सिंग, विजेंदर : (२९ ऑक्टोबर १९८५– ). भारतातील एक ख्यातनाम मुष्टियोद्घा व ऑलिंपिक क्रीडा स्पर्धांतील कास्यपदकाचा मानकरी. त्यांचा जन्म सामान्य गरीब कुटुंबात हरयाणातील भिवानी शहराजवळील कालवास या खेड्यात झाला. त्यांचे वडील महिपाल सिंग हे हरयाणातील राज्य परिवहन विभागात बसचालक असून मुलांच्या शिक्षणासाठी ते अन्य खाजगी उद्योगही करीत असत. विजेंदरांचे जेष्ठ बंधू मनोज हे लष्करात १९९८ नंतर नोकरीस लागले. तेही प्रारंभी प्रसिद्घ मुष्टियोद्घे होते. विजेंदर यांनी जेष्ठ बंधूकडून पेरणा घेऊन या क्रीडाक्षेत्रात बालवयातच प्रवेश केला. त्यांचे सुरुवातीचे प्राथमिक शिक्षण जन्मगावीच झाले. पुढे त्यांनी भिवानीला माध्यमिक शिक्षण घेतले आणि वैश महाविद्यालयातून पदवी संपादन केली. भिवानी येथील बॉक्सिंग क्लबमध्ये त्यांनी मुष्टियुद्घाचे प्रशिक्षण घेतले. विद्यार्थिदशेत त्यांनी मुष्टियुद्घांच्या स्पर्धांत पारितोषिके मिळविली. त्यातील कर्तृत्वामुळे त्यांना मॉडेलिंगची कामे मिळाली. त्यांतील अर्थप्राप्तीमुळे त्यांना आपल्या मुष्टियुद्घ या क्रीडा प्रकारात अधिक सराव करणे शक्य झाले.

विद्यार्थिदशेत ते भिवानी क्रीडा प्राधिकरणाच्या केंद्रावर मुष्टियुद्घाच्या सरावासाठी जात असत. सुरुवातीपासून जगदीश सिंग हे त्यांचे प्रमुख प्रशिक्षक होते. त्यांनी या लहान मुलाचे मुष्टियुद्घातील कौशल्य व प्रतिभा हेरली आणि त्यांना पहिल्या उप-कनिष्ठ राष्ट्रीय मुष्टियुद्घ स्पर्धेत पूर्ण तयारीनिशी दाखल केले. त्यांनी रौप्यपदक मिळविले. दुसऱ्या वर्षीच्या उप-कनिष्ठ राष्ट्रीय मुष्टियुद्घ स्पर्धेतही त्यांनी असाच पराक्रम गाजविला. त्यानंतर त्यांनी बऱ्याच कनिष्ठ राष्ट्रीय स्पर्धेत पदके मिळवून आपले कौशल्य दाखविले. त्यांनी १९९७ मध्ये राज्यस्पर्धेत चॅम्पियनशिप मिळविली व नंतर २००० मध्ये राष्ट्रीय स्पर्धेत सुवर्णपदक मिळविले. कनिष्ठ मुष्टियोद्घा असूनही २००३ मध्ये त्यांची आफ्रो-आशियाई स्पर्धेसाठी भारतातर्फे निवड झाली. त्यांत त्यांनी रौप्यपदक मिळविले. त्यांना हरयाणा राज्य शासनाने सात लाख रुपये देऊन सन्मानित केले. पुढे त्यांचे प्रशिक्षक व गुरु जगदीश सिंग यांनी बॉक्सिंग क्लबची स्थापना भिवानी येथे केली (२००३). तिथेच विजेंदर यांनी आपले प्रशिक्षण चालू ठेवले.

अथेन्स (ग्रीस) ऑलिंपिकसाठी मध्यम वजनाच्या गटात (वेल्टरवेट) पात्र ठरल्यानंतर २००४ मध्ये त्यांना तुर्कस्तानचे मुष्टियोद्घे मुस्ताफा कारागोल्लू यांच्याकडून २० विरुद्घ २५ असा पराभव पत्करावा लागला. त्यानंतर २००६ मधील राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत इंग्लंडच्या नील पार्किन्झ यांचा पराभव करुन विजेंदरांनी अंतिम फेरी गाठली परंतु दक्षिण आफ्रिकेच्या बोंगानी म्वेलासे यांच्या विरुद्घच्या लढतीत त्यांना पराभवास सामोरे जावे लागल्याने रौप्यपदकावर समाधान मानावे लागले. त्याच वर्षीच्या दोहा (क्वातार) येथील आशियाई क्रीडा स्पर्धेत विजेंदर यांनी कांस्यपदकाची कमाई केली. त्यामुळे बीजिंग येथील ऑलिंपिक क्रीडांसाठी ते पात्र ठरले. त्यांनी जर्मनीत तेथील काही तज्ज्ञांकडून प्रशिक्षण घेतले. तिथे काही जर्मन मुष्टियोद्ध्यांना हरविल्यामुळे त्यांचा

आत्मविश्वास वाढला. त्यांनी भारतात आल्यावर पतियाळा येथील शिबिरात दिनेशकुमार, अखिलकुमार, जितेंदरकुमार आणि अंथरिश लाक्रा यांसोबत सराव केला. इंडियन ॲमॅचूअर बॉक्सिंग फेडरेशनने दृश्यचित्रकाराला तिथे पाठवून या पाच मुष्टियोद्ध्यांचे चल चित्रिकरण केले. तसेच त्यांना अन्य देशांतील मुष्टियोद्ध्यांचे चित्रिकरण दाखविले. त्यामुळे विजेंदरांना माहिती प्राप्त झाली.

बीजिंगच्या (चीन) ऑलिंपिक स्पर्धांत (२००८) त्यांनी बडौ जॅक (गांबिया) याचा पहिल्या फेरीत १३–३ ने पराभव केला. दुसऱ्या फेरीत त्यांनी अंग्‌खान चौम्फूफुआंग (थायलंड) याचा १३–३ ने पराभव करुन मध्यम वजनाच्या (७५ किग्रॅ.) उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. तिथे त्यांनी साउथपॉ कार्लोस गाँगोरा (एक्वादोर) याचा ९–४ ने पराभव केला मात्र पुढील फेरीत एमिलीओ कोरीआकडून त्यांना पराभव पत्करावा लागला. त्यामुळे कांस्यपदकावर त्यास समाधान मानावे लागले. यानंतरच्या जागतिक हौशी मुष्टियोद्ध्यांच्या चॅम्पियनशिपमध्ये (२००९) मध्यम वजनाच्या गटात त्यांना कांस्यपदकच मिळाले मात्र सप्टेंबर २००९ च्या यादीत विजेंदर यांच्या आतापर्यंतच्या कार्यकर्तृत्वाचा आढावा घेऊन त्यांना २,८०० गुण देऊन मुष्टियुद्घातील सर्वश्रेष्ठ (टॉप रँकिंग) पद देण्यात आले. नंतर २०१० च्या दिल्ली येथील राष्ट्रकुल स्पर्धेत त्यांनी सुवर्णपदक मिळविले.

त्यांच्या मुष्टियुद्घ क्रीडा प्रकारातील कार्याबद्दल त्यांना ऑलिंपिक कांस्यपदकाव्यतिरिक्त अनेक पदके मिळाली असून अन्य काही मानसन्मान लाभले आहेत. त्यांपैकी राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार (२००९), पद्मश्री (२०१०) हे प्रमुख होत. त्यांचा विवाह उच्चविद्याविभूषित अर्चना सिंग या युवतीशी ७ मे २०११ रोजी झाला. तत्पूर्वी त्यांना हरयाणा पोलीस दलात अधिकारी म्हणून नोकरी देण्यात आली. मुष्टियुद्घ क्रीडा प्रकारात ऑलिंपिक स्पर्धांत कांस्यपदक मिळविणारे ते पहिले भारतीय क्रीडापटू होत. जुलै २०१२ मधील लंडन (इंग्लंड) ऑलिंपिक स्पर्धेत उपांत्यपूर्व सामन्यात त्यांना उझबेकिस्तानच्या अब्बोस ॲटोवकडून पराभव पतकरावा लागला.

देशपांडे, हृषीकेश