ओदुद, काजी अब्दुल : (१८९४ — १९ मे १९७०). बंगाली साहित्यसमीक्षक, निबंधकार व लघुकथालेखक. नदिया गावी मुसलमान कुटुंबात जन्म. कलकत्ता विद्यापीठाचे एम्. ए. साहित्य अकादेमीचे काही काळ सदस्य तसेच विश्वभारतीच्या (शांतिनिकेतन) कार्यकारी मंडळाचे राष्ट्रपतीद्वारा नियुक्त सदस्य (१९५४ — ५७ ). रवींद्रनाथ टागोर व जर्मन कवी गटे ह्या दोघांवर त्यांनी अनुक्रमे रवींद्र – काव्यपथ (१९२८) व कविगुरू गटे (२ खंड – १९४६) असे समीक्षाग्रंथ लिहिले आहेत. समाज ओ साहित्य (१९३४ ), बाँगलार जागरण (१९५६ ), हिंदु-मुसलमानेर  विरोध (१९३५) हे त्यांचे चर्चात्मक प्रबंध दर्जेदार मानले जातात. यांशिवाय एक कादंबरी, एक नाटक व अनेक लघुकथा असे ललित साहित्यही त्यानी लिहिले. एक चिकित्सक समीक्षक व निष्ठावंत मानवतावादी म्हणून बंगालीत त्यांना विशेष स्थान आहे.

खानोलकर, गं. दे.