ट्रॅकाइट : फिकट रंगाचा सूक्ष्मकणी ज्वालामुखी खडक. हा ⇨सायेनाइटाशी तुल्य असून मुख्यतः सॅनिडीन किंवा ऑलिगोक्लेज यांचा म्हणजे क्षार (अल्कली) फेल्स्पाराचा बनलेला असतो. डायोप्साइड, हॉर्नब्लेंड व अभ्रक ही अल्प प्रमाणात तर क्वॉर्ट्‌झ बहुधा नसते. मॅग्नेटाइट, इल्मेनाइट, ॲपेटाइट, झिर्‌कॉन व स्फीन ही गौण खनिजे यात असतात. लाव्हा जलद थंड व घन झाल्याने याचे वयन (पोत) सूक्ष्मकणी व काचमय असते. यात सॅनिडिनाचे मोठे स्फटिक असले, तर पृषयुक्त वयनही असते. थंड होताना लाव्ह्याचे प्रवहन झाल्यास पट्टित व प्रवाही संरचना निर्माण होतात.

ऑलिव्हीन बेसाल्टाचा लाव्हा थंड होताना प्रथम तयार होणारी ऑलिव्हीन, पायरोक्सीन वगैरे खनिजे जड असल्याने तळाशी जातात व अशा तऱ्हेने भिन्नीभवन होऊन राहिलेल्या शिलारसापासून ट्रॅकाइट बनत असावा. शिलारसात बाहेरचे पदार्थ मिसळले जाऊन म्हणजे संदूषित अशा शिलारपासून काही ट्रॅकाइट बनत असावेत. काहींच्या मते घन रूपातील ⇨अँडेसाइटांचे रासायनिक रूपांतर होऊन ट्रॅकाइट बनत असावेत. टफ आणि शिलापट्ट, भित्ती यांसारखी अंतर्वेशने (घुसलेल्या राशी) यांच्या रूपांत हा फोनोलाइट, लॅटाइट इत्यादींच्या जोडीने आढळतो. सायेनाइटाप्रमाणेच हा सर्वांत सामान्य क्षारीय खडक असून तो सर्वत्र परंतु थोड्या प्रमाणात आढळतो. इटली, पूर्व आफ्रिका, जर्मनी वगैरे भागांत याचे चांगले नमुने आढळतात.

ट्रॅकाइटात नेफ्राइट असेल तर फोनोलाइट, ल्यूसाइट असेल तर ल्यूसिटोफायर, क्षाराऐवजी सोडा फेल्स्पार अधिक असल्यास लॅटाइट आणि मोंझोनाइट, मोठ्या स्फटिकांचे प्रमाण वाढल्यास ट्रॅकाइट पॉर्फिरी व कमी झाल्यास व्हिट्रोफायर आणि सिलिका जास्त झाल्यास रायोलाइट असे खडक तयार होतात.

लहान स्फटिकांमुळे याचे ताजे पृष्ठ खडबडीत लागते. त्यामुळे खडबडीत या अर्थाच्या ट्रॅकिस या ग्रीक शब्दावरून ट्रॅकाइट हे नाव पडले.

पहा: अग्निज खडक.

 ठाकूर, अ. ना.