देव : (सु. १६७३–सु. १७६७). रीतिकालीन प्रख्यात हिंदी महाकवी. मूळ नाव देवदत्त पण काव्यात ‘देव’ हेच नाव त्याने घेतले. तो सनाढ्य ब्राह्मण होता की कान्यकुब्ज ब्राह्मण, हा वाद आहे. त्याचा जन्म इटावा येथून सु. ४५ किमी. वर असलेल्या कुसमरा (मैनपुरी) गावी झाला. आडनाव दुबे. कुसमरा येथे त्याचे स्मारक उभारण्याचे प्रयत्नही होत आहेत. कवी देव हा अनेक राजांच्या आश्रयास होता. औरंगजेबाचा पुत्र आजमशाह, भवानीदत्त वैश्य, कानपूरजवळील फफूँदचे राजे कुशल सिंह, राजा भोगीलाल उद्योतसिंह, प्रिहानीचे अकबर अली खाँ ही त्याच्या काही आश्रयदात्यांची नावे आहेत. या सर्वांना त्याने त्यांच्या आश्रयास असताना लिहिलेले ते ते ग्रंथ अर्पण केले आहेत. राजा भोगीलाल याच्याकडून त्याला विशेष अर्थप्राप्ती आणि सन्मान प्राप्त झाला असावा, असे त्याने राजाविषयी लिहिलेल्या प्रशंसेवरून समजते.

देव कवीच्या नावावर ७२ किंवा ५२ ग्रंथ सांगितले जातात परंतु त्यांतील पुढील १३ ग्रंथच त्याचे असावेत, असे लक्ष्मीधर यांनी आपल्या शोधग्रंथात (देवके लक्षण ग्रंथोंका पाठ और पाठसमस्याएँ) म्हटले आहे. त्या ग्रंथांची नावे अशी : (१) अष्टयाम, (२) भवानीविलास, (३) रसविलास, (४) काव्यरसायन, (५) भावविलास, (६) सुजानविनोद, (७) कुशलविलास, (८) सुमिलविनोद, (९) प्रेमचंद्रिका, (१०) सुखसागरतरंग, (११) देवचरित्र, (१२) देवमाया प्रपंच नाटक, (१३) देवशतक.

तो पंडितही होता आणि प्रतिभावंत कवीही परंतु मुख्यतः तो प्रतिभावंत कवी होता आणि रीतिकालीन परंपरेचे पालन करण्यासाठी त्याने साहित्यशास्त्रीय चर्चा काव्यग्रंथांतून केली. त्याची नैसर्गिक अभिरुची शृंगाररसाकडे असल्यामुळे आपल्या बहुतेक ग्रंथांतून त्याने रसराज शृंगाराची महती गायिली आहे. नायक–नायिकाभेदाचे वर्णनही त्याने अतिशय रस घेऊन केलेले आहे. भावविलास, भवानी–विलास, सुमिलविनोद, रसविलास या ग्रंथांत शृंगार व नायिकाभेद (भावविलासात नायिकेचे ३८४ प्रकार सांगितले आहेत) यांवर भर आहे. सुखसागरतरंग  हा संपूर्ण शृंगारप्रधान ग्रंथ असून ‘नायिकाभेदाचा हा एक विश्वकोशच आहे ‘ असे डॉ. नगेंद्र यांनी त्याबाबत म्हटले आहे. देव कवीने निसर्गवर्णनही केले आहे आणि त्यात तत्कालीन विलासमय जीवनाचे प्रतिबिंब पडले आहे. शेवटी देव कवीचा कल भक्ती आणि वैराग्याकडे झुकू लागला. त्याच्या प्रेमभावनेवर शृंगारापेक्षा भक्ती, आध्यात्मिकता आणि त्याग यांचे रंग चढू लागले. त्याच्या प्रेमचंद्रिका, देवशतक, देवचरित्र, देवमाया प्रपंच नाटक  या ग्रंथांतून याची प्रचीती येते.

देव कवीने परंपरापालनाच्या हेतूने जरी रस, अलंकार यांची लक्षणे सांगण्याचा प्रयत्न केला, तरी तिकडे त्याची फारशी प्रवृत्ती नव्हती व म्हणूनच त्याच्या काव्यात इतर रीतिकालीन कवींच्या तुलनेने रसात्मकता, अर्थसौष्ठव, गाढ अनुभूती आणि प्रौढता आढळते. जेव्हा तो पांडित्य दाखविण्याच्या उद्देशाने यमक, अनुप्रास, वक्रोक्ती, चमत्कृती यांच्यामागे जातो, तेव्हा त्याची कविता निश्चितपणे कृत्रिम व हिणकस होते.

त्याचे उत्तरायुष्य हालअपेष्टांत गेले असावे. शेवटी अकबर अली खाँच्या आश्रयास तो गेला तेव्हा त्याचे वय ९४ असावे, असा अंदाज आहे.

देव किंवा देवदत्त या नावाचे आणखीही सात कवी हिंदीत होऊन गेलेत.

संदर्भ : नगेंद्र, रीतिकाव्यकी भूमिका तथा देव और उनकी कविता, २ भाग, दिल्ली, १९५०.

बांदिवडेकर, चंद्रकांत