ॲबॅलोनी : ॲबॅलोनी अथवा हॅलिओटिस हा मॉलस्का (मृदुकाय) संघाच्या गॅस्ट्रॉपोडा वर्गातील प्राणी आहे. याच्या अनेक जाती आहेत. उष्णकटिबंधातील सगळ्या समुद्रांत तो आढळतो. हा गोगलगायच आहे, पण याचा शंख इतका चापट झालेला असतो की, तो शिंपेसारखा दिसतो. शिंप कानाच्या आकाराची असते. तिच्या एका काठावर ओळीने छिद्रे असतात आणि त्यांमधून पाणी व उत्सर्ग (निरुपयोगी) पदार्थ बाहेर पडतात. पाद रुंद व चपटा असून त्यामुळे तो खडकाला घट्ट चिकटतो. तुंड (मुस्कट) रुंद असून दोन सवृंत (देठ असलेले) डोळे व अभिमर्श (ज्यांच्या योगाने स्पर्शज्ञान होते अशी इंद्रिये) असतात. शिंपेच्या सगळ्या काठावर झालर असलेला प्रावार (त्वचेची बाहेरची मऊ घडी) असतो. हा प्राणी शैवले खातो.

शिंप सुंदर असून तिच्यापासून अलंकार व गुंड्या बनवितात. कधीकधी शिंपांत हिरवे मोती सापडतात. या शिंपांत हल्ला कल्चर (कृत्रिम) मोतीही तयार करतात. इंग्‍लंड, फ्रान्स, जपान इ. देशांत हे प्राणी खातात.

कर्वे, ज. नी.