पमीस : (पमीस दगड). फेसासारखा वा स्पंजासारखा सच्छिद्र असा नैसर्गिक काचेचा खडक. हा ज्वालामुखी उद्रेकातून बाहेर पडलेल्या द्रव्यापासून तयार झालेला अग्निदलिक खडक आहे. वायुयुक्त लाव्हा भूपृष्ठावर येतो तेव्हा जवळजवळ द्रवरूप असतो. नंतर तो इतक्या जलदपणे थंड होतो की, त्यामुळे स्फटिकीभवनाला वेळच मिळत नाही आणि काच तयार होते. लाव्हा घन होत असताना त्यातील वायुरूप द्रव्ये (उदा., वाफ, वायू इ.) एकदम मुक्त होऊन बुडबुड्यांच्या रूपात बाहेर पडतात. यामुळे सर्व द्रव्य फेसाप्रमाणे फुगते व लगेच घनरूपही होते. अशा प्रकारे पमीस दगड तयार होतो. पमीस सर्व प्रकारच्या लाव्ह्यांपासून बनतो मात्र रायोलाइटी व ट्रॅकाइटी लाव्ह्यांपासून तो जास्त प्रमाणात आणि बेसाल्टी व अँडेसाइटी लाव्ह्यांपासून त्यामानाने कमी प्रमाणात निर्माण होतो. अधिक दाबाखाली अशा प्रकारे पमिसाऐवजी ज्वालाकाच बनते त्यामुळे पमीस भूवैज्ञानिक दृष्ट्या कमी वयाच्या शैलसमूहांतच आढळतो.

पमीस हा काचरूप खडक असला, तरी पुष्कळदा त्यात विशेषेकरून फेल्स्पार, ऑजाइट, हॉर्नब्लेंड व झिर्कॉन या खनिजांचे लहान स्फटिकही आढळतात. वायू बाहेर पडल्यामुळे यात गोलसर, लांबट वा नळीसारख्या पोकळ्या निर्माण झालेल्या असतात. या पोकळ्यांत कधीकधी काचेचे तंतू, पापुद्रे इ. आढळतात. तसेच कधीकधी जुन्या खडकांतील अशा पोकळ्यांत झिरपणाऱ्या पाण्याने साचलेली द्वितीयक (नंतरच्या प्रक्रियांनी तयार झालेली) खनिजेही असतात. सिलिकामय म्हणजे रायोलाइटी वा ट्रॅकाइटी पमीस नमुनेदार प्रकारचा असतो. ६० ते ७५% पमीस याच प्रकारचे असतात. त्यामुळे याच्या जोडीने ज्वालाकाचही आढळते. या पमिसाचा रंग पांढरा आणि वि. गु. २·३–२·४ असते परंतु बेसाल्टी पमीस सर्वांत हलका असतो व नुकत्याच फोडलेल्या पमिसाचा रंग डांबरासारखा काळा असतो. अँडेसाइटी पमीस मात्र पिवळा व उदी असतो.

आइसलँड, हंगेरी, प. जर्मनी, हवाई बेटे, ग्रीस, जपान, भूमध्यसागरी प्रदेश, तेनेरीफ व लिपारी बेटे तसेच भारतात पावागड (गुजरात) येथील बेसाल्टात पमीस आढळतो. शिवाय याचे लहान तुकडे जमिनीवर विस्तृत पसरलेले आढळतात. कित्येकदा सागरातील ज्वालामुखी उद्रेकात पमीस तयार होतो. नंतर कित्येक आठवडे तो पाण्यावर तरंगत राहतो व वाऱ्यांनी वा सागरी प्रवाहांनी त्याचे तुकडे दूरवर वाहून नेले जाऊन विखुरले जातात. दीर्घ काळाने पोकळ्यांत पाणी भरले जाऊन ते जलसंपृक्त होतात व बुडून तळाशी जातात. अशा तऱ्हेने पमिसाचे तुकडे सागरतळावरील चिखलात व सिंधुजैवपंकात [→ऊझ] मिसळले जातात. क्राकाटाऊ ज्वालामुखीच्या १८८३ च्या उद्रेकानंतर तेथील कित्येक चौ. किमी. क्षेत्रातील पाण्यावर पमीस पसरलेला होता. काही ठिकाणी त्याचा पाण्यावर १·५ मी. जाडीचा थर साचला होता. शिवाय पमिसाचे लहान तुकडे व धूळ हवेत बऱ्याच उंचीवर फेकली गेली व नंतर वाऱ्याने जगभर पसरली गेली. तसेच १७५६ साली पाँडिचेरीजवळ सागरात ज्वालामुखीचा उद्रेक होऊन पमीस व राख बाहेर टाकली गेली होती.

पमीस फार पूर्वीपासून खरवडणे, पॉलिश करणे इ. अपघर्षक कामांसाठी वापरात आहे. १९४५ नंतर मात्र रूळमार्गावरील खडी, बांधकामाचे पूर्वनिर्मित घटक, ओतावयाचे काँक्रीट, विटा, उष्णता व ध्वनी यांच्या निरोधनासाठी वापरण्यात येणाऱ्या फरश्या व गिलावा इत्यादींत हलका घटक पदार्थ म्हणून पमीस वापरला जाऊ लागला आहे. चूर्णरूपात किंवा बंधक (घटक एकत्रित धरून ठेवणारा पदार्थ) व याचे चूर्ण यांपासून बनविलेल्या वड्यांच्या रूपात हा अजूनही लाकूड, धातू व काच यांच्यासाठी सौम्य अपघर्षक म्हणून वापरला जातो.

अमेरिकेत व न्यूझीलंडमध्ये वाळू व मृत्तिका यांपासून कृत्रिम पमीस बनविण्यात येतो. फेस या अर्थाच्या लॅटिन शब्दावरून पमीस हे नाव पडले आहे. 

पहा: ज्वालाकाच.

ठाकूर, अ. ना.