मुहूर्तशास्त्र : प्राचीन भारतीय कालगणनेनुसार दिवस आणि रात्र मिळून ३० भाग दिवसांचे १५ व रात्रीचे १५ या प्रत्येक भागास मुहूर्त म्हणतात. यजुर्वेदाच्या शतपथ ब्राह्मणात (१०·४·२·१८ व १२·३·२·५) याप्रमाणे एका वर्षाचे १०,८०० मुहूर्त (३६० दिवस ३०) असतात असे म्हटले आहे यावरून मुहूर्त दोन घटिकांचा काळ (मिनीटे ४८) वेदांगज्योतिषातही मुहूर्त म्हणजे दोन नाडिका असे म्हटले आहे. ऋग्वेदकाळापासून ही मुहूर्तगणना प्रचलित होती. ऋग्वेदात (क्र.१०·१८९·३) म्हटले आहे की, सूर्याच्या दीप्तीने वासराची (दिवसाची) ३० धामे (मुहूर्त) विशेष शोभतात.मुहूर्त शब्दाचा प्रयोग ‘थोडावेळ’, ‘किंचीत काल’ अशा अर्थी ऋग्वेदात (३·३३·५ ३·५३·८) दोनदा आला आहे. संस्कृतातील काव्यादी ग्रंथांत आतापर्यंत मुहूर्त शब्दाला तोच अर्थ आहे. यास्काने निरुक्तात (२·२५) मुहूर्त या शब्दाची व्युत्पत्ती ‘भराभर जाणारा काळ’ अशी दिली आहे. मुहूर्त या शब्दाचा तिसरा अर्थ म्हणजे कोणत्याही शुभ कृत्यासाठी लागणारा अनुकूल काळ असा बनला.

शुभ काळ आणि अशुभ काळ मानण्याची प्रवृत्ती ऋग्वेदापासून उल्लेखिलेली आढळते. दिवस सुदिन असावा किंवा व्हावा, दिवस सुदिन झाला आहे. दिवस सुदिन होईल अशा अर्थाचे निर्देश ऋग्वेदामध्ये (२·२१·६ ३·८·५ ३·२३·४ ४·३७·१ ७·११·२ ७·३०·३ ७·८८·४ १०·३९·१२ १०·७०·१) अनेकवार येतात.

शुभ आणि अशुभ दिवस मानण्याची प्रवृत्ती बॅबिलोनिया, ग्रीस, इ. अनेक प्राचीन देशांत होती. रोमन लोकांनाही दिवसाचे शुभ दिवस व अशुभ दिवस असे भाग पाडले होते. ते पहिल्या प्रकारच्या दिवसात राजकीय किंवा न्यायविषयक व्यवहार करीत व दुसऱ्या प्रकारच्या दिवसांत तसले व्यवहार स्थगित करीत.

शुभक्रियेला योग्य काल असा सामान्य अर्थ मुहूर्त या शब्दाला धरून संस्कृतमध्ये मुहूर्तचिंतामणि, मुहूर्तमार्तण्ड, मुहूर्तप्रकाश, मुहूर्तदर्शन इ. ग्रंथांत सर्व प्रकारच्या धार्मिक व व्यावहारिक कार्यांना योग्य आणि अयोग्य असे घटिका, मुहूर्त, दिवस, रात्र, नक्षत्र, राशी, तिथी, पक्ष, मास, ऋतू, अयन, वर्ष यांची ऋषींनी निर्मिलेल्या ग्रंथांच्या आधाराने माहिती दिलेली असते. त्या त्या व्यक्तीच्या जन्मलग्न कुंडलीवरून किंवा तत्काल लग्न कुंडलीवरूनही शुभ आणि अशुभ काळ या ऋषींनी निर्मिलेल्या ग्रंथांनी निश्चित केलेला आहे. दिवस व रात्र, नक्षत्र, तिथी, मास, वर्ष इत्यादीकांचे शुभाशुभ वर्ग धरून विवाहयज्ञादी नित्यनैमित्तिक व काम्य अशी धार्मिक कर्मे विहित केली आहेत. कृत्यानुसार शुभकाल वेगवेगळे ठरविलेले होते. ही पद्धती वैदिक काळापासून रूढ होती. ऋग्वेदात (१०·८५) सवितादेवाची कन्या सूर्या हिच्या सोमदेवशी झालेल्या विवाहासंबंधी वर्णन आले आहे. सवित्याने सोमाला गोधन मघा नक्षत्रावर दिले आणि पूर्वाफल्गुनी व उत्तरा फल्गुनी या नक्षत्रावर सूर्येचा विवाहविधि केला असे त्यात म्हटले आहे. तैत्तिरीय ब्राह्मणामध्ये (१·५·२·६ ते ८) कृतिका ते विशाखा ही देवनक्षत्रे व अनुराधा ते भरणी ही यमनक्षत्रे अशी वर्गवारी सांगून देवनक्षत्रांचा काळ हा पुण्याह म्हणजे पुण्य दिवस होय. कार्यसिद्धीकरिता या देवनक्षत्रांवरच कार्ये करावीत. असे म्हटले आहे. आपल्या कर्मास योग्य असलेल्या नक्षत्राच्या उदयापासून खमध्यावर येईपर्यंतच्या कालावधीत ते कर्म केल्यास ते सत्वर फलदायी होते, असे मानले आहे.

वैदिक वाङ्‌मयानंतर सूत्रग्रंथ ऐतिहासिक क्रमाने येतात. श्रौतसूत्र, गृह्यसूत्र व धर्मसूत्र असे या सूत्रवाङ्‌मयाचे तीन वर्ग आहेत. श्रौतसूत्रांमध्ये अग्निहोत्रव्रत स्वीकारणाऱ्या गृहस्थाने तीन अग्नींची स्थापना म्हणजे अग्न्याधान करायचे असते आणि पत्नी असेपर्यंत किंवा वृद्धापकाळ येईपर्यंत अग्निहोत्र चालवायचे असते. सगळे श्रौतयज्ञ करण्याचा अधिकार अग्निस्थापना केलेल्या या आहिताग्नी व्यक्तिलाच प्राप्त होतो. अग्न्याधानाचा काळ, दर्श पौर्णिमास या इष्टींचा काळ, अग्निहोत्र हवनाचा काळ, सोमयाग, राजसूत्र, अश्वमेध इ. यज्ञांचा काळ कोणता शुभ व योग्य होय, यासंबंधी माहिती श्रौतसूत्रांमध्ये दिलेली असते. गृह्यसूत्रांमध्ये विवाह, उपनयनादी संस्कारांचे शुभाशुभ काळ कोणते यांचे विवरण असते. उपनयन, विवाह, इ. संस्कारांसाठी उत्तरायण, शुक्ल पक्ष आणि शुभ नक्षत्र मिळून होणारा काळ गृह्मसूत्रांमध्ये विहित मानला आहे. उत्तरायण, शुक्ल पक्ष आणि पुण्य दिवस असताना धार्मिक कृत्ये करावीत असा सामान्य नियम सांगून शिशिर ऋतूचे महिने व आषाढ महिना सोडून सर्व ऋतूंत सर्व पुण्य नक्षत्रांवर विवाह होतो, असे आपस्तंब गृह्यसूत्रात म्हटले आहे.

वैदिक वाङ्‌मयात किंवा बऱ्याचशा प्राचीन श्रौत, गृह्य आणि धर्मसूत्रांमध्ये वारांची नावे येत नाहीत. त्याला अपवाद विष्णुधर्मसूत्र होय. त्यात सातही वारांचा श्राद्धकर्माशी संबंध दाखवून विशिष्ट फलप्राप्ती निर्दिष्ट केली आहे. हे लक्षात घेता वारांची भारतातील नावे इसवी सनापूर्वी फार तर चार-पाचशे वर्षांपेक्षा प्राचीन नसावीत. असे ज्योतिषशास्त्राच्या इतिहासाचे संशोधक म्हणतात.

सूत्रकाळीच दिवस रात्र मिळून काळाचे मुहूर्तनामक जे तीस विभाग पाडले, त्या प्रत्येक मुहूर्ताला अधिष्ठात्री देवतेवरून नाव पडले. मन्वादी स्मृतींमध्ये म्हटले आहे, की गृहस्थाने ब्राह्ममुहूर्तावर उठावे. ब्राह्ममुहूर्त म्हणजे रात्रीचा शेवटचा पंधरावा भाग. वराहमिहिर या प्रसिद्ध ज्योतिषशास्त्रज्ञाने दिवसाच्या आणि रात्रीच्या मुहूर्ताच्या अधिष्ठात्रीदेवता बृहद्‌योगयात्रा या आपल्या ग्रंथात दिल्या आहेत. या देवतेच्या स्वभावानुसार व गुणवैशिष्ट्यांनुसार कोणते नक्षत्र कोणत्या कृत्यास सहाय्यकारी होईल, हे सांगितले आहे.

शुभ किंवा अशुभ काळ ठरवीत असताना मुहूर्त, तिथि, पक्ष, करण, योग, वार, नक्षत्र, राशी, ग्रह, या सर्वांच्या बलाबलाचा विचार करावा लागतो पण यांच्या बलाबलासंबंधी भिन्नभिन्न ऋषींची भिन्न भिन्न मते सांगितली आहेत. सर्वांनी ग्रहाचे बल सर्वांत प्रभावी मानलेले आहे. मुहूर्त विचारात नक्षत्र प्रबळ असते. बारा राशींची पद्धती भारतात प्रथम केव्हा सुरू झाली, ती भारतातच निर्माण झाली किंवा भारताने दुसऱ्या कोणा राष्ट्राकडून घेतली, हे फार बिकट प्रश्न आहेत.त्यांचा विचार करण्याचे हे स्थळ नव्हे.

फलज्योतिष व शकुनशास्त्र फार प्राचीन काळापासून जगातील सर्व प्राचीन राष्ट्रांमध्ये श्रद्धेय मानली गेली आहेत. कोपर्निकस हा आधुनिक ज्योतिषशास्त्राचा प्रवर्तक होता परंतु तोही फलज्योतिषी होता. भारतात फलज्योतिष व शकुनशास्त्र यांना फार महत्त्व होते अजूनही त्याला फार मागणी आहे. ज्योतिषाचे झालेले ज्ञान वाढण्यास व आजपर्यंत अस्तित्वास राहण्यास अनेक व्यवहारांतील मुहूर्ताची आवश्यकता हे एक मुख्य कारण आहे. गौतम धर्मसूत्रात (११·१५–१६) राजाला उपदेश केला आहे की, देवचिंतक (फलज्योतिषी) व उत्पातचिंतक (शकुनशास्त्रवेत्ते) जे सांगतील त्याचा राजाने आदर करावा. याज्ञवल्क्यस्मृतीत (१·३०८) स्वच्छ म्हटले आहे की राजांची उननती व अवनीती ही ग्रहांच्या स्वाधीन आहे जगाची उत्पत्ति-विनाश हीही ग्रहाधीन आहे म्हणून ग्रह राजांना पूज्यतम आहेत. याच्या उलट कौटिलीय अर्थशास्त्रात म्हटले आहे : ‘नक्षत्रांच्या मागे लागलेल्या बालिश पुरुषाला बाजूला टाकून धन दुसरीकडे जाते. धन हेच धनाचे नक्षत्र होय. बिचाऱ्या तारका काय करणार ?’ वराहमिहिराने आपल्या बृहद्‌योगयात्रा या ग्रंथात राजांना स्पष्ट बजावले आहे की, सर्व शुभाशुभ निमित्ते एका बाजूला व शुद्ध मन दुसऱ्या बाजूला, असे झाल्यास विशुद्ध मन जय मिळवून देते. अंगिरा ऋषीने म्हटले आहे की, मनाचा उत्साह हाच शुभ मुहूर्त होय.

पहा-फलज्योतिष शकुनविचार.

संर्दभ : १. दीक्षित, शं. बा. भारतीय ज्योतिषशास्त्र, पुणे, १९३१.            २. भट, य. आ. अनु., भारतरत्न म. भ. डॉ. काणेकृत धर्मशास्त्राचा इतिहास, मुंबई, १९७७.

जोशी, लक्ष्मणशास्त्री