ॲनहायड्राइट : खनिज. स्फटिक समचतुर्भुजी, जाड वडीसारखे किंवा ब अक्षाला समांतर असलेले प्रचिन [→ स्फटिकविज्ञान]. जुळे स्फटिकही आढळतात. हे खनिज सामान्यत: संपुंजित किंवा स्फटिकमय व नियमित किंवा अनियमित राशींच्या स्वरूपात व कधीकधी तंतुमय, पत्रित (पापुद्र्यांच्या) किंवा कणमय पुंजाच्या स्वरूपातही आढळते. पाटन : (001) उत्कृष्ट, (010) स्पष्ट, (100) एकंदरीत स्पष्ट [→ पाटन]. या तीन पाटनांच्या दिशा एकमेकींशी काटकोनात असल्यामुळे यांच्या राशी घनीय पाटन असलेल्या घनीय खनिजाच्या राशीसारख्या दिसतात. भंजन अनियमित. कधीकधी याचे ढलपीसारखे तुकडे निघतात. ठिसूळ. कठिनता ३–३·५ वि.गु. २·९०–२·९८. चमक मोत्यासारखी, काचेसारखी, किंचित चरबीसारखी. रंग पांढरा, किंचित करडा, फिकट निळसर, लालसर, विटकरी. कस पांढरा [→ खनिजविज्ञान]. रा.सं. CaSO4. ॲनहायड्राइट हे मुख्यत: गाळांच्या खडकांत, विशेषत: चुनखडकाचे व सैंधवाचे थर असलेल्या खडकांत आणि पुष्कळदा जिप्समाच्या जोडीने आढळते. नाव निर्जल या अर्थाच्या ग्रीक शब्दावरून पडले आहे.

ठाकूर, अ. ना.