फ्ल्युओराइटाचे स्फटिक

फ्ल्युओराइट : (फ्ल्युओरस्पार, डर्बिशरस्पार). खनिज. स्फटिक घनीय, पुष्कळदा घनाकार, कधीकधी अष्टफलक, द्वादशफलक आणि घन व चतुःषट्फलकांचे संयोग झालेले असतात. सामान्यतः अन्योन्यवेशी (एकमेकांत घुसलेले) जुळे स्फटिक आढळतात [⟶ स्फटिकविज्ञान]. कधीकधी संपुजित वा कणमय राशींच्या व क्वचित तंतुमय वा स्तंभाकार रूपात हे आढळते. ⇨ पाटन : (111) उत्कृष्ट.भंजन सपाट ते शंखाभ. ठिसूळ. कठिनता ४ [मोस कठिनता मापक्रमातील चवथा क्रमांक ⟶ कठिनता] . वि. गु. ३·१८-३·२०. रंग पांढरा, जांभळा, हिरवा, पिवळा, निळा, तपकिरी क्वचित तांबडा अथवा गुलाबी. कधीकधी एकाच स्फटिकामध्ये निरनिराळ्या रंगांचे पट्टे असतात. रंग मँगॅनीज, लोह यासांरख्या मलद्रव्यामुळे, हायड्रोकार्बनांच्या समाविष्टांमुळे वा स्फटिकातील आणवीय मांडणीतील दोषांमुळे आलेला असतो. कस पांढरा. पारदर्शक ते दुधी काचेप्रमाणे पारभासी. जंबुपार (दृश्य वर्णपटातील जांभळ्या रंगापलीकडील अदृश्य) किरण याच्या काही प्रकारांवर पडल्यास ते अनुस्फुरित होतात म्हणजे त्यांतून निळा-हिरवा प्रकाश बाहेर टाकला जातो (या गुणधर्मावरूनच ‘फ्ल्युओरेसेन्स’ म्हणजे अनुस्फरण ही संज्ञा आली आहे). याचा क्लोरोफेन हा प्रकार औष्णिक दीप्त आहे म्हणजे तो तापविला असता त्यातून तेजस्वी हिरवा प्रकाश बाहेर पडतो. हे विद्युत् संवाहक नाही. याचा वितळबिंदू १,३५०° से. आहे. रा. सं. CeF2. यामध्ये कॅल्शियमाच्या जागी २० टक्क्यांपर्यंत इट्रियम वा सिरियम आलेले असते. शिवाय यामध्ये पाणी, बिट्युमेनी द्रव्य व वायू यांनी भरलेल्या सूक्ष्म पोकळ्या असतात. हे सामान्य व सर्वत्र आढळणारे आणि फ्ल्युओरिनाचे सर्वांत विपुलपणे आढळणारे खनिज आहे. जलपातीय (उच्च तापमानाच्या पाण्याच्या क्रियेने बनलेल्या) विशेषतः कथिल, शिसे व चांदी यांच्या खनिजांच्या शिरांत हे तोरमल्ली, पुष्कराज, लेपिडोलाइट, ॲपेटाइट, कॅसिटेराइट, गॅलेना, क्वॉर्ट्‌झ इत्यादींच्या बरोबर आढळते. शिवाय गाळाच्या व ज्वालामुखी खंडकामधील पोकळ्यांत, चुनखडक व संगमरवर यांमध्ये, उन्हाळी असलेल्या भागात आणि गौण खनिज म्हणून ग्रॅनाइट, ग्रॅनाइट पेग्मटाइट व नेफेलीन सायेनाइट या अग्निज खडकांतही फ्ल्युओराइट आढळते. मेक्सिको, कॅनडा, अमेरिका, रशिया, फ्रान्स स्पेन, चीन, इंग्लड, जर्मनी इ. भागांत हे आढळते. भारतात गुजरात(छोटा उदेपूर, आंबेगाव), मध्यप्रदेश (खैरगड, रेवा, छिंदवाडा, द्रुग, जबलपूर), बिहार (छोटा नागपूर, शहाबाद) काश्मीर (सतलज खोरे), आंध्रप्रदेश (नेल्लोर, गुंतूर), राजस्थान (डुंगरपूर, जोधपूर, इडर), कर्नाटक, पंजाब व तमिळनाडू या भागांत अल्प प्रमाणात फ्ल्युओराइट आढळते. महाराष्ट्रात भंडारा जिल्ह्यात थोडेसे फ्ल्युओराइट सापडते.

फ्ल्युओरीन व हायड्रोफ्ल्युओरिक अम्ल मिळविण्यासाठी, तसेच दुधी काच व चिनी मातीच्या भांड्यांचे एनॅमल बनविण्यासाठी हे वापरतात. ॲल्युमिनियम, पोलाद यांच्या निर्मितीत तसेच सोने, चांदी, तांबे व शिसे या धातू गाळताना अभिवाह (धातूची तरलता म्हणजे पातळपणा वाढविण्यासाठी वापरावयाचा पदार्थ) म्हणून, विशिष्ट प्रकारच्या इंधनाच्या निर्मितीत उत्प्रेरक (विक्रियेत भाग न घेता तिची गती बदलणारा पदार्थ) म्हणून, ॲल्युमिनियम फ्ल्युओराइट (कृत्रिम क्रायोलाइट) बनविण्यासाठी, एमरी चक्रात, विद्युत् वितळजोडकामात, विशिष्ट सिमेंटात, पिण्याच्या पाण्यात टाकण्यासाठी, दंतधावनात आणि क्वचित रत्न म्हणून फ्ल्युओराइट वापरले जाते. याचा पारदर्शक प्रकार भिंगे, लोलक इ. वस्तू बनविण्यासाठी व डर्बिशरमध्ये आढळणारा जांभळा पट्टेदार ‘ब्ल्यू जॉन’ हा प्रकार शोभिवंत वस्तू (बश्या, पात्रे इ.) बनविण्यास वापरतात. याच्याबरोबर आढळणाऱ्या इतर खनिजांच्या मानाने हे सहज वितळत असल्याने ‘वाहणे’ या अर्थाच्या लॅटिन शब्दावरून याचे फ्ल्युओराइट हे नाव पडले आहे. डर्बिशर येथे हे विपुल आढळत असल्याने त्याला डर्बिशरस्पार असेही नाव पडले आहे.

पहा : फ्ल्युओरीन.

ठाकूर, अ. ना.