रत्नाकरवर्णि : (सोळावे शतक). कन्नड भाषेत रचना करणारा प्रख्यात जैन महाकवी. कर्नाटकाच्या दक्षिण कानडा जिल्ह्यातील मूदबिद्रि येथे एका क्षत्रिय कुलात जन्म. मूदबिद्रि हे तेव्हा जैन धर्माचे मोठे केंद्र होते. रत्नाकरवर्णीने तत्कालीन पद्धतीनुसार उत्तम शिक्षण घेतले होते व तो काव्य, शास्त्र, योगविद्या, धर्म-तत्त्वज्ञान इ. विषयांत पारंगत होता. चारुकीर्ती असे त्याच्या दीक्षागुरूचे व हंसनाथ असे त्याच्या मोक्षगुरूचे नाव आढळते. ⇨ महाकवी पंप (सु. ९४०), ⇨ पोन्न (सु. ९५०) आणि ⇨ रन्न (सु. ९९०) या ‘मणित्रयी’ म्हणून प्रख्यात असलेल्या महाकवींनंतर जैन साहित्यास उतरती कळा लागली होती. वीरशैव आणि दास (हरिदास) साहित्याचा कर्नाटकात विशेष प्रभाव पडत असताना, रत्नाकरवर्णीने आपल्या रचनेद्वारा जैन साहित्यास पुन्हा उर्जितावस्था प्राप्त करून दिली. रामायण, महाभारत इ. ग्रंथांच्या आधारे पारंपारिक स्वरूपाची तीच ती रचना न करता रत्नाकरवर्णीने बदलत्या काळास अनुसरून नवे विषय, देशी छंद व वेगळे साहित्यप्रकार हाताळून रचना केली. त्याच्या ग्रंथरचनेचा काळ साधारणपणे १५५७ ते १५७० असा अभ्यासक मानतात.

रत्नाकरवर्णीचा पहिला ग्रंथ त्रिलोकशतक (सु. १५५७) हा असून त्यात स्वर्ग, भूलोक, पाताळ या लोकांचे जैन सृष्टिशास्त्रानुसार वर्णन आहे. अपराजितेश्र्वरशतकमध्ये नीति-अनीती, धर्माधर्म, संन्यास, कर्म इत्यादींचे विवरण आहे. एक प्रतिभासंपन्न महाकवी म्हणून त्याची जी चिरंतन कीर्ती झाली, ती त्याच्या भरतेशचरिते वा भरतेशवैभव (सु. १५६७) ह्या महाकाव्यामुळेच. यात जैन पुराणातील आदी तीर्थंकराचा पुत्र भरतेश याचे उदात्त जीवनचरित्र महाकाव्य शैलीत वर्णिले आहे. दीर्घकाल राज्यधुरा सांभाळल्यानंतर भरतेशाने सर्वसंगपरित्याग करून यतिधर्म स्वीकारल्याची कथा त्यात आली आहे. कवीच्या प्रतिभेचे व स्वतंत्र विचारांचे दर्शन या महाकाव्यात घडते. [⟶ भरतेशवैभव ].

रत्नाकरवर्णीची नीतिपर पदे अतिशय लोकप्रिय असून ती अण्णन पदगळु (मोठ्या भावाची पदे) या नावाने प्रख्यात आहेत. रत्नाकराधीश्र्वरशतक हाही आणखी एक त्याचा शतकग्रंथ सांगितला जातो. त्याच्या रचनेचे अनुकरण करण्याचा अनेक कवींनी प्रयत्न केला. नंतरच्या कवींवर त्याचा बराच प्रभावही पडला. पंप, ⇨ हरिहर,कुमारव्यास इ. कन्नड महाकवींच्या मालिकेत बसणारा एक श्रेष्ठ महाकवी म्हणून कन्नड साहित्यात रत्नाकरवर्णीचे महत्त्वपूर्ण स्थान आहे.

दिवेकर, गु. व्यं.