समर्स्काइट : गुंतागुंतीचे रासायनिक संघटन असलेले हे खनिज विरळपणे आढळते. याचे स्फटिक समचतुर्भुजी असून ते आयताकार प्रचिनरूपात आढळतात. स्फटिकांचे फलक ( पृष्ठे ) खडबडीत असतात [→ स्फटिकविज्ञान]. मात्र सामान्यपणे हे संपुंजित व जडविल्या गेलेल्या व सपाट झालेल्या कणांच्या रूपांत आढळते. ⇨ पाटन : ( 010 ) अस्पष्ट. भंजन शंखाभ. ठिसूळ. कठिनता ५ – . वि. गु. ५.६ – .८. चमक काचेसारखी ते रेझिनासारखी भास्वर. रंग मखमली काळा ते गडद तपकिरी. कस गडद तांबूस तपकिरी. जवळजवळ अपारदर्शक [→ खनिजविज्ञान].

समर्स्काइटात कोलंबियम व टँटॅलम यांची ऑक्साइडे, तसेच विरल मृत्तिका मूलद्रव्ये, कॅल्शियम, लोह, शिसे, कथिल, टिटॅनियम व युरेनियम या इतर मूलद्रव्यांची ऑक्साइडे यांचे जटिल मिश्रण झालेले असते. यामुळे याचे रासायनिक सूत्र वेगवेगळ्या प्रकारे देतात. त्यांपैकी एक सूत्र असे आहे: ( Y, Ce, U, Ca, Fe, Pb, Th ) ( Nb, Ta, Ti, Sn )2 O6 . मात्र हे विरळाच आढळत असल्याने मोनॅझाइटासारख्या इतर जटिल खनिजांप्रमाणे यापासून विरल मृत्तिका मूलद्रव्ये मिळविता येत नाहीत. बंद नळीत तापविल्यास हे तडतडते, चकाकते, यांवरील भेगा रूंद होतात व हे काळे पडते.

समर्स्काइट हे गॅनाइट पेग्मॅटाइट या खडकांत सामान्यत: कोलंबाइटा बरोबर आढळते. याचा सर्वांत महत्त्वपूर्ण साठा ब्राझीलमध्ये असून रशिया व मादागास्कर येथेही हे आढळते. अमेरिकेत हे कोलोरॅडो, कनेक्टिकट, मेन व नॉर्थ कॅरोलायना या राज्यांत आढळते.

एकोणिसाव्या शतकातील रशियन खाण-अधिकारी एम्. फोन समर्स्की यांनी हे खनिज उरल पर्वतात शोधून काढले. म्हणून त्यांच्यावरून याचे समर्स्काइट हे नाव पडले. अँपाँगाबेइट व युरॅनोटँटॅलाइट ही याची पर्यायी नावे आहेत. लाइम विपुल असणाऱ्या याच्या प्रकाराला कॅल्शिओसमर्स्काइट, तर नॉर्वेत आढळणाऱ्या समर्स्काइट व कोलंबाइट यांच्या आंतरवृद्धीला ॲनेरोडाइट असे म्हणतात.

ठाकूर, अ. ना.