कृत्तिवास : (१२ जानेवारी १३९९–? १४८०). आद्य बंगाली (बाँगाली) रामायणाचा कर्ता. श्रीहर्ष ह्याच्या वंशातील एकविसावा पुरुष. उपनाव ओझा. त्याचा जन्म प. बंगालच्या चोवीस परगण्यातील फुलिया ह्या गावी ब्राह्मण कुलात झाला. गौडेश्वर ह्या राजाच्या इच्छेवरून त्याने बंगाली भाषेत श्रीराम-पाँचाली  हे सप्तकांड रामायण रचिले. ‘पाँचाली’ ह्या जुन्या बंगाली गीतप्रकाराचे अनुसरण करून, रामकथेवर रचिलेले ते एक स्वतंत्र लोककाव्य आहे. ते वाल्मीकि रामायणाचे रूपांतर नाही.  ह्या काव्यातील राम हा अस्सल बंगाली आहे. मध्ययुगीन बंगली बहुजनांच्या आशाआकांक्षा, सुखदुःखे, त्यांची रीती-नीती, त्यांचे जीवनादर्श व त्यांचे भावजीवन, हे सारे ह्या महालोककाव्यात प्रतिबिंबित झाले आहे. कृत्तिवासरचित रामायणापूर्वी बंगालमध्ये, रामकथेतील प्रसंग व व्यक्ती ह्यांची जी वर्णने स्त्रीपुरुषांकडून गायिली किंवा कथन केली जात, त्यांचेच श्रीराम-पाँचालीत परिष्कृत व रसपूर्ण पुनरावतरण झालेले आढळते. अनेक ठिकणी कृत्तिवासाने प्रयोजनपरत्वे, कालिकापुराण, अध्यात्मरामायण, अद्‌भुतरामायण  वगैरे ग्रंथांतील काही भागांच्या आधारे नवीन रचना करून, ती त्यात समाविष्ट केली आहे. सुबोध, चित्रमय व भावोत्कट अशी ह्या काव्याची शैली आहे. मार्मिक स्वभावचित्रण हे तर त्याचे खास वैशिष्ट्य आहे. सुशिक्षित व अशिक्षित ह्या दोघांच्याही अंतःकरणाची ही शैली पकड घेते. दया, दाक्षिण्य, समवेदना, स्‍नेह, प्रेम, भक्ती ह्या गुणांमुळे मानव देव बनतो त्यांच्या अभावी मानव दानव बनतो, हा विचार कृत्तिवासाने प्रस्तुत काव्यात व्यक्त केला आहे.

आजही या काव्यविषयांचे बंगाली लोकांचे प्रेम आणि आकर्षण यत्किंचितही कमी झालेले नाही. बंगाली माणसाची विशिष्ट मानसिक व नैतिक घडण बनविण्यास जे काही काव्यग्रंथ कारण झाले, त्यांत श्रीराम-पाँचाली  हे काव्य प्रमुख होय.

खानोलकर, गं. दे.