गार्नेटचे स्फटिक

गार्नेट गट : खनिजांच्या एका गटाचे नाव. यांचे स्फटिक घनीय समुहातील, सामान्यतः द्वादशफलकाकार (आ. क) किंवा समलंब फलकाकार (आ. ख) किंवा या दोहोंच्या संयोजनाने तयार झालेले (आ. ग आणि घ) असतात. स्फटिकांची वाढ सामान्यतः चांगली झालेली असते. कधीकधी ही खनिजे गोल कणांच्या स्वरूपात आढळतात. हे कण सुटे असतात किंवा संपुंजित राशींच्या स्वरूपात असतात. रंग सामान्यतः तांबडा, गडद तांबडा किंवा डाळिंबी असतो. क्वचित तो इतर प्रकारचाही असतो. पारदर्शक ते दुधी काचेसारखे पारभासी. चमक काचेसारखी ते राळेसारखी. कस पांढरा. कठिनता ६·५ ते ७·५ वि. गु. ३·५ ते ४·३. रा. सं. गार्नेटे ही सिलिकेट असून त्यांचे सामान्य सूत्र A3B2(SiO4)3 असे असते. यातील A म्हणजे कॅल्शियम, मॅग्नेशियम, फेरस (ज्याची संयुजा म्हणजे इतर अणूंशी संयोग पावण्याची क्षमता दर्शविणारा अंक, दोन आहे असे) लोह किंवा मँगॅनीज असते व B म्हणजे ॲल्युमिनियम, फेरिक (ज्याची संयुजा तीन आहे असे) लोह, क्रोमियम किंवा टिटॅनियम असते. बहुतेक गार्नेटे या उल्लेख केलेल्या घटकांची कमीअधिक प्रमाणात मिश्रणे असतात.

गार्नेटाचे प्रकार : या गटात पुढील प्रकार आढळतात.

(१)पायरोप : Mg3Al2(SiO4)3. वि. गु. ३·५१. याच्या रासायनिक संघटनेत बहुधा कॅल्शियम व लोहही असतात. रंग गडद तांबडा ते जवळजवळ काळा असतो. बऱ्याच वेळा पारदर्शक असते. याच्या चांगल्या नमुन्यांचा रत्न म्हणून उपयोग होतो. अग्नीसारखा या अर्थाच्या ग्रीक शब्दावरून पायरोप नाव पडले.

(२) अल्मंडाइट : Fe3Al2(SiO4)3. वि.गु. ४·२५. ॲल्युमिनियमाच्या जागी फेरिक लोह व फेरस लोहाच्या जागी मॅग्नेशियम येऊ शकते. मौल्यवान अल्मंडाइटाचा रंग गडद तांबडा असतो. ते रत्न म्हणून वापरले जाते. साध्या प्रकारच्या अल्मंडाइटाचा रंग तपकिरी तांबडा असतो. मौल्यवान प्रकार पारदर्शक तर साधा पारभासी असतो. अलाबंडा या ठिकाणी प्राचीन काळी गार्नेट कापून पैलू पाडून त्यांना झिलई देत. त्यावरून अल्मंडाइट हे नाव आले. दोन भाग पायरोपाचे व एक भाग अल्मंडाइटाचा असे रासायनिक संघटन असलेल्या फिकट गुलाबी अथवा जांभळ्या गार्नेटाला रोडोलाइट असे म्हणतात.

(३) स्पेसर्टाइट : Mn3Al2(SiO4)3. वि. गु. ४·१८. सामान्यतः मँगॅनिजाच्या जागी काही प्रमाणात फेरस लोह व ॲल्युमिनियामाच्या जागी काही फेरिक लोह आलेले असते. रंग तपकिरी ते तांबडा असतो.

(४) ग्रॉसुलराइट : Ca3Al2(SiO4)3. वि. गु. ३·५३. यालाच एसोनाइट व सिनॅमोनस्टोन असेही म्हणतात. बहुधा कॅल्शियमाच्या जागी फेरस लोह व ॲल्युमिनियामाच्या जागी फेरिक लोह आलेले असते. रंग पांढरा, हिरवा, पिवळा, दालचिनीसारखा तपकिरी फिकट लाल. या गार्नेटाच्या प्रथम आढळलेल्या नमुन्याचा रंग गूजबेरीसारखा फिकट हिरवा आढळला. त्यामुळे गूजबेरीच्या वनस्पतिशास्त्रीय नावावरून ग्रॉसुलराइट हे नाव पडले.

(५) अँड्राडाइट : Ca3Fe2(SiO4)3. वि. गु. ३·७५. सामान्यतः विपुल आढळणारा गार्नेट. फेरिक लोहाच्या जागी ॲल्युमिनियम व कॅल्शियमाच्या जागी फेरस लोह, मँगॅनीज व मॅग्नेशियम येऊ शकते. याचे स्फटिक फिकट ते गडद पिवळे, हिरवे, तपकिरी व काळे असतात. पोर्तुगीज खनिजवैज्ञानिक डी’ अँड्रादा यांच्या नावावरून अँड्राडाइट नाव पडले. काळ्या रंगाच्या अँड्राडाइटाला मेलॅनाइट व तेजस्वी चमक असणाऱ्या हिरव्या मौल्यवान अँड्राडाइटाला डेमंटॉइड असे म्हणतात.

(६) युव्हॅरोव्हाइट : Ca3Cr2(SiO4)3. वि. गु. ३·७७. याचा रंग पाचूसारखा हिरवा असतो. काउंट युर्व्हेरोव्ह यांच्या नावावरून हे नाव पडले. 

रंग, स्फटिकांचे घनीय आकार व कठिनता यांच्यावरून गार्नेटे इतर खनिजांपासून वेगळी ओळखता येतात. तसेच वि. गु. प्रणमनांक (प्रकाशकिरण एका माध्यमातून दुसर्‍या माध्यमात जाताना त्याच्या दिशेत होणार्‍या बदलाचे मान दर्शविणारा अंक) आणि आणवीय एककांचे आकारमान यांच्यावरून या गटातील भिन्न प्रकार वेगळे ओळखता येतात.

आंतरिक संरचना : गार्नेटाच्या संरचनेत विभक्त SiO4 चतुष्फलक असतात. हे चतुष्फलक एकमेकांना आयनी बंधाने (विरुद्ध विद्युत् भार असणाऱ्या आयनांमधील म्हणजे विद्युत् भारित अणू, रेणू व अणुगट यांतील, रासायनिक बंधाने) म्हणजे ऑक्सिजन-ऋणायन-ऑक्सिजन अशा प्रकाराने जोडलेले असतात (ऋणायन म्हणजे ऋण विद्युत् अग्राकडे जाणारा धन विद्युत् भारित आयन). त्यांच्या संरचनेत दोन भिन्न अशा ऋणायनांच्या संरचनात्मक जागा दोन वेगळ्या प्रकारांच्या ऋणायनांनी व्यापलेल्या असतात. या दोन जागांपैकी A ही एक जागा सामान्यतः सापेक्षतः मोठ्या द्विसंयुजी (संयुजा दोन असणाऱ्या) आयनाने व्यापलेली असते व दुसरी B ही जागा लहान त्रिसंयुजी आयनाने व्यापलेली असते [यामुळे गार्नेट गटातील खनिजांचे वर उल्लेख केलेले सर्वसाधारण सूत्र A3B2(SiO4)3 असे होते]. ही संरचना (100) आणि (111)प्रतले निर्माण करणाऱ्या अणूंची संख्या कमी असणारी असते म्हणून घनीय षडष्टकफलकीय स्फटिकांत नेहमी विपुल असणारे घनफलक वा अष्टफलक गार्नेटामध्ये क्वचितच आढळतात. त्यांच्या स्फटिकांच्या आकारांमध्ये असामान्य एकरूपता आढळते. गार्नेट गटाची खनिजे समसंरचनात्मक प्रकाराच्या खनिजांची उत्कृष्ट उदाहरणे आहेत. त्यांच्या संरचनेच्या साच्यात ऋणायनांच्या A स्थानी मॅग्नेशियम, फेरस लोह किंवा द्विसंयुगी मँगॅनीज असून त्याची इतर दोहोंनी सुलभतेने व पूर्णपणे प्रतिष्ठापना (एकाच्या ठिकाणी दुसरे मूलद्रव्य येण्याची क्रिया) होते. A स्थानी क्वचित कॅल्शियम असते आणि B स्थानी ॲल्युमिनियम, फेरिक लोह किंवा क्रोमियम असून त्याची इतर दोहोंनी मर्यादित स्वरूपात अदलाबदल होते. A जागेतील ऋणायनावरून A स्थानी (१) कॅल्शियम असणारे आणि (२)  मॅग्नेशियम, फेरस लोह किंवा द्विसंयुजी मँगॅनीज असणारे असे गार्नेटाचे दोन वर्ग होतात. एक वर्ग पायरालस्पाइट-यात पायरोप (Mg, Al), अल्मंडाइट (Fe, Al) व स्पेसर्टाइट (Mn, Al) हे आणि दुसरा वर्ग युग्रांडाइट – यात युव्हॅरोव्हाइट (Ca, Cr), ग्रॉसुलराइट (Ca, Al) व अँड्राडाइट (Ca, Fe) अशी गार्नेटे आढळतात. B जागेतील ऋणायनावरून ॲल्युमिनियमयुक्त, फेरिक लोहयुक्त व क्रोमियमयुक्त असे तीन वर्ग पडतात. काही गार्नेटांतील SiO4च्या जागी (OH)4 हे मर्यादित प्रमाणात येऊ शकते. अशा गार्नेटांना हायड्रोगार्नेटे असे म्हणतात. मेलॅनाइट या गार्नेटामध्ये B स्थानी टिटॅनियम असताना A स्थानी कॅल्शियमाच्या ऐवजी सोडियम येणे शक्य असते [→ स्फटिकविज्ञान].

आढळ व उपयोग: गार्नेटे मुख्यत्वेकरून रूपांतरित (दाब व तापमानात बदल होऊन तयार झालेल्या) खडकांत व गौण खनिज म्हणून काही अग्निज खडकांत आढळतात. अभ्रकी आणि हॉर्नब्लेंडी सुभाजा (सहज भंगणारे खडक) व पट्टिताश्म या रूपांतरित खडकांत ती विशेषकरून आढळतात. पेग्मटाइटांमध्ये आणि अगदी क्वचित ग्रॅनाइटी खडकांतही ती सापडतात. ग्रॉसुलराइट मुख्यत्वेकरून संस्पर्शी (अग्निज राशीच्या सान्निध्यामुळे होणाऱ्या) रूपांतरणाने अथवा प्रादेशिक रूपांतरणाने तयार होणाऱ्या स्फटिकी चुनखडकांत आढळते. अल्मंडाइट विशेषतः अभ्रकी सुभाजात असते. पायरोप पेरिडोटाइटात किंवा त्याच्या रूपांतरणाने तयार झालेल्या सर्पेंटाइनामध्ये सापडते. स्पेसर्टाइट हे रायोलाइट या अग्निज खडकात आढळते. मेलॅनाइटदेखील काही अग्निज खडकांत सापडते. क्रोमाइटाबरोबर आढळणाऱ्या सर्पेंटाइनामध्ये युव्हॅरोव्हाइट आढळते. बऱ्याच वेळा गोलसर भरड गार्नेटे व गार्नेटांचे गोल झालेले कण नदीनाल्यांच्या प्रवाहांच्या आणि समुद्राच्या वाळूत आढळतात. ज्यांचा रत्न म्हणून उपयोग होईल अशा प्रकारचे अल्मंडाइट उत्तर भारत, श्रीलंका आणि ब्राझील येथे सापडते. रत्नांच्या दर्जाचे पायरोप हे ऑलिव्हिनाबरोबर (पेरिडोटाबरोबर) अमेरिकेत उटा व ॲरिझोना राज्यांत तसेच बोहमियामध्ये मेरोनिझजवळ सापडते. ग्रॉसुलराइटाचे एसोनाइट अथवा सिनॅमोनस्टोन हे प्रकार श्रीलंकेमध्ये मिळतात. मौल्यवान रत्नांच्या प्रतीची गार्नेटे भारतात मुख्यत्वेकरून राजस्थानात किशनगढ, जयपूर व मेवाड यांच्या आसपास आंध्र प्रदेशात नेलोरजवळ व तमिळनाडूतील तिनेवेल्लीजवळ आढळतात.

चांगल्या पारदर्शक गार्नेटांचा मुख्य उपयोग स्वस्त रत्ने म्हणून होतो. हलक्या प्रतीची गार्नेटे अपघर्षक (घासून व खरवडून पृष्ठ गुळगुळीत करण्यासाठी वापरला जाणारा पदार्थ) म्हणून वापरतात. १९७० साली भारतात अपघर्षक गार्नेटाचे ९८६ टन (सु. ३९,००० रु.) आणि रत्न गार्नेटाचे ४,४८३ किग्रॅ.  (३१,००० रु.) उत्पादन झाले. गार्नेट हे नाव कणासारखा या अर्थाच्या ग्रॅनाटस या लॅटिन शब्दावरून पडले आहे.

आगस्ते, र. पां.