व्रेडेनबर्गाइट : मँगनिजाचे खनिज. अष्टफलकाला किंवा चतुष्कोणीय प्रसूचीला [→ स्फटिकविज्ञान] समांतर असलेले ⇨ पाटन चांगले असते. याचा रंग काशासारखा ते पोलादासारखा गडद करडा आणि कस गडद तपकिरी असतो. रा. सं. 3Mn3O4·2Fe2O3 (मँगॅनीज व लोखंड यांचे संयुक्त ऑक्साइड). हॉसम्नाइट, हेटीरोलाइट, फ्रँक्लिनाइट व मॅग्नेटाइट या खनिजांच्या समरूपी (रासायनिक संरचना भिन्न परंतु स्फटिकी संरचना सारखी असलेल्या) मिश्रणांनाही व्रेडेनबर्गाइट असे नाव देतात. हे तीव्र चुंबकीय असून अम्लांत पूर्णपणे विरघळते. महाराष्ट्रातील नागपूर भागात काही ठिकाणी व आंध्र प्रदेश राज्यातही काही भागांत ते आढळते.

ठाकूर, अ. ना.