बेडूक थर : महाराष्ट्रात आढळणाऱ्या कातळाच्या म्हणजे ⇨ दक्षिण ट्रॅप खडकांच्या लाव्हा थरामध्ये काही ठिकाणी गाळाचे स्तरयुक्त खडक आढळतात, त्यांना ⇨अंतरा ट्रॅपी थर म्हणतात. मुंबईमध्ये असे काही थर आहेत. मलबार टेकडीच्या पूर्व भागात व वरळी टेकडीत आढळणारा असा थर सर्व थरांमध्ये समुद्रसपाटीपासून जास्त उंचीवर असून तो सर्वात जाड (सु. ३० मी. पेक्षा जास्त जाडीचा) आहे. असे इतर थर कमी उंचीवर आढळतात व त्यांची जाडी कमी असल्याने ते सहजपणे लक्षात येत नाहीत. मलबार टेकडी व वरळी येथे आढळणाऱ्या थरामध्ये बेडकांचे अनेक जीवाश्म (शिळारुप अवशेष) असल्याने त्याला बेडूक थर म्हणतात. या थरात शेल प्रकारचे खडक असून ते मातकट व मऊ आहेत व त्यांचा रंग पिवळसर, उदसर वा काळपट आहे. त्यांच्यापैकी कार्बनमय शेलांमध्ये काही ठिकाणी बिट्युमेन आढळते व तेथे दगडी कोळशासारख्या द्रव्याचे पापुद्र्यांसारखे पातळ पट्टे असून त्यांत खनिज राळेचे तुकडेही आढळतात.

बेडूक थराचा जास्तीत जास्त भाग ज्वालामुखी डबराचा बनलेला आहे. या थरामध्ये बेडकांच्या इंडोबॅट्रॅकस या वशांतील पुढील तीन जातीचे जीवाश्म आढळले आहेत: इंडोबॅट्रॅकस प्युसिलस, इं. ट्रिव्हिएलीस व इं. मलबारिकस. बेंडकाची काही मोठ्या आकारमानाची सुटी हाडेही येथे आढळली होती व त्यावरून बेडकाची आणखी एक मोठी जाती येथे असावी, हे सिद्ध होते येथील बेडकाच्या जीवाश्मंतील सांगाडे पूर्ण स्वरूपात व चांगल्या अवस्थेत टिकून राहिले असल्याने मेलेल्या ठिकाणीच त्यांची शरीरे गाडली गेली असल्याचे स्पष्ट होते. मुंबईत या व अन्य अंतरा ट्रपी थरांमध्ये याशिवाय अन्य प्राण्याचे व वेगवेगळ्या वनस्पतीचे जीवाश्मही आढळतात. गोड्या पाण्यातील कूर्म (हायड्रॅस्पिस लाइथी) व सायप्रीड प्रकारचे ऑस्ट्रॅकॉड यांचे, तसेच गॅमॅसस फॉसिलिस या माइटाचे चांगले जीवाश्म आणि कीटकांचे अर्धवट असे आणि विशेष चांगल्या प्रकारे टिकून न राहिलेले मृदूकाय प्राण्यांचे जीवाश्मही या थरांमध्ये आढळले आहेत. निरनिराळ्या जांतीच्या वनस्पतींची पाने, फुले, खोडे व क्वचित मुळे यांचेही जीवाश्म (कधीकधी ठशांच्या रूपात) त्यांच्यात आढळले आहेत, मात्र ते चांगले टिकून राहिलेले नाहीत. बेडूक थरातील खडक हे उथळ दलदलीत निर्माण झाले असावेत, असे अनुमान या सर्व जीवाश्मवरून करता येते. शिवाय हे गाळाचे खडक व त्यांच्याशी संबंधित असलेले ज्वालामूखी खडकांचे थर पॅलिओसीन (सु. ६.५ ते ५.५ कोटी वर्षापूर्वीच्या)काळातील असावेत, असा अंदाज जीवाश्मवरून करण्यात आला आहे. मुंबईमधील वाढत्या घरबांधणीमुळे बेडूक थर व तेथील अन्य अंतरा ट्रपी थर यांचेद दृश्यांश (उघडे पडलेले भाग) दुर्मिळ होत चालले आहेत.

ठाकूर, अ. ना.