गुप्त, ईश्वरचंद्र : (१८१२–१८५९). एक बंगाली कवी, लेखक व पत्रकार. चोवीस परगणा जिल्ह्यातील कांचनपल्ली (हल्लीचे काचरापारा) येथे जन्म. कांचनपल्ली व कलकत्ता येथे अल्प शिक्षण. लहानपणापासूनच काव्यलेखनाचा छंद. कलकत्त्यास धंदेवाईक गायकांसाठी ते काव्यरचना करीत. ती लोकप्रिय ठरली. कलावंतांचे आश्रयदाते योगींद्रमोहन ठाकूर (टागोर) यांनी ईश्वरचंद्रांना प्रोत्साहन देऊन मार्गदर्शन केले. ईश्वरचंद्रांनी ह्या काळात विपुल गद्य-पद्यलेखन केले. योगींद्रमोहनांनी १८३१ मध्ये ईश्वरचंद्रांना संवाद-प्रभाकर  नावाचे वृत्तपत्र सुरू करून दिले व छापखाना उभारून दिला. हे पत्र प्रथम साप्ताहिक व पुढे दैनिक करण्यात आले. हे बंगालीतील पहिले दैनिक पत्र होय. ईश्वरचंद्रांनी ठाकूर कुटुंबाचे आणि इतर विद्वानांचे साह्य घेऊन आपल्या संवाद-प्रभाकरमधून वैचारिक जागृतीची नवीन आघाडी उघडली आणि बंगालीमध्ये राष्ट्रीय जागृतीच्या व सांस्कृतिक उद्‌बोधनाच्या एका नव्या पर्वाचा पाया घातला.

ईश्वरचंद्रांचे विपुल गद्य-पद्यलेखन संवाद-प्रभाकरमधूनच प्रसिद्ध होऊ लागले. त्यांच्या ह्या लेखनामुळे समाजमनाला वैचारिक धक्के बसू लागले आणि लोकांत नव्या जाणिवा निर्माण होऊ लागल्या. स्वदेश, स्वधर्म, स्वभाषा आणि स्वसंस्कृती ह्यांबाबत डोळस अभिमान लोकांत जागृत होऊन स्वकर्तव्याची जाणीवही त्यांना हळूहळू होऊ लागली. ह्या पत्रातून राजकीय, धार्मिक, सामाजिक, आर्थिक, वाङ्‌‌मयीन इ. विविध विषयांचा परामर्श घेतला जाई. ईश्वरचंद्रांनी स्वतः प्राचीन बंगाली कवींची चरित्रपर माहिती संशोधनपूर्वक मिळवून त्यांची चरित्रेही त्यातून प्रसिद्ध केली. भारतचंद्र, रामप्रसाद इ. श्रेष्ठ आणि लोकप्रिय प्राचीन कवींची चरित्रे लिहून त्यांच्या जीवनाचा साद्यंत परिचय बंगाली जनतेला ईश्वरचंद्रांनी घडविला. बंगाली साहित्यातील ही आद्य वाङ्‌‌मयीन चरित्रे होत.

संवाद-प्रभाकरव्यतिरिक्त ईश्वरचंद्रांनी पुढील काळात पाषंडपीडन (१८४६) आणि संवाद-साधुरंजन (१८४७) ही दोन साप्ताहिके काढली. लोकशिक्षण व स्वभाषेची अभिवृद्धी हे ध्येय पुढे ठेवून त्यांनी अत्यंत जिद्दीने व समर्थपणे ही नियतकालिके चालवली. त्यांनी समकालीन सुशिक्षित तरुणांत साहित्याभ्यासाची आणि स्वभाषेत लेखन करण्याची गोडी उत्पन्न करून त्यांना आपल्याकडे आकर्षून घेतले. बंकिमचंद्र, दीनबंधू मित्र, रंगलाल बंदोपाध्याय, मायकेल मधुसूदन दत्त ह्यांसारख्या प्रसिद्ध लेखकांना सुरुवातीच्या काळात घडविण्याचे श्रेय ईश्वरचंद्रांनाच दिले जाते. आधुनिक बंगाली वाङ्‌मयाचे आद्य व प्रमुख प्रवर्तक म्हणून ईश्वरचंद्रांचा गौरव केला जातो.

ईश्वरचंद्रांची कविता प्रायः भारतचंद्र व मुकुंदराम ह्या जुन्या कवींच्या परंपरेतील असली, तरी तिचे विषय मात्र भिन्न आहेत. समकालीन व्यक्ती, प्रवृत्ती, समजुती, श्रद्धा, विधिनिषेध इ. त्यांचे काव्यविषय बनले. त्यांची बहुतांश कविता विनोदी व विडंबनपर आहे. विनोद जसा रंजक तसाच भंजकही असतो, याचे प्रत्यंतर त्यांनी रेखाटलेल्या काही हास्यचित्रांतून येते. त्यांच्या काव्यात दिसणारे तत्कालीन समाजजीवनाचे वास्तव व मनोरम चित्रण तत्कालीन अन्य कोणाही कवीच्या कवितेत आढळत नाही. त्यांनी नवीन छंदरचनाही केली.

एक वास्तववादी व विडंबनकार कवी, तसेच प्रभावी पत्रकार म्हणून बंगाली साहित्यात ईश्वरचंद्रांचे स्थान महत्त्वपूर्ण आहे.

खानोलकर, गं. दे.