वजन उचलणे: शरीरसौष्ठव व शक्तिवर्धन या उद्दिष्टांनी वजने उचलून करावयाचा विदेशी व्यायामप्रकार. प्राचीन काळापासून वैयक्तिक स्वरूपात शक्ती अजमावण्यासाठी माणसे वजने उचलीत असत. प्रसिद्ध ग्रीक गणिती पायथॅगोरसचा शिष्य मिलो हा पूर्ण वाढलेला बैल उचलून खांद्यावर घेत असे. भारतीयांतही वजने उचलण्याचे प्रकार रूढ असले, तरी त्यांत वस्तुनिष्ठता व अचूकता नव्हती. वजनदार दगडाच्या चाक्या, दगडी गोळे, तळी, एक्का, गदा, चक्की, जडजोडी, करेली, लोखंडी नांगर, लाकडी समतोल उचलण्याचे प्रकारभारतीय मल्ल करीत. वजन उचलण्याच्या व्यायामप्रकाराला शास्त्रशुद्ध व पद्धतशीर स्वरूप आधुनिक काळातच प्राप्त झाले.

व्हस्यील्यई अल्यिक्स्येव्ह या रशियन खेळाडूचा वजन उचलण्याचा उच्चांकवजन उचलण्याच्या सध्याच्या प्रमाणित स्पर्धांत एका लांब लोखंडी दांड्याला (बार) दोन्ही बाजूंस सारखी वजने लावून तो दांडा दोन्ही हातांनी उचलतात. या दांड्याच्या दोन्ही टोकांकडे निरनिराळ्या वजनांच्या चात्या (डिस्क्स) बसविण्याची सोय असते आणि ही वजने सरकून पडून जाऊ नयेत म्हणून त्यांवर घट्ट नट (कॉलर्स) बसवितात. या साधनाला इंग्रजीत ‘बारबेल’ असे म्हणतात. वजन उचलण्याचा लोखंडी दांडा २.२० मी. पर्यंत लांब असतो. दोन कॉलरच्या आत १.३१ मी. अंतर असते. दांड्याचा व्यास जाडीसाठी २८ मिमी. असतो. कॉलरसह दांड्याचे वजन २५ किलो असते. २५, २०, १५, १० किग्रॅ. वजनांच्या चकत्या लावून वजन उचलण्याचे प्रमाण कमी अधिक केले जाते. २५ किलो. चकतीचा रंग तांबडा, तर २० चा निळा असतो. ‘डंबेल्स’ हा बारबेलपैकीच एक वजन उचलण्याचा साधा प्रकार आहे. त्याचा दांडा आखूड असून त्याच्या दोन्ही बाजूंना लोखंडी गोळे असतात व ती एकेका हाताने उचलून हाताना व्यायाम दिला जातो. 

दोन्हा हातांनी उचलण्याच्या बारबेलने आणि दोन्ही हातांत घ्यावयाच्या डंबेल्सनी व्यायामपटूस हव्या त्या स्नायूंचे पुरेसे आकुंचन-प्रसरण होऊन, अपेक्षित आवर्तनाने व्यायाम व्हावा, म्हणून निरनिराळ्या शारीरिक कृतींची रचना करण्यात आली आहे. वजने उचलण्याच्या या व्यायामपद्धतीने शरीर सुंदर,घाटदार आणि सुटसुटित दिसू लागते. या व्यायामाने स्नायूंवर व हृदयावर, पोटावर, आंतरेद्रियांवर एकदम ताण पडण्याची शक्यता असते. तसेच आपल्या ताकदीपेक्षा थोडे अधिक वजन उचलून म्हणजे श्रमाधिक्याच्या तत्त्वाने (ओव्हरलोड ट्रेनिंग) व्यायाम केल्याने स्नायू चांगले वाढतात. मात्र ही तत्त्वे व आचरण अत्यंत व्यक्तिगत असल्याने योग्य मार्गदर्शनानुसार हा व्यायाम करणे इष्ट होय. या व्यायामातही श्वासोच्छ्वासाला महत्त्व आहे. व्यायामक्रिया सुरू करण्यापूर्वी भरपूर श्वास (ऑक्सिजन) घेणे व क्रिया पूर्ण झाल्यावर सोडणे हे तत्त्व होय. व्यायाम चालू असताना शरीर जेव्हा आकुंचन पावते, जेव्हा उच्छ्वास आणि ते प्रसरण पावत असेल तेव्हा श्वास ग्यावा लागतो. या क्रिया पद्धतशीरपणे केल्याने हृदयाची क्रिया सुधारण्यास साहाय्यच होते. मेहनत चालू असताना ज्या अवयवांना व्यायाम मिळत असेल त्यांवाचून इतर अवयव हलू न देता, व्यायाम होणाऱ्या अवयवांवर मन केंद्रित करणे श्रेयस्कर असते. यासाठी स्नायूंची हालचाल न्याहाळण्यास मोठे आरसे उपयुक्त ठरतात. एकाच यंत्रावर अनेक दिशांनी कप्पी व साखळ्यांच्या साहाय्याने ३/४ व्यायामपटू वजन उचलण्याचा व्यायाम करू शकतात. अशा बहूदेशीय साधनांमुळे वजन उचलण्याच्या नियोजित कार्यक्रमाचीअचूकता अधिक साधली जाते. ‘मिलिटरी प्रेस’ व्यायामप्रकारात वजन खांद्यापासून डोक्यांवर दोन्ही हातांनी दाबून नेण्यामुळे खांद्यांचे व हातांचे स्नायू पुष्ट होतात. मानेच्या मागे खांद्यांवर वजन धरून बैठका मारल्यास मांड्यांचे व पायांचे स्नायू बळकट होतात. पुढे वाकून वजने खांद्याजवळ नेण्यामुळे पाठीच्या व पोटाच्या स्नायूंना ताण व आकुंचन मिळते व ते स्नायू बळकट होतात. अशी अनेक प्रकारची वजनांची साधने वापरून शरीराच्या निरनिराळ्या भागांना व्यायाम देण्याच्या पद्धती आहेत. शरीरसौष्ठव विकसित करण्यासाठी वजन उचलणे निरनिराळ्या क्रीडाप्रकारांस पूरक म्हणून (वेट ट्रेनिंग) वजन उचलण्याचा सराव करणे व केवळ वजन उचलण्याच्या स्पर्धेत भाग घेण्यासाठी वजन उचलणे, असे या व्यायामाचे तीन प्रकार आहेत.  

यूरोप खंडात तसेच ईजिप्त, तुर्कस्तान, जपान इ. देशांत या व्यायामास क्रीडास्पर्धात्मक स्वरूप प्रांप्त झाले व तो लोकप्रिय ठरला. अमेरिकेत विसाव्या शतकात या खेळाला लोकप्रियता प्राप्त झाली. लंडनमधील पिकॅडिलीतील ‘कॅफो मोनिको’ मध्ये १८९१ साली जगातील सर्व खेळाडूंना वाव असलेली आंतरराष्ट्रीय स्पर्धा सुरू झाली. १९२० सालापासून वजने उचलण्याच्या स्पर्धांना ऑलिंपिक सामन्यांत स्थान प्रांप्त झाले. ‘इंटरनॅशनल वेटलिपिंटग फेडरशन’ ची स्थापना पॅरिस येथे १९२० मध्ये झाली. जूल्झ रोझेट हा या संस्थेचा संस्थापक होय. त्याने सर्वसंमत अशी या खेळांची नियमावली तयार केली, त्या नियमांनुसार १. २० साली अँटवर्प येथील ऑलिपिंक स्पर्धो झाल्या. या स्पर्धांचे नियमनही याच आंतरराष्ट्रीय संस्थेने केले. १९२० सालापासून वजन उचलण्याच्या स्पर्धा याच संस्थेची देखरेखीखाली होतात.

वजन उचल्याण्याचे पुढील प्रकार प्रचलित आहेत:(१) ‘क्लीन अँड जर्क’ या पद्धतीत खाली वाकून छातीपर्यंत वजन उचलणे, दोन्ही पायांचा तोल सांभाळून एक पाय पुढे टाकला असता वरती हात व कोपर ताठ करून वजन तोलणे ह्या क्रियांचा अंतर्भाव होतो.

(२) ‘स्नॅच’ या प्रकारात गुडघ्यात वाकून वजन उचलणे, बैठक स्थितीत दोन्ही हात ताठ करून वर वजन उचलणे व परत ताठ उभे राहून दोन्ही हात वर करून तोलणे ह्या कृतींचा अंतर्भाव होतो.

(३) ‘डेड लिफ्ट’ हा प्रकारही रूढ होत आहे. वरील पहिल्या दोन प्रकारांतील तीन प्रयत्नांत उचललेल्या वजनांची बेरीज करून विजयी स्पर्धक ठरविला जातो.


या तीन पद्धतींनीच आता राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय व ऑलिंपिक स्पर्धा होतात. या स्पर्धा खाली दिलेल्या सात विभागांत होतात :

(१) फ्लाय वेट ११४.६४ पौंड (५२किग्रॅ.) किंवा कमी (२) बँटम वेट १२३.४५ पौंड (५६ किग्रॅ) (३) फेदर वेट १३२.२७ पौंड (६० किग्रॅ) (४) लाइट वेट १४८.७५ पौंड (६७.५ किग्रॅ) (५) मिड्ल वेट १६५.३४ पौंड (७५ किग्रॅ.) (६) लाइट हेवी वेट १८१.७५ पौंड (८२.५ किग्रॅ.) (७) मिड्ल हेवी वेट १९८.४१ पौंड (९० किग्रॅ.) (८) हेवी वेट २४२.५० पौंड (११० किग्रॅ.) (९) सुपर हेवी वेट २४४. ७१ पौंड (१११ किग्रॅ.) किंवा अधिक.

वजन उचलण्याच्या क्षेत्रात अनेक जागतिक विक्रम आजवर प्रस्थापित झाले आहेत. अमेरिकन पॉल अँडरसन (१,१०२ पौंडऑलिंपिक, १९५६), युरी व्ह्लासीव्ह (१,१८४ पौंडऑलिंपिक, १९६०) हे काही विक्रमवीर होत. १९६८ च्या मेक्सिको ऑलिंपिक सामन्यात ल्येऑन्यीट झॉबोटिन्स्की या रशियन खेळाडूने तीन प्रमाणबद्ध उचलींत ५७२.२ किग्रॅ. (१,२६२ पौंड) वजन उचलून जागतिक विक्रम प्रस्थापित केला, सुपर हेवी वेट गटात व्हस्यील्यई अल्यिक्स्येव्ह या रशियन खेळाडूने १९७० ते ७७ या कालावधीत सतत आठ वेळा आपले निर्विवाद वर्चस्व सिद्ध करून एक जागतिक विक्रम प्रस्थापित केला आहे.

गोखले, श्री. पु.