चॅंपियन पट्टिताश्म : धारवाड संघानंतर तयार झालेल्या व द्वीपकल्पी पट्टिताश्मांपेक्षा जुन्या अशा कर्नाटकातील पट्टिताश्मांना (रूपांतरित खडकांना) दिलेले नाव. कोलारजवळच्या सुभाजांमध्ये (सहज भंग पावणाऱ्या रूपांतरित खडकांमध्ये) ते प्रथम आढळले, त्यामुळे तेथील चॅंपियन नावाच्या सोन्याच्या धातुकाच्या (कच्च्या धातूच्या) शिरेवरून हे नाव पडले. अतिशय भरडले गेलेले सूक्ष्मकणी अभ्रकयुक्त ग्रॅनाइट पट्टिताश्म, त्यांच्याबरोबर आढळणारे इतर खडकांचे पट्टे व भरडकणी ग्रॅनाईट, पेग्मटाईट व क्वार्ट्‌झ यांच्या शिरा या सर्वांना मिळून प्रथम हे नाव दिले होते. यांतील ग्रॅनाइट मंद करड्या ते गुलाबी रंगाचा, मध्यम ते सूक्ष्मकणी, अभ्रकयुक्त व भरडलेला असून तो ग्रीजासारखा दिसतो. ओपल या खनिजासारखी चमक असणारे क्वार्ट्‌झाचे कण हे या ग्रॅनाइटाचे वैशिष्ट्ये असून फेल्स्पार, ॲपेटाईट, मॅग्नेटाइट आणि झिरकॉन ही खनिजेही त्यात असतात. क्वॉर्ट्‌झाचे असेच कण असलेले केरॅटोफायर, रायोलाइट, क्वॉर्ट्‌झ पॉर्फिरी व काही ग्रॅनाइट यांसारख्या सिकत (विपुल सिलिका असणाऱ्या) अग्निज खडकांचा चॅंपियन पट्टिताश्मात समावेश करतात.

बाबाबुदन टेकड्या, शिमोगा पट्ट्याजवळ आणि धारवाड व बल्लारी जिल्ह्यांच्या दक्षिण भागात यांचे पट्टे आढळतात. आद्य जटिल राशींमध्ये खडकांचे अंतर्वेशन झाल्याने (घुसल्याने) चॅंपियन पट्टिताश्म निर्माण झाले आहेत. त्यांच्या जिभा धारवाडी सुभजांमध्ये घुसलेल्या असल्याने ते धारवाड कालानंतरचे आणि द्वीपकल्पी पट्टिताश्मांच्या अंतर्वेशनाने त्यांच्यात खंड पडला असल्याने ते द्वीपकल्पी पट्टिताश्मांहून जुने ठरतात. ऱ्होडेशियातील माँटॉर ग्रॅनाइटाचे त्यांच्याशी साम्य आहे.

ठाकूर, अ. ना.