उच्चै:श्रवा : (बृहदश्व, पेगॅसस). उत्तर गोलार्धातील एक तारकासमूह. पेगॅसस म्हणजे पंख असलेला घोडा. यात सहाव्या प्रतीपर्यंतचे सु. ५० तारे आहेत. यात काही चल व काही युग्मतारे [→ तारे] असून एम १५ हा तारकागुच्छही आहे. यात आल्फा (मार्‌कॅब) प्रत २·६, बीटा (शिआत) प्रत २·६, गॅमा (अल्‌जेनीब) प्रत २·९, एप्सायलॉन (एनिफ) व झीटा (होमम) हे तारे प्रमुख आहेत [→ प्रत]. या समूहाची व्याप्ती होरा २१ ते २४, क्रांती + २ ते + ३६ [→ ज्योतिषशास्त्रीय सहनिर्देशक पद्धती ⇨ एवढी मोठी आहे. मार्‌कॅब, शिआत, अल्‌जेनीब आणि देवयानीपैकी आल्फा (अल्‌फेरात्झ) हे चार मिळून मोठा पेगॅसी चौरस तयार होतो. यांपैकी पश्चिमेकडील दोन तारे मिळून पूर्वाभाद्रपदा आणि पूर्वेकडील दोन तारे मिळून उत्तराभाद्रपदा अशी नक्षत्रे होतात. हा चौरस महाराष्ट्रात नोव्हेंबरमध्ये रात्री ९ च्या सुमारास डोक्यावर दिसतो. अल्‌फेरात्झपासून पूर्वेकडे ताऱ्यांची एक रांग गेलेली दिसते. तिच्यातील बीटा देवयानीच्या मदतीने एम ३१ ही ]दीर्घिका  सापडते. शिआत हा रक्तवर्णी युग्मतारा असून त्याच्या मुख्य ताऱ्याचा व्यास सूर्याच्या व्यासाच्या १०० पट आहे, तर एनिफ हा तारा नारिंगी असून त्याचा व्यास सूर्याच्या व्यासाच्या १५० पट आहे.

पूर्वाभाद्रपदाच्या दोन ताऱ्यांची रेषा उत्तरेकडे वाढविली, तर ध्रुवताऱ्यातून जाते आणि दक्षिणेकडे वाढविली, तर फोमलहॉट हा ठळक तारा लागतो. उत्तरा भाद्रपदाचे दोन तारे जोडणारी रेषा दक्षिणेकडे साधारण तितकीच वाढविली तर सध्याचा वसंत संपातबिंदू मिळतो. तेथे सूर्य २१ मार्च या दिवशी असतो.

ग्रीक पुराणातील पेगॅसस या घोड्यावरून या समूहास नाव मिळाले म्हणून हिंदू पुराणातील उच्चैःश्रवा या घोड्याचे नाव या समूहास बाळशास्त्री जांभेकरांनी दिले.

ठाकूर, अ. ना.