बंदोपाध्याय, हेमचंद्र : (१७ एप्रिल १८३८–२४ मे १९०३). रवींद्रपूर्व काळातील एक प्रमुख बंगाली भावकली. हुगळी जिल्ह्यातील गुलिटा राजवल्लभहाट येथे आजोळी जन्म आणि तेथेच प्राथमिक शिक्षणास प्रारंभ. नंतर कलकत्त्यातील खिदिरपूर (किदरपूर) विभागातील निवासस्थानात प्रसन्नकुमार सर्वाधिकारी यांच्याजवळ इंग्रजीचे धडे घेऊन हिंदू कॉलेजमध्ये प्रवेश. पुढे १८५६ साली कलकत्त्यास प्रेसिडेन्सी कॉलेजमध्ये शिकत असताना त्यांनी अध्यापक प्रशिक्षण परीक्षा दिली व ते प्रथम श्रेणीत आले. १८५९ साली ते बी.ए. परीक्षेत प्रथम श्रेणीत द्वितीय क्रमांकाने उत्तीर्ण झाले. १८६१ मध्ये एल्.एल्. ही कायद्याची परीक्षा ते उत्तीर्ण झाले. प्रथम त्यांनी सैनिकी महालेखापरीक्षकाच्या कचेरीत कारकुनी केली. नंतर काही काळ त्यांनी कलकत्ता प्रशिक्षण शाळेचे मुख्याध्यापक म्हणून नोकरी केली (१८५९-६१). सेरामपूर, हावडा या ठिकाणी त्यांनी काही काळ मुन्सफी केली व कायद्याची परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर कलकत्त्याच्या उच्च न्यायालयात वकिली केली. १८९० साली ते उच्च न्यायालयाचे प्रमुख सरकारी वकील झाले.

विद्यार्थिदशेपासून हेमचंद्र कविता लिहीत. त्यांच्या काव्यपिंडावर अठराव्या शतकातील बंगाली कवी ⇨भारतचंद्र यांचा व इंग्रजी स्वच्छंदतावादी कवींचा प्रभाव जाणवतो. चिंतातरंगिणी (१८६१) हे त्यांचे पहिले काव्य एका मित्राच्या व एका शेजाऱ्याच्या आत्महत्येमुळे व्यथित होऊन लिहिलेले आहे. बीरबाहू काठ्य (१८६४) या काव्यात कवीच्या जाज्ज्वल्य देशभक्तीचा प्रत्यय येतो व भाषाप्रभुत्व आणि छंदांवरील हुकमत जाणवते. कवितावलि (१८७०) हा त्यांच्या स्फुट कवितांचा संग्रह आहे. हेमचंद्र सरकारी नोकरीत असल्यामुळे त्यांची ‘भारत संगीत’ (१८७०) ही सुप्रसिध्द कविता या संग्रहातून वगळण्यात आली होती. पुढे कवितावलीच्या तिसऱ्या आवृत्तीत ती समाविष्ट करण्यात आली. वृत्रसंहार काव्य (पूर्वार्ध−१८७५,उत्तरार्ध-१८७७) या काव्यामुळे हेमचंद्राची महाकवींमध्ये गणना होऊ लागली. छायामयी (१८८०) हे काव्य त्यांनी दान्तेच्या ⇨दिव्हीना कोम्मेदीआ या महाकाव्याला अनुसरून लिहिले आहे. हूतोम पँचार गान (१८८४) व नाके खत (१८८५) ही त्यांच्या विडंबनपर हास्यकाव्याची उदाहरणे होत. हेमचंद्राच्या काळी बंगालमध्ये ब्राम्हो धर्माचा प्रचार जोरात सुरू होतो. या बाबतीतील त्यांची मते ब्राह्मोथीइझम इन इंडिया (१८६९) या पुस्तकात ग्रथित केलेली आहेत. केशवचंद्र सेन आदी ब्राह्मो धर्मप्रचारक हेमचंद्रांच्या हिंदुत्वनिष्ठेवर विवेकविरोधी  वागणुकीचा आरोप करीत. त्यांना उत्तर म्हणून हेमचंद्रांनी उपरिनिर्देष्ट पुस्तकात ब्राह्मो धर्माची मते व उपदेश यांचा परामर्श घेऊन ब्राम्हो धर्मविरोधी मते मांडली आहेत. राष्ट्रप्रेम व धर्मनिष्ठा हे हेमचंद्रांच्या व्यक्तिमत्त्वाचे व कार्याचे प्रधान पैलू होत.

चिंतातरंगिणी हे हेमचंद्राचे पहिलेच काव्य कलकत्ता विद्यापीठात पदवी परीक्षेसाठी क्रमिक पाठ्यपुस्तक म्हणून नेमण्यात आले. हेमचंद्रांच्या साहित्विक गुणवत्तेतीच ही पावती होय. प्रख्यात बंगाली महाकवी ⇨मायकेल मधुसूदन दत्त यांनी त्यांच्या मेघनादवध या महाकाव्याला प्रस्तावना लिहिण्यासाठी हेमचंद्रांना निवडले. कुशाग्र बुध्दीमत्तेमुळे हेमचंद्रांनी मधुसूदन दत्तांच्या ‘अभित्राक्षर छंदा’चे महत्त्व जाणले व त्यांचे योग्य स्वागत केले परंतु स्वतःच्या कवितेत मात्र त्यांनी असा निर्यमक प्रवाही छंद वापरला नाही. याचा एक चांगला परिणाम असा झाला, की विचित्र छंद वापरणाऱ्या मायकेल मधुसूदन दत्तांपेक्षा हेमचंद्रांना स्वतःच्या ह्यातीत जास्त लोकप्रियता लाभली. त्यांनी निगर्वीपणे केलेले नव्या छंदाचे मूल्यमापन त्यांचे द्रष्टेपण दर्शविते. जीवनाच्या अखेरीस हेमचंद्र अंध झाले होते. कलकत्ता येथे त्यांचे निधन झाले.

आलासे, वीणा