए. जी. लाबाराक यांनी दाहक पोटॅशाऐवजी दाहक सोड्याचा वापर सुरू केला. १७९८ मध्ये चार्ल्स टेनंट यांनी चुन्याच्या निवळीत क्लोरीन वायू विरघळून तयार होणाऱ्या कॅल्शियम हायपोक्लोराइटाच्या विद्रावाची विरंजनक्षमता परिणामकारक असल्याचे दाखविले. नंतर त्यांनी उत्तम विरंजनक्षमता असलेले ⇨ विरंजक चूर्ण तयार केले (१७९९). सुमारे सव्वाशे वर्षे विरंजनासाठी विरंजक चूर्णच वापरात होते. पहिल्या महायुद्धानंतर द्रवरूप क्लोरीन आणि दाहक सोडा यांच्या सुलभ वाहतुकीमुळे पाहिजे असलेल्या ठिकाणी सहजपणे सोडाब्लीच अथवा सोडियम हायक्लोराइटाचे विद्राव बनविणे सोपे झाले. त्यामुळे विरंजक चूर्णाची मागणी झपाट्याने कमी झाली. १९२५ नंतर हायड्रोजन पेरॉक्साइड सहजपणे मिळू लागले. हा पदार्थ विरंजक म्हणून सोडा-ब्लीझचपेक्षाही प्रभावी आहे. अलीकडे पेरॉक्साइडाचा सर्रासपणे विरंजक म्हणून वापर करतात. काही वेळेस प्रथम सोडियम हायपोक्लोराइटाची अभिक्रिया (संस्करण) करतात आणि नंतर पेरॉक्साइडाचा वापर करून अंतिम विरंजन करतात.

डिसायझिंग : या प्रक्रियेत ताण्याच्या धाग्यांना दिलेली खळ काढून टाकतात. कारण खळीतील कापडाला कडकपणा आणणारी द्रव्ये (संयुगे) ताण्याच्या धाग्यांमुळे मिसळलेली असतात. सेल्युलोजिक (तुलीरीय) पदार्थावर दिलेली स्टार्चची खळ माल्टच्या (नीच तापमान-प्रतिरोधक) किंवा शाकाणुरोधक (सूक्ष्मजंतूंची वाढ रोखणाऱ्या) प्रकारच्या (उच्च तापमान-प्रतिरोधक) एंझाइमांनी [रासायनिक विक्रियेला मदत करणाऱ्या पदार्थानी ⟶ एंझाइमे] काढून टाकतात. या एंझाइमांना पिष्टभंजक एंझाइमे म्हणतात. एंझाइमांचा उपयोग केला असता डिसायझिंग प्रक्रियेला नीच तापमानाला अधिक जास्त वेळ लागतो किंवा उच्च तापमानाला कमी वेळात त्याच कार्यक्षमतेने ही प्रक्रिया करता येते.

प्रथिनयुक्त ताणा-धाग्यांना जिलेटीन, केसीन, अल्ब्युमीन किंवा सरस यांसारख्या प्रथिनांवर आधारित कारकांची खळ दिलेली असते आणि ती काढून टाकण्याकरिता प्रथिन अपघटक (प्रथिनाच्या विघटनास मदत करणाऱ्या) एंझाइमांची आवश्यकता असते. संश्लिष्ट (कृत्रिम रीतीने बनविलेल्या) पदार्थावर पॉलिव्हिनिल अल्कोहॉल किंवा पॉलिअँक्रिलिक अम्लांनची सोडियम लवणे अशा जलविद्राव्य (पाण्यात विरघळणाऱ्या) कारकांची खळ दिलेली असते आणि ती ⇨प्रक्षालकांच्या तप्त विद्रावांनी काढून टाकतात. कापूस आणि इतर सेल्युलोजिक तंतूंवरील पॉलिव्हिनिल अल्कोहॉले आणि कार्‌बॉक्सिमिथिल सेल्युलोज यांचा खळ म्हणून वापर वाढत आहे आणि ती संयुगे संश्लिष्ट पदार्थाप्रमाणे प्रक्षालक विद्रावांनी काढतात.

स्काउरिंग : या प्रक्रियेत तंतूमधील चरबीयुक्त, मेणचट पदार्थ, प्रथिने, धूळ इ. नैसर्गिक अशुद्ध द्रव्ये काढून टाकतात. याकरिता अल्कली (उदा., दाहक सोडा) आणि साबण यांचा उपयोग करतात. वसाम्लाकचे रूपांतर साबणात करणे. तसेच वसेचे विघटन करून तिचे साबणात रूपांतर करणे हा अल्कलीचा उपयोग असतो. नंतर साबणामुळे पायसीकरण (एक द्रव दुसऱ्या अमिश्रणीय द्रवात विसरित होण्याची प्रक्रिया) होऊन अशुद्ध द्रव्ये काढून टाकली जातात. स्काउरिंग प्रक्रिया पूर्ण झाल्यावर सूत वा कापड पाण्याने स्वच्छ धुतात. वेगवेगळ्या तंतूच्या बाबतीत स्काउरिंगसाठी आवश्यक असलेली परिस्थिती वेगवेगळी असते.


कापसाचे सूत वा कापड : हे सु. १% दाहक सोड्याच्या विद्रावामध्ये ८ ते १२ तास उकळतात. ही क्रिया ‘कीर’ नावाच्या दंडगोलाकृती लोखंडी उपकरणात करतात. ही क्रिया वाफेच्या दाबाखाली केल्यास स्काउरिंग अधिक परिणामकारकपणे आण कमी वेळात होते.

लिनन : अंबाडीचे दोर २% सोड्याच्या विद्रावामध्ये ४ ते ६ तास उकळतात. लिननच्या हव्या असलेल्या प्रतीनुसार ही क्रिया २ ते ६ वेळा पुनःपुन्हा करतात.

लोकर : लोकरीवरील स्काउरिंग प्रक्रिया सोडा व साबणाच्या विद्रावामध्ये ⇨पीएच मूल्य १० व तापमान ४०°-५०° से. असताना करावी लागते. ती अनेक वेळा करावी लागते. लोकरीमधील वनस्पतिजन्य द्रव्ये काढण्यासाठी लोकर ३-६% सल्फ्युरिक अम्लारच्या विद्रावामध्ये ९०°-१००° से. तापमानाला गरम करतात. याचा लोकरीच्या तंतूवर काही परिणाम होत नाही.

रेशीम : कच्च्या रेशमाच्या तंतूवर सेरिसीन नावाचा डिंकसदृश पदार्थाचा थर असतो. त्यामुळे कडक असते व पिवळे दिसते. या थरात सेरिसीन सु. २५-३०%  असते. स्काउरिंग प्रक्रियेत कच्चे रेशीम सोडा आणि साबणाच्या विद्रावामध्ये पीएच मूल्य ९·२ ते १०·५ आणि तापमान ९५° से. असताना सु. १ ते ३ तास गरम करतात. यानंतर मऊ आणि चमकदार पाढरे रेशीम मिळते.

कृत्रिम तंतू : या तंतूवर नैसर्गिक थर नसतात परंतु संरक्षक म्हणून तेले त्यात मिसळलेली असतात. ही तेले स्वयं-पायसीकारक असल्यामुळे डिसायझिंग प्रक्रियेत काढून टाकता येतात व स्काउरिंग प्रक्रियेची आवश्यकता राहत नाही. तंतूवर जलविद्राव्य खळ वापरली असेल, तर डिसायझिंग प्रक्रिया न करता फक्त स्काउरिंग प्रक्रिया करतात.

विरंजन प्रक्रिया : पेरॉक्साइड, क्लोरीन आणि क्लोराइट या तीन सर्वांत महत्त्वाच्या विरंजन प्रक्रिया आहेत.

पेरॉक्साइड विरंजन : हायड्रोजन पेरॉक्साइड हे सर्वत्र वापरात असलेले व्यापारी विरंजक आहे. हे क्लोरिनापेक्षा अधिक महाग असले, तरी याच्या साहाय्याने विरंजन केल्यास वेळेची बचत होते व उत्पादन अधिक त्वरेने होते. अलीकडे ८५ टक्क्यांपेक्षा अधिक कापसाचे व्यापारी विरंजन २७·५%, ३५% आणि ५०% संहतीच्या (प्रमाणाच्या) हायड्रोजन पेरॉक्साइड विद्रावांनी करतात. प्रबलतेचे निर्देशन शेकडा पेरॉक्साइडाऐवजी आयताने करतात. उदा., २७·५% हायड्रोजन पेरॉक्साइड म्हणजे १०० आयतन, ३५% म्हणजे १३० आयतन आणि ५०% म्हणजे १९७ आयतन असते. हायड्रोजन पेरॉक्साइडाच्या एका आयतनाने मुक्त केलेल्या ऑक्सिजनाच्या आयतनाशी वरील आयतन संबंधित असते.

हायड्रोजन पेरॉक्साइड विद्रावाने कापसाचे विरंजन करताना ३/४ ते २ आयतन पेरॉक्साइड, पीएच मूल्याचे नियंत्रण करण्यासाठी उभयरोधक [हायड्रोजनाच्या आयनाची (विद्युत्‌ भारित अणूची) संहती कमीत कमी करणारा विद्राव] म्हणून सोडियम सिलिकेट, तांबे व लोखंड यांच्याकरिता चिलेटिंगकारक (विद्रावामध्ये ज्या कार्बनी संयुगातील अणू धातूंबरोबर एकाहून जास्त सहसंबद्ध बंध निर्माण होतात असे कार्बनी संयुग) म्हणून सोडियम पॉलिफॉस्फेट आणि इष्टतम पीएच मूल्य मिळविण्याकरिता सोडियम हायड्रॉक्साइड लागते. विद्रावाचे पीएच मूल्य आणि तयार होणारे ऑक्सिसेल्युलोज यांचे काळजीपूर्वक नियंत्रण करावे लागते, नाही तर अतिजलदपणे निर्माण होणाऱ्या नवजात (रासायनिक संयोगातून मुक्त होण्याच्या क्षणी असणाऱ्या) ऑक्सिजनाने (O) नेहमी धोका निर्माण होतो. वनजात ऑक्सिजनाची मुक्तता व पीएच मूल्य यांचा अगदी जवळचा संबंध असल्याचे पुढील विक्रियेवरून दिसते. H2O2 ⟶ H2O+O. वापरण्यात येणाऱ्या पेरॉक्साइडाची संहती किंवा आयतन, कुंडाचे पीएच मूल्य व तापमान आणि उद्‌भासनाचा कालावधी यांचे काटेकोर पालन करून विरंजन प्रक्रिया नियंत्रित करतात.

वस्त्राची रचना व वजन यांच्यावर उत्पादन त्वरा अवलंबून असते. अतिजड मालावर पूर्ण रूंदीभर विरंजन प्रक्रिया केली असता उत्पादन त्वरा अखंडितपणे सु. ३६- ४५ मी./ मि. असते. तसेच मऊ व वजनाने हलक्या असलेल्या वस्त्राची उत्पादन त्वरा सु. २२२ मी. /मि. असते.

विरंजन केलेल्या लोकरीची टक्केवारी विरंजन केलेल्या कापसापेक्षा फार कमी आहे. लोकरीवर पेरॉक्साइड पद्धतीने विरंजन प्रक्रिया करतात. प्रक्रिया पूर्ण होण्यास अधिक वेळ लागतो, तथापि पेरॉक्साइडाला अनुरूप असलेल्या प्रकाशकीय विरंजनाने हा काळ कमी करता येऊ शकतो. अलीकडील पद्धतीत अखंडित प्रणालीपेक्षा खंडित प्रणाली वापरतात.

लोकरीवर हायपोक्लोराइटाने विरंजन करता येत नाही. कारण त्यामध्ये अँमिनो घटक असतात आणि पिवळी क्लोर अमाइने तयार होत असल्यामुळे तंतूला कायमचा पिवळा रंग प्राप्त होतो. रेशमाचे सुद्धा पेरॉक्साइडाने विरंजन करतात परंतु ही क्रिया अधिक उच्च तापमानाला (५०° से. पेक्षा अधिक) व कमी वेळात होते.

लोकर आणि रेशीम प्रथिन तंतू आहेत. पूर्वी त्यांच्यावर स्टोव्हिंग प्रक्रियेने विरंजन करीत असत. या प्रक्रियेत एका बंद भट्टीमध्ये दांड्यावर टांगलेल्या लोकरीच्या लडींवर सल्फर डाय-ऑक्साइड वायूचा परिणाम घडवितात. ही क्रिया सर्वसाधारणपणे ५०° से. तापमानाला चांगली होते. मात्र ही प्रक्रिया वापरीत नाहीत. कारण तंतूंना प्राप्त झालेला शुभ्रपणा जाऊन त्यांना लवकरच पुन्हा विरंजनापूर्वीचा रंग येतो.

कृत्रिम तंतूचे (उदा., पॉलिअमाइडे, पॉलिएस्टरे व ॲक्रिलिके यांचे) पेरॉक्साइडाने विरंजन करीत नाहीत. कारण त्यामुळे तंतू खराब होतात. या तंतूकरिता क्लोराइड विरंजन प्रक्रिया वापरतात. सेल्युलोजपासून तयार केलेले तंतू (उदा., व्हिस्कोज आणि बेमबर्ग) उत्पादनानंतर शुभ्रच असतात परंतु आवश्यकता भासल्यास त्यांच्यावर पेरॉक्साइड विरंजन प्रक्रिया करतात.

हायपोक्लोराइट विरंजन : या प्रक्रियेत सर्वसामान्यपणे क्लोरीन विरंजन असे म्हणतात. दुसऱ्या महायुद्धापर्यत सेल्युलोजिक पदार्थाकरिता हा सर्वाधिक वापरात असलेली प्रक्रिया होती. नंतर अखंड पेरॉक्साइड प्रणालीला अनुकूल परिस्थिती निर्माण झाली. घरगुती विरंजनाकरिता अजूनही हायपोक्लोराइड प्रमुख विरंजक म्हणून वापरतात. कॅल्शियम हायपोक्लोराइटापेक्षा (विरंजक चूर्णापेक्षा) सोडियम हायपोक्लोराइट अधिक प्रबल आहे. सोडियम क्लोराइडाचे विद्युत्‌ विच्छेदन करून लगेच सोडियम हायपोक्लोराइड मिळविता येते परंतु प्रत्यक्ष संयंत्र निर्मितीमध्ये सौम्य दाहक सोडा किंवा सोडा ॲश याच्यामध्ये संपीडित (दाबयुक्त) टाकीमधील क्लोरीन वायू बुडबुड्यांच्या रूपात सोडला असता सोडियम हायपोक्लोराइट तयार होते. पाण्यामध्ये सोडियम हायपोक्लोराइटाने विरंजन प्रक्रिया केली असता जलीय विच्छेदन होऊन हायपोक्लोरस अम्ल तयार होते. हे अम्ल  फार अस्थिर असते आणि त्याचे विघटन होऊन वनजात ऑक्सिजन (O) बाहेर पडतो.

HCIO ⟶ HCI + O

अतिरिक्त NaOH आणि पीएच मूल्य या दोन गोष्टींमुळे नवजात ऑक्सिजनाचे आणि पर्यायाने अंतिम शुभ्रपणा आणण्याचे नियंत्रण होते. व्यापारी दृष्ट्या उष्ण क्लोरीन विरंजक म्हणून अखंडपणे वापरतात येईल या हेतूने विकास करण्यात आला. याकरिता बदलणाऱ्या संहती, काल, पीएच मूल्य आणि तापमान यांसारख्या गोष्टींवर अतिशय काटेकोर नियंत्रण ठेवण्याची गरज असते.


क्लोराइट विरंजक : १९३९ साली अखंड पेरॉक्साइड विरंजन माहीत झाल्यानंतर १९४१ सालाच्या सुमारास सोडियम क्लोराइटाचा ( टेक्स्टोनाचा ) विरंजक म्हणून, प्रथम वापर झाला. क्लोरीन डायऑक्साइड (CIO2) हे प्रभावी विरंजक आहे. NaCIO2 चा वापर अगदी विशेष प्रकारचा असतो. कारण इष्टमय ३·५ पीएच मूल्य असताना ही अम्ल  प्रणाली म्हणून उपयुक्त ठरते. या विरंजनाकरिता ८५° से. हे तामपान मान्य करण्यात आलेले आहे. या प्रक्रियेचा विशेष गुणधर्म म्हणजे यात सेल्युलोजाचे विघटन होत नाही व ऑक्सिसेल्युलोज तयार होत नाही. या विरंजकाचे स्फटिक अनुकूल परिस्थितीत स्फोटक बनू शकत असल्यामुळे तसेच खुद्द CIO2 वायू अनिष्ट व विषारी असल्यामुळे व्यापारी दृष्ट्या याचा वापर करण्याला विरोध होत असतो. हे कृत्रिम तंतूकरिता (उदा., पॉलिएस्टरे व ॲक्रिलिके) सर्वांत जास्त परिणामकारक आहे. कापसावरील काही अखंड प्रणालींमध्ये हे वापरतात. CIO2 बाहेर पडणारी विक्रिया खालीलप्रमाणे दाखविता येते.

5 NaCIO2 + 4 HCI  ⟶ 4 CIO2 + 5 NaCI + 2 H2O

 प्रकाशकीय विरंजन : दृश्य तरंगांपेक्षा कमी तरंगलांबीच्या लघुतरंगांचे शोषण करणारी आणि दृश्य पल्ल्यामध्ये उत्सर्जन करणारी कार्बनी संयुगे आहेत. सूर्यप्रकाशातील जंबुपार (दृश्य वर्णपटातील जांभळ्या रंगापलीकडील अदृश्य) प्रकाश हा शोषला जाणारा विशेष लघुतरंग आहे. कार्बनी संयुगे ४०० नॅनोमीटरपेक्षा (१ नॅनोमीटर = १० -९ मी. = एक अब्जांश मी.) कमी तरंगलांबी असलेला जंबुपार प्रकाश शोषतात आणि दृश्य पल्ल्यातील ४००-७०० नॅनोमीटर तरंगलांबीचा प्रकाश उत्सर्जित करतात. हा उत्सर्जित प्रकाश वस्त्राच्या पृष्ठभागावरील पिवळ्या रंगाबरोबर क्रिया करतो आणि ते वस्त्र शुभ्र दिसते. ही संयुगे (कारके) दीप्तिकारके म्हणून सुद्धा ओळखली जातात आणि घरगुती प्रक्षालकांमध्ये मोठ्या प्रमाणात वापरतात. प्रकाशकी विरंजन नेहमी इतर पद्धतींनी विरजन केलेल्या वस्त्रांना (विशेषतः  हायपोक्लोराइट व पेरॉक्साइड प्रणालीत) पूरक म्हणून वापरतात. याचा फायदा म्हणजे विरंजनाचा खर्च कमी होतो. कारण विरंजक थोडे वापरावे लागते किंवा प्रक्रियेचा काळ कमी होतो. या विरंजनाने तंतूंच्या बलावर परिणाम होत नाही.

कोष्टक क्र. १. कापड विरंजनाची वैशिष्टये 

विरंजक 

तंतू 

पीएच मूल्य 

तापमान  

( °से.) 

काल 

हायपोक्लोराइट 

सेल्युलोजिक 

९·५-१०·० 

२१– २७ 

४ -१२ 

हायपोक्लोराइट 

सेल्युलोजिक 

१०-११ 

८२ 

५ ते १० सेकंद 

पेरॉक्साइड 

सेल्युलोजिक 

१०·४-११·५ 

८२ 

२-४ तास 

पेरॉक्साइड 

सेल्युलोजिक 

१०·४-११·५  

९८ किंवा अधिक  

१ मिनट – दिड तास

पेरॉक्साइड 

लोकर 

९·०-१०·० 

४९ 

२-६ तास 

पेरॉक्साइड 

रेशीम 

९·०-१०·० 

७१ 

१/२ तास

क्लोराइट

सेल्युलोजिक आणि कृत्रिम  

३·५ 

८५ 

३/४ – १ तास

प्रकाशकीय

सेल्युलोजिक आणि कृत्रिम  

५·० किंवा कमी 

८२

१/४ – १ तास

प्रकाशकीय

लोकर 

८·०-८·५ 

७१ 

१/४ – १/२ तास

NaOCI/NaCIO2 

सेल्युलोजिक 

८·७-९·०० 

२१-२७ 

१ तास 

NaOCH/H2O2

सेल्युलोजिक 

९·५-१०·५ 

२१-२७/९३ किंवा अधिक 

१/३ – १/२ तास

संयुक्त विरंजन : अनेक विरंजन प्रणालींना संयुक्त विरंजन किंवा विरंजक प्रणाली असे म्हणतात. कारण यात दोन भिन्न विरंजके एकत्र किंवा एकामागून एक अशी वापरतात. खर्च कमी करणे, दर्जा घसरू न देणे, प्रक्रियेचा काळ कमी करणे किंवा सामग्रीची खराबी टाळणे हा यामागील हेतू असतो.

हायपोक्लोराइट – क्लोराइट विरंजन : ही प्रक्रिया हायपोक्लोराइट विरंजनाचा काळ कमी करते आणि O ऐवजी CIO2 मुक्त करते. तसेच ही प्रक्रिया क्षारीय स्थितीत घडत असल्यामुळे सामग्री खराब होत  नाही. क्लोराइट विरंजनाप्रमाणे येथे उष्णतेची गरज नसते.

तेले व वसा यांचे विरंजन : अनेक गोष्टींकरिता तेले आणि वसा यांमधील रंगद्रव्ये व अशुद्ध पदार्थ मोठ्या प्रमाणात काढून टाकणे इष्ट असते. ही अशुद्ध द्रव्ये कॅरोटिनॉइडे आणि ग्लिवसराइड व इतर पदार्थाचे ऑक्सिडीकरण व निम्नीकरण (कार्बनी संयुगाचे कमी कार्बन अणू असणाऱ्या संयुगात रूपांतर होण्याची क्रिया) यांनी निर्माण झालेली असतात.

रंगद्रव्ये काढून टाकणारी सर्वसामान्य पद्धत म्हणजे विवेचक अधिशोषकांवर (निवडक रीतीने इतर द्रव्ये पृष्ठभागी शोषून घेणाऱ्या द्रवांवर वा घन पदार्थावर) त्यांचे ⇨अधिशोषण करणे ही होय. ⇨मुलतानी माती (फुलर्स अर्थ), सक्रियित (अधिक क्रियाशील केलेला) कार्बन व सक्रियित मृदा यांचे विविध प्रकार अधिशोषणाकरिता वापरतात. तेल आणि मृदा यांचा संपर्क ८२° ते १२१° से. या तापमानाला घडवून आणतात आणि ते मिश्रण सु. अर्धा तास चांगले घुसळून नंतर गाळतात.

तेले व वसा यांचे विरंजन करण्याकरिता हायड्रोजन पेरॉक्साइड, सोडियम हायपोक्लोराइट आणि सोडियम क्लोराइट या ऑक्सिडीकारकांचा वापर करतात. विविध नैसर्गिक रंगद्रव्यांचे ऑक्सिडीकरणाने रंगहीन द्रव्यात रूपांतर होते.

एम्‌. डब्ल्यू. केलॉग कंपनीने विकसित केलेली सोलेक्सॉल प्रक्रिया वसा आणि तेले यांतील रंगद्रव्ये काढून टाकण्यासाठी वापरली जाते. या प्रक्रियेत क्रांतिक तापमानाला द्रवीकृत प्रोपेनामध्ये तेल विरघळविले असता रंगद्रव्ये अविद्राव्य (न विरघळणारी) बनतात आणि तेले विद्रावात राहते. अशा रीतीने या प्रक्रियेत वसा अखंडपणे द्रवीकृत प्रोपेनाच्या संपर्कात राहते आणि रंगद्रव्ये अखंडपणे काढून टाकली जातात.


घरगुती वस्त्रधुलाई विरंजके : यामध्ये क्रियाशील क्लोरिनाचा किंवा क्रियाशील ऑक्सिजनाचा विरंजक म्हणून समावेश असतो. क्लोरीन विरंजके कापूस, लिनन आणि सर्वाधिक कृत्रिम तंतूंच्या वस्त्रांकरिता वापरतात परंतु ती रेशीम, लोकर किंवा ‘धुवा-नी-वापरा’ अशा वस्त्रांकरिता वापरता येत नाहीत. धुण्याच्या विद्रावामध्ये घालण्यापूर्वी क्लोरीन विरंजके सौम्य करावी लागतात. वस्त्रे खराब होऊ नयेत म्हणून विरंजनानंतर ती चांगली धुवावी लागतात.

ऑक्सिजन विरंजके बहुधा सोडियम परबोरेट किंवा पोटॅशियम मोनोपरसल्फेट यांपासून बनवितात. गरम पाण्यामध्ये आणि धुलाईच्या प्रक्षालकांबरोबर सोडियम परबोरेट आधारित विरंजके वापरली असता फार परिणामकारक ठरतात.

लाकडाच्या लगद्याचे विरंजन : १८४० मध्ये लाकडाच्या लगद्यापासून कागद बनविण्यास सुरुवात झाली. थोडे लिग्नीन असलेल्या लाकडाच्या लगद्याच्या विरंजनाकरिता क्लोरीन, कॅल्शियम व सोडियम हायपोक्लोराइटे आणि क्लोरीन डाय-ऑक्साइड ही विरंजके वापरतात तर जास्त लिग्नीमन असलेल्या लाकडाच्या लगद्याच्या विरंजनाकरिता सोडियम व हायड्रोजन पेरॉक्साइड आणि झिंक व सोडियम हायड्रोसल्फाइड वापरतात.

कोष्टक क्र. २. लाकडाच्या लगद्याच्या अभिक्रियेची वैशिष्ट्ये 

हायड्रोसल्फाइट

काल (तास) 

तापमान (से.) 

विरंजनाच्या शेवटी पीएच मूल्य 

क्लोरीन

१ 

२५ 

२ 

दाहक निष्कर्षण

१ 

६५ 

११ 

हायड्रोसल्फाइट

२ 

३५ 

८·५ 

क्लोरीन डायऑक्साइड

३ 

६५ 

४ 

पेरॉक्साइड

२ 

७० 

१० 

हायड्रोसल्फाइट

१ 

६५ 

लगद्याच्या रासायनिक विरंजनाकरिता क्लोरिनीकरणाचा वापर, लिग्नीन काढून टाकण्यासाठी दाहक निष्कर्षणाचे टप्पे आणि शिल्लक राहिलेल्या रंगद्रव्यांचे हायपोक्लोराइट आणि/किंवा क्लोरीन डायऑक्साइड यांनी ऑक्सिडीकरण करण्याचे टप्पे यांची नेहमी आवश्यकता असते. क्राफ्ट कागदासाठीच्या लगद्याच्या बाबतीत थोडा तेजस्वीपणा वाढविण्याकरिता अंतिम टप्पा म्हणून पेरॉक्साइड अभिक्रिया करतात.

कच्च्या साखरेचे विरंजन : कच्ची साखर प्रथम साखरेच्या पाकात मिसळतात. त्यामुळे स्फटिकांना चिकटलेली मळी विरघळते. हे मिश्रण नंतर केंद्रोत्सारक (केंद्रापासून दूर लोटण्याची क्रिया करणाऱ्या) यंत्रात ठेवतात. केंद्रोत्सारित स्फटिक वाफेने धुतात व जवळजवळ शुभ्र स्फटिक मिळतात. नंतर ही साखर घट्ट पाकात विरघळवितात व अशुद्ध द्रव्यांचे कण संकलित होण्यासाठी या साखरेवर चुना व फॉस्फोरिक अम्लि यांची अभिक्रिया करतात. नंतर हे मिश्रण गाळून शिल्लक राहिलेली रंगद्रव्ये व थोड्या प्रमाणातील राख काढून टाकतात. [⟶ साखर].

गव्हाच्या पिठाचे विरंजन : अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांमध्ये सु. ८०% गव्हाच्या पिठाचे विरंजन करतात. तेथील अन्न आणि औषध प्रशासनाने नायट्रोजनाची ऑक्साइडे, विरलकारक मिसळलेले बेंझॉइल पेरॉक्साइड, क्लोरीन, क्लोरीन डाय-ऑक्साइड आणि नायट्रोसिल क्लोराइड या विरंजकांना मान्यता दिलेली आहे. यांपैकी शेवटच्या तीन रसायनांमुळे पीठ केवळ पांढरे तर होतेच शिवाय कालप्रभावन (काळानुसार गुणधर्मात बदल होण्याच्या) क्रियेने पिठाच्या भाजण्याच्या गुणवत्तेतही वाढ होते.

संदर्भ : 1. Easton, B. K. Bleaching Cotton With Hydrogen peroxide, 1962.

           2. Easton, B. K. Weinberg, N. progress in the Art of Bleaching, 1957.

           3. Milwidsky, B. M. Manufacture of Sodium Hypochlorite, 1962.

          4. Trotman, E. R. Dyeing and Chemical Technology of Textile Fibers, New York, 1985.

दळवी, श, शं, सूर्यवंशी, वि. ल.